Friday, August 9, 2013

मैत्र निर्जीवांचे - श्रीराम ग. पचिंद्रे

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार "जागतिक मैत्री दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी तो 4 ऑगस्ट रोजी तो साजरा केला गेला. त्यानिमित्त मैत्रीकडं पाहण्याचा हा वेगळाच दृष्टिकोन...

         मैत्रीच्या अनेक परी आहेत. पुरुषाची दुसऱ्या पुरुषाशी मैत्री. यात लंगोटीयार असतात, बालमित्र असतात, वर्गमित्र असतात, खोलीमित्र असतात, कार्यालयीन मित्र असतात. तीच गत स्त्रियांची. मुली-मुलींची मैत्री असते. बालमैत्रीण, वर्गमैत्रीण इत्यादी. त्यापुढं जाऊन स्त्री-पुरुषांची मैत्री येते. अगदी काल-परवापर्यंत अशी भिन्नलिंगी मैत्री म्हटलं, की समाज भुवई वर करून किंवा डोळे वटारून पाहात असे. आता त्याचंही फारसं काही वाटेनासं झालंय. स्त्री-पुरुषांनी भेटणं, बोलणं, फिरणं, चित्रपट पाहणं, चहा-कॉफी-अल्पोपाहार-जेवण यांचा मिळून आस्वाद घेणं आणि त्याच्याही पुढं जाऊन एकमेकाशी एकरूप होणं, याचीही नवलाई राहिलेली नाही. आपापल्या सोईचं ठरेल, कौटुंबिक स्तरावर काही त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन हे सारं होत असतं. मैत्री आणि प्रेम यांच्या सीमारेषा अगदी धूसर असतात, त्यामुळं त्या कधी ओलांडल्या जातात, हे मित्र-मैत्रिणींनाही कळत नाही.
              मानवामानवातल्या मैत्रीनंतर मानवप्राणी आणि मानवेतर प्राणी यांच्यातली मैत्री येते. कुत्रा, मांजर, गाय, बैल, म्हैस, घोडा अशा पाळीव प्राण्यांशी आणि पोपटासारख्या पक्ष्यांशी माणसाची मैत्री जडते. काही जण विदेशी पक्षीही पाळतात. काहींची हत्तीशीही मैत्री जमते. त्यावर काही चित्रपटही आले आणि गाजले आहेत. काही साहसी स्त्री-पुरुष वाघ, सिंह, गेंडा, सुसर, मगर अशा हिंस्र प्राण्यांशीही मैत्री करतात. राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांची वाघाशी आणि चित्त्यांशीही मैत्री होती. त्यांच्या वाड्यात वाघ आणि चित्ते माणसासारखे मोकळे वावरायचे. ही माणसं धन्यच होत! पूर्वी एखाद-दुसरा असणाऱ्या सर्पमित्रांची संख्याही आता वाढलेली आहे. डॉल्फिन माशाशी मैत्री करून त्याच्याशी विविध जलक्रीडा करणाऱ्या पाश्‍चिमात्य सुंदरींविषयी आपण वाचतो, छोट्या-मोठ्या पडद्यावर त्यांचे खेळही पाहतो.
              या मैत्रीच्या पुढं जाऊन आपण पाहतो, तेव्हा "वृक्षवल्ली आम्हां सोयरी' असं मनोभावे आळवणाऱ्या वृक्षमित्रांची झाडा-झुडपांशी असलेली मैत्री दिसू-जाणवू लागते. खरंतर प्रत्येक माणसाला झाडं-झुडपं-वेलींविषयी थोडाफार जिव्हाळा वाटत असतो; पण काहींना वृक्षवल्लींमधल्या रसरसत्या चैतन्याची अनुभूती येत असते. या मंडळींचं झाडा-वेलींशी इतकं गाढ मैत्र असतं, की त्यांच्याशी फुलं-फळं तर बोलतातच; पण खोड, फांद्या, पानं आणि काटेसुद्धा बोलतात. त्यांनी झाडा-वेलीवर हळुवारपणे हात फिरवल्यावर पानन्‌पान शहारतं, कळ्या-फुलं हसू लागतात.
               माणूस असेल, पशू-पक्षी असतील, ते तर जिवंतच असतात. झाडं-झुडपंही सजीव असतात. मानवी मनात असतात तशा संवेदना त्यांनाही असतात, हे शास्त्रीयदृष्ट्या कधीच सिद्ध झालंय; पण रूढार्थानं निर्जीव असलेल्या वस्तूंनाही जीव आहे, असं मानणारी काही माणसं जगात असतात. अशीही माणसं असतात, की त्यांची निर्जीव वस्तूंशीही घट्ट मैत्री असते. त्यांच्या नित्याच्या उपयोगाच्या वस्तूंपैकी अशी एखादी वस्तू असते, की तिच्याशी त्यांची अतूट मैत्री जमते. त्यांच्या दृष्टीनं ती वस्तू सजीवच असते. वरून कितीही स्थिर दिसणाऱ्या, कितीही घन असो की द्रव असो, ह्या विश्‍वातल्या प्रत्येक वस्तूच्या अंतरंगात सूक्ष्मातिसूक्ष्म स्तरावर सातत्यानं हालचाल सुरू असते, असं पदार्थविज्ञान सांगतं. ही हालचाल आपल्याला दिसत नाही, जाणवतही नाही; पण ती सुरू असते, हे खरं. त्या वस्तूच्या खास मित्राला-मैत्रिणीला मात्र ती हालचाल जाणवत असावी. निर्जीव वस्तूलाही भावना, वेदना अन्‌ संवेदना असतात आणि त्यांची स्पंदनं तिच्या मानवी मित्राला जाणवत असतात की काय, असं या लोकांना पाहून वाटतं. आमचा धाकटा मामा अविवाहित होता. अनंत मोरे असं त्याचं नाव. त्याची एक सायकल होती. जवळजवळ ४० वर्षं त्यानं ती वापरली असेल. संसार नव्हता आणि सांगण्यासारखा काम-धंदाही नव्हता. त्याची सायकल हेच त्याचं सर्वस्व होतं. आपली आंघोळ दोन-तीन मिनिटांत उरकणारा मामा रोज सकाळी दोन तास आणि रात्री एक तास सायकलचं धुणं, पुसणं, तेलपाणी करायचा! अखंड 40 वर्षांत या गोष्टींचा त्याला कधीही कंटाळा आला नाही. रात्री आपली ही सायकल शेजारी ठेवूनच तो झोपायचा. रात्रभर ती सायकल त्याच जागी असूनही, तिच्यावर धुळीचा एक कणही बसलेला नसताना सकाळी पुन्हा तिची तशीच सेवा तो करायचा. पुसताना प्रत्येक वेळी तो स्वच्छ कापड वापरायचा. कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेतल्या एकाही वांड पोराला त्याच्या सायकलला हात लावायची हिंमत व्हायची नाही. सायकलवरून तो मैलोन्‌मैल निरुद्देश भटकला. त्याची ही सायकल एके दिवशी चोरीला गेली. त्यानंतर त्याचा जीव झुरणीला लागला. तो पुन्हा कधीही दुसऱ्या सायकलवरच नव्हे, तर कुठल्याही वाहनावर बसला नाही. आपल्या सायकलची आठवण मनात ठेवूनच तो हे जग सोडून निघून गेला.
           एकेक वाहनचालक आपल्या वाहनाला अतिशय जीव लावतात. काही संस्थांची वाहनं असतात. त्यावर पगारी चालक नेमलेले असतात. त्यातले काही चालक गाडी चालवत असताना नजाकतीनं चालवतात. त्या गाडीचं मन सांभाळत आणि मर्जी राखतच ते गाडी चालवतात जणू! ती बंद असताना ते तिची सतत देखभाल करत असतात. ती गाडी त्यांच्याशी जणू संवाद साधत असावी, आपली सुख-दुःखं सांगत असावी, असं ते त्या गाडीशी प्रेमानं वागत असतात. राज्य परिवहन महामंडळाचे मी काही चालक असे पाहिले आहेत, जे बस स्वतःची असल्यासारखी ती काळजीनं चालवतात. ते ही बस सजवतात, सुंदर बनवतात आणि मैत्रिणीसारखी तिची देखभाल करतात. त्यांची "विनाअपघात सेवा' ही प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा, आपल्या बसला काही धक्का लागू नये, यासाठी असते. ती बस, ती गाडी त्यांच्या मालकीची नसते आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचा तिच्याशी कसलाही धागा राहणार नसतो; पण तरीही त्यांची मैत्री अबाधित असते. कोल्हापुरात फार पूर्वीपासून "रिक्षासुंदरी' स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी काही मालक नव्हे, तर चालक रिक्षा सजवतात. रिक्षाला खरीखुरी "सुंदरी' बनवतात.
         काही चालक तर स्पर्धा नसतानाही बारा महिने रिक्षा नववधूसारखी सजवून चालवतात. आपल्या या नखरेल मैत्रिणीची मिजास सांभाळण्यात ते धन्यता मानतात.
           घर हा प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो; पण काही जण केवळ राहण्याची जागा म्हणून न बघता घराशी मित्राप्रमाणं वागतात. त्या घराच्या भिंती-दारं-खिडक्‍या आणि प्रत्येक खोलीचा कानाकोपराही त्यांच्याशी बोलतो. घरातला "वास्तु'पुरुष असो की गृहिणी असो, ते खूप दिवस प्रवासाला गेले, बाहेरगावी गेले आणि महिना-पंधरा दिवसांनी परत आले, तर घराच्या अगदी फाटकापासून सारं घर त्यांना हाक मारू लागतं, त्यांच्याशी संवाद साधायला लागतं. "अरे, माझ्या जिवलगांनो, कुठं होतात इतके दिवस? मला सोडून तुम्हाला बाहेर करमतं तरी कसं? या, असं माझ्या कुशीत या...' असंच जणू काही ते घर त्यांना म्हणत असतं. त्या मित्राला किंवा त्याच्या गृहिणीला घराचं बोलणं ऐकू येत असतं. त्यांच्या घराच्या बाहेर, जवळ कुठंतरी त्यांची दुचाकी असो, चारचाकी असो, ते वाहन उभं असतं, तेही त्यांना साद घालतं, "या मित्रांनो, या. माझ्या अंगावरून हात फिरवा. मला घेऊन चला, आपण मिळून फिरू या. चला, तुमच्याविना माझं आणखी कोण मित्र आहे?'
          त्या वाहनाची हाकही त्यांना ऐकू येते. तो किंवा ती त्याच्यावरून हलकेच हात फिरवतात. मग घराचं कुलूप काढतात, त्या कुलपाचीही विचारपूस करतात. मग ते आत पाऊल ठेवतात आणि घराच्या कुशीत शिरतात. जिवलग मित्राच्या सहवासाचं सुख त्यांच्या मनात स्रवायला लागतं. मग घर झाडता झाडता तो किंवा ती घराशी बोलायला लागतात. असा त्यांचा संवाद सुरू होतो, सुरू राहतो. ते घर आणि त्यात राहणारे सारे जण यांचं छानसं मैत्रीचं नातं बहरत जातं.
            ज्यांना भावना आहेत, संवेदना आहेत अशा सर्वांची निर्जीवाशीही सुंदर मैत्री जुळलेली असते. मैत्रीची ही रीत वेगळी असते. इतर सर्व प्रकारच्या मैत्रीइतकीच ही मैत्रीही तितकीच छान, रसरशीत, सुंदर असते, फुलणारी असते. 


- सप्तरंग (सकाळ)

दि. ४ ऑगस्ट २०१३, रविवार        

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...