Monday, January 19, 2015

हनुमानाची महाभारतातील भूमिका

आपल्याला माहित आहेच की महाभारताच्या युद्धात भगवान हनुमान अर्जुनाच्या रथावर विराजित होते. परंतु आपल्यापैकी केवळ थोड्याच लोकांना त्यामागची कथा माहित असावी. ती कथा अशी...
_______________________________________________________________________

धनुर्धारी अर्जुन एकदा यात्रेसाठी संतमंडळींबरोबर दौरा करत होता. विविध पवित्र जागा फिरून झाल्यावर दक्षिण भारतातील रामेश्वरम या ठिकाणी ते सर्व जण आले. रामायणाच्या काळात भगवान रामांनी, त्यांची पत्नी सीता हिला सोडवण्यासाठी लंकेला जाण्याआधी प्रभू शंकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी, एक शिवलिंग तेथे प्रस्थापित केले होते. वानरे आणि अस्वलांच्या सैन्याच्या मदतीने त्यांनी दगड व झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने त्या अथांग सागरावर एक पूल देखील बांधला होता. त्या पुलाच्या अवशेषांकडे बघून अर्जुन आश्चर्यचकित झाला. त्याने विचार केला, ‘रामासारख्या धनुर्धारी योद्धयाला एक पूल बांधण्यासाठी वानरे आणि अस्वलांसारख्या प्राण्यांवर का अवलंबून राहावे लागले? त्याने हा पूल बाणांनी का नाही बांधला?’ बरोबर असणाऱ्या एकाही यात्रेकरूला याचे उत्तर ठाऊक नव्हते. हे बघून तेथूनच दूरवर थांबलेले आणि या सर्व लोकांबरोबर फिरत आलेले एक माकड हसले आणि त्याने या प्रश्नाचे उत्तर दिले,

“बाणांचा पूल! हे राजा, तुला त्या काळातल्या पराक्रमी माकडांची काही कल्पना आहे का? सुग्रीव, नळ, नील, अंगद आणि हनुमान यासारख्या दिग्गजांनी आपापली पदे भूषविली होती. कुठल्याही बाणांचा पूल त्यांचा भार पेलू शकला नसता. त्यांचंच काय पण माझ्यासारख्या एका लहान आणि कमकुवत माकडाचा भारही बाणांचा पूल पेलू शकला नसता.”

अर्जुन ते कथित आव्हान घेण्यासाठी लगेच पुढे सरसावला.

"आपण एक पैज लावू. मी एक बाणांचा पूल तयार करतो. जर त्या पुलाला तुझा भार पेलता आला नाही तर मी स्वतःला अग्नीस अर्पण करेन."

माकड तयार झाले. अर्जुनाने आपल्या अजरामर भात्यातून बाण काढत त्या अथांग समुद्रावर एक बाणांचा पूल बांधला. माकडाने पुलावर उडी मारली आणि ते दहा पाऊलेही पुढे गेले नसेल की तो पूल कोसळला. अर्जुनाने माकडाला पाण्यातून बाहेर येण्यास मदत केली आणि पुन्हा एकदा प्रयत्न करण्याबद्दल विचारले. माकड पुन्हा तयार झाले. अर्जुनाने पुन्हा एकदा एक बाणांचा पूल बांधला, ह्यावेळी बाणांच्या मधले अंतर त्याने कमी ठेवले, व माकडाला पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची विनंती केली. माकड पुन्हा एकदा लंकेच्या दिशेने त्या पुलावरून जाऊ लागले आणि पुन्हा एकदा तो पूल कोसळला. अर्जुनाला स्वतःचीच लाज वाटली. पैजेच्या नियमाप्रमाणे, जास्त वेळ न दवडता, त्याने एक लाकडाची चिता रचली व तो आगीत उडी मारणार इतक्यात एका युवकाने त्याला मागे ओढत थांबवले.

 युवक आश्चर्याने म्हणाला, “हे शक्तिमान राजा, तू हे काय करायला निघाला होतास?”

“मला एक आव्हान देण्यात आले होते जे मी पेलू शकलो नाही. अशी लाजिरवाणी हार पत्करून मी आता जगू इच्छित नाही”, अर्जुन म्हणाला.
तो युवक विस्मित झाला. “पण पैजेचा निवाडा किंवा फैसला करणारा कोणी होता का तिथे? आव्हान देणारा बरोबर आहे किंवा नाही हे ठरवायला कोणी होते? निवाडा करायला कोणीही नसताना घेतली गेलेली स्पर्धा ही निरर्थक आहे. तेंव्हा प्रार्थना कर, पुन्हा एकदा एक पूल बांध आणि ह्या वेळी मी परीक्षक म्हणून थांबतो.”

अर्जुन काय किंवा ते माकड काय कोणीच ही गोष्ट नाकारू शकत नव्हतं त्यामुळे दोघेही तिसऱ्यादा तयार झाले. पूर्ण आत्मविश्वासाने आणि कल्पकतेने अर्जुनाने तिसरा पूल बांधला.

“घे, आता हा पूल पार करून बघ”, तो त्या माकडाला म्हणाला.

ते माकड हसत तयार झाले. ते पुलावरून चालू लागले परंतु पूल अजूनही मजबूत होता. ‘त्याने यावेळी बाण जास्त चांगले गुंफले असतील’, माकडाने स्वतःशीच विचार केला. ते पुलावर उड्या मारू लागले परंतु पूल न कोसळता तसाच मजबूत उभा राहिला. माकड आश्चर्यचकित झाले. ‘पूर्वी हा समुद्र पार करताना जे रूप मी घेतले होते ते घेऊन बघतो’, त्याने विचार केला आणि ते अचानक एका महाकाय पर्वता एवढे मोठे झाले. आपल्याला आव्हान देणारे हे माकड दुसरे कोणी नसून खुद्द महान भगवान हनुमान आहेत हे बघून अर्जुनाची दातखिळ बसली. आता केंव्हाही ह्या महान वानराच्या ताकदीपुढे हा पूल कोसळून पडेल हे उमजून भीतीपोटी त्याने मान खाली घातली. बाणांचा पूल हनुमानासारख्या महायोद्ध्यांना पेलू शकेल ह्या त्याच्या विचारातला मूर्खपणा त्याला कळून चुकला. तो खूपच शरमला. पण.. तो पूल कोसळला नाही. महाकाय हनुमानाच्या वाजनानेदेखील! अर्जुन बावरला! काय चालू आहे हे त्याला कळेना. अजूनही तो पूल कोसळला नाही यासाठी त्याच्याकडे कुठलेही स्पष्टीकरण नव्हते. हनुमानालाही काही कळेना! तो आता त्या पुलावर पुन्हा पुन्हा उड्या मारू लागला पण ते ही व्यर्थ होते. हा संपूर्ण वेळ त्या युवकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. एका निर्णायक क्षणी, दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना कळून चुकले की त्यांचे परीक्षण करणारा कोणी साधारण युवक नव्हता. अर्जुन आणि हनुमान दोघेही त्या युवकाच्या पाया पडले. 

 “मी राम आहे आणि मीच कृष्ण देखील आहे. अर्जुना, मी तुझा पूल कोसळण्यापासून वाचवला. तुझ्यासाठी हा एक नम्रतेचा धडा व्हावा. गर्व आणि अहंकार बड्याबड्यांना संकटात टाकतात. प्रिय हनुमान, तुला तरी हे माहित असायला हवे. अर्जुन, हा या काळातल्या योद्ध्यांपैकी एक श्रेष्ठ योद्धा आहे. तू त्याला आत्महत्या करण्यास कसं प्रवृत्त केलंस?”

अर्जुन आणि हनुमान यांनी प्रभूंची क्षमा मागितली आणि प्रभूंनी त्यांना आशीर्वाद दिला.


"प्रायश्चित्त म्हणून, भावी काळात होणाऱ्या महायुद्धात मी तुझ्या रथाला स्थिर करेन आणि त्याचे संरक्षण करेन" हनुमान म्हणाला.

“तथास्तु! भावी काळात होणाऱ्या घनघोर महायुद्धात अर्जुन ज्या रथावर आरूढ होईल त्या रथाच्या झेंड्यावर तू विराजमान असशील”, असे हनुमानाला म्हणून प्रभू अंतर्धान पावले.                   


No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...