Tuesday, March 31, 2015

ती पोलादराणी

वैयक्तिक खेळामध्ये तेथे मदानात तुम्ही एकटेच असता. स्टेडियमच्या तीव्र प्रकाशझोताखाली आजूबाजूला हजारो प्रेक्षक असतात. समोर तुमचा प्रतिस्पर्धी असतो. परंतु तुम्ही कोणाशीही बोलू शकत नाही. तुमच्या मार्गदर्शकाशीही. तुम्हाला कोणाचीच मदत नसते. सगळा खेळ तुम्हाला एकटय़ालाच खेळायचा असतो. सगळे निर्णय एकटय़ालाच घ्यायचे असतात. आंद्रे आगासी त्याच्या आत्मचरित्रात ज्या एकलेपणाचा उल्लेख करतो ते हेच. त्या प्रचंड दडपणाखाली एखादा क्रीडापटू वैयक्तिक खेळातील सर्वोच्च स्थान संपादन करतो तेव्हा ते यश तेवढेच मोठे असते. सायना नेहवाल - भारताची अव्वल बॅडिमटनपटू - जागतिक क्रमवारीतही अव्वल ठरते, भारतीय खुल्या सुपर-सीरिज स्पर्धेची विजेती ठरते, तेव्हा ते यश देशाने सणासारखे साजरे करावे असेच असते. याची कारणे दोन. एक तर ती मुलगी, या खेळातील असा बहुमान मिळवणारी पहिलीच महिला खेळाडू आहे म्हणून आणि त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे हे यश मिळविण्यासाठी तिने जे कष्ट केले, जो संघर्ष केला तो प्रत्येकालाच प्रेरणादायी ठरावा असा आहे म्हणून. कोणत्याही दोन खेळांची आणि त्यातील यशापयशाची तुलना करता कामा नये. परंतु तरीही विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव झाल्यामुळे सर्व देशावर उगाचच पसरलेल्या उदासीनतेच्या ढगांना हटविण्यासाठी बॅडिमटनमधील तिचे हे यश कामास आले, हेही एक कारण तिच्या विजयाचे ढोलताशे वाजविण्यासाठी पुरेसे आहे. जागतिक महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या देशाच्या नजरेसमोर अधूनमधून असे काही मिरवावेसे आले नाही, तर या देशाची मानसिकता दुभंगत्वाकडेच जाईल. सायनासारख्यांचे यश म्हणून अतिशय महत्त्वाचे ठरते. वर म्हटल्याप्रमाणे हे यश काही सहजी प्राप्त झालेले नाही. सायना बॅडिमटनची फुले उडविते म्हणून तिला फुलराणी म्हटले जाते. पण या फुलराणीचे काळीज पोलादाचे आहे, हे तिने आता सिद्ध करून दाखविले आहे. नाही तर गेल्या वर्षीच्या जूनमधील जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेतील पराभवाने ती संपलीच होती.. म्हणजे तसे तिचे टीकाकार म्हणू लागले होते. सानिया मिर्झाचे टेनिसमध्ये काहीसे असेच झाले होते. दुखापती होत्याच, पण मनावरही काळोख दाटून आला होता. त्या कसोटीच्या क्षणी तिने एक निर्णय घेतला. आपले आजवरचे प्रशिक्षक गोपीचंद यांच्या ऐवजी ती बंगळुरूला प्रकाश पदुकोण अकादमीत विमल कुमार यांच्याकडे धडे घेण्यास गेली. या निर्णयाने तिच्यावर टीकाही झाली. परंतु तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. जागतिक क्रमवारीतील आघाडीच्या खेळाडूंसमोर खेळताना येणारे दडपण झुगारून लावणे हे तिच्यापुढील सर्वात मोठे आव्हान होते. ते किती मोठे होते याचा अंदाज काही दिवसांपूर्वीच झालेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत आला होता. तेथे स्पेनच्या कॅरोलिना मारिनसमोर दुसऱ्या गेमपासून तिचा खेळ जो ढासळला तो सावरलाच नाही. तिच्या मनाने जणू आधीच तो पराभव मान्य केला होता, अशा पद्धतीने ती खेळत होती. खेळ कारकीर्दीच्या या टप्प्यावर कोणताही खेळाडू कोसळूनच गेला असता. सायना सावरली. जिंकली. अव्वल ठरली. आपल्यातले पोलाद तिने सिद्ध केले. तिची ही झुंज, हे यश अन्य कोणत्याही विश्वचषकाहून प्रेरणादायी आहे.

- लोकसत्ता (संपादकीय, अन्वयार्थ)
दि. ३१/०३/२०१५, मंगळवार

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...