Friday, September 6, 2013

ऊंचे लोग - उत्तम कांबळे

    बऱ्याच वर्षांनी कोणत्या तरी कारणानं मुंबईतल्या एका टोलेजंग हॉटेलात उतरलो होतो. अर्थात, एका संस्थेनं ते बुक केलं होतं. हॉटेलात जाताच वेटरनं तिथल्या व्यवस्थांविषयी आवश्‍यक असणारं ज्ञान भरभरून दिलं. अलीकडच्या खोल्या अत्याधुनिक सुखसोयींनी भरलेल्या आहेत. पूर्णपणे यांत्रिकीकरण झालंय. ज्याला ते समजतं, तोच खोलीचा आनंद उपभोगू शकतो. वेटरनं मेनू कार्ड समोर ठेवलं. माझ्याबरोबरचा सहकारी म्हणाला: "तुम्हाला औषध घ्यायचंय; थोडं खाऊन घ्या.''
      आम्ही दोघांनीही मेनू कार्ड चाळायला सुरवात केली. मेनूकार्ड भलं मोठं आणि हॉटेलच्या तारांकित वैभवात भर टाकणारं होतं. पदार्थ आणि त्यांच्यासमोर लिहिलेले दर वाचून गरगरायला लागलं. बाहेर २० रुपयांना मिळणारी पाण्याची बाटली १८० रुपये, बाहेर ३०-४० रुपयांना मिळणारं ऑम्लेट इथं ५०० ते ८०० रुपये, पावाचा तुकडा १०० ते १२५ रुपये, चहा २०० रुपये... बाप रे बाप! पुढचं काही वाचवेनाच... 
        मी माझ्या सहकाऱ्याला म्हणालो: "चला, बाहेर जाऊ'' आणि त्यांची संमती न घेताच आम्ही बाहेर पडलो. माझा सहकारी समजूत काढत होता. "अहो, हॉटेलच्या भव्यतेनुसार दर ठरलेले असतात. कुणी कुरकुर करत नाही. आठवतं का, अमुक एका देशाचा अध्यक्ष इथं राहून गेलाय. अमुक मोठे उद्योगपती, संचालक, सीईओ, नट इथंच येत असतात. कुणी दराविषयी कुरकूर नाही करत...तसं करणं प्रतिष्ठेला शोभतही नाही. आपण तिथलीच सेवा घ्यायला हवी होती.''
         मी म्हणालो: "तुम्ही म्हणता ते खंरही असंल; पण यातले बहुतेक जण कुणाच्या तरी पैशावर येतात इथं. यायला हरकतही नाही; पण २० रुपयांचं पाणी २०० रुपयांना. तीच बाटली, तेवढंच पाणी; तसंच पॅकिंग...काय फरक आहे? मग पाचपट पैसे देणं म्हणजे मला थोडी उधळपट्टीच वाटते. नाहक उधळपट्टी...कुणीतरी आपलं बिल भरणार आहे, म्हणून मस्तीत केली जाणारी उधळपट्टी...'' आम्ही बाहेर गेलो. १००-२०० रुपयांत दोघांनी खाऊन घेतलं. २० रुपयांत पाण्याची बाटलीही आली. पुन्हा त्या प्रतिष्ठित हॉटेलात परतलो. सवलतीच्या दरात तिचं भाडं होतं दिवसाला १० हजार रुपये...
         आपल्या देशातली दारिद्य्ररेषा आणि तिच्या खाली असणाऱ्या माणसाचं दरडोई उत्पन्न ठरवण्यावरून मोठमोठ्या विद्वानांत आणि सरकारमध्ये वाद सुरू आहे. कुणी म्हणतं दरदिवसा ३० रुपये, कुणी म्हणतं ४० रुपये. वाद काही मिटत नाही. एकाचं दरदिवसा दरडोई उत्पन्न म्हणजे दुसऱ्याचं एक वेळचं पाणी, असंही गणित मांडता येत नाही. कल्पना करा, एखाद्यानं या प्रतिष्ठित हॉटेलात राहून दिवसभरात पाण्याच्या तीन बाटल्या फस्त केल्या, तरी करासह ६०० रुपये होतात आणि इकडं आख्ख्या कुटुंबानं ५०-६० रुपयांत जगायचं आहे. वरच्या वर्गाचं उत्पन्न वाढलं, की तोच महागाईला निमंत्रण देतो. जास्तीत जास्त महागाई म्हणजे जास्तीत जास्त प्रतिष्ठा. एकतर यातले बहुतेक जण कुणाचे ना कुणाचे तरी पैसे उडवत असतात. त्यांचा पगारही जंबो असतो. महागाईवर ना कधी ते चर्चा करतात; ना कधी तिला विरोध करतात...महागाई कितीही तीक्ष्ण दातांची असली तरी त्यांच्यापर्यंत ती पोचतच नाही. त्यांच्याकडं कवचकुंडले असतात...
         परवा 'मद्रास कॅफे' चित्रपट पाहायला गेलो होतो. बुकिंग विंडोजवळ बोर्ड लावला होता. सकाळच्या शोचं तिकीट होतं १२० रुपये, तर रात्रीच्या शोचं तिकीट होतं२२० रुपये! हा फरक का? चित्रपट तोच, जागा तीच, प्रत्येक शोवर वीज, एसी, तेवढाच खर्च होणार; मग एवढा फरक का? कुणाच्याच मनात असा प्रश्‍न निर्माण होत नाही. वरचे, मधले कुणीच याविषयी ब्र काढत नाहीत. बाहेर अतिशय उच्च दर्जाच्या लाह्या मिळतात १५-२० रुपयांना. इथं त्या १६० रुपयांना. एवढा फरक का? कुणाच्याच ओठावर असा प्रश्‍न नसतो. याउलट "आपण एन्जॉय करायला येतो; महागाईचा अभ्यास करायला नाही,' असं समर्थन बरेच जण करतात. १०-२० पटींनी अधिक रक्कम देऊन एखादी गोष्ट विकत घेण्यात एन्जॉयमेंट कशी काय असते, हा एक न सुटणारा प्रश्‍न. 
         कधीकधी मधले म्हणजे मधल्या वर्गातले लोक कुरकूर करतात; पण चित्रपट संपल्यावर. "तिकीट किती महाग आहे नाही? आणि बर्गरचे १५० रुपये लावले,' अशी त्यांची तक्रार असते. एक दिवस चित्रपटावर बहिष्कार टाकला, की सारं काही वळणावर येऊ शकतं; पण तसं कुणी करीत नाही. कॉलेजमध्ये गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या प्राध्यापकांनी अतिशय चांगलं शिकवावं आणि तो आमचा हक्क आहे, असं विद्यार्थ्यांनी थोडं जरी मोठ्या आवाजात सांगितलं, तरी ट्यूशनची दुकानं बंद पडतील; पण तसं घडत नाही. उलट, कोट्यामध्ये लाखो-कोट्यवधी रुपये खर्चून पोरं "आयआयटी'च्या तयारीला जातात. तिथल्या "दुकानदारां"
नी प्रवेशावर निर्बंध आणले. ट्यूशनमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा सुरू केली. ती उत्तीर्ण व्हावी, यासाठी मग पुणे, मुंबई, नाशिकमध्ये नवी ट्यूशन सुरू झाली. तिलाही प्रचंड गर्दी. मग आता तिथं प्रवेश मिळावा म्हणून अजून कुणीतरी नवी शक्कल काढेल. खिचडी खाऊन शिकणारी पोरं ट्यूशनच्या दारात जाऊ शकत नाहीत आणि फी इतकी का वाढली, असा प्रश्‍न उच्च वर्गात जगणारा कुणी विचारत नाही.
       मला आठवतं, हातात पिशवी घेऊन रस्त्यावरच्या भाजीबाजारात एकदा उभा राहिलो होतो. माझ्या अगोदरच भाजीविक्रेत्यासमोर एका महिलेनं इम्पोर्टेड गाडी लावली. गाडीची काच खाली करून आणि गाडीत बसूनच ती भाजी खरेदी करू लागली. मोठी मजेशीर रीत होती तिची. "वोह बैंगण एक किलो दो... फ्लॉवर, कोबी प्रत्येकी एक किलो' अशी ऑर्डर ती देत होती. विक्रेत्यानं साऱ्या गोष्टी पॅक केल्या. खिडकीशेजारी तो उभा राहिला. पुढच्या सीटवर थैली ठेवत तो म्हणाला: ""मॅडम, ७०० रुपये!'' मॅडमनं पटकन ७०० रुपये दिले. १०० रुपयांची टीपही दिली. बंदुकीची गोळी सुटावी, तशी तिची गाडी सुटली. मी भाजीसाठी थांबलो. "वांग्याचा दर काय?' "कोबी कसा?' असे प्रश्‍न विचारू लागलो. विक्रेत्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. 

तो म्हणाला: "मॅडमकडून जो दर घेतला, तोच तुमच्याकडून घेईन. एक पैसा जादा घेणार नाही.''
मी म्हणालो: "वांग्याचा दर काय लावला?''
तो म्हणाला: "फार नाही; १०० रुपये.''
मी म्हणालो: "वांगी तर ७० - ८० च्या भावानं विकली जात आहेत.''
तो म्हणाला: "होय, माहितीय मला; पण मॅडमनं आत्ताच नवा दर फोडला. 
१०० रुपये किलो. बघा परवडतं का?''

      कुणाच्याही लक्षात यायला हरकत नाही, की आता जगाचे सरळसोट दोन तुकडेच झाले आहेत. वरचा तुकडा बिनधास्त जगतोय. महागाई कशाला म्हणतात ते तो गुगलवर, ऑक्‍सफर्ड डिक्‍शनरीत पाहतोय. खालचा तुकडा घालमेल होऊन महागाई पचवण्याचा प्रयत्न करतोय. महागाई का वाढते, याचं कारण त्याला कळत नाही. त्याचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून सरकार महागाईला लगाम घालण्याऐवजी सबसीडीचे नवे मार्ग शोधायला लागतं. खिचडीपासून अन्नसुरक्षा विधेयकापर्यंत कोणतेही मार्ग यात असू शकतात. या मार्गावर जगण्याची व्यवस्था होईल कशीतरी; पण लढण्याची आणि विकासाची व्यवस्था होत नाही कधी...एखाद्यानं महागाईला कंटाळून आत्महत्या केली, की त्याला कसलीच भरपाई मिळत नाही आणि मिळाली तरी मरणानंतर तिचा काय उपयोग? 
       समृद्ध जीवन जगणाऱ्यांचा हेवा कुणीच करू नये. तसं करायचं काही कारणही नाही; पण समृद्ध जगणं म्हणजे नेमकं काय, हेही कधीतरी ठरवायला हवं. २० रुपयांचं पाणी २०० रुपयांना घेणं म्हणजे समृद्ध जीवन? ४० रुपयांची वांगी गाडीत बसून १०० रुपयांना घेणं म्हणजे समृद्ध जीवन? की अशा चढ्या आलेखातून पिळवणूक होतेय, असा प्रश्‍न कधीच न विचारणं म्हणजे समृद्ध जीवन?
        रस्त्यावर कुठंही संत्री, सफरचंद खरेदी करा. तुम्ही गाडीतून उतरलात तर महागाई भडकते...तुम्ही मौन पाळून व्यवहार केलात, तर ती आणखी भडकते आणि भडकत्या वस्तूत प्रतिष्ठा आहे, असं समजून बसाल, तर ती आणखी आणखी भडकते. आपल्याला त्याच्या झळा बसणार नाहीत कदाचित; पण तुमच्या मागून जो चालत येतो आहे, महिन्याचं अंदाजपत्रक पाठ करत येतो आहे, त्याला मात्र त्या झळा बसणार आहेत, हे विसरायचं का आपण? खरं म्हणजे मागून येणाऱ्याचा दोष काहीच नाहीय. दोष एवढाच, की तो वरच्या वर्गामागं उभा आहे.
         माझा एक मित्र देवदर्शनासाठी रांगेत उभा होता. त्याच्या पुढं वरच्या वर्गातला एक भक्त उभा होता. दर्शन झाल्यानंतर त्यानं दानपेटीत हजाराची पत्ती टाकली. पुजाऱ्यानं खूष होऊन त्याला देवाचा स्पर्श झालेला नारळ दिला. आशीर्वाद दिला. माझ्या मित्रानं मात्र दर्शन झाल्यावर पाच रुपयांची पत्ती टाकली. पुजाऱ्यानं तेही बघितलं आणि तो पुटपुटायला लागला: "पुढची माणसं कशी श्रद्धा व्यक्त करतात बघावं, रीत पाळावी...''
वगैरे वगैरे... वरच्यानं दानपेटीचा भावही वधारून ठेवला होता. मित्र शरमिंदा होऊन मागं परतला. त्याला त्याच्या दारिद्य्राची लाज वाटू लागली. मी म्हणालो: "नाराज कशाला होतोस आणि वरच्या वर्गात जाऊन त्यांच्यासारखं वागण्याची खोटी स्वप्नं का बाळगतोस? तुलाही हजार रुपये टाकायचे होते का? लक्षात ठेव, देव नावाची शक्ती कुणाकडं काहीच मागत नसते. हे वरचे लोक देवासह-माणसासह सर्वांनाच अशा काही ना काही सवयी लावतात... श्रद्धेत नव्हे; तर हजाराच्या पत्तीत प्रतिष्ठा आहे, असं सांगतात...''  
       मध्यंतरी वरच्या वर्गाची व्याख्या करणारी एक जाहिरात कुठल्या तरी मसाला गुटखा तयार करणाऱ्या कंपनीनं बनवली होती. उत्पादन खायचं आणि थुंकत फिरायचं. ऊंचे लोगों की कसली तरी पसंत, असं त्या जाहिरातीचं नाव होतं. एक पुडी तोंडात टाकली, की जणू काही अमिताभ बच्चनएवढी उंची प्राप्त होणार...! मग अशा जाहिरातीत काम करण्यासाठी नट-नट्याही पुढं येऊ लागल्या. आपली आर्थिक उंची वाढवू लागल्या...
        आपण वरचं जगत असताना खालच्याचं विनाकारण नुकसान करतोय...अशा खालच्या वर्गाचं, की ज्यानं या वरच्या वर्गाला विरोध केला नाही. आपण कितीही वर गेलो, तरी आपले पाय कुणाच्या तरी खांद्यावरच असतात. आपलं वरचं स्थान तोपर्यंतच टिकून राहतं, जोपर्यंत हे खांदे हलत नाहीत, उठाव करीत नाहीत, प्रश्‍न विचारत नाही... कुणी सांगावं, कोण्या एका क्षणाला या खांद्यांतूनही फुटतील प्रश्‍न...

- सप्तरंग (सकाळ)
दि. ०१/०९/२०१३, रविवार
 

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...