Tuesday, February 12, 2019

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !! 
#amazing_playing_cards 

गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे कौतुक केले. कांहींनी अनेक प्रश्न आणि माहिती विचारली. माझ्याकडे असलेल्या आणखी कांही मजेदार पत्त्यांची माहिती, लोकांच्या प्रश्नांची मला जमतील तशी उत्तरे, थोडा अधिक तपशील इत्यादींसाठी हा दुसरा भाग !
टॅरो कार्ड्स हा पत्त्यांचाच प्रकार आहे पण त्याचे स्वरूप आणि उद्देश वेगळा आहे. नेहेमीच्या पत्त्यांच्या साहाय्याने देखील ज्योतिष सांगितले जाते. हे ज्योतिष आणि असंख्य जादू मला माहिती आहेत. पण त्यांची उदाहरणे म्हणून मी फक्त कांही संचच माझ्या संग्रहात ठेवले आहेत. पोर्नो प्रकारातील असंख्य संच जगभरात अनेक संग्राहकांकडे असतात पण माझा उद्देशच वेगळ्या आणि कौटुंबिक छंदाचा असल्याने मी तसा एकही संच ठेवलेला नाही. 
माझ्याकडे SKAT या एका वेगळ्या जर्मन खेळाच्या पत्त्यांचे संच आहेत. हा ३२ पत्त्यांचा खेळ जर्मनीत खूप प्रसिद्ध आहे.जर्मनीतील अल्टेनबर्ग येथे १९२७ पासून या खेळाचे विशेष नियामक मंडळ कार्यरत आहे. दरवर्षी देशपातळीवर " जर्मन चॅंपियन स्पर्धा " घेतली जाते. आणखी एका संचामधील प्रत्येक पत्ता 3 D किंवा होलोग्राम पद्धतीने छापलेला असल्याने, पटकन दिसतच नाही. पण निरखून पाहिल्यावर उजेडात त्यातील सुंदर छपाई कळते. पारदर्शक पत्ते म्हणून जो संच आहे त्यात एका पारदर्शक प्लॅस्टिक तुकड्यावर एका बाजूने, निळ्या रंगाची ३ वर्तुळे दिसतात पण तुकडा उलटल्यावर तो पत्ता असल्याचे लक्षात येते.बियर, सिगारेट्स,विमान कंपन्या, कॅसिनो क्लब यांचे पत्ते उत्तम प्रतीचे आहेत. 
पत्त्यांचा कॅट फुकट मिळतो म्हणून, लहानपणी आईवडिलांकडे हट्ट धरून JOY आईस्क्रीम अनेकांनी Enjoy केले असेल. आपल्याला जॉय आईस्क्रीमचा संच त्याची आठवण नक्कीच करून देईल. त्याचबरोबर नेत्रहिनांसाठी खास तयार केलेला संचही निरखून पाहावा असा आहे. सर्वसामान्य पत्त्यांसारखाच हा संच आहे पण याच्या प्रत्येक पत्त्याच्या उजव्या कोपऱ्यात वरती आणि डाव्या कोपऱ्यात खाली, ब्रेल लिपीत पत्त्यांची ओळख कोरलेली आहे . उजव्या हातात पत्ते धरणाऱ्या खेळाडूला,नुसत्या बोटाने चाचपून पत्ता कळतो. " Lexicon Cards " हा खेळ शब्दांची स्पेलिंग्ज आणि अंकांशी खेळायला शिकवतो. 
पुण्याच्या एका संस्थेने, मुलांना धार्मिक सणांचे महत्व कळण्यासाठी प्रत्येक पत्त्यावर एकेक सणाची माहिती असलेला वेगळाच संच प्रसिद्ध केला आहे.या मध्ये बदाम, चौकट, इस्पिक, किलवर ऐवजी कमळ , स्वस्तिक,त्रिशूल आणि बिल्वपत्र आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी, विविध देशांनी आपापल्या देशातील ५४ विविध सौन्दर्यस्थळे निवडून त्या प्रत्येकाचा एकेक पत्ता अशा ५२ पत्ते आणि २ जोकरच्या पत्त्यांचे संच वितरित केले आहेत. एका अगदी जुन्या संचामध्ये जोकरवर चार्ली चॅप्लिन यांचे चित्र आहे. चॅप्लिन यांच्या विनोदाला कारुण्याची एक झालर असायची. ते लक्षात घेता चार्ली चॅप्लिन यांचाच जोकर म्हणजे एक " करूण विनोद " वाटतो. 
गेल्या भागामध्ये मी गंजिफा या प्राचीन खेळाबद्दल लिहिले होते. हे संच आजही सावंतवाडीच्या राजवाड्यात खास बनवून विकले जातात. तेथे बनविलेला पत्त्यांचा एक खास संच माझ्याकडे आहे. यातील राजा, राणी आणि गुलाम हे सर्व मराठी वेशभूषेत आहेत. राजाच्या कमरेला तलवार आणि हातात फूल आहे.कपाळाला गंध आहे. राणीसाहेबांच्या डोईवर पदर आणि नाकात नथ आहे. हातात तलवार घेऊन सज्ज असलेल्या गुलामाच्या पाठीवर ढाल आणि कपाळी गंध आहे. या संचाचा लाकडी डबा उत्तम रंगसंगतीतील छान चित्रांनी रंगविलेला आहे. माझ्याकडील ओरिसा येथिल गंजिफा संच हा पातळ कागदापासून बनलेला आहे. अन्य दोन गंजिफा संच हे सवंतवाडीचे असून त्यांचे डबेही खूप आकर्षक आहेत. 
गंजिफा आजही उपलब्ध असले तरी ते खेळायचे कसे ? त्याचे नियम काय ? महाराष्ट्र, ओरिसा, दिल्ली, बंगाल,दक्षिण भारतात हा खेळ खेळला जात असे. प्रत्येक ठिकाणी वापरले जाणारे संच, पत्त्यांची संख्या, नियमांमध्ये असलेला फरक, खेळण्याची पद्धत, खेळाचा प्राचीनपणा, स्थानिक वैशिष्ठ्ये यामुळे नियमांमध्ये एकवाक्यता नाही. श्रीतत्वनिधी आणि कौतुकनिधी या गंथांमध्ये या खेळाची माहिती आहे असे वाचले होते पण हे ग्रंथ मिळणे आता दुरापास्त झाले आहे. कोल्हापूरच्या राजवाड्यातील वस्तुसंग्रहालयात या संबंधीच्या ३ पुस्तिका मी पहिल्या होत्या पण त्या अभ्यासासाठी उललब्ध होऊ शकल्या नाहीत. या खेळाचे कांही नियम देत आहे पण त्या आधारे हा खेळ खेळणे क्लिष्ट वाटते. 
विष्णूच्या १० अवतारांच्या १२० पत्त्यांच्या संचामध्ये प्रत्येक अवताराचे चित्र असलेला १ / १ पत्ता म्हणजे राजा, दुसरा साधारणतः संबंधित चित्र असलेला १ / १ पत्ता म्हणजे मीर / प्रधान ( वजीर ) असतो. नंतर एक्का ते दश्शी असे १० / १० पत्ते असे प्रत्येक अवताराचे १२ पत्ते आणि १० अवतारांचे एकूण १२० पत्ते असतात. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह आणि वामन या पहिल्या ५ अवतारांमधील पत्त्यांची किंमत म्हणजे अवतार पत्ता सर्वात श्रेष्ठ नंतर वजीर, नंतर एक्का, दुर्री असे करीत करीत दश्शी सर्वात कमी किंमतीची असते. 
परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलंकी या अवताराच्या पत्त्यांमध्ये अवताराचा पत्ता सर्वात श्रेष्ठ नंतर वजीर, नंतर दश्शी, नश्शी असे करीत करीत एक्का सर्वात कमी किंमतीचा असतो. 
हे पत्ते पिसण्यासाठी ते एका धोतरासारख्या पातळ वस्त्रामध्ये पसरून हाताने गोल गोल फिरवून ( कपड्याला साबण लावतात तसे ) पिसले आणि मग वाटले जातात. हा खेळ ३ खेळाडू खेळतात त्यामुळे प्रत्येकाला ४० / ४० पाने येतात. हा खेळ जर दिवसा खेळला जात असेल तर ज्याच्याकडे रामाचा पत्ता आला असेल त्याने पहिली उतारी करायची आणि रात्री खेळला जात असेल तर ज्याच्याकडे कृष्णाचा पत्ता आला असेल त्याने पहिल्यांदा उतारी करायची असते. खेळ सुरु करणाऱ्याला " सुरु करतो '' म्हणून सुरुक्या किंवा सुरक्या म्हणतात. रामाचा पत्ता खेळल्यावर त्याने आणखी एक रामाच्याच अवतारातील / हलका पत्ता खेळायचा आणि इतर दोन खेळाडूंनी २ / २ पत्ते खेळायचे. हे उतरलेले सर्व ६ पत्ते सुरक्याचा हात म्हणून त्याच्या मालकीचे होतात. ज्याच्याकडे जास्त पत्ते जमा होतात त्याला दुसऱ्यांचे पत्ते ओढण्याचा हक्क मिळतो. या खेळामध्ये पैसे लावणे किंवा जमीन, राज्य असे काही पणाला लावणे वगैरे होत नाही. 
इथपर्यंत सर्व भाग हा खूप मनोरंजक आहे. या खेळासाठी जबरदस्त स्मरणशक्ती लागते, वेळ लागतो. खेळाचे याच्या पुढील नियम कमालीचे किचकट आणि गुंतागुंतीचे आहेत. मी जर ते सर्व इथे दिले तर -- हा लेख चौपट मोठा होईल, ज्यांना गंजिफा खेळायचा नसेल त्यांना ते कंटाळवाणे होईल आणि लेखाचा रंजकपणा पूर्ण नाहीसा होईल म्हणून मी येथे सर्व नियम तपशीलवार देत नाही. ज्यांना त्यात खूप रस असेल त्यांनी मला आपला मोबाईल क्रमांक आणि तपशील इंग्रजी की मराठी भाषेत हवा हे कळवावे. 
पूर्वी एखादे एकटे आजोबा पत्त्यांचा पेशन्स गेम एकटेच खेळात बसलेले दिसायचे . लहानपणी आजोबांबरोबर, सुट्टीत मित्रांबरोबर, गावी- कार्यक्रमाला जमल्यावर , मुंबईत गाडीमध्ये, क्लबमध्ये असा कुठेही आणि कितीही वेळ रंगणारा पत्त्यांचा खेळ आता कॉम्पुटर आणि मोबाईलवरही आपली लोकप्रियता टिकवून आहे. 
तर रंजकता आणि आठवणींचा गोफ विणणारी अशी ही पत्त्यांच्या रंजक विश्वाची मनोरंजक सफर !

(हा लेख शेअर केल्यास कृपया लेखकाच्या नावासह शेअर करावा ). 

(फेसबुकवरून साभार) 







 








(वरील फोटोंचे सर्व अधिकार हे श्री. करंदीकर यांच्याकडे आहेत)


खेळाचे पत्ते (भाग १) - श्री. मकरंद करंदीकर

खेळाचे पत्ते.... खेळासारखीच मनोरंजक माहिती आणि इतिहास ! 
अगदी छोट्या मुलापासून आजोबांपर्यंत आणि गरीबांपासून गडगंज श्रीमंतांपर्यंत, आपली पाळेमुळे घट्ट रोवलेला खेळ म्हणजे पत्त्यांचा खेळ ! जागा, वेळ, वय किंवा आर्थिक स्तर असे कसलेही बंधन नसलेला हा एक विश्वव्यापी खेळ आहे. आजोबा आणि नातू यांच्या निरागस “ भिकार-सावकार “ खेळापासून ते थेट लाखो रुपयांची हारजीत करणाऱ्या जुगारापर्यंत हा खेळ फिरतो. सतत कोसळत असूनही पुन्हा पुन्हा बांधायचा प्रयत्न करायची सहजपणे शिकवण देणारा “ पत्त्यांचा बंगला “ आपण अनेकांनी अनेकदा लहानपणी बांधलेला असतोच ! मराठी साहित्याला या खेळाने अनेक नवीन शब्द दिले. जीवनात येणारी परिस्थिती आणि हातात येणारे पत्ते हे आपल्या इच्छेनुसार येत नसल्यामुळे, पत्त्यांची उपमा अध्यात्मिक पातळीवरही पोचते. .... आणि आजवर पाहिलेल्या पत्त्यांच्या जादू तर कोण विसरणार ? अनेकांनी पत्त्यांच्या आधाराने सांगितले जाणारे भविष्यही जाणून घेतले असेल.
अशा या पत्त्यांचा सर्वात जुना उल्लेख चीनमध्ये ९ व्या शतकामध्ये आढळतो. तेव्हा ३२ पत्तेच होते. नंतर हे पत्ते १३ व्या शतकात मंगोल आक्रमकांनी “ सिल्क रोड ” मार्गे पर्शियात नेले. पर्शियन भाषेत त्याला गंजीफेह म्हणत. मोगल आक्रमकांनी १६ व्या शतकात पत्ते भारतात आणले.
भारतात गंजिफा या पत्त्यांनी गोल आकार धारण केला. विष्णूचे १० अवतार, राशी, नवग्रह यांच्या आधारानी पत्त्यांची संख्याही १२० वर पोचली. तर मुस्लीम राजवटीतील गंजीफांना चंगकंचन म्हणत असत. हा शब्द चंग आणि कंचन या पर्शियन आणि संस्कृत शब्दांमधून बनला असून या मध्ये ९६ पत्ते असत. याचा उल्लेख "बाबरनामा '' ग्रंथात आहे. " ऐने अकबरी " या ग्रंथात हा हिंदू खेळ असल्याचा उल्लेख आहे. त्यात हा खेळ १४४ पानांचा आणि १२ जणांमध्ये विभागल्याचा उल्लेख आहे. तो अधिक क्लिष्ट असल्याने लुप्त झाला असावा. चौकोनी, आयताकृती, षटकोनी आकाराचेही गंजिफा होते आणि ते हस्तिदंतापासूनही तयार केले जात असत.
महाराष्ट्रात सावंतवाडीच्या राजांनी, आपल्या कारागिरांची कला टिकविण्यासाठी त्यांना लाकडी खेळण्यांबरोबरच खास प्रकारच्या कागदाचे गंजिफा बनविण्यास उत्तेजन दिले. येथे आजही गंजिफा बनविले जातात. येथे प्रत्येक पत्ता हाताने रंगविला जातो. यातील अतिशय बारकाव्याने रंगविलेली चित्रे विदेशात खूपच लोकप्रिय आहेत. या संचांचे खोकेही अतिशय आकर्षक चित्रांनी आणि रंगांमध्ये रंगविलेला असतात. त्यांची चेहेरेपट्टी आणि वस्त्रांवरील चित्रे अस्सल मराठी धाटणीची असतात.
आत्ताच्या स्वरूपातील पत्ते साधारणत: १५ व्या शतकात अवतरले. तेव्हा सर्वात कमी मूल्याचा पत्ता नेव्ह ( KNAVE ) म्हणजे “राजपुत्र” असा होता. आजही पत्त्यांच्या अनेक खेळांमध्ये राजा सर्वात मोठा की एक्का मोठा, असा प्रश्न असतोच. पत्त्यांमध्ये जोकर आणायची मूळ कल्पना अमेरिकन लोकांची पण जोकरांचा धुमाकूळ मात्र हल्ली सगळ्या क्षेत्रातच दिसतो.
माझ्या पत्त्यांच्या संग्रहात १ इंचापासून ते दीड फूट आकाराचे, गोल- चौकोनी- पारदर्शक- Z आकाराचे - ५२ जातींच्या वेगवेगळ्या मांजरांच्या चित्रांचे, - अत्यंत विचित्र आकाराचे, जादूसाठी वापरले जाणारे, विविध सणांची माहिती देणारे, भविष्य कथन करणारे, भोपळ्याच्या बी सारखे लंबगोल आकाराचे - अशा विविध प्रकारचे दुर्मिळ पत्ते आणि गंजिफा आहेत. संपूर्ण सुवर्ण रंगात तसेच चंदेरी रंगात छापलेले सोन्याचांदीचे पत्ते हे खासच आहेत. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात, चित्रपटाच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच वापरले गेलेले, १९६० चे " मुघले आझम " चे पत्ते आणि अंधांसाठीचे ब्रेलमधील पत्तेदेखील माझ्याकडे आहेत. या प्रत्येकाचा ५२+२ ( जोकर ) असा पूर्ण संच माझ्याकडे आहे. सावंतवाडीमधील हाताने रंगविलेल्या पत्त्यांच्या संचामधील राणीने चक्क मराठी पद्धतीने डोईवरून पदर घेतलेला आहे तर गुलामाने इंग्रजी सोल्जर ऐवजी मावळ्याचा पोशाख घातला आहे.
हिंदीतील “मुघल ए आझम”या चित्रपटाने, हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक नवे विक्रम स्थापित केले. या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी किंवा एक आठवण म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथमच, उच्चभ्रू प्रतिष्ठितांना पत्त्यांचे २ कॅट्स, पत्र्याच्या एका खास डब्यातून देण्यात आले. या पत्त्यांमध्ये, एका कॅटमधील प्रत्येक पत्त्यामागे दिलीपकुमारचे व दुसऱ्यामागे मधुबालाचे सुंदर चित्र छापले आहे. चार एक्क्यांवर दोघांची चित्रपटातील प्रणयप्रसंगातील चित्रे छापली आहेत तर पत्र्याच्या डब्यावरही या दोघांचे एक चित्र आहे. आणखी एक खास वैशिष्ठय म्हणजे या पत्त्यांमधील सर्व राजा आणि राणींच्या चेहेऱ्याच्या जागी अकबर ( पृथ्वीराज कपूर ) आणि जोधाबाई ( दुर्गाबाई खोटे ) यांचे चेहेरे छापले आहेत. कॅटमधील दोन जोकरवर मुघल ए आझम असे छापले आहे.
इंटर नॅशनल कॅट असोसिएशनच्या मते घरगुती मांजरांच्या ५४ प्रजाती आहेत. या प्रत्येक प्रजातीच्या गोंडस मांजराचे एक चित्र असलेला एक पत्ता असे ५४ प्रजातींच्या ५४ वेगवेगळ्या चित्रांच्या पत्त्यांचा एक सुंदर कॅट माझ्या संग्रहात आहे. ५२ पत्ते आणि २ जोकर असे हे ५४ पत्ते आहेत. आपल्याला काळे, पांढरे, लाल, राखाडी, सोनेरी एवढ्याच प्रकारची मांजरे माहिती आहेत. पण एवढी विविध मांजरे पाहतांना खूप मजा वाटते. यातील जोकरांवरील मांजरे इतकी छान आहेत की त्यांना 'जोकर' म्हणणे शोभत नाही. नेहेमी आपल्याला दिसणाऱ्या दोन सोनेरी मांजरांची प्रजाती युरोपियन शॉर्ट हेअर आणि ईजिप्शियन माऊ अशी आहेत. म्हणजे दिसते आमच्याकडे, नाव माऊ ..पण ईजिप्शियन माऊ ! अतिशय वेगळ्या आकाराचे हे पत्ते ठेवण्याचा प्लॅस्टिकचा खोका मांजराच्या आकाराचा आहे. पत्त्यांच्या या कॅटचे इंग्रजी नाव "म्यांव प्लेईंग कार्ड्स" असे आहे.
पूर्वी विविध प्रकारच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी पत्त्यांचे कॅट छापून वाटले जात असत. चहा, ब्लेड्स, दारूचे विविध प्रकार, सिगारेट्स अशा अनेक उत्पादनांपासून कुटुंब नियोजनाच्या प्रचारासाठी तसेच गर्भनिरोधक गोळ्यांच्या जाहिरातीसाठी छापलेले कॅटस वाटले जात असत. विदेशातील विविध विमान कंपन्या आणि अगदी एअर इंडियासुद्धा प्रवासामाध्ये फार छान चित्रांचे पत्ते आपल्या प्रवाशांना देत असत. ताजमहाल हॉटेलने आपल्या मान्यवर ग्राहकांना, हॉटेलच्या छान पेंटींग्जचा दिलेला कॅटही देखणा आहे. असे सर्व कॅटसही माझ्याकडे आहेत.
माझ्याकडील काही पत्त्यांची छायाचित्रे सोबत देत आहे. थोडीतरी कल्पना येईल. 
(फेसबुकवरून साभार)
(क्रमशः)











 (वरील फोटोंचे सर्व अधिकार श्री. करंदीकर यांच्याकडे आहेत.)

Thursday, April 5, 2018

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन

एक नन्ही मुन्नी सी पुजारन

पतली बाहें, पतली गर्दन

भोर भये मंदिर आई है

आई नहीं है, माँ लायी है

वक़्त से पहले जाग उठी है

नींद भी आँखों में भरी है

ठोड़ी तक लट आयी हुई है

यूँही सी लहराई हुई है

आँखों में तारों सी चमक है

मुखड़े पे चांदनी की झलक है

कैसी सुंदर है, क्या कहिये

नन्ही सी एक सीता कहिये

धुप चढ़े तारा चमका है

पत्थर पर एक फूल खिला है

चाँद का टुकडा फूल की डाली

कमसिन सीधी भोली-भाली

कान में चांदी की बाली है

हाथ में पीतल की थाली है

दिल में लेकिन ध्यान नहीं है

पूजा का कुछ ग्यान नहीं है

कैसी भोली और सीधी है

मंदिर की छत देख रही है

माँ बढ़ कर चुटकी लेती है

चुपके-चुपके हंस देती है

हँसना रोना उसका मजहब

उसको पूजा से क्या मतलब

खुद तो आई है मंदिर में

मन उसका है गुडिया घर में 


कवी - मजाज़ लखनवी

Monday, February 12, 2018

नम्रतेचा महामेरू बहुत जनांसी आधारु 'राहुल द्रविड' - पराग पुजारी

एखाद्या माणसाबद्दलच्या आपल्या मनातल्या आदराला पण एक लिमिट असते. त्या लिमिटच्या बाहेर तो अगदी बियॉन्ड म्हणतात तसा जाऊ लागला की त्याला संत म्हणावं का असं वाटू लागतं. अंडर १९ वर्ल्डकप जिंकल्यावर बीसीसीआयने कोच राहुल द्रविडला ५० लाख, खेळाडूंना ३० लाख आणि सपोर्ट स्टाफला २० लाख पारितोषिक जाहीर केले. फुकट ते पौष्टिक असा अलिखित नियम असणाऱ्या देशात तर चौदा महिन्यांची मेहनत फळाला आल्यानंतर सर्व युनिटला असे भरघोस बक्षीस मिळाल्यावर द्रविडने खरंतर त्याला मिळालं ते बक्षीस घेऊन खुश व्हायला हवे होते. पण आता तो म्हणतोय की 'सर्व अटेन्शन मला मिळतंय हे मला जरा खटकतंय, आम्ही सर्वानीच एकसारखी मेहनत केलीये आणि मला ५० लाख व इतरांना माझ्यापेक्षा कमी असा भेदभाव का? सर्वाना समान का नाही?'

हेच ते, इतरांना आपल्यापेक्षा कमी मिळतेय म्हटलं की हा माणूस अस्वस्थ होतो, प्रश्न विचारतो. हर्षा भोगलेने एकदा राहुलच्या ग्रेट इनिंग्जविषयी त्याला बोलतं केलं तेव्हा राहुल त्या त्या सामन्यात दुसऱ्याही काही खेळाडूंचा कसा मोलाचा वाटा होता हे सांगत राहिला. त्यावर हर्षा जे म्हणाला होता त्याची प्रचिती आत्ताही येते - 'धिस इज राहुल द्रविड फॉर यू गाइज.. यू  टेल हिम ही प्लेड वेल अँड ही विल टेल यू समवन एल्स ऑल्सो प्लेड इकवली वेल'. 

आत्ताही त्याने हेच केलंय. दुसरेही तितकीच मेहनत घेतात हे माहित असलेल्या राहुलचा हा स्वभाव आपल्याला नवा नाही. मध्यंतरी बेंगलोर विद्यापीठाने आणि त्यापूर्वी गुलबर्गा विद्यापीठाने दिलेली डॉक्टरेट नम्रपणे नाकारणाऱ्या द्रविडला जेव्हा विचारलं गेलं की असं का केलंस? तेव्हा तो म्हणाला होता, 'डॉक्टरेट मिळवण्यासाठी लोक बराच काळ खूप कष्ट घेतात हे मला माहितेय. माझ्या पत्नीनेही डॉक्टर होण्यासाठी मोठा कालावधी मेहनत घेतलीये, सगळेच डॉक्टर घेतात, तेच पीएचडीचं. अशावेळी मी यासाठी स्वत:ला हकदार मानत नाही जरी ती मानद पदवी असली तरी.. वाटल्यास पुढे स्वत: क्रीडा क्षेत्रात रिसर्च करून ही पदवी मिळवेन'.. त्या त्या क्षेत्रात मेहनत करूनच मिळवता येतील अशा काही गोष्टी असतात, त्या इतर क्षेत्रांतील लोकांना मानद म्हणून दिल्या की त्या खऱ्या मूळ क्षेत्रातील लोकांना काय वाटत असेल हा विचार फारसा कुणी करत बसत नाही. तेव्हा असं वाटतं की नियम हा अपवादाने सिद्ध होतो हेच मुळात सिद्ध होण्यासाठी नियतीने द्रविडची योजना करून ठेवलेली असावी.

या पीएचडीवरून अजून एक किस्सा आठवला. ज्यातून आपल्याला धोनी, रैना, इरफान, पियुष, आरपीसिंग, श्रीशांत वगैरे खेळाडू मिळाले, त्या टॅलेंट रिसोर्स डेव्हलपमेंट विंगची (TRDW) कल्पना बीसीसीआयला सुचवणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा पत्रकार डॉ. मकरंद वायंगणकरानी वयाच्या ६६ व्या वर्षी मुंबई क्रिकेटवर पीएचडी करून मुंबई क्रिकेटवर आधारित 'अ मिलियन ब्रोकन विन्डोज' हे पुस्तक लिहिलेय, त्याच्या प्रकाशनाला मागच्या वर्षी गेलो होतो. कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी द्वारकानाथ संझगिरी, किरण मोरे, पारस म्हाम्ब्रे, अमोल मुजुमदार हेही मान्यवर होते. पण हे पीएचडीचे सांगताना त्यांनी आणखी एक उदाहरण दिले ते थक्क करणारे होते - राहुल द्रविडच्या आईने वयाच्या ५८ व्या वर्षी फाईन आर्ट्समध्ये पीएचडी केलीये. हे ऐकून वाटलं, काय बिशाद मग त्या नियतीची की अशा मातेचा मुलगा मेहनती, जिद्दी, चिकाटी असणार नाही आणि इतरांनी केलेल्या मेहनतीचा आदर करणार नाही. असे संस्कार घरातून असताना तो का काही फुकट घेईल? आणि डिझर्व्हिंग अशा इतरांना कमी मिळत असेल तर का गप्प बसेल? या अशा नम्रतेमागे, आपण कुणी स्पेशल नाही या वाटण्यामागे हा एक अंडरकरंटही असावा - राहुलसारख्यांची जडणघडण, त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांनी जवळून पाहिलेले जग, त्यांच्या भोवतालची माणसे या सगळ्याच गोष्टी त्यात येतात.

मुलाच्या सायन्स एक्झिबिशनसाठी शाळेत गेला की तो सहज रांगेत उभा राहतो. बिनधास्त रिक्षा, मेट्रोतून फिरतो. मग कुणीतरी त्याला ओळखून फोटो काढतो आणि ते फोटो व्हायरल होतात.

एम टीव्ही वाले त्याच्या रूममध्ये एका तरुण मुलीला पाठवून त्याचा बकरा करायला गेले, ती त्याच्याशी लगट करू लागली. तर या पठ्ठ्याने तिलाच उलट सुनावले की 'तुझं शिक्षण पूर्ण होण्याचं वय आहे तर अभ्यासावर लक्ष दे, नीघ इथून'. बकरा करणाऱ्यांचाच बकरा झाला. (हा व्हिडिओही अनेकांनी यूट्यूबवर पाहिला असेलच.)

असेच एकदा त्याच्या घरी कुणी एक मुलगी घरातून पळून येऊन हटूनच बसली होती की 'मला त्याच्याशी लग्नच करायचंय, त्याशिवाय मी जाणार नाही, आमचं लग्न लावून द्या.' राहुलचे आईबाबा ताबडतोब धन्य झाले होते. पोलिसांना बोलवावं लागलं होतं. राहुलने नीट समजावून तिला परत पाठवलं. मुलींना तो आवडतोच. उगाच नाही 'अगंबाई अरेच्चा'मध्ये संजय नार्वेकर पुस्तकात द्रविडचा फोटो ठेवून बसलेल्या त्याच्या बहिणीला म्हणत की ' गप अभ्यास कर.. म्हणे काय छान दिसतोय राहुल द्रविड!'

बोन मॅरो ट्रान्सप्लान्ट आणि किमोथेरपी सुरु असणाऱ्या अक्षय ढोके या द्रविडच्या एका तरुण फॅनला त्याच्या अखेरच्या दिवसात त्याच्या मित्रांनी एक सुखद भेट दिली होती. तो हॉस्पिटलमध्ये असताना द्रविडला व्हिडीओ कॉल करून त्याच्याशी त्याला बोलायला दिलं. राहुलने त्याची आत्मीयतेने चौकशी केली. अक्षयचे वडील त्याच्याशी मराठीत बोलू लागल्यावर राहुलही त्यांच्याशी मराठीत बोलू लागला. मध्येच मुलाला मांडीवर बसवून त्याच्याकडूनही अक्षयला गेट वेल सून म्हणवून घेतलं. मग तो लॅपटॉप त्या वॉर्डमध्ये फिरवला गेला तेव्हा राहुलने सर्वच पेशन्ट्सना हाय केलं आणि मग डॉक्टरांशीही बोलला. (हे मला Quora वरून समजलं होतं, त्यावर व्हिडीओ पाहिला होता जो यूट्यूबवरही आहे.)

तुम्ही ज्यांना फॉलो करता, ज्यांचे फॅन असता त्यांनी वागणुकीतून दिलेले धडेही आपसूक गिरवत राहण्याचा प्रयत्न करता, यातून तुम्हाला कधी फायदा होतो, कधी नुकसानही होते. तरीही आपण त्या मूल्यांपासून हटत नाही, तशी इच्छाच होत नाही. हे सगळं आपण शाळेच्या चार भिंतींबाहेरच शिकू शकतो. 

द्रविडचा असा स्वभाव, तो असा का घडला हा स्वतंत्र पीएचडीचा विषय आहे.

स्रोत - WhatsApp post

Wednesday, January 17, 2018

दिवस

दिवस

ओले-सुके,
चिंब-ओले
दिवस
वर्षभर धुवून,झटकून वाळत घातले.

काही खडखडीत वाळले,
चुरचुरीत झाले.

काही राहिले अर्धवट ओले,
अर्धवट कोरडे,
विचित्र वास देत राहिले.

काही उडून पडले
मोग-याच्या वेलावर
दरवळून गेले.

काही कॅक्टसमध्ये अडकले
भळभळले.

काही थारोळ्यात पडले
भिजकटले.

काही फुफाट्यात
अंगभर
धूळ माखले.

काही रस्त्यावर..
जड चाकांखाली
चेंगरले,
चिरडले.

काही दोरीवरच
शहाण्यासारखे
जस्सेच्या तस्से.

काही मात्र
पडले
काळजाच्या डोहात

आणखी ओले झाले,
भिजत,शहारत,
चमकत राहिले

ओल्या उबेत
ध्रुवपदासारखे
घोळत राहिले,

गवसणीतल्या सतारीसारखे
मूक झंकारत राहिले.

दिवस...दिवस..
वर्षभराच्या
दोरीवरचे..

दिवस... दिवस
ते दिवस..

   
कवयित्री - संजीवनी बोकील

चहा

चहा

चहाच्या  कपासोबतच त्याने
मैत्रीचा हात पुढे केला
तेंव्हा ती भांबावली
अरे लग्न झालेय
मूलं मोठी , छान सगळे चाललेय
म्हणाली

तो हसला आणि म्हणाला
अगं मी मैत्री म्हणतोय तुला ....!

ती पुढे म्हणाली

आणि कसं आहे
मला हे असं  आवडतच नाही
मी बरी नि माझे काम बरे
अशा गोष्टींसाठी
माझ्या कड़े वेळ ही नाही

तो पुन्हा हसला म्हणाला
अगं मी मैत्री म्हणतोय तुला ....!

हो हो तेच ते
इथे सगळ्यांचीच नजर असते
सगळ्यांना उचापती पडल्यात
प्रमोशन तोंडावर आहे
साध्या साध्या गोष्टींचेही  
काहूर करतात

तो पोट  धरुन हसला आणि म्हणाला
अगं म्हणूनच मी मैत्री म्हणतोय तुला ....!

इतके बोलताना  
धाप लागलेली तिला
चहा तर थंडगारच,
निवून गेलेला  

मग अचानक तिच्या डोळ्यात
उष्ण उष्ण  पाणी
कित्येक दिवसात खरे तर
असे म्हटलेच नाहीये कुणी

त्याने  शांतपणे खिशातून रुमाल काढला
सहजतेने तिच्या समोर धरला

मग ती अजूनच कोसळली
अजूनच स्फुन्दली
डोळ्यांच्या काठाने
मनसोक्त वाहिली

यावेळी तो हसला नाही
तिच्या नजरेत पाहून म्हणाला
इतक्याच साठी तर मी

मैत्री म्हणतोय तुला ....!!!!

कवयित्री - शशी डंभारे

Monday, January 15, 2018

असे जगावे

असे जगावे


असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही  चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना
संकटासही ठणकावुनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

करून जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर 

कवी - गुरु ठाकूर 

तुझी तू रहा!

तुझी तू रहा! 

कुणी नसलं तरी चालेल!
तुझी तू रहा
फक्त तुझ्याच डोळ्यांनी
तुझे जग पहा...
हास जेव्हा ओठ हसतील
रड जेव्हा डोळे रडतील.
हसण्यावर, अश्रूंवर,
तुझी सत्ता ठेवून रहा...
काटे जरी बोटी रुततील
फुफाट्यात पावले जळतील
फक्त तुला आवडलेलीच
फुले वेचीत रहा...
मुसळधार सरी येतील
तुझा अंगार विझवू बघतील
विझणाऱ्या ठिणगीवर
फुंकर घालीत रहा...
उसने मुकुट कुणी घालतील
जरी अंगरखे पेहरून सजतील
तुझ्या सुती वस्त्राचा
अभिमान तू वहा...
मग कुठेतरी कमळे फुलतील
सुगंध घेऊन वारे येतील
तुझ्या मोकळ्या गळ्यातले
गीत तोवर गात रहा... 
कवयित्री - संजीवनी बोकील   

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...