Monday, March 16, 2015


मुंबईतील कोळीवाडे रूढ अर्थाने केवळ 'आहेत' असे लिहायचे कारण मुंबईत रहात असताना खास कोळीवाडा बघायला म्हणून कुठे जावे लागत नाही तर कोळीवाडेच आपल्याला कुठून ना कुठूनतरी दिसत राहतात. वर्ल्ड ट्रेड सेंटरला जाताना कफ परेडचा, कुलाबा कॉजवेवरून जाताना कुलाब्याचा, पोर्ट ट्रस्टकडे जाताना माझगावचा, सी लिंकवरून जाताना माहीम आणि वरळीचा, बांद्रा बॅंण्ड स्टेंडवरुन जाताना चिंबईचा… असे अनेक… आणि त्यांचे 'असणे' जाणवते ते, त्या त्या कोळीवाड्यांच्या पट्ट्यातील समुद्रात नांगरलेल्या रंगीबेरंगी बोटींमुळे. "मुंबईचे मूळ रहिवासी कोळी आणि कोळीवाडे मुंबई (बॉम्बे), मुंबई शहर म्हणून विकसित होण्याच्या कितीतरी वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत", हे वाचलेलं असल्यामुळे किंवा किनाऱ्यालगतच्या कोळी वस्त्या व समुद्रात नांगरलेल्या बोटी सतत दिसत असल्यामुळे किंवा ऐकून माहित असलेल्या कोळीगीतांमुळे तरी रूढ अर्थाने मुंबईत कोळीवाडे अस्तित्वात आहेत ह्यावर कुणाचेही दुमत नसते.
कोळीवाड्यांचे हे असणे, दिसणे आणि ऐकू येणे ह्या व्यतिरिक्त असे कोळीवाड्यांचे वेगळेपण काय आहे? हे 'वेगळेपण' जाणून घेण्याआधी कोळीवाड्यांमध्ये फिरताना मला जाणवलेल्या काही गोष्टी इथे नमूद कराव्याशा वाटतात. त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक लोकांमध्ये स्वतःच्या गावाच्या इतिहासाबद्दल दिसलेली कमालीची अनास्था. तुमच्या गावाचा इतिहास काय? किंवा वेगळेपण काय? ह्या प्रश्नाला काही कोळीवाड्यांमध्ये जुने दस्ताऐवज उपलब्ध करून देणे, जुन्या-जाणत्या लोकांशी गाठीभेटी घालून देणे, गावातील महत्वाची ठिकाणे दाखविणे अशी सर्वतोपरी मदत मिळाली तर काही कोळीवाड्यांमध्ये 'तू ना, अमक्या सरांना किंवा तमक्या मॅडमना भेट. त्यांनी मागे एकदा आमच्या गावाचा अभ्यास केला आहे'. अशी उत्तरे मिळाली. कोळीवाड्यातील फारच कमी लोकं कोळीवाड्यांच्या समाजहितासाठी प्रयत्नशील दिसली… त्याउलट प्रत्येक गावात एक खूप मोठा वर्ग 'आई माउलीचा उदो उदो' करीत देवाधर्मात किंवा 'ह्या कोलीवारयाची शान आय तुजं देऊलं' करीत बॅंजोवरच्या नाच-गाण्यात मग्न दिसला… कोळीवाड्यातल्या दैनंदिनीवर संगीताचा किती प्रभाव असतो ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु स्वतःच्या इतिहासाविषयी किंवा भविष्याविषयीची उदासीनता आणि स्वतःच्या गावाचा इतिहास दुसऱ्यांकडून ऐकावा लागणे ह्यासारखी दुसरी शरमेची गोष्ट असूच शकत नाही...
जी गोष्ट इतिहासाची तीच येणाऱ्या भविष्याची… मुंबईच्या DP (डेव्हलपमेंट प्लान) मध्ये कोळीवाड्यांशी निगडीत अनेक चुका आहेत आणि त्याचा परिणाम येत्या काही वर्षांमध्ये कोळीवाड्यांवर होऊ शकतो. त्या अनुषंगाने काही कोळीवाड्यांच्या प्रस्तावित रिडेव्हलपमेंटबद्दल विचारले असता वरळी कोळीवाड्यातल्या, 'आम्हाला समुद्रात पोहता येते मग आम्हाला स्विमिंग पूलचे डबके कशाला पाहिजे?' असा किंवा सायन कोळीवाड्यातल्या, "आमच्या मालकी हक्काच्या जागेवर आम्ही कसे आणि कुठे राहायचे हे आम्हाला बिल्डर सांगणार का?' असा खडा प्रश्न विचारणारे एखाद-दोन अपवाद वगळता, बाकी कोळीवाड्यांमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट, स्लम रिडेव्हलपमेंट DP मधील चुकीचे demarcation, coastal road इत्यादींचा कोळीवाड्यांवर काय परिणाम होईल ह्याबद्दलही एक प्रकारची हतबलता दिसली.
मुंबईसारख्या झपाट्याने ग्लोबल सिटी म्हणून विकसित होऊ पाहणाऱ्या शहरात, उष्ण दमट वातावरणात, जिथे सर्वांनाच आपल्या घरातून अरबी समुद्राचा view दिसावा, किंवा तापलेल्या दुपारी समुद्रकिनारी बसून समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्याचे आणि पाण्याचे तुषार अंगावर झेलावेत असे मनोमन वाटते, त्याच मुंबईत किनाऱपट्टीवर रिअल एस्टेट मार्केट मध्ये प्राइम लोकेशन म्हणून गणल्या जाणाऱ्या ठिकाणी वसलेले असूनही कोळीवाडे मात्र अजूनही मध्ययुगीन अवस्थेतच आहेत. मध्ययुगीन अश्यासाठी कारण इतक्या वर्षांमध्ये ना ह्या कोळीवाड्यांच्या रचनेत बदल झाला ना इथल्या राहणीमानात… त्याचप्रमाणे जगभर मासेमारीसाठी पर्सेनिअर किंवा त्याही पुढे जाऊन फॅक्टरी लाईनर (इथे मास फिशिंग चांगले असे म्हणायचा उद्देश नाही) प्रकारच्या अत्याधुनिक बोटी वापरल्या जात असताना मुंबईतील बहुतांश कोळी मात्र अजूनही सिंगल इंजिन प्रकारच्या छोट्या बोटींमधूनच मासेमारी करतात… ग्लोबलायझेशनच्या काळात कोळ्यांचे मध्ययुगीन राहणीमान, पेहराव आणि छोट्या छोट्या रंगीत बोटी बघणाऱ्याला जरी आकर्षक वाटत असल्या तरी प्रत्यक्षात कोळ्यांना आणि कोळीवाड्यांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड झगडावे लागते आहे. वर्तमानातील ह्या झगड्याबद्दल पुढे लिहेनच. पण त्याआधी थोडे इतिहासात डोकावून पाहूयात… बॉम्बे होण्यापूर्वीची मुंबई होती तरी कशी? सात बेटांची कि आणखी काही?
क्रमशः

No comments:

Post a Comment

हीच अमुची प्रार्थना

हीच अमुची प्रार्थना हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्...