Wednesday, January 14, 2015

पानिपत : मराठ्यांचे राष्ट्रीयत्व, शौर्याचे प्रतीक - अनिल यादव

    
     जगात अशी काही युद्धे लढल्या गेली, ज्यामुळे त्या-त्या देशातील सामाजिक, भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीत मोठी उलथापालथ झाली. दिल्लीपासून ९० किलोमीटरवर असलेल्या पानिपतावर झालेल्या तीन युद्धांनी भारताचा सर्व इतिहासच बदलून टाकला. पहिल्या महायुद्धाने हिंदुस्थानात मुघल राजवटीचा उदय झाला. 
      दुसऱ्या युद्धात अकबराने हेमू या हिंदू राजाची हत्या करून बादशाही बळकट केली, तर तिसऱ्या आणि विध्वंसक ठरलेल्या तिसऱ्या युद्धाने महाराष्ट्रधर्माला, मराठाशाहीला जगाच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून दिले. पाश्‍चिमात्य इतिहासकारांनी पानिपतावरील मराठ्यांच्या राष्ट्रीयत्वाला, पराक्रमाला मुजरा केला. विचारवंत आणि इतिहासकार इव्हॅन्स बेल लिहितात की, मराठे हे ‘हिंदी लोकांसाठी हिंदुस्थान’ या ध्येयाने आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनेने लढले. त्यामुळे पानिपतची लढाई मराठ्यांना अभिमानास्पद आणि कीर्ती मिळवून देणारी घटना आहे. प्राचार्य रॉलिन्सन मराठ्यांचा पराक्रम आणि क्षात्रतेजाने भारून गेले. ते लिहितात, इतिहासातील एखादा पराजय हा विजयाइतकाच सन्मान देणारा ठरतो. मराठ्यांच्या सर्व इतिहासात त्यांच्या फौजेने राष्ट्रातील सर्व उत्तम शिलेदारांसह पानिपतच्या घनघोर रणक्षेत्रात आपल्या देशाच्या आणि धर्माच्या वैऱ्यांशी लढताना जे मरण पत्करले, त्याहून जास्त यशदायक मरण इतिहासात क्‍वचितच नोंदले गेले असेल.
     परदेशी इतिहासकार पानिपतावरील मराठा पराक्रमाचे गोडवे गात असताना दुर्दैवाने काही भारतीय लेखक आणि इतिहासकार पानिपत हे मराठे आणि महाराष्ट्रावरील कलंक आणि अपयश असल्याचे मानतात. वास्तविक पाहता दिल्लीत मुसलमानी राजवट असताना शेकडो मैल दूर असलेल्या पुण्यावरून मराठा लष्कराला पानिपतावर जाण्याची मुळीच गरज नव्हती. खरे तर दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मुघलांची हुजरेगिरी, गुलामगिरी करणारे, त्यांच्या बाजूने लढणारे तत्कालीन राजपूत, जाट, मुस्लिम संस्थानिक, राजेरजवाड्यांची होती. दिल्लीच्या इभ्रतीचे रक्षण करण्यासाठी आलेल्या मराठ्यांना मदत न करता बिळात लपून बसणाऱ्या वर उल्लेखित सर्वांसाठी पानिपत हे कलंक आहे. या भूमीचे अन्न खाल्लेला, तिच्यावर पोसला गेलेला रोहिलखंडचा नजीब खान, अवधचा  नबाब शुजाउद्दोला यांनी मराठ्यांच्या राष्ट्रधर्माची बाजू न घेता आपल्या धर्माची तळी उचलून धरत देशाशी बेइमानी केली. त्यामुळे पानिपतचा कलंक हा मराठ्यांवर नव्हे, तर या सर्व बेइमानांवर आहे. पानिपतावर मराठे प्राणाची आहुती देत असताना महाराष्ट्र वगळता उर्वरित हिंदुस्थानातील तथाकथित ‘पराक्रमी’ राजे-महाराजे, संस्थानिक गंमत पाहत होते. धर्माने मुसलमान असलेल्या दिल्लीच्या बादशहाचे राज्य शाबूत ठेवण्यासाठी लाखभर मराठ्यांनी मैदानावर जिवाची जी होळी खेळली, त्याला देशाच्या इतिहासात तोड नाही. 
      अफगाणिस्तानचा शासक अहमदशहा अब्दाली, भारतातील बेइमान नजीबखान रोहिला आणि अवधचा नबाब शुजाउद्दोला यांनी हे युद्ध धर्मासाठी लढले. परंतु, मराठ्यांनी देशासाठी युद्ध केले. कारण, मराठ्यांचे लष्कर हे अठरापगड जातींचे होते. त्यात मराठा, ब्राह्मण, मुस्लिम, हबशी यांच्यासह महाराष्ट्रातील बारा बलुतेदार शिपाई सहभागी झाले होते. भगवा झेंड्याच्या रक्षणासाठी मुस्लिम असलेल्या इब्राहिम खान गारद्याने धर्मासाठी नव्हे, तर राष्ट्रकार्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. सदाशिवराव भाऊने तर पानिपतावर अभिमन्यूप्रमाणे लढताना अतुलनीय पराक्रम गाजविला. त्यांच्या शौर्याला तोड नाही. अनेक सरदार त्यांना रणांगण सोडण्याचे सल्ले देत असताना भाऊने देशकार्यासाठी मरण पत्करणे पसंत केले. शहाण्णवकुळी मराठ्यातील असे एकही घराणे नव्हते की, ज्याने पानिपतावर तलवार गाजविली नाही. शिंदे घराण्याच्या अख्ख्या एका पिढीनेच पानिपतावर हौतात्म्य पत्करले. या युद्धाचे  नेतृत्व अनुभवी दत्ताजी शिंदे अथवा मल्हारराव होळकर यांच्याकडे असते तर युद्धाचा निर्णय वेगळा लागला असता. अर्थात, राजकारण आणि धर्मकारण करताना मराठ्यांनी धर्मभेद केल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे पानिपतचे युद्ध मराठ्यांवरील कलंक असल्याचे संबोधणे हे इतिहास घडविणाऱ्या मराठ्यांवर अन्याय केल्यासारखे होईल. 
     हिंदुस्थानच्या इतिहासातून शिवराय, महाराष्ट्र आणि मराठे वगळल्यास केवळ पराजयच आणि पराजयच दिसतो. म्हणूनच अठरापगड जातींच्या समूहातून तयार झालेला मराठा आणि मराठाधर्माने सतरावे आणि अठरावे शतक आपल्या पराक्रमाने गाजविले. पानिपतच्या युद्धानंतर मराठे संपले नाहीत, तर यापुढे त्यांनी दिल्लीचा कारभार आपल्या हातात घेतला. म्हणूनच इंग्रजांनी दिल्लीची सत्ता मुघल, राजपूत, शीख, जाट या शासकांशी लढून नव्हे, तर मराठ्यांशी लढून घेतली.

- सकाळ
दि. १४/०१/२०१५, बुधवार
पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा रोमांचक व धावता आढावा घेण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा. 

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...