Thursday, March 19, 2015

साहित्य परिषदेची स्थापना आणि इतिहास

मराठी भाषा आणि साहित्य यांच्या प्रसारासाठी आणि विकासासाठी मराठी प्रदेशात ज्या लहान-मोठ्या संस्था सातत्याने कार्यरत आहेत त्या सर्वांत महाराष्ट्र साहित्य परिषद ही संस्था ज्येष्ठ आणि प्रातिनिधिक आहे. १९०६ साली पुणे येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात या संस्थेची स्थापना झाली. तिच्या स्थापनेपूर्वी मराठी साहित्यप्रसाराचे जे कार्य चालू असे ते मुख्यतः सार्वजनिक ग्रंथालयांच्या आश्रयाने होत असे.

सातार्यापाठोपाठ चौथे ग्रंथकार संमेलन पुणे येथे शनिवार, रविवारी म्हणजेच दि. २६ व २७ मे १९०६ रोजी सदाशिव पेठेत नागनाथ पारानजीकच्या मळेकर वाड्यात भरले होते. हे संमेलन आधीच्या तिन्ही संमेलनांपेक्षा मोठ्या प्रमाणावर नि विधायक स्वरूपाचे झाले.

ग्रंथ, वृत्तपत्रे, नियतकालिके इ. माध्यमांची झपाट्याने वाढ हे बहुधा यामागचे कारण असावे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ग्रंथकार आणि भाषांतरकार गोविंद वासुदेव कानिटकर (१८५४ - १९१८) होते. गोविंदराव हे न्या. रानडे आणि हरिभाऊ आपटे यांचे स्नेही होते. त्यांची मते सुधारकी होती. प्रसिद्ध स्त्री-चरित्रकार आणि कादंबरीकार म्हणून ख्यातनाम असलेल्या काशीबाई कानिटकर या त्यांच्या सहधर्मचारिणी होत्या. असा बहुगुणी अध्यक्ष लाभल्याने चौथे ग्रंथकार संमेलन हे खर्या अर्थाने साहित्य संमेलन ठरावे यात आश्चर्य नाही.

भारताचार्य चिंतामणराव वैद्य, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, प्रोफेसर पानसे, न. चिं. केळकर, कादंबरीकार ह. ना. आपटे, ‘आनंद’कर्ते वा. गो. आपटे, संत वाङ्मयाचे अभ्यासक हभप ल. रा. पांगारकर, नाटककार आणि पत्रकार कृ. प्र. तथा काकासाहेब खाडिलकर, महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे, कवी रेव्ह. ना. वि. टिळक, लोकमान्य टिळक इ. अनेक ख्यातनाम मंडळी संमेलनात सहभागी झाली होती. त्यामुळे निबंधवाचन, ठरावांवरील भाषणे, काही इतर प्रासंगिक भाषणे इत्यादी उपक्रमांमुळे संमेलन दोन दिवस गजबजून गेले होते.

मराठी जुने ग्रंथ व लेख सुरक्षित ठेवण्याकरिता एक गृह बांधण्याची जाहीर सूचना प्रथमच महादेव राजाराम बोडस यांनी मांडली. वर्हाडचे वा. दा. मुंडले यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या जपणुकीसाठी एखादी सुरक्षित जागा हवी, असा विचार मांडून त्यासाठी स्वत:ची ५० रुपये देणगी जाहीर केली. योगायोग असा की, या दोन्ही सूचनांमधील आशय पाच-सहा वर्षांनी पुण्यातच कार्यवाहीत आला. श्री. मुंडल्यांची सूचना १९१० साली भारतीय इतिहास संशोधक मंडळ-स्थापनेच्या रूपाने साकार झाली, तर श्री. बोडसांची सूचना थोड्या निराळ्या पद्धतीने प्रस्तुत संमेलनाच्या समारोपाच्या वेळी साहित्य-परिषद स्थापन झाल्याच्या घोषणेने झाली. श्री. पांगारकरांनी परिषदेसारख्या स्थायी स्वरूपाच्या संस्था स्थापन होण्याला उत्तेजन म्हणून स्वत:ची २५ रुपये देणगी जाहीर केली.

संमेलनातील काही भाषणांत साहित्य परिषदेच्या स्थापनेविषयीचे विचार मांडले गेल्यामुळे समारोपाच्या आधी न. चिं. केळकर यांनी साहित्य परिषद स्थापण्यात आली असून, साठ सभासद मिळाले असल्याविषयी व त्या परिषदेच्या सेक्रेटरींच्या जागी ठाण्याचे वि. ल. भावे, रा. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आणि रा. वासुदेव गोविंद आपटे यांना नेमल्याविषयी जाहीर केले. या घोषणेला पाठिंबा देण्यासाठी लोकमान्य टिळकांनी आशीर्वादपर भाषणे केले.

१० जुलै १९०६ रोजीच्या केसरीत श्री. आपटे, श्री. भावे आणि श्री. खाडिलकर यांच्या सहीने मराठी भाषेच्या अभिमान्यांना उद्देशून एक विनंतीपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. या पत्रात परिषदेची उद्दिष्टे आणखी स्पष्ट करण्यात आली, तिने हाती घेतलेल्या नऊ कामांची जंत्री देण्यात आली आणि शेवटी परिषदेची वार्षिक एक रुपया वर्गणी भरून सभासद होण्याची विनंती करण्यात आली.

नऊ कलमांतील पहिले मराठी ग्रंथकारांची व लेखकांची आता वेळोवेळी परिषद भरवून परस्परांमधील परिचय वाढविणे व त्यांच्या अडचणी काय आहेत ते समजावून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न करणे हे फार महत्त्वाचे आहे. परिषदेतर्फे साहित्य-संमेलने भरविण्याच्या कार्याचा या कलमात स्पष्ट निर्देश आहे. चौथ्या कलमात साहित्य चर्चा करण्याकरिता साधल्यास एखादे मासिक किंवा त्रैमासिक काढण्याचेही सूतोवाच करण्यात आले. परिषदेतर्फे पुढे दहा वर्षांनी महाराष्ट्र साहित्य पत्रिका मुंबई कार्यालयातून निघू लागली. तिचे मूळ वरील सूतोवाचात आढळते.

अशा रितीने ग्रंथकार संमेलनाच्या द्वारे २७ मे १९०६ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुणे येथे स्थापना झाली नि आपटे, भावे आणि खाडिलकर हे तिघे ग्रंथकार चिटणीस म्हणून तिचे काम पाहू लागले. ‘ग्रंथकार संमेलन’ या नावाचा पुढल्या काळात अर्थातच लोप झाला.

बडोदा संमेलनानंतर तीन वर्षांनी १९१२ साली अकोला येथे आठवे साहित्य संमेलन श्रीराम नाटकगृहात भरले होते. परिषदेच्या दृष्टीने या अकोला संमेलनाला ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठी लोकप्रिय कादंबरीकार, करमणूककार हरी नारायण आपटे संमेलनाध्यक्ष आणि पूर्वाध्यक्ष विष्णू मोरेश्वर महाजनी स्वागताध्यक्ष हा योगही विशेष आनंददायी होता. या संमेलनातील महत्त्वाची घटना म्हणजे बडोदा संमेलनात ठरल्याप्रमाणे साहित्य परिषदेच्या घटना-नियमांचा मसुदा थोडा फेरफार करून संमत करण्यात आला. संमत झालेल्या परिषदेच्या या पहिल्या १९ कलमी घटनेत तिचे उद्देश आणि ते साध्य करण्याचे उपाय निर्दिष्ट करण्यात आले. दर वर्षी साहित्य संमेलन भरविणे आणि संमेलनप्रसंगी परिषदेची वार्षिक साधारण सभा बोलावणे हे काम परिषदेवर सोपविण्यात आले. संमेलनातील या घटनेचे महत्त्व दत्तो वामन पोतदार यांच्या शब्दांत सांगायचे तर १९०६ साली जन्मास आलेल्या परिषदेला १९१२ मध्ये नियमबद्ध व घटनामंडित करण्यात आले.

परिषदेची कचेरी १९३३ साली मुंबईहून पुण्यात स्थलांतरित झाली त्या वर्षी बाळकृष्ण अनंत भिडे यांचा मराठी भाषेचा वाङ्मयाचा इतिहास- मानभावअखेर हा एक महत्त्वाचा ग्रंथ ५०० रुपयांचा पुरस्कार देऊन प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत त्यांची प्रकरणे याआधी प्रसिद्ध झालेली होती. ग्रंथ प्रकाशित झाला तेव्हा भिडे (१८७४-१९२९) हयात नव्हते. या संदर्भात आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे श्री. भिडे यांच्या आधी चिंतामणराव वैद्य आणि अहमदनगरचे शिवरामपंत भारदे यांना असा ग्रंथ लिहिण्याची विनंती करण्यात आली होती. पण दोघांनी असमर्थता दर्शविल्यामुळे ते काम भावे-भिडे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन हेच परिषदेचे आरंभ काळातले महत्त्वाचे कार्य म्हणता येईल. वरील चारही पुस्तके गेल्या अनेक वर्षांपासून दुर्मीळ आहेत.

पुण्यात परिषद आल्यावर तिचे दप्तर प्रथम कृ. पां. कुलकर्णी यांनी जपून ठेवले. नंतर टिळक रोडनजीकच्या चापेकरांच्या आर्यसंस्कृती मुद्रणालयाजवळ भागवतांच्या बंगल्यात (१९६/७९ सदाशिव पेठ, पुणे -०२) ती दोन-तीन वर्षे अल्प भाड्याने नांदत होती. कार्याध्यक्ष नानासाहेब चापेकर यांचा शांत स्वभाव होता. दा. ग. पाध्ये यांच्यासारख्या हटयोगी गृहस्थांशीसुद्धा त्यांनी शेवट स्नेह जोडला होता. दोघांमध्ये दिलजमाई झाली म्हणून पुढे पाध्यांच्याच हस्ते परिषदेच्या वास्तूची कोनशिला बसविण्यात आली.

आज ना उद्या परिषदेची कचेरी पुण्याला येणार याचा अंदाज बांधून नानासाहेबांनी औंधचे संस्थानिक श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्याशी यासंबंधी प्राथमिक बोलणी सुरू ठेवली होती. राजेसाहेब राजी झाल्यावर परिषदेच्या साधारण सभेचा नि कार्यकारी मंडळाचा कौल घेऊन ते पुढच्या तयारीला लागले. २१ जुलै १९३५ रोजी प्रथम राजेसाहेबांच्या भेटीसाठी अध्यक्ष मा. वि. किबे यांच्या नेतृत्वाखाली औंधास एक शिष्टमंडळ गेले. या मंडळात किबे, चापेकर, वा. म. जोशी, द. वा. पोतदार, पां. वा. काणे, ज. र. घारपुरे, धनंजयराव गाडगीळ आणि चिटणीस दे. द. वाडेकर अशी बडी मंडळी होती. शिष्टमंडळाची भेट दुपारी झाली. परिषदेच्या जागेबाबतचा अर्ज वाचून श्रीमंतांना सादर करण्यात आला. शिष्टमंडळ परतल्यावर औंधकरांच्या दिवाणांचे पत्र आले. त्यात ९१ वर्षांच्या कराराने नि वार्षिक ४५ रुपये भाड्याने टिळक रस्त्यावरील जागा देऊ केल्याचा मजकूर होता. तथापि, चापेकरांनी आपला शब्द खर्ची टाकून कराराची मुदत ९९९ वर्षे आणि भाडे वार्षिक १५ रुपये असा बदल करवून घेतला. त्याप्रमाणे ६ जुलै १९३५ रोजी पंतप्रतिनिधींनी भाडेपट्टा करून परिषदेला आपल्या मालकीची ६७७.६ चौरस यार्ड जागा दिली.

परिषदेच्या भाडेपट्ट्यावर चापेकरांची सही आहे. भाडेपट्ट्यातील प्रदीर्घ मुदत आणि नाममात्र भाडे विचारात घेता पंतप्रतिनिधींनी परिषदेला जागा जवळजवळ कायमची देणगीदाखलच दिली असे म्हटले पाहिजे. साहित्यविषयक कार्यासाठी जागेचा वापर करावा, भाडे वगैरे उत्पन्नासाठी तिचा वापर करू नये अशी अट मात्र घालण्यात आली. बाळासाहेब पंतप्रतिनिधींनी परिषदेवर न फिटणारे उपकारच केले. पत्रिकेच्या यानंतरच्या अंकात त्यांचे एक रंगीत आकर्षक पूर्णाकृती छायाचित्र छापण्यात आले असून, जागेबाबतच्या व्यवहाराची सर्व माहिती देण्यात आली आहे. पाध्येसाहेबांनी मागचे सारे विसरून आनंदाने येण्याचे कबूल केल्यावर २८ ऑक्टोबर १९३५ (कार्तिक शु. प्रतिपदा) हा कोनशिला बसविण्यासाठी मुहूर्त ठरवण्यात आला.

१९४६-४७ च्या सुमारास श्री. म. तथा बापूसाहेब माटे परिषदेचे कार्याध्यक्ष झाले. पुढे १९६२ साली सातारच्या संमेलनाचे अध्यक्ष श्री. न. वि. ऊर्फ काकासाहेब गाडगीळ घटना-नियमानुसार वर्षभर परिषदेला अध्यक्ष म्हणून लाभले. या दोघा श्रेष्ठींच्या प्रयत्नांमुळे परिषदेच्या वास्तूचा आणखी भरदार विस्तार होत गेला.

चिपळूणकर सभागृहानंतर परिषदेच्या वास्तूला उपयुक्त जोड मिळाली ती सभागृहाला लागूनच उभारलेल्या चार खोल्यांच्या अतिथी भवनाची. अतिथी भवन उभारण्याचे सारे श्रेय काकासाहेब गाडगीळांना द्यावे लागेल. १९६२ साली काका परिषदेचे अध्यक्ष होते. श्री. म. माट्यांप्रमाणे तेही कर्ते गृहस्थ. मराठी साहित्य संस्था आणि दिल्लीतील बृहन्महाराष्ट्र मंडळ यांच्यासाठी काकांनी खूप काही केले आहे. परिषदेच्या परगावच्या सभासदांना अल्पदरात पुण्यात उतरता यावे यासाठी त्यांनी अतिथी भवनाची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते कामाला लागले. पहिली पंधरा हजारांची देणगी त्यांनी दिल्लीच्या महाराष्ट्रीय समाज बिल्डिंग ट्रस्टकडून आणली. महाराष्ट्र शासन (१० हजार रुपये), दयानंद बांदोडकर (५ हजार रुपये), विश्वासराव चौगुले (५ हजार रुपये), महाराष्ट्र निवास, कलकत्ता (२ हजार रुपये), बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट (१ हजार रुपये), चित्रशाळा ट्रस्ट (५०१ रुपये) अशा काही भरघोस देणग्यांची भर पडू लागली.

जी. एम. आपटे कॉन्ट्रॅक्टर यांच्याकरवी वर्ष - दीड वर्षांत उंचउंच खांब घेऊन त्याचे बांधकाम पूर्ण झाले. १५ ऑगस्ट १९६४ रोजी परिषदेचे वयोवृद्ध - ज्ञानवृद्ध माजी कार्यकर्ते ना. गो. चापेकर (वय ९७) यांच्या हस्ते समारंभपूर्वक अतिथी भवनाचे उद्घाटन झाले. परिषदेचे प्रस्तुत ग्रंथालय हे मुख्यत्वे संदर्भ-ग्रंथालय आहे. पण असे असूनही त्यात दुर्मीळ ग्रंथ, नियतकालिकांचे अंक, विविध विषयांचे कोश इत्यादींबरोबर कथा, कादंबरी, कविता, नाटके, प्रवास, चरित्र-आत्मचरित्रे, ललित गद्य इ. अनेक प्रकारची ललित पुस्तकेही आहेत. प्रभाकर, मासिक मनोरंजन, विविध ज्ञानविस्तार, रत्नाकर, म. सा. पत्रिका, इतर साहित्य संस्थांची नियतकालिके यांचे बांधीव अंक पाहण्या-चाळण्यासाठी कितीतरी अभ्यासक ग्रंथालयात नित्य येत असतात. परिषदेचे सभासद, विद्यार्थी वर्ग, अभ्यासक, संशोधक, पीएच. डी. चे छात्र यांना ग्रंथालयात मुक्त प्रवेश आहे. रविवारखेरीज ते खुले असते. आपटे ट्रस्टने स्टीलची कपाटे खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपयांची आणखी एक देणगी देऊन संस्थेला उपकृत केले आहे. यानंतर साहित्य परिषदेने अनेक उपक्रम व पारितोषिके सुरू केली.

सौजन्य - म. श्री. दिक्षित लिखित, महाराष्ट्र साहित्य परिषद या ग्रंथातून
स्त्रोत : http://www.sahityasammelanghuman.org/parishad-stapna-itihas.php

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...