Thursday, March 26, 2015


आपण जो मुंबईचा इतिहास वाचतो तो प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी, प्रवासी इत्यादींनी लिहिलेला आहे परंतु ह्या इतिहासात काही गोष्टी नमूद करण्याचे टाळलेले दिसते. कदाचित त्या गोष्टी ब्रिटीशांच्या लेखी तेव्हा महत्वाच्या नसाव्यात. अश्याच गाळलेल्या गोष्टी वाचायचा (reading between the lines)/ समजून घ्यायचा प्रयत्न आजच्या लेखात करीत आहे.
----------
पोर्तुगीज भारतात आले होते ते ख्रिस्ती लोकांच्या आणि मसाल्यांच्या पदार्थांच्या शोधात. त्यामुळे धर्मप्रसार हा प्रमुख अजेंडा आणि समुद्री व्यापारावर वर्चस्व हा दुसरा. ब्रिटिशांसाठीदेखील हिंदी महासागरातील समुद्री व्यापारावरील वर्चस्व महत्वाचे होतेच, परंतु ते वर्चस्व स्थापन करण्यासाठी एक स्वतंत्र base असणे त्याहूनही महत्वाचे होते. आणि तीच संधी कॅथरीना आणि दुसऱ्या चार्लसच्या विवाहाच्या निमित्ताने इंग्रजांना मिळाली… मुंबईच्या इतिहासातील हि कलाटणी देणारी घटना होती कारण इथून मुंबईत 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' ह्या म्हणीचा वारंवार प्रत्यय येऊ लागला. तो असा, म्हणजे मुंबईची मूळ बेटे इथल्या कोळी जमातीच्या मालकीची (hereditary rights), त्यातले बॉम्बे बेट बाहेरून आलेल्या पोर्तुगीजांनी त्यांच्याचसारख्या बाहेरून आलेल्या इंग्रजांना भेट म्हणून देऊन टाकले. आणि पुढे आणखी सात वर्षानंतर इंग्रजांनी बॉम्बे बेट, इस्ट इंडिया कंपनीकडे दिले. ह्या दोन्ही, किंबहुना ह्यानंतर झालेल्या कोणत्याही जागेसंबंधीच्या transactions मध्ये मुंबईतल्या मूळ कोळी जमातीला, ज्यांचा इथल्या जागांवर भारताच्या घटनेतदेखील उल्लेखित केलेला hereditary right आहे, त्यांना सामावून घेतलेच गेले नाही.
इस्ट इंडिया कंपनीकडे बॉम्बे बेटाचा ताबा आल्यानंतर मुंबईतील 'colonial डेव्हलपमेंटला' सुरुवात झाली. हि डेव्हलपमेंट म्हणजे बॉम्बे बेटावरील पोर्तुगुजांनी बांधलेल्या बॉम्बे कॅसल भोवती तटबंदी, जेट्टी, कोठार आणि कस्टम हाउसची निर्मिती. ह्या काळातील इस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काही महत्वाच्या नोंदी करून ठेवल्या आहेत त्यात प्रामुख्याने बॉम्बे बेटाचे स्वरूप, इथले 'त्यांच्या' आरोग्यास हानिकारक असे वातावरण आणि इथल्या कोळी गावठाणांबद्दल नोंदी आहेत. त्यातील महत्वाची नोंद म्हणजे इथले वातावरण आणि त्याचा इथे येणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या आयुर्मानावर होणारा विपरीत परिणाम… मुंबईत येउन गेलेल्या ब्रिटीश अधिकारी/ सैनिक इत्यादींचे सरासरी आयुर्मान तीन महिने असल्याचे ह्या नोंदींमध्ये नमूद केलेले आहे. इतके कमी आयुर्मान आणि कमी मनुष्यबळ (कारण सुरुवातीला काही बोटी भरभरून इथे राज्य करण्यासाठी इंग्रज आले नव्हते) बरोबर असताना, इथल्या निर्मिती प्रक्रियेत स्थानिक लोकांची मदत नक्कीच घेतली गेली असावी. नंतरच्या काळातील मुंबईच्या निर्मिती प्रक्रियेतील भारतीयांच्या सहभागाबद्दल नोंदी आहेत. त्याच आधारावर स्थानिक कोळ्यांकडे असलेल्या मुंबई परिसर, अरबी समुद्र आणि समुद्री व्यापारातील इत्यंभूत माहिती तसेच इमारत बांधणी आणि जहाज बांधणी प्रक्रियेतील बरीचशी कामे स्वतःच करण्याचे कौशल्य असे महत्वाचे गुण असताना, सुरुवातीच्या काळात देखील मुंबईच्या निर्मिती प्रक्रियेत इथल्या स्थानिकांचा सहभाग असावा असे अनुमान काढता येईल. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घेता येईल ती म्हणजे, ह्या काळात भारतातील इतर मागासलेल्या भागांतून गुलाम म्हणून लोकं नेली जात असताना मुंबई व आजूबाजूच्या परिसरातून धर्मांतर केल्यानंतरही कुणाला गुलाम म्हणून नेल्याच्या नोंदी नाहीत. ह्याचे कारण स्थानिक लोकांकडे असलेल्या कौशल्याचा पोर्तुगीजांना किंवा ब्रिटीशांना इथे पाय रोवण्यात फायदाच झाला.
Reclamation: ब्रिटिशांनी बॉम्बे बेटानंतर साधारण १७व्या शतकाच्या शेवटी माझगाव बेट पोर्तुगीजांकडून मिळविले आणि reclamation द्वारे बॉम्बे बेटाशी जोडले. बॉम्बे आणि माझगाव बेटांमधील reclamation तसे सोपे होते कारण दोन्ही बेटांच्या मध्ये उमरखाडी नावाची कमी खोलीची, ओहोटीच्या वेळी चालत पार करता येऊ शकेल अशी खाडी होती (आजही ह्या भागाचे नाव उमरखाडीच आहे). त्यानंतर टप्प्या-टप्प्याने वरळी, शिवडी, माहिम, ओल्ड वुमन्स आयलंड आणि कुलाबा बेटे मिळविली. ह्यापैकी बॉम्बे आणि वरळी बेटांमधील विस्तीर्ण खाडी बुजवून १७८२ ते १७८४ ह्या दोन वर्षाच्या काळात केलेले reclamation, 'The Great Breach' (म्हणजेच आताचा ब्रीच कॅन्डी भाग) अतिशय महत्वाचे होते, कारण ह्या reclamationमुळे फक्त बॉम्बे, माझगाव आणि वरळी ही तीन बेटेच जोडली गेली नाही तर जवळपास ४०० एकर्सचा भूभाग तयार झाला... ह्या मोठ्या reclamation मुळे ब्रिटीशांसाठी समुद्री व्यापारावरील वर्चस्वासाठी एक base तर तयार झाला पण त्यामध्ये बॉम्बे, माझगाव आणि वरळी बेटांच्या आतील बाजूस असलेल्या कोळीवाड्यांचा हकनाक बळी गेला. समुद्रच न राहिल्यामुळे व्यवसायाचा स्त्रोतच नाहीसा झाला… पुढे जवळपास २०० वर्षे सुरु असलेली मुंबईतील विविध reclamation's हि मुंबईच्या किनारपट्टीशी केलेली negotiations होती, त्यात किनारपट्टी तर बदललीच पण प्रत्येक reclamation बरोबर इथले कोळीवाडे आणि गावठाणे नामशेष होत गेली… तर काही नावापुरती उरली.
१७९६ मध्ये कुलाब्याला cantonment म्हणून घोषित केले गेले आणि इथला कोळीवाडा आक्रसला गेला. १८३८ मध्ये बॉम्बे बेटाशी जोडण्याकरिता कुलाबा कॉजवे बांधला गेला आणि आधीच आक्रसून गेलेला कुलाबा कोळीवाडा विभागाला गेला. आजही कुलाबा कोळीवाडा cantonmentला अगदी खेटून उभा आहे तर कॉजवेमुळे विभागल्या गेलेल्या मुळच्या कुलाबा कोळीवाड्याच्याच एका भागावर आज कफ परेडचा कोळीवाडा किंवा मच्छीमार नगर वसलेले आहे. सात बेटांच्या मुंबईच्या निर्माण प्रक्रियेत अनेक गावठाणे आणि कोळीवाडे नामशेष होत होते त्याला अपवाद फक्त माहीम 'कॉजवे'... १८४५ मध्ये बॉम्बे आणि साष्टी बेटावरील बांद्रा जोडण्याकरिता कुलाबा कॉजवेप्रमाणे माहीम कॉजवेची निर्मिती केली गेली. माहीम कॉजवेच्या निर्मितीसाठी लेडी जमशेटजी जीजीभॉय ह्यांनी उदारहस्ते मदत केली परंतु ती करतानाच त्यांनी 'माहीम काजवे' ह्या वाटेतल्या कोळीवाड्याला धक्का लागणार नाही आणि इथल्या स्थानिक कोळी लोकांना कॉजवेच्या वापरासाठी टोलही भरावा लागणार नाही अशी अट घातली.
एकीकडे reclamationद्वारे मुंबई वसवली जात असतानाच पायाभूत विकासकामे (infrastructural development) देखील वेग घेत होती. आणि ह्या infrastructural development मधील मैलाचा दगड गाठला गेला तो १६ एप्रिल १८५३ साली... मुंबईतील बोरी बंदर ते ठाणे दरम्यान मुंबईतीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली रेल्वे धावली. ३४ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग, सिंध, साहेब आणि सुलतान ह्या तीन स्टीम इंजिन्सच्या सहाय्याने ओढलेली १४ डब्ब्यांची गाडी आणि ठाणे खाडीवरचा ९४० मीटर लांबीचा पुल, हे सगळेच काळाच्या खूप पुढचे होते. पण बोरी बंदर ते ठाणेच का? तसे पहिले तर मुंबईतील पहिली रेल्वे कुठूनही कुठेही धावू शकली असती… पण इथे मागच्याच लेखात लिहिल्याप्रमाणे ठाणे कितीतरी आधीपासून समुद्री व्यापारामुळे समृद्ध होते आणि ब्रिटिशांनी मुंबई वसवायला घेतल्यानंतरही इथल्या व्यवसायावर त्याचा काहीही परिणाम झाला नव्हता. फक्त ठाणेच नाही तर साष्टीवरची पूर्वापार समुद्री व्यापारात असलेली बरीचशी बंदरे १९व्या शतकातदेखील आपले वर्चस्व राखून होती. ती बंदरे आणि व्यापारी मार्ग रेल्वेने जोडणे आणि तिथून पूर्वीच्याच थळघाट आणि बोरघाट मार्गे अंतर्गत भागात जाणे हा त्यामागचा एक प्रमुख उद्देश होता. त्याकरिता ठाण्यानंतर कलिआन (आताचे कल्याण) बंदर रेल्वेने जोडण्याकरिता ठाणे खाडीवर पुल बांधणे क्रमप्राप्त होते. ठाणे खाडी वरचा पुल पार केल्यानंतर साधारण एक किलोमीटरवर पारसिकची टेकडी लागते. ह्या टेकडीवर रेल्वेचे एक artificial तळे आहे (Google earth मध्ये पाहिल्यास हे तळे दिसेल), त्यातल्या पाण्याचा उपयोग स्टीम इंजिन्समध्ये होत असे.
ह्या सगळ्या प्रवासात रेल्वे आणि ठाणे खाडीवरच्या पुलाकडे structural engineering मधले marvel म्हणून पहिले जात असतानाच ह्याच रेल्वेमुळे ठाण्यातला शेकडो वर्षाची समृद्ध परंपरा असलेला चेंदणी कोळीवाडा मात्र कापला गेला आणि दोन भागात विभागाला गेला… to be precise विस्थापित हा शब्द प्रचलित होण्याआधीच मुंबईतले एक एक कोळीवाडे विस्थापित होत गेले… आणि वर लिहिल्याप्रमाणे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' सुरूच राहिले.
क्रमशः

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...