Sunday, August 18, 2013

माणूस होतोय डिलीट - उत्तम कांबळे

"पाचच मिनिटांत येतो,' असं सांगत मला हॉलमध्ये बसवून मित्र बाथरूममध्ये गेला. 

       बाथरूमच्या शेजारी, अगदी थोडीफार बाथरूमला चिकटूनच, त्याची डायनिंग रूम. डायनिंग टेबलवर त्याचा दहावीतला मुलगा जेवण करत बसलेला. त्याच्या पाठीवर सॅक लटकलेली आणि डाव्या हातात त्यानं शाळेला न्यायची वॉटरबॉटल गच्च पकडलेली...त्याला खूप घाई झालेली असावी, असं त्याच्या वर्तनावरून वाटत होतं. सकाळी सकाळी दीड-दोन तासांची ट्यूशन करून तो परतत होता. आता तो शाळेला जाईल. पुन्हा ट्यूशन करेल. टीव्हीवरची एखादी सीरिअल पाहील. मग पुन्हा एक तास अभ्यास करेल. दिवसभराच्या घडामोडींचं रिपोर्टिंग आई-वडिलांसमोर; त्यातही शक्‍यतो आईसमोरच करेल. मग तो झोपायला जाईल. हो, झोपण्यापूर्वी आई त्याला रोज बघायच्या स्वप्नांची आठवण करून देईल. काहीही करून शंभर टक्के गुण मिळवायचे आहेत आणि क्वालिटी वन असलेल्या न्यू एज कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायची आहे. यंदा दिल्लीत आठ-दहा विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळवूनही इच्छित कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली नव्हती. कुठून तरी ही बातमी आईनं वाचलेली किंवा ऐकलेली... तिचं टेन्शन वाढलेलं... सारं घरच टेन्शननं भरलेलं...वेळेचं नियोजन अतिशय काटेकोरपणे केलेलं... मिनिटा-मिनिटाचं नियोजन... अनेकदा तर घरातले हे सदस्य घरातल्या घरातच मोबाइलवरून बोलायचे... प्रत्यक्ष भेटून बोलल्यावर वेळ हकनाक वाया जातो, हेही त्यांना कळलेलं होतं... प्रत्येकाकडे मोबाईल, लॅपटॉप वगैरे वगैरे...
        बाथरूममध्ये गेलेल्या मित्रानं आतूनच आपल्या पोराला आवाज दिला, ""बेटा, टीपॉयवर माझा मोबाइल आहे. त्यात एस. एन. जगदाळेंचा नंबर आहे. टेम्प्लेटमध्ये जा आणि कन्डोलन्स मेसेज दे पाठवून. त्याचे वडील वारले आहेत.''
        पोरगा तोंडातला घास चघळतच उठला. सॅकसह उठून तो हॉलमध्ये आला. वडिलांचा मोबाइल उचलला. एका क्षणातच त्यानं कन्डोलन्स मेसेज शूट केला. दुसऱ्याच क्षणाला तो पुन्हा डायनिंग टेबलवर गेला. जेवणातली दोन-तीन मिनिटं वाया गेली होती. भरभर जेवून तो ही मिनिटं भरून काढतोय, असं वाटायला लागलं. जेवण संपवून तो उठला. पाठीवरची सॅक नीट केली. हातात पाण्याची बाटली होतीच. "आता मी बाहेर पडणार,' असं त्यानं खुणेनंच आईला सांगितलं. प्रत्येक गोष्ट तो नेमकेपणानं करत होता. जणू त्याच्या शरीरात कोणत्या तरी स्वरूपात प्रोग्रॅम फीड केला आहे...

बाथरूममधून बाहेर येत मित्रानं मुलाला विचारलं: "बेटा, केला का एसएमएस शूट?''
पोरगा म्हणाला: "येस पप्पा.''
मित्र हॉलमध्ये आला. टीपॉयवरचा मोबाइल त्यानं उचलला. सेंट मेसेजमध्ये तो गेला आणि जोरात ओरडला: "बेटा, अरे हे काय केलंस?''
पोरगा म्हणाला: "काय पप्पा?''
मित्र म्हणाला: "अरे, तुला कन्डोलन्स मेसेज पाठवायला सांगितलं. अरे, तू तर लग्नाच्या वाढदिवसाचा एसएमएस शूट केलास. अरे, आता प्रचंड भानगड झाली. साला इज्जतच खलास झाली. त्याला काय वाटेल? मीच करायला पाहिजे होता एसएमएस. उगीचच तुला सांगितलं...''
मित्र एकसारखा बडबडत होता. त्याचा चेहरा रागानं लाल झाला होता. मुलगा मात्र हे सारं ऐकत ऐकत शांतपणे हॉलमध्ये आला. त्यानं स्टूलवर बसून पायात सॉक्‍स घातले. शूज घातले. बाहेर पडण्यासाठी तो उठला. वडिलांकडे शांतपणे पाहत म्हणाला: "पप्पा, टेन्शन कशाला घेताय? होतं असं कधी कधी... आता एक करा... "इग्नोअर फर्स्ट मेसेज' असं ऑपरेट करून कन्डोलन्स मेसेज पाठवा. काम खलास!... टेन्शन नका घेऊ..! मी निघतोय पप्पा... बाय पप्पा...'' 
      
      मुलगा पाठमोरा होऊन बाहेर पडला. त्याच्या पाठीकडे बघतच मित्र पुटपुटायला लागला: "अरे, शोकसंदेशात चूक करणं खूप गंभीर... आता कशी काय दुरुस्ती करायची? तुला माहीत नाहीय, माझे वडील वारले, तेव्हा तो स्वतः भेटायला आला होता. कशाला सांगितलं मी तुला काम?''
पोरगा एव्हाना निघून गेला आणि पोरानं सांगितल्याप्रमाणे मित्र नवा एसएमएस तयार करू लागला: "प्लीज इग्नोअर अर्लिअर मेसेज. रीड धिस वन. आय शेअर युवर सॉरो...'' मित्रानं एसएमएस शूट केला.
       इतक्‍यात वहिनीनं चहाचा कप आणून टीपॉयवर ठेवला. तिलाही सगळं महाभारत कळलं होतं. ""अहो, मेसेज पाठवण्याऐवजी फोन केला असतात तर?' एवढं एकच वाक्‍य बोलून, उत्तर न ऐकताच, ती किचनमध्ये गेली. मित्र माझ्याकडे पाहत बायकोनं विचारलेल्या प्रश्‍नावर बोलू लागला: "बघा, काय म्हणते ती! फोन का नाही केला?'' अहो, फोनपेक्षा एसएमएस स्वस्त असतो. तो हमखास पोचतो. माणूस कधी ना कधी त्याच्यावर नजर टाकतोच आणि ज्याच्या घरी मयत झाली आहे, तो काय "हॅलो', "हॅलो' करण्यासाठी फोन कानाला लावून बसत असेल का? तो गर्दीत असणार, दुःखात असणार, रडारडी ऐकत असणार आणि आपण इकडून "हॅलो,' "हॅलो' म्हणत राहायचं... कसं वाटेल दोघांनाही?''

मी सहजच म्हणालो: "...पण चुकीचा मेसेज वाचून काय वाटलं असेल त्याला? एव्हाना त्यानं तो वाचलाही असेल.''
मित्र: "हो; पण करेक्‍शनही पाठवलंय की मी.''
मी: "बूंद से गयी वो गयी...जगण्या-मरण्याच्या गोष्टीत ऑनलाइन होण्याऐवजी थेट बोलणं, भेटणं अधिक चांगलं असतं, नाही का?
मित्र: "चांगलं असतं, हे खरंय; पण वेळ पाहिजे ना?''
मी: "तुमच्या मित्रानं वेळ काढला होता ना, तुमच्या वडिलांचं निधन झाल्यावर...''
मित्र: "जाऊ दे, आता व्हायचं ते होऊन गेलं...साला आपण सारेच लाइनसिक झालोय असं वाटतंय... फिजिकली काही करावं, असं वाटत नाहीय. सारं मेटाफिजिकल... जुळवून घ्यायला हवं नव्या व्यवस्थेशी...''
खरं तर वाद वाढवावा, असा विषय नव्हता. मी एका कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका त्याच्या हातात दिली.
म्हणालो: "हे बघ, मी ही पत्रिका ऑनलाइन पाठवू शकलो असतो; पण तुला भेटता आलं नसतं. तुझ्या भेटीचा आनंद घेता आला नसता. होता वेळ. खरंतर वेळ काढून आलो...'' 

       मित्र काही बोलला नाही. मीही बाहेर पडलो. सगळं जग ऑनलाइन झालंय हे खरंच आहे. हे होणारही होतं; पण लायनीतून माणूस डिलीट व्हायला लागलाय, याचं वाईट वाटायला लागलं. मित्राच्या वडिलांचं निधन झाल्यानंतरही एसएमएस करायचा की कॉल करायचा, कोणत्या स्कीममधून किती पैसे वाचवायचे, हे जरा जास्तच होतंय, असं वाटायला लागलं. फोन काय, संगणक काय, शेवटी तो माणसासाठीच असतो की नाही? मग त्यातून नेमका माणूसच हेरून तोच का डिलीट करायचा? 
       परवा तर एका पोरीनं ऑनलाइन आत्महत्या केली. मित्राच्या संगणकाशी आपला संगणक कनेक्‍ट केला. कॅमेरा ऑन केला आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या मित्राला किंवा प्रियकराला सांगितलं: "माझी सुसाइड पाहायची का? पाहा.'' असं म्हणत स्वतःला टांगून घेतलं पंख्याला. पलीकडे स्क्रीनवर लटकणारी डेड बॉडी पाहत होता प्रियकर... काही करू शकला नाही... बॉडी स्क्रीनवर दिसत होती, हे जसं खरं, तसं प्रत्यक्षात ती तरुणी शेकडो मैलांवर होती, हेही वास्तवच होतं. कॅमेरा बॉडी स्क्रीनवर आणू शकतो; पण भौगोलिक अंतर तसंच राहतं... भावनाही जागच्या जागीच राहतात... ऑनलाइन प्रेम, ऑनलाइन आणा-भाका, ऑनलाइन किसिंग आणि मिसिंगही... ऑनलाइनचा भलताच काहीतरी अर्थ आपण घेत नाही आहोत ना माणूस गहाण टाकून किंवा तो डिलीट करून? नाहीतर "नवा एसएमएस पाठवून करेक्‍शन करा,' असं बिनधास्तपणे तो मुलगा म्हणालाच नसता किंवा "कर शूट कन्डोलन्स मेसेज,' असं त्याचा बाप म्हणाला नसता... मेसेज कितीही वेगानं शूट करता येतो; पण भावना-संवेदनांचं काय? त्या कशा करता येतील शूट?
      भावनांचा विचार करणं म्हणजे अँटीऑनलाइन होणं नव्हे. या लाइन टिकवण्याबरोबरच भावना कशा टिकवता येतील..., माणूसपण कसं टिकवता येईल, याचाही विचार महत्त्वाचाच...एखाद्याला "काळजी घे,' असं अंतःकरणातले दोन ओले शब्द वापरून सांगणं आणि "टीसी' (टेक केअर) अशी दोन अक्षरं एसएमएसद्वारा कुठल्या तरी स्कीममध्ये बसवून पाठवणं, यात काहीच फरक नाहीय का? आपण इतके कसे बिझी झालो आहोत, की "टेक केअर'चं स्पेलिंग लिहायलाही वेळ नाही आपल्याला! रेल्वेतला टीसी आणि काळजीतला टीसी जणू काही एकाच मापानं तोलतोय का आपण?  

- सप्तरंग (सकाळ)
दि. १८/०८/२०१३, रविवार
     
 

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...