Monday, July 15, 2013

कवयित्री इंदिरा संत

प्रतिभासंपन्न कवयित्री इंदिरा संत यांची १३ जुलै रोजी पुण्यतिथी. यंदाच्या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त चतुरंग (लोकसत्ता) मध्ये आलेल्या दोन लेखांमधले मला आवडलेले भाग -

चार भिंतींतल्या लयवेल्हाळ आक्का - प्रा. माधुरी शानभाग 
शेवटी त्या बिछान्याला खिळल्या तेव्हा खोलीतून बाहेर येण्याचे टाळत असत. संध्याकाळी बागेत खुर्चीवर बसून आल्यागेल्यांशी चार शब्द बोलताना त्रास होतोय हे जाणवू लागले. पण हे माझे कुटुंब आहे हा भाव मात्र तिळमात्र उणावला नाही. घरातले कुणी आजारी असले तर त्या काळजी करतात, त्यांना त्रास होतो म्हणून कुणी सांगत नसे त्याचा त्यांना भारी राग येई. अन् भोवतीच्या परिस्थितीवरून त्यांना कळले तर त्या अगदी विकल होऊन जात.
पणतीच्या तिसऱ्या वाढदिवसाला तिचाकी सायकल भेट म्हणून घरात आली अन् योगायोगाने दुसरे दिवशी रविवार होता. नातू निरंजन आपल्या छोटय़ा मुलीला तिचाकीवर बसवून पेडल कसे मारायचे हे शिकवत होता. अन् रोजच्यासारखे वीणा आक्कांना घेऊन खुर्ची ढकलत बाहेर आली. समोरचे दृश्य पाहून आक्का मोठय़ाने रडू लागल्या. अगदी हुंदके देत. घरातील सर्वजण सभोवती गोळा झाले. चौकशी करू लागले.. शांत झाल्यावर त्या म्हणाल्या, ''घरातले छोटे मूल बापाकडून पहिल्यांदा सायकल शिकते आहे अन् मला कुणीच सांगितले नाही.''
त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी हे पणती नातवाकडून हुंदडत सायकल शिकते आहे या आनंदाचे होते की अशी जवळीक उपभोगण्यापूर्वी आपल्या मुलांवरचे पितृछत्र हरपले यासाठी होते हे त्यांच्या हळुवार झालेल्या मनालाच ठाऊक!
आपल्या कवितेइतक्या अशा पारदर्शक असलेल्या इंदिरा संत म्हणूनच साऱ्या बेळगावकरांच्या 'लयवेल्हाळ आक्का' आहेत!

पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे टिचकी मारा -
http://www.loksatta.com/chaturang-news/poetess-indira-sant-148773/

माझं  शिक्षण आणि आई  - प्रकाश नारायण संत
वडिलांच्या मृत्यूनंतर आमची आर्थिक परिस्थिती बिकटच झालेली असणार. कविवर्य बा. भ. बोरकरांच्या शिफारशीमुळे बेळगावच्या मराठी ट्रेनिंग कॉलेजमधील वडिलांच्या जागीच आईला नेमणूक मिळाली होती. ते कॉलेज तेव्हा बेळगावातल्या महिला विद्यालय या शाळेत भरत असे. शाळेच्या कामात अडथळा न आणता कॉलेज चालवलं जायचं. त्यामुळे आईला सकाळ-संध्याकाळ काम करावं लागे. बसनं येण्याजाण्यातही खर्च होई. वडिलांच्या आजारीपणातही बराच खर्च झाला असावा. आम्हा भावंडांच्या अंगावर साधेच कपडे असायचे. तीही बहुधा एकच जोडी असायची.
शाळेतले बरेच मास्तर माझ्या वडिलांचे ट्रेनिंग कॉलेजमधले विद्यार्थी होते. त्यांना माझ्याबद्दल आपुलकी आणि सहानुभूती वाटत असे. मला ते नेहमी मदत करत असत. एकदा हेडमास्तरांनी मला त्यांच्या ऑफिसात बोलावलं. माझी चौकशी वगैरे केली आणि ते मला म्हणाले, ''बाळ, माझं तुझ्याकडे लक्ष असतं. तू नेहमी चपला न घालता शाळेत येतोस. चपला का घालत नाहीस?''
''माझ्याकडे चपला नाहीत.'' मी म्हणालो.
''त्यासाठीच मी तुला बोलावलं. चल, आतल्या खोलीत ये,'' ते मला आतल्या एका खोलीत घेऊन गेले. तिथे एक लाकडी पेटी होती. ती त्यांनी उघडली. ती चपला आणि बूट यांनी भरलेली होती.
''या सगळ्या, पोरांच्या शाळेत विसरलेल्या चपला आहेत. तुझ्या पायाला येणाऱ्या चपला तू घेऊन जा. पण अनवाणी फिरू नकोस.'' त्यांनी ती पेटी उलटी केली. खाली पडलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि प्रकारांच्या चपला ते पाहायला लागले. एक पठाणी चपलांची जोडी त्यांनी माझ्या हातात दिली. ''पायात घालून बघ'' ते म्हणाले. मी त्या चपलांत पाय सरकवला. माझ्या पायाच्या चपला होत्या त्या. जवळजवळ नवीन. मला खूप आवडल्या. त्यांनी उरलेल्या चपला पेटीत भरल्या, त्या पठाणी चपला एका फडक्यानं साफ केल्या आणि मला दिल्या. त्या दिवशी त्या चपला घालूनच मी घरी गेलो. ऐटीत!
आईला मी ते सर्व सांगितलं. तिला राग काही आला नाही, पण तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ''त्यांनी दिल्या आणि तू घेतल्यास.'' ती म्हणाली. नंतर ती गप्पच बसली. मला काही समजेनासं झालं होतं. त्या चपला घालून मित्रांच्या घरी जाऊन यायचं असं मी ठरवलं होतं. पण मी गेलो नाही.
दिवेलागणीच्या सुमारास आमच्या घरासमोर सायकलची घंटा वाजली. मी दार उघडलं. दारात हेडमास्तर उभे होते. आई माझ्या शेजारी उभी होती. ''बाई, मी सरांचा विद्यार्थी, सरांनी मला जितकं दिलं त्यातलं अंशभरही मी फेडू शकत नाही. मध्यंतरी शाळेची सफाई करताना ही जोडी मी पाहिली. आणि मला वाटलं, ही याला हवी का विचारलं. त्याला दाखवल्यावर त्याला आनंद झाला. मी त्याला देऊन टाकली. पण घरी गेल्यावर मनाला टोचणी लागली. आपण हे असं परस्पर करायला नको होतं. चुकलो. म्हणून तुम्हाला भेटायला आलो. केवळ प्रेमाखातर मी हे केलं. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका किंवा रागावू नका. तुम्हाला आवडलं नसेल तर माफी मागून परत घेऊन जातो.''
''आधी आत या आणि या खुर्चीवर बसा. चहा घ्या, मग जा.'' ती म्हणाली. मास्तरांना चहा करून दिल्यावर ती म्हणाली. ''मास्तर, यानं मला सगळं सांगितलं होतं. थोडा वेळ मला वाईट वाटलं, ते अशी परिस्थिती आमच्यावर, याच्यावर यावी म्हणून. तुम्ही चपला स्वत: शोधून त्याला आपल्या हातानं स्वच्छ करून दिल्या असं तो म्हणाला होता. त्याच्या डोळ्यांतल्या आनंद मलाही दिसला होता. तुम्ही योग्य तेच केलंत. हा त्या चपला आनंदानं वापरेल.'' ती म्हणाली.
मास्तरांनी डोळ्यांवर रुमाल धरला होता. बऱ्याच वेळानं त्यांनी तो काढला. आईला वाकून नमस्कार केला आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवून ते निघून गेले. त्या पठाणी चपला चांगल्याच कडक होत्या. पण हट्टानं बरेच दिवस वापरल्यावर त्या एकदम मऊ झाल्या. नंतर कधीतरी माझे पाय त्यात मावेनासे झाले. त्या आम्ही घराच्या माळ्यावर टाकून दिल्या. अधूनमधून घरसफाईच्या वेळी त्या दिसायच्या.
(प्रकाश नारायण संत यांच्या 'मौज प्रकाशन'ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या 'चांदण्याचा रस्ता' या पुस्तकातून साभार)

पूर्ण लेख वाचण्यासाठी इथे टिचकी मारा-
http://www.loksatta.com/chaturang-news/kaviyatri-indira-sant-148774/

- चतुरंग (लोकसत्ता/लेख)
दि. १३ /०७ /२०१३, शनिवार   

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...