Thursday, January 15, 2015

'शार्ली एब्दो' च्या निमित्ताने… - राजेंद्र येवलेकर

फ्रान्समध्ये शार्ली एब्दो या व्यंगचित्र साप्ताहिकावर बुधवारी जो हल्ला झाला त्यामुळे सगळे जगच सुन्न झाले. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचा तर तो हल्ला होताच, पण एका कलेला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न होता. एक व्यंगचित्र हजारो शब्दांत जी टिप्पणी करता येणार नाही ती एका छोटय़ाशा चित्रातून करते. आता हा हल्ला फ्रान्समध्ये झाला आहे हे विशेष. कारण ज्या फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन लोकशाही मूल्यांची देणगी जगाला दिली, तिथे वृत्तपत्रस्वातंत्र्यावर झालेला हल्ला सहजगत्या खपवून घेतला जाणार नाही हे उघड आहे. तेथील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा कायदाही प्रत्येकाला
त्याचे विचार मांडण्याचे जास्तीत जास्त स्वातंत्र्य देणारा आहे. त्यामुळे 'शार्ली एब्दो'ला अनेक धमक्या मिळूनही त्याचे संपादक मंडळ मुस्लीम अतिरेक्यांच्या धमकावण्यांपुढे मान तुकवणे अशक्य होते. 'शार्ली एब्दो'वर झालेल्या हल्ल्यानंतर या घटनेच्या विविध विश्लेषणांचे विच्छेदन..

'शार्ली एब्दो'ची धाडसगाथा!
समाजातील व्यंगावर बोट ठेवणारे डाव्या वळणाचे हे फ्रेंच साप्ताहिक १९६९ मध्ये सुरू झाले. कॅथॉलिक, इस्लामिक, ज्यू, उजव्या विचारसरणीचे गट त्यांच्या टीकाटिप्पणीच्या फटकाऱ्यातून सुटले नाहीत. हे साप्ताहिक १९६० साली जॉर्ज बेर्नियर व फ्रँकाईस कॅव्हान यांनी हाराकिरी या नावाने सुरू केले होते. एका वाचकाने त्याचे वर्णन तेव्हाच 'डम्ब अॅण्ड नॅस्टी' असे केले व नंतर तेच त्याचे ध्येयवाक्य बनले. १९६१ मध्ये आक्षेपार्ह स्वरूपाबद्दल त्याच्यावर बंदीही घालण्यात आली. नंतर १९६६ मध्येही त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. १९६९ मध्ये ते 'हाराकिरी एब्दो' नावाने साप्ताहिक रूपात सामोरे आले. १९७० मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष चार्लस द गॉल हे एका नाइट क्लबमध्ये मरण पावले त्या वेळी त्या घटनेत एकूण १४६ जण मरण पावले असतानाही 'ट्रॅजिक बॉल अॅट कोलोंबे, वन डेड' असे शीर्षक देऊन 'एब्दो'ने खळबळ उडवून दिली होती. नंतर पुन्हा त्याच्यावर बंदी घातली होती. आताच्या स्वरूपातील शार्ली एब्दोचे प्रकाशन जुलै १९९२ मध्ये सुरू झाले. त्याचा पहिला अंकच १ लाख इतका खपला होता. एकदा तर त्यांनी पॅलेस्टिनी असंस्कृत आहेत असा लेख लिहिला होता. तो सहकारी पत्रकार जोना शोलेट यांनाही आवडला नाही, त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले. नंतर फिलीप व्हाल हे या प्रकाशनाचे संचालक बनले. ज्यांना व्यंगचित्रातील टिप्पणी कळत नाही तेच खरे वांशिकतावादी आहेत, असे व्हाल म्हणतात. प्रथमदर्शनी पाहता त्यांची व्यंगचित्रे आक्षेपार्ह वाटतीलही, पण त्यातील आशय बघता त्यांची टीका धर्मावर नव्हे, तर त्यातील दांभिकता व मूलतत्त्ववादीपणावर आहे. 

हल्ल्यांची मालिका
२०११ :  शार्ली एब्दोने एक व्यंगचित्र काढले होते. त्यात मुहम्मद पैगंबर हे अतिथी संपादक दाखवले होते व हसून मेला नाहीत तर १०० फटक्यांची शिक्षा मिळेल, असे वाक्य त्यांच्या तोंडी टाकले होते. त्यामुळे भडकलेल्या मूलतत्त्ववादी मुस्लिमांनी भल्या पहाटे या साप्ताहिकाचे कार्यालयच उडवून दिले होते. त्या वेळीही शार्ब यांनी असे म्हटले होते की, ज्यांना इस्लाम काय आहे तेच माहीत नाही त्यांनी हा हल्ला केला.
२०१२ : सप्टेंबर २०१२ मध्ये पुन्हा शार्लीने मुहम्मद पैगंबरांवर व्यंगचित्रे प्रकाशित केली. त्यातील काही नग्न स्वरूपातीलही होती. त्या वेळी फ्रान्स सरकारने या साप्ताहिकाची सुरक्षा वाढवली होती. आता यावर त्यांच्या संपादक मंडळाचे मत असे होते की, दर आठवडय़ाला (बुधवारी) आम्ही व्यंगचित्रे काढतो त्यात सर्वाची खिल्ली उडवलेली असते. केवळ मुहम्मद पैगंबरांची व्यंगचित्रे काढली जातात तेव्हाच प्रक्षोभक स्थिती निर्माण होते, या प्रश्नाला समाजाकडे काय उत्तर आहे. मुस्लीम समाज असहिष्णू आहे हेच यातून त्यांना सांगायचे आहे. ज्यांना विनोद पचवता येत नाही तो समाज अनारोग्याकडे वाटचाल करीत असतो. ज्यांना टीकेला वैचारिक पातळीवर उत्तर देता येत नाही तो समाज उत्क्रांत होत नाही, तशीच काहीशी स्थिती या साप्ताहिकाने उघड केली. ते केवळ पैगंबरांवरच नाहीतर अनेक राजकीय नेत्यांचीही खिल्ली उडवत असत. 

व्यंगचित्रे एक हत्यार
शार्ली एब्दोने २००६ मध्ये डेन्मार्कच्या व्यंगचित्रकाराने काढलेली मुहम्मद पैगंबरांची व्यंगचित्रे प्रसिद्ध केली होती. अनेक फ्रेंच राजकारण्यांनी विनंती करूनही या साप्ताहिकाने कुणाची भीड बाळगली नाही, पण फ्रान्समधील एकूण खुले वातावरण बघता त्यावर बंदी घालणे अयोग्यच आहे. त्याला अल्ला हो अकबरच्या आरोळय़ा देत नृशंसपणे पत्रकार, व्यंगचित्रकारांना ठार करणे हे उत्तर नव्हते. सध्या तरी विजय या अतिरेक्यांचा झाला. त्यांनी लेखणीला एके-४७ रायफलने उत्तर दिले आहे. या हल्लेखोरांना नंतर ठार करण्यात आले ही बाब वेगळी, पण त्यांनी फ्रान्ससारख्या प्रगत देशाला तीन दिवस झुंजवत ठेवून तेथील लोकशाही मूल्यांना सामाजिक सलोख्याला मोठा तडाखा दिला. या घटनेनंतर काही मशिदींवर हल्ला झाला. क्रियेस प्रतिक्रियेने उत्तरातून काही साध्य होत नाही असा अनुभव आहे, कारण मशिदी पेटवल्याने ज्यांनी हे सगळे घडवून आणले त्या अल काईदाचे उद्दिष्ट काही अंशाने साध्य झाले.

प्रतिक्रियांचे मोहोळ
इस्लाम हॅज ब्लडी बॉर्डर्स. मारेकऱ्यांनी या व्यंगचित्रकारांना ठार करताना अल्ला हो अकबरच्या घोषणा दिल्या, पण त्याचा धर्माशी संबंध नाही असे म्हणण्याचा मूर्खपणा कुणी करील असे वाटत नाही.
 -रिचर्ड डॉकिन्स, 'द गॉड डेल्यूजन' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक

सर्वच धर्म हिंसेशी सारखेच निगडित नाहीत. काहींनी हिंसेचा मार्ग काही शतकांपूर्वीच सोडून दिला आहे. फक्त एका धर्माने तो सोडलेला नाही. पॅरिसमधील हल्ल्यानंतर पाश्चिमात्य देश कदाचित हिंसाचार व इस्लामचा संबंध जोडणे थांबवतील असे हल्ल्यामागील सूत्रधारांना वाटले असावे.
-अयान हिरसी अली, 'वॉल स्ट्रीट जर्नल'च्या लेखिका
 
इस्लाममध्ये असे काहीतरी असले पाहिजे, जे त्यांना हिंसाचार, दहशतवाद व स्त्रियांची मुस्कटदाबी करण्यासाठी प्रवृत्त करीत असावे.
-निकोलस ख्रिस्तॉफ, 'टाइम्स'चे लेखक
 
पाश्चिमात्य मुस्लिमांनी स्वत:मधील न्यूनगंड काढून टाकावा व आपण पाश्चिमात्य लोकांइतकेच या समाजाचे जबाबदार घटक आहोत असे मानले पाहिजे. त्याच्या जोडीला त्यांना अधिकारही मिळतील. हल्ला करताना मुहम्मद पैगंबरांच्या निंदेचा सूड घेतला असे हल्लेखोर ओरडले खरे, पण प्रत्यक्ष तसे नाही. आमचा धर्म, आमची मूल्ये व इस्लामिक तत्त्वे यांच्याशी तो हल्ला म्हणजे विश्वासघात होता. त्या भयानक घटनेचा आपण निषेधच करतो.
-तारिक रमादान, प्राध्यापक, इस्लामिक स्टडीज, ऑक्सफर्ड विद्यापीठ.

युरोपमधील इस्लाम
फ्रान्समध्ये ३५ लाख मुसलमान आहेत, पण ते सर्व सुशिक्षित आहेत. हल्लेखोरही सुशिक्षित आहेत. ते उत्तम फ्रेंच बोलत होते. मग त्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य, धर्म व मूलतत्त्ववाद यातील फरक समजत नसेल असे म्हणता येणार नाही. फ्रान्समधील साधारण ११००-१२०० मुस्लीम हे सीरिया व इतरत्र इसिससाठी लढत आहेत. तुलनेने ही संख्या नगण्य आहे. त्यांना खरे तर इसिसने जिहादची हाक दिली आहे, पण लगेच काही ते छाती पिटत लढायला जात नाहीत. त्यांचे खरे तर फ्रान्समध्ये चांगले चालले आहे. ते उत्तर आफ्रिकेतील स्थलांतरित असले तरी त्यांचा तिथे जम बसला आहे, त्यामुळे दहशतवादी कारवायांच्या मार्गाला जाणे शक्य नाही. पण सुरुवातीला मुस्लिमांचा वापर अमेरिका, फ्रान्स यांनी करून घेतला व आता इसिस व अल काईदासारख्या संघटना करून घेत आहेत. हा हल्ला वरवर पाहता व्यंगचित्रांवरचा, पत्रकारितेवरचा असला तरी त्यातील अतिरेकी संघटनांची व्यूहरचना वेगळी होती व ती यशस्वीही झाली. व्यूहरचना अशी होती की, फ्रान्समधील सुशिक्षित मुस्लिमांना हाताशी धरून असे हल्ले करायचे, त्यामुळे फ्रेंच जनतेत इस्लामविषयी भय निर्माण होईल. मग ते फ्रेंच मुस्लिमांवर हल्ले करतील व मग त्यांच्या या अन्यायाविरोधात त्यांना कुणी वाली राहणार नाही, मग ते इसिस व अल काईदाची वाट धरतील. काही अंशाने झालेही तसेच, फ्रेंच इस्लामी धर्मगुरूंनी या हल्ल्याचा निषेध केला असतानाही तेथील मशिदींवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्याचे आणखी एक कारण सांगितले जाते, ते म्हणजे फ्रान्स हा अमेरिकेचा मित्र आहे व सीरियातील अतिरेकीविरोधी कारवाईत त्यांचा सहभाग आहे, त्याचा राग दहशतवादी संघटनांना आहे. 

धर्मनिंदा पण किती वेळा
 एक अल्पसंख्याक समुदाय असलेल्या मुस्लिमांच्या खोडय़ा इतक्या नियमितपणे काढल्या जाव्यात का व अमेरिका व युरोपने असे सहन केले असते का, अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली एखादी गोष्ट किती वेळा खपवून घेतली जावी, असाही एक प्रश्न आहे. याचा अर्थ अतिरेक्यांनी केलेले कृत्य समर्थनीय आहे हे सांगण्याचा नाही. ईश्वरनिंदा करणारी ही व्यंगचित्रे हजारो वेळा काढून छापली जात असतील तर वंचित समाजाला ती दुखावणारी असतात, असे व्हॉक्सचे मॅट येगवेसिस यांनी म्हटले आहे. सुडाने सुडाचाच जन्म होतो, तसे यातून घडू शकते याचे भान ठेवायला हवे. त्यांच्या मते हा वांशिकवाद नाकारला पाहिजे. वंचित समाजाविषयी अभिव्यक्तिस्वातंत्र्य असले तरी इतक्या प्रमाणात कुचेष्टा करणे फारसे समर्थनीय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. जरी फ्रान्समध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे तरी अजूनही तिथे मुस्लिमांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालणे राजकारण्यांनाही रोखता आलेले नाही. त्यामुळे अशा गोष्टीतून विचार परिवर्तन होते का, हा खरा प्रश्न आहे, असे जॅकब कॅनफील्ड यांनी म्हटले आहे.

- विशेष (लोकसत्ता)
दि. १५/०१/२०१५, गुरुवार

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...