Monday, March 16, 2015


मागच्या लेखात लिहिल्याप्रमाणे मुंबई सात बेटांचीच होती का? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी आपले मुंबईचे definition काय हे पाहणे महत्वाचे ठरेल. म्हणजे मुंबई शहर ह्या व्यतिरिक्त असलेल्या मुंबई उपनगर, नवी मुंबई आणि MMRDA च्या कक्षेत येणाऱ्या शहर/ गावांना आपण मुंबईचाच भाग मानतो का? कारण आजच्या मुंबईचा इतिहास हा मुंबईच्या आजूबाजूला वसलेल्या शहरं आणि गावठाणांशी निगडीत आहे. आपण वाचलेल्या मुंबईच्या इतिहासाची सुरुवात नेहमीच 'सात बेटे' जोडली गेली आणि मुंबई निर्माण झाली अशीच असते. त्यामुळे "मुंबईचे पहिले आणि अखेरचे राजे हे इंग्रज." हे आपल्याला सहज पटतेही... परंतु जर खोलात जाऊन त्यातले तथ्य शोधायचा प्रयत्न केल्यास काहीसा वेगळा इतिहास समोर येतो, तो असा कि मुंबईच्या निर्मितीची सुरुवात होण्याच्या कितीतरी वर्षांपुर्वीपासून मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणे अस्तित्वात होती… आहेत... तसेच मुंबई परिसरात केवळ सातच नव्हेत तर अनेक लहान मोठी बेटे अस्तित्वात होती, त्यातली काही आजही बेटेच आहेत तर खुद्द अनेक बेटे एकत्र करूनही आजची मुंबई geographically बेट स्वरूपातच (island city) राहिली आहे.
मुंबईची निर्मिती टप्प्या-टप्प्याने झाली आहे ती अशी:
➙ कोळी जमातीची वस्ती असलेली बॉम्बे, कुलाबा माहीम अशी अनेक लहान मोठी विखुरलेली बेटे
➙ बॉम्बे बेटावरचा विकास
➙ सभोवतालची आणखी सहा बेटे जोडून झालेली ग्रेटर बॉम्बेची निर्मिती
➙ ग्रेटर बॉम्बेचा विकास
➙ मुंबईचा उपनगरातील विस्तार
➙ उपनगरांच्याही पुढे जाऊन मुंबईला लागुनच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील विस्तार
➙ महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राजधानी म्हणून झालेली मुंबईची निवड
➙ मुंबईचा रायगड जिल्ह्यातील विस्तार आणि नवी मुंबईची निर्मिती
➙ आणि सरतेशेवटी MMRDA ची स्थापना
त्यातला पहिला टप्पा विखुरलेल्या बेटांचा:
मुंबईच्या आजूबाजूला विखुरलेल्या बेटांपैकी सर्वात मोठे आणि महत्वाचे बेट म्हणजे साष्टी (Salsette)… साष्टी म्हणजे सहासष्ट गावांचा समूह. मुंबई उदयास येण्यापूर्वीपासूनच साष्टी बेटावरील सोपारा, डहाणू, कल्याण, वसई, ठाणे इत्यादी अनेक शहरांतील कोळी जमाती, पर्शिया, ग्रीस आणि आखाती देशांशी लाकूड, मीठ, अरबी घोडे, सुपाऱ्या, वेलवेट इत्यादींचा व्यापार करीत असत. साष्टी बेटावरील ही सर्व समुद्री व्यापार केंद्रे थळघाट, नाणेघाट आणि बोरघाट मार्गे अंतर्गत भारताशी जोडलेली होती. त्यामुळेच ह्या भागात कान्हेरी, महाकाली, जोगेश्वरी इत्यादी लेण्यांची निर्मिती झाली.ह्या लेण्यांमध्ये, व्यापाऱ्यांकडून शिधा घेऊन त्यांच्या राहण्याची सोय बौद्ध भिख्खु करीत असत. ह्या लेण्यांची locations देखील विशेष आहेत, म्हणजे साष्टी बेटावरच्या सर्वात उंच ठिकाणी कान्हेरी किंवा बाजूच्या घारापुरी बेटावरील (हि कोकण मौर्यांची राजधानी होती) घारापुरीची किंवा एलिफंटा लेणी... थळघाट, नाणेघाट आणि बोरघाट ह्या व्यापारी मार्गावरच पुढे म्हणजे इसवीसन पूर्व पहिल्या ते इसवी सन सहाव्या शतकापर्यंत सातवाहन, कोकण मौर्य, चालुक्य, राष्ट्रकुट आणि शिलाहारांच्या काळात देवळे, तलाव, विहिरी, मठ इत्यादीच्या स्वरुपात विस्तारित विकास होत गेला.
राजा बिंबदेवाला मुंबईचा कर्ता म्हटले जाते. बिंबदेवाने साष्टी बेटापलीकडील माहीम बेटावर साम्राज्य विस्तार जरूर केला परंतु त्याची राजधानी आताच्या मुंबई बेटावरील माहीम येथे नसून, साष्टी बेटावरील केळवे माहीम येथील माहीम इथे होती. बिंबदेवाचे मुंबईतील योगदान म्हणजे प्रभादेवी व बाबुलनाथ मंदिरांची निर्मिती. बिंबदेवाच्या कारकीर्दीपर्यंत साष्टी परिसरात बर्यापैकी शांतता आणि परिणामी सुबत्ता होती. बिंबदेवानंतर हा सगळा परिसर गुजरातच्या सुलतानाच्या अधिपत्याखाली गेला. बिंबदेवाच्या प्रभावामुळे असेल कदाचित पण ह्या काळात गुजरातच्या सुलतानाने आताच्या मुंबईतील महिमवर लक्ष केंद्रित केले आणि हाजी अली दर्गा व महिमी मशीदीची (माहीम दर्गा, माहीम बाजार) निर्मिती केली. ह्या व्यतिरिक्त अनेक सुफी संतांच्या नावाने पीरांची देखील स्थापना केली. मुंबईतील अनेक कोळीवाड्यांमध्ये किंवा आजूबाजूला (ज्या ज्या ठिकाणांवरून पूर्वी समुद्री व्यापार चालत असे अश्या ठिकाणी) आजही हे पीर आढळतात. त्या नंतर साष्टी बेटावर खोलवर ठसा उमटवणारी घटना घडली ती म्हणजे पोर्तुगीजांचे आगमन.
१५३४ मध्ये गुजरातच्या सुलातानाकडून वसईच्या तहाअंतर्गत साष्टी आणि आजूबाजूच्या बेटांची मालकी पोर्तुगीजांकडे आली आणि त्याच वर्षी मुंबईतील पहिले सेंट मायकल चर्च (माहीम चर्च) माहीम येथे उभारले गेले. सातासमुद्रापलीकडून आलेल्या पोर्तुगीजांना साष्टी बेटावरील आधीच भरभराटीस आलेल्या समुद्री व्यापाराचे आकर्षण वाटले नसते तरच नवल होते. ह्या समुद्री व्यापारा व्यतिरिक्त स्थानिक लोक मासेमारी आणि शेतीही करीत. पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्माचा प्रचार करतानाच इथला समुद्री व्यापार स्वतःच्या अधिपत्याखाली आणला. हा धर्मप्रचार इतका आक्रमक होता कि ज्यात Inquisition च्या माध्यमातून संपूर्ण गावेच्या गावे धर्मांतरित केली गेली. १५५७ मध्ये निर्मळ आणि दादर येथील Nossa Senhora da Salvação (म्हणजेच आताचे पोर्तुगीज चर्च), १५६६ मध्ये सांदोर, १५६८ मध्ये आगाशी, १५७३ मध्ये नंदकाल, १५७४ मध्ये पापडी, १५७५ मध्ये पाले, १६०६ मध्ये माणिकपूर, १६१६ मध्ये बांद्र्याचे माउंट मेरी चर्च अश्या अनेक चर्चेसची आणि त्याचबरोबर सभोवतालच्या समुद्री हल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी बॉम्बे कॅसल, डोंगरी, acquisitionद्वारे माहीम, बांद्रा, मढ ह्या ठिकाणी किल्ल्यांची निर्मिती केली. पोर्तुगीजांच्या काळात एकाच वेळी व्यापार, शहर विकास, संरक्षण आणि धर्मांतर असे सगळे एकत्रित कार्यक्रम चालले होते. ह्या सर्वांचा साष्टी बेटांवरील गावांच्या सांस्कृतिक जडणघडणीवर खोलवर उमटलेला ठसा आजही ठाणे, वसई, मढ, बांद्रा, नालासोपारा ह्या पूर्वीच्या साष्टी बेटांवरील गावांवर आणि प्रामुख्याने इथल्या कोळीवाड्यांवर ठळकपणे दिसतो.त्याबद्दल नंतर लिहीनच पण पोर्तुगीजांच्या काळात ह्या सर्व घटनांनव्यतिरिक्त घडलेली एक महत्वपूर्ण घटना म्हणजे मुंबईला मिळालेले पहिले लिखित नाव, Bombaim... म्हणजेच good bay!
आत्तापर्यंतचा इतिहास वाचताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे देवळे असू देत, दर्गे असू देत, चर्चेस असु देत किंवा संरक्षणासाठी उभारलेले किल्ले असू देत, सगळ्यांचे अस्तित्व किनारपट्टीवर अगदी mandatory असल्यासारखे आहे. अश्या किनारपट्टीवर ब्रिटिशांचे आगमन कधी न कधी तरी झालेच असते. कारण पोर्तुगीजांप्रमाणे ते हि दर्यावार्दीच परंतु हिंदी महासागरातल्या समुद्री व्यापारविस्तारासाठी, त्यांच्या डच (बटाविया) आणि पोर्तुगीज (गोवा) व्यापारी प्रतीयोग्यांसारखा भक्कम व्यापारी तळ नसलेले. तो तळ उभारण्याची संधी ब्रिटिशांना मिळाली ती ११ मे १६६१ साली पोर्तुगीज राजकन्या केथारिन ब्रीगांझा हिच्या इंगलंडचा राजपुत्र दुसरा चार्लसशी झालेल्या विवाहाच्या निमित्ताने. ह्या लग्नात हुंडा म्हणून पोर्तुगीजांनी बॉम्बे (फक्त बॉम्बे बेट, सात बेटे नाही) ब्रिटिशांना दिले आणि मुंबईच्या पहिल्या नाही पण निशितपणे अखेरच्या राजांचे मुंबईत (बॉम्बे मध्ये) आगमन झाले.…
क्रमशः
(* ह्या लेखात दोन ते अडीज हजार वर्षांचा इतिहास संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे तिथ्या, वंशावळ्या इत्यादी तपशील टाळले आहेत.)

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...