Monday, January 12, 2015

पॅरिसचा गर्द काळोख

Albert Uderzo's tribute shows Asterix declare: I too am Charlie




स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची ज्या पॅरिसमध्ये नवतुतारी फुंकली गेली आणि ज्या पॅरिसमधील विविध कलांच्या उन्मुक्त नवसर्जनाकडे साऱ्या जगाने अनेक शतके कौतुकाने आणि अचंब्याने पाहिले; त्या पॅरिसमध्ये जणू काळरात्र वस्तीला आली आहे. जगाच्या इतिहासात दहा पत्रकारांना एकाचवेळी गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रकार कधी घडला नव्हता. त्यातही, व्यंगचित्रकारांना लक्ष्य करून निषेधाच्या घोषणा देणाऱ्या दहशतवाद्यांनी आपले क्रौर्य कोणती परिसीमा गाठू शकते, हे दाखवून दिले आहे. हा इशारा केवळ फ्रेंच पत्रकारांसाठी नाही. तो साऱ्या जगातील पत्रकार, चित्रकार, कलावंत आणि विचारवंतांना आहे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या पंढरीत पत्रकारांचे रक्त सांडून या दहशतवाद्यांनी 'तुमच्या हातातल्या लेखणीवर आणि कुंचल्यावर इतकेच प्रेम असेल तर दुसऱ्या तळहातावर मनोमन शीर उतरवून ठेवा' असा इशाराच दिला आहे. 'चार्ली हेब्दो' या साप्ताहिकाच्या नावातला 'चार्ली' हा शब्द चार्ली या कार्टुनपात्राशी नाते सांगणारा आहे. तो चार्लस द गॉलचाही अप्रत्यक्ष उपहास करणारा आहे. ४५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या, मध्येच काही काळ बंद पडलेल्या या साप्ताहिकाचा खप ४५-५० हजारांच्या आसपास असेल. हा आकडा तसा फार नाही. पण विरोधातला किंवा वेगळा आवाज ​कितीही छोटा अथवा दुर्लक्षणीय असला तरी तो ठेचून काढायचा, हीच सगळ्या रंगांच्या दहशतवाद्यांची रीत असते. तिने यावेळी टोक गाठले. 'चार्ली हेब्दो' हे डाव्या​ किंवा काहीवेळा अतिडाव्या विचारांचा आसरा घेत असे. त्याच्या व्यंगचित्रांच्या, लेखांच्या माऱ्यातून जगातला एकही धर्म, विरोधी तत्त्वज्ञान किंवा 'आयडॉल' सुटले नाहीत. 
 इस्लामी दहशतवाद आणि चार्ली हेब्दो यांच्यातील ही लढाई गेली आठ-नऊ वर्षे चालू होती. २००६ मध्ये रडणाऱ्या आणि 'या मूर्खांच्या तावडीत कुणीकडून सापडलो' असा शोक करणाऱ्या प्रेषिताचे चित्र छापून चार्ली हेब्दोने या लढाईला तोंड फोडले होते. ती लढाई पुढे कोर्टांमध्ये गेली. तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक यांनी 'कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जातील, इतके स्वातंत्र्य घ्यायला नको,' अशी भूमिका घेऊन सबुरीचा सल्ला दिला. मात्र, नंतर सार्कोझी हे अध्यक्ष मात्र फ्रान्सला उपहासाची आणि विडंबनाची दीर्घ परंपरा आहे, असे सांगत चार्ली हेब्दोच्या पाठीशी ठाम उभे राहिले. सार्वजनिक ठिकाणी बुरखा कशाला? असेही सार्कोझी यांनीच ​विचारले होते. चार्ली हेब्दोने न्यायालयीन लढाया केल्या, पण माघार घेतली नाही. स्वतःचे उच्चारस्वातंत्र्य गहाण ठेवण्याचेही नाकारले. तात्त्विक चर्चेत प्रोव्होकेशन म्हणजे खंडनपर उत्तेजनेला (साध्या भाषेत 'उचकावण्याला') महत्त्व असते. अशा प्रोव्होकेशनमुळे संभाव्य सत्याची सापेक्षता कमी होऊ शकते. संवादाचे नवे मार्ग दिसू शकतात. पण विडंबनपर कार्टुन्समधून जन्म घेऊ शकणाऱ्या अशा कोणत्याही चर्चेत या कडव्या दहशतवाद्यांना रस असणे शक्यच नव्हते. या अर्थाने ही कमालीची विषम लढाई होती. इस्लामी दहशतवादाशी चाललेल्या सुसंस्कृत जगाच्या लढाईने आशिया, आफ्रिका हे खंड पादाक्रांत केलेच होते. पश्चिम युरोप खदखदत असला तरी तेथे या लढाईने इतके उग्र रूप आजवर घेतले नव्हते. या हल्ल्यामुळे फ्रान्स आणि युरोप यांच्या वर्तमानाला गंभीर वळण लागू शकते. तंत्रज्ञानाने अपार ताकद कमावलेला जगभरातला मीडिया या आव्हानाकडे कसा पाहतो आणि कोणती रणनीती आखतो, हे लवकरच स्पष्ट होईल. पॅरिसचे निर्भर आकाश काळवंडून टाकणारा हा गर्द काळोख अनेक रंगांत आपल्या आकाशावर चाल करून येऊ शकतो. तो शिकस्त करून रोखायला हवा. 

-  अग्रलेख (संपादकीय, महाराष्ट्र टाईम्स)
दि. ०९/०१/२०१५, शुक्रवार

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...