Wednesday, March 25, 2015

जैविक शेतीने भरघोस पीक येऊ शकते - डॉ. राम बजाज

कमी किमतीत अधिक उत्पादन घेण्याच्या लोभामध्ये बहुतेक शेतकरी रासायनिक खताचा आणि कीटकनाशकांचा वापर करीत असतात. त्यामुळे शेतीचे सुरक्षाचक्र कोलमडून परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या परिस्थितीतून वाचण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे रासायनिक खताचा वापर न करता शेती करणे. त्यासाठी जैविक खताचा वापर अधिकाधिक केला पाहिजे. "वैयक्तिक पातळीवर मी हा प्रयोग केला आहे. या प्रयोगाने घेतलेले उत्पादन अद्याप शेतात उभे आहे. गव्हाची रोपं चार फुटाहून अधिक उंच झाली आहेत. १०० चौरस फूट जागेत गव्हाच्या ६०० ते ६५० लोंब्या आहेत आणि प्रत्येक लोंबीत ४५ ते ५२ दाणे अस्तित्वात आहेत. सामान्यपणे गव्हाच्या लोंब्यात २५ ते ३० दाणे असतात हे लक्षात घेता मला अधिक उत्पादन मिळणार हे उघड आहे".

हे यश आम्ही जैविक खताचा वापर करून संपादन केले आहे. जैविक खतात असलेल्या अ‍ॅझोटोबॅक्टर व ग्लुकोनेक्टर बॅक्टरमुळे नैसर्गिक अवस्थेत नायट्रोजनला एकत्र करून रोपाच्या मुळापर्यंत पोचविले जाते. रोपाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला प्राणवायू तसेच सायटोकायनीन, अ‍ॅब्सिसिक अ‍ॅसिड, एथिनील ही पोषक द्रव्ये जिबिरीलीन सिंथेसिसद्वारा सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोजची निर्मिती करतात. त्यामुळे रोपांना आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स मिळतात. रोपांचे आरोग्य चांगले राहते. रोपाचे आरोग्य चांगले असले की कीटकांसोबत लढण्याची क्षमता वृद्धिंगत होते. इंडोल अ‍ॅसिटीक अ‍ॅसिडमुळे रोपाची मुळं वाढतात. काही वेळातच जीवाणूंची संख्या वाढून ती कित्येक कोटी होते. हे जीवाणू जमिनीला मऊ करतात. त्यामुळे रोपांची मुळं या जीवाणूंना ग्रहण करू लागतात. परिणामी रोपे कमालीची वाढू लागतात.

रेतीत आणि मातीमध्ये अस्तित्वात असलेल्या लाभदायी सूक्ष्म जीवाणूंची वैज्ञानिक पद्धतीने निवड करून त्याचा उपयोग करून आमच्या शेतातच आम्ही जैविक खतांची निर्मिती केली आहे. वातावरणातील नत्रवायू आणि जमिनीतील फॉस्फोरस हे रोपाच्या मुळांपर्यंत पोचविणारे जीवाणू हे जिवंत स्थितीत गायीच्या शेणात असतात. ते शेण, गोमूत्र, जिप्सम, दहा किलो लाल माती, राख, गव्हाची ताजी तीन चार रोपं एकत्र करून ते सगळे रेती आणि मातीच्या मिश्रणात एकत्र करून सात दिवस सडू द्यावेत. अशातऱ्हेने निर्मित जैविक खत पाण्यात मिसळून ते पाणी शेतात उपयोगात आणतात. या जैविक खतात असलेले अ‍ॅसोटोबॅक्टर जीवाणू मातीत मिसळताच ते क्रियाशील होतात. २४ तासात एका जीवाणूपासून कोट्यवधी जीवाणूंची निर्मिती होते. हे जीवाणू गव्हाच्या रोगांसोबत सहजीवन करू लागतात. त्यामुळे वातावरणात असलेल्या नायट्रोजनचे रूपांतर ते नायट्रेटमध्ये करतात. या नायट्रेटचा उपयोग गव्हाच्या तसेच रोपांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या एन्झाईम प्रोटीन, पिगमेंट्स, हार्मोन्स व विभिन्न व्हिटॅमिन्सच्या निर्मितीसाठी तर होतोच पण तो द्रव्ये रोपात मिसळून त्याचा विकास करण्यास मदत करतात. तसेच विविध किटाणूंशी तसेच रोगांशी लढण्याची क्षमता त्या रोपांमध्ये निर्माण करतात. पिकांच्या मुळांपर्यंत नायट्रोजन पोचल्यामुळे त्या रोपांमध्ये आवश्यकतेनुरूप पोषक तत्त्वे ग्रहण करण्याची क्षमता निर्माण होते. परिणामी गव्हाचे दुप्पट उत्पादन मिळू शकते.

बीपासून रोपाची निर्मिती झाल्यावर त्या बियात असलेली पोषक तत्त्वे समाप्त होतात. मग रोपांना पोषक तत्त्वांची गरज भासू लागते. रोपांची जी हिरवी पाने असतात त्या पानांमुळे वातावरणातील कार्बनडाय आॅक्साईड ग्रहण केला जातो. जमिनीतील पाण्यात तो मिसळून रोपांसाठी आवश्यक असलेली पोषक तत्त्वे मुळांच्या माध्यमातून रोपांना मिळू शकतात. रोपांच्या वाढीसाठी व विकासासाठी एकूण १६ पोषक तत्त्वे आवश्यक असतात. ती पुरेशी उपलब्ध झाली नाही तर रोपांची वाढ होत नाही. त्यामुळे रोपांना पोषक तत्त्वांची सतत उपलब्धता मिळायला हवी. अन्यथा गव्हाच्या उत्पादनावर त्यांचा विपरीत परिणाम होतो.

लोह : लोह तत्त्वाची उपलब्धता कमी झाली की रोपं कमजोर होतात. त्यांची वाढ न झाल्याने ती खुजी राहतात. रोपांची पाने पिवळी पडतात. फांद्या झुकायला लागतात. तसेच फळांची झाडे असल्यास ती फळे गळू लागतात.

मँगनीज : याची उपलब्धता कमी झाल्यास रोपाच्या पानावर हिरवे डाग पडतात. हे हिरवे डाग कालांतराने पिवळे होतात तशी रोपांची वाढ थांबते.

ताम्र : ताम्राची उपलब्धता कमी झाल्यास रोपांची नवी पाने सुकतात. त्यांचा रंग बदलू लागतो. शेवटी ती पिवळी होत होत पांढरी पडतात.

आम्ही आमच्या शेतात निर्माण केलेले फॉस्फोरसयुक्त बायोलॉजिकल जैविक खत हे रोपांसाठी अत्यंत आवश्यक आहे. रोपांच्या वाढीसाठी लागणारे फॉस्फोरस ते निर्माण करते. पिकांची फॉस्फोरसची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून डी.ए.पी. निगेटिव्ह चार्जचा प्रयोग करण्यात येतो. हा निगेटिव्ह चार्ज मातीत सुरुवातीपासून उपलब्ध असलेल्या पॉझिटिव्ह चार्जशी मिळून त्यांचा एक प्रकारचा बॉण्ड निर्माण होतो. त्यामुळे पिकांना फॉस्फोरस योग्य प्रमाणात मिळू शकत नाही. परिणामी जमीन कडक होते. पण जैविक खताचा प्रयोग केल्यामुळे जमीन मऊशार होते. या खतातून वेगवेगळे एन्झाइम्स जमिनीत तयार होतात. ते जमिनीत निर्माण झालेला बॉण्ड तोडून टाकतात. त्यामुळे उपयुक्त फॉस्फोरस पिकाच्या मुळाशी पोचण्यात मदत होते. पिकाच्या मुळाशी अ‍ॅन्टीव्हायरस तत्त्वांची निर्मिती होते. त्यामुळे पिकांतील गोडवा वाढण्यास मदत तर होतेच; शिवाय उत्पादनही भरघोस मिळते.

- लोकमत
दि. २५/०३/२०१५, बुधवार

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...