Saturday, September 28, 2013

चक्रीवादळ - प्रभाकर पेंढारकर

मछलीपटनम् चा सागर-परिसर.
ब्रिटीश नॅव्हिगेशन कंपनीचं कार्गोशिप 'एच. एम. एल. अलेक्झांड्रा'. दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटं.
जहाजाच्या पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमवर आवाज आला:
"धिस इज युवर कॅप्टन गिल्बर्ट रॉस…अटेन्शन ऑल स्टेशन्स. मी आतापासून जहाजाचा चार्ज घेतला आहे. वेट फॉर माय ऑर्डर्स."
        शनिवारची संध्याकाळ. सगळे जण काहीसे विसावलेले. विशाखापटनम् ला जहाज थांबलं असतं तर शहरातून फेरफटका मारावा असा मूड. पण सकाळपासून पाऊस. बहुतेक जण त्यांच्या केबिनमध्ये. कॅप्टनचा आवाज ऐकला तसे प्रत्येक जण आपापल्या स्टेशनकडे निघाले. काही क्षणांत जहाजावर धावपळ सुरु झाली. जहाज प्रवासात असताना कॅप्टनच्या डेकवर फर्स्ट ऑफिसर उभा असतो. आजही जहाजाचं संचलन तोच करत होता. पण त्याच्या लक्षात आलं, आज ह्या सागराचं लक्षण काही ठीक दिसत नाही. वादळाच्या सूचना ह्यापूर्वी आल्या होत्या; आणि नॅव्हिगेशन-अधिकाऱ्यानं त्या कॅप्टनच्या निदर्शनास आणल्या होत्या.
             हे रिपोर्ट्स जेव्हा कॅप्टननं पहिले तेव्हा त्याच्या मनात पहिला विचार आला, की अशी वादळं भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ह्या दिवसांत होतातच. त्यापासून सुरक्षित राहण्याचे दोन मार्ग : एक, ते परिसर अथवा मार्ग पूर्णपणं टाळायचा आणि दुसराच मार्ग घ्यायचा. इथं ती शक्यता नव्हती; कारण एका बाजूला थोड्याच अंतरावर आंध्रचा सागरकिनारा. दुसरा मार्ग, ह्या भागातून शक्य तो त्वरेनं पलीकडे जायचं.
       आता जहाज अशा जागी होतं, की जहाज वळवून परत मागं जायचं. पण हे कॅप्टनला स्वीकारणं पटण्याजोगं नव्हतं. मद्रासला पोहोचायची वेळ कॅप्टननंच दिली होती. तिथं कार्गो तयार होता. आणि कॅप्टन रॉस वेळेच्याबद्दल कधी तडजोड करत नसे, हे नॅव्हिगेशन-ऑफिसरला माहित होतं.
मुख्य प्रश्न होता, ह्या वादळाची तीव्रता नेमकी किती असेल?
नॅव्हिगेशन-अधिकारी म्हणाला,
"सर, आपण भारताच्या किनाऱ्यावर आहोत. युरोप किंवा अमेरिकेसारखी अत्याधुनिक रडार-सिस्टीम इथं नाही. हा त्यांनी दिलेला त्यांचा अंदाज असतो. तो बदलण्याची शक्यताही असते."
"मला वाटतं, शक्य तितक्या वेगानं आपण ह्या परिसरातून निघून जावं."
"सर, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे."
"ते मला माहित आहे. हे वादळ आपणांपर्यंत पोहोचायला नेमका किती वेळ लागेल?"
"तेही आत्ताच सांगता येणार नाही."
 कॅप्टननं नॅव्हिगेशन-अधिकाऱ्याला निरोप दिला; आणि फर्स्ट ऑफिसरला जहाजाच्या गतीबद्दल ऑर्डर दिल्या. काही वेळ त्या रिपोर्ट्सवर मन एकाग्र करून कॅप्टन रॉस विचार करत राहिले; आणि थोड्याच वेळात फर्स्ट ऑफिसरचा आवाज आला,
"मास्टर, मला वाटतं, तुम्ही वर याच."
"काय झालं?"
"समथिंग अन्युज्वल! आज समुद्र खवळल्यासारख्या लाटा येत आहेत."
"मी आलोच."
तीसएक सेकंदात कॅप्टन क्वॉर्टर डेकवर आले.
"काय झालंय?"
"मास्टर,ऑन पोर्ट साइड…"
जहाजाच्या डाव्या बाजूला क्षितिजाजवळ भली मोठी लाट झेपावत पुढं येत होती.
फर्स्ट ऑफिसर म्हणाला, "मास्टर, इट्स सुनामी!"
जपानी भाषेत सु (Tsu) म्हणजे बंदर. आणि नामी म्हणजे लाट. 'सुनामी' हा शब्द पॅसिफिक सागरातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक खलाशांच्या कानांवरून गेलेला असतो. अशा लाटा त्यांच्यापैकी काही जणांनी अनुभवलेल्या असतात;
पण त्या भर समुद्रात. तिथं त्या लाटा येतात आणि जहाजाखालून सागराच्या खोल पाण्यात निघून जातात. जर कधी त्या वर आल्या तर काही मिनिटं जहाजाला हादरे बसतात. आज पहिल्यांदाच अशी लाट फर्स्ट ऑफिसर पाहत होता. तो मनातून हादरून गेला होता. पण मास्टरसमोर त्याच्या तोंडून फक्त एकाच शब्द बाहेर आला : 'सुनामी.'
"नॉनसेन्स! सुनामी लाटा भारताच्या किनाऱ्यावर येत नाहीत. धिस इज नॉट पॅसिफिक."
"मास्टर, ही सुनामीच. वाट चुकून तर इकडं आली नसेल ना?"
"नॉनसेन्स! काय करायचं ती माझी जबाबदारी."
                कॅप्टन रॉस समुद्राच्या त्या लाटेकडे पाहत होते. तिची लांबी जणू क्षितिजाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत! उंची प्रती क्षणी वाढतच होती. किनाऱ्याजवळ जहाज तिथपर्यंत पोहोचेतो ती लाट जहाजाच्या उंचीपेक्षा किती तरी अधिक होईल. जितका किनारा जवळ तितका धोका अधिक. ह्या लाटेचा जहाजावर होणारा आघात किती टनांचा असेल? हे जहाज तो तडाखा सहन करू शकेल काय? एकाच वेळी कॅप्टन रॉसच्या मनात अनेक विचार. इतक्या वर्षांचं ट्रेनिंग. जहाजावरचा अनुभव. कामाची शिस्त आणि अशा कठीण प्रसंगी डोकं शांत ठेवून काम करण्याची अंगी मुरलेली सवय. अशा लाटेपासून जहाज जितकं दूर तितकं ते सुरक्षित. पण आता ती शक्यताच उरली नव्हती. कितीही वेगानं जायचं ठरवलं तरी ह्या लाटेपासून दूर होता येणार नाही इतकी तिची लांबी. मग तसा प्रयत्न करण्याऐवजी ही लाट ओलांडून पलीकडे गेलं तर! जहाजाची सगळ्यांत मजबूत बाजू हे जहाजाचं पुढचं टोक. धारदार आणि शक्तिशाली. आपण जर ही लाट ओलांडून पलीकडे गेलो तर आपण जिंकलो. अशा लाटा आपण पाहिल्या आहेत. त्यांना हाताळण्यात आजवरचं आपलं आयुष्य गेलं आहे. आपण ही लाट ओलांडू…रॉस ह्यांचा आत्मविश्वास जबरदस्त होता. त्यांनी जहाज वळवण्याची आज्ञा दिली. लाट जहाजावर येऊन आदळण्यापूर्वी जहाजच त्या लाटेकडे घेऊन जाण्याचा त्यांचा निर्णय ठरला. पण फर्स्ट ऑफिसरला खात्री वाटेना. त्याच्या मनात ह्या जहाजाची उंची वीसएक मीटर्स. रुंदी तेवढीच, लांबी शंभर मीटर्स. आणि ह्या लाटेची लांबी कित्येक मैलांची. तिची शक्ती ह्या जहाजाच्या इंजिनच्या कितीतरी पट. सगळ्या सागराची ताकद तिच्या पाठीशी. हे जहाज झाडाच्या एखाद्या लहानश्या पानासारखं. सगळा समुद्रच असा पुढं येतो आहे. तो ह्या जहाजाला कुठल्या कुठं फेकून देईल. शेवटी जहाज ही ह्या टीचभर मानवाची वीतभर निर्मिती. साऱ्या विश्वाची अमर्याद ताकद त्याच्या पाठीशी, म्हणून ही लाट म्हणजे हाहाकार! विध्वंस! ही लाट म्हणजे मृत्यूनं घेतलेलं पाण्याचं रूप! हा मृत्यूच! त्याचा एक लहानसा घास- हे जहाज!
                  हे जहाज आपल्याला हवं तसं वळवण्यासाठी कॅप्टन रॉस इंजिनमधल्या माणसांना सतत ऑर्डर्स देत होते. त्या शब्दाप्रमाणं इंजिनवर बारा माणसं काम करीत होती. त्यांत चार इंजिनिअर, चार मोटरमन आणि चार फिटर्स. ह्यांतले दोघे फ़िलिपाइन्स बेतावरले. इग्नेशिअस गेटा - मोटरमन आणि अलेक्स बोनाफिशिओ - फिटर. दोघं समुद्रावरच वाढले. छोट्या छोट्या एका बेटावरून दुसऱ्या बेटावर सततचा प्रवास. समुद्र त्यांचा बालपणापासूनचा सांगाती. लाटांची आणि वादळांची भीती त्यांना माहित नव्हती. पण आज काही वेगळंच घडत होतं. इंजिनजवळ उभं राहणं त्यांना कठीण होत चाललं. लाटांमुळं जहाज वर-खाली होणं हे त्यांच्या सवयीचं. पण आता जहाज असं वेडंवाकडं होत होतं, की उभा असलेला माणूस एका बाजूला पंचेचाळीस अंश वळे आणि त्यातून आपला तोल सावरण्यापूर्वी उलट्या बाजूला ढकलला जाई. सरळ उभं राहणं अशक्य झालं, त्यामुळं पोटात ढवळू लागलं. पोटातील अन्नाचा कण न् कण बाहेर फेकला जाईल असं वाटू लागलं. मोटरमन इग्नेशिअसला कळून चुकलं, की जहाजाची एक बाजू वर झाली तर इंजिनची शक्ती ती टरबाइन्सची पाती दर मिनिटाला सत्तर एक वेळा फिरवते. ती पाण्याचा त्यांच्यावरील भर नाहीसा झाला की एकदम नव्वदपेक्षा अधिक गतीनं फिरतील; आणि ह्या लाटेमुळं परत जहाज एका बाजूनं उचललं जाऊन ती पाती पाण्याखाली गेली, की त्यांची गती साठापेक्षा कमी होईल. असा इंजिनवरील दाब सतत एकदम एवढा कमी-अधिक होत राहिला तर ती काही मिनिटांत बंद पडतील, हे चीफ इंजिनियरला सांगायला हवं. पण ते सांगायची जरुरीच नव्हती. चीफ इंजिनिअर अॅम्पोन कोलासाला हे समजून चुकलं होतं. इंजिन बंद पडलं तर आपल्या हातांत हे जहाज वाचवण्यासाठी काही उरणारच नाही. कॅप्टनला वाटलं, मोटारचं स्टिअरिंग आपल्या हाती असावं; पण जर तिचं इंजिन बंद पडलं तर कितीही अनुभवी चालक असला तरी काय करणार? फरक एवढाच, मोटार आहे त्या ठिकाणी जमिनीवर उभी राहील. इथं ह्या लाटा जहाजाला त्यांच्या मर्जीप्रमाणं कुठंही फेकून देतील.
                इंजिन चालू आहे तोवर ही लाट ओलांडून जहाज पलीकडे न्यायचं. त्याकरता इंजिनवर पूर्ण ताण पडत होता. इंजिनची जागा कमालीची तापून निघाली होती. तिथं काम करणारेसर्वच घामानं निथळत होते. त्यांना सरळ उभं राहणंही जहाजाच्या वरखाली होण्यानं अशक्य झालं होतं. कॅप्टन रॉसच्या लक्षात आलं, जहाजाची इंजिन्स आणि आपले खलाशी आता हा ताण अधिक वेळ सहन करू शकणार नाहीत. खालून चीफ इंजीनियारचा आवाज आला : "मास्टर, दोन इंजिन्स बंद पडली आहेत. दुसरी केव्हा बंद पडतील  सांगता येत नाही." "डोंट टेल मी. काय वाटेल ते करा. ताबडतोब इंजिन्स सुरु होतील हे पहा."
              इंजिनियर्स, मोटारमन, फिटर्स काम करत होतेच; पण आता परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली होती. डेकवर उभ्या असलेल्या मास्टरला खाली काय घडत आहे ह्याची पूर्ण कल्पना होती. त्यांना वेगवेगळे मार्ग सुचत होते. पण आता त्यांतले कोणते अंमलात आणता येतील ह्याची खात्री वाटेना. तो ऑर्डर्स देत होता; पण नजर मात्र समोरच्या लाटेवर खिळलेली होती. ती लाट अमर्याद पाणी आणि प्रचंड शक्तीनिशी येत होती. सगळा सागरच जहाजावर आदळेल तेव्हा काय होईल? खाली इंजिन-रूममध्ये काम करणारे तिथंच बुडून मरतील काय? आणि वरच्या बाजूला असलेले नाविक कुठं फेकले जातील? निश्चितच ही लाट हा मृत्यू! हाहाकार!
             आणि तरीही रॉसची खात्री होती, की हे जहाज बुडणार नाही. ब्रिटीश-तंत्रज्ञान आणि अनुभव हे जहाज बांधण्यामागं आहे. कोणत्याही वादळाशी ते सामना करू शकेल. जहाज भरकटेल, फेकलं जाईल; पण वादळाला ते बुडवता येणार नाहीच. त्याची रचना अशी की काहीही झालं तरी ते तरंगतच राहील.
               पण हा आत्मविश्वास खाली पोर्टहोलमधून बाहेर सागर-लाटेकडे पाहणाऱ्या नाविकांना वाटेना. त्यांनी त्यांच्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण माणूस एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड सागर असेल तर माणसाची शक्ती काय पुरी पडणार? आता तर सगळीच इंजिन्स बंद पडली. काहींचा हा पहिलाच अनुभव. त्यांना परत परत 'टायटानिक' ची आठवण येऊ लागली.  'टायटानिक' हिमनगाला धडकलं. इथं फक्त पाणी आहे. मग आपली बोट कशी दुभंगेल? आपण एवढे किनाऱ्याजवळ! पाण्याची खोली जेमतेम बोट तरंगत ठेवण्यापुरती! इथं ती बुडेलच कशी? आपण फार तर ह्या बोटीतून बाहेर फेकले जाऊ; पण आपण मरणार तर नक्की नाही. ही लाट बोटीवर कोसळली तर आपणाला इथं जलसमाधी मिळेल! त्यापेक्षा आपण वरच्या डेकवर जाऊ या. जे काय व्हायचं ते तिथं होऊ देत.
ते वर जायला निघणार इतक्यात मास्टर रॉसचा आवाज आला : "आणखीन तीस सेकंदात ही लाट आपल्या बोटीवर धडकेल. सावध राहा. आणि पाणी आत येणार नाही अशी सर्व दारं घट्ट बंद करून घ्या. धीर सोडू नका. आपण ह्या संकटातून निभावून जाऊ. नक्कीच. हा माझा शब्द आहे."
                 जे खालच्या बाजूला होते ते तिथंच थांबले. त्यांना नेमकं काय करावं हे समजेना. पण कॅप्टन सांगतो आहे तर आपण आपापल्या स्टेशनवरच थांबावं. तरीही काही जण वर आले होते. त्यांनी समोरासमोर ही प्रचंड लाट पहिली. ते दृश्य पाहून त्यांचा थरकाप उडाला. त्याचं मुख्य कारण, त्या लाटेचा सर्व आसमंत व्यापणारा प्रचंड आवाज. एकाच वेळी शंभर जेट विमानांनी आकाशात झेप घ्यावी असा. प्रतिक्षणी वाढणारा. जवळ जवळ येणारा. सर्व जाणिवा बधिर करणारा. ही मृत्यूलाटच!
         बरोबर तीस सेकंदांनी ती भलीमोठी लाट बोटीवर आदळली. ती बोट हादरली. एखाद्या प्रचंड धबधब्याखाली यावी तसा पाण्याचा प्रचंड लोट जहाजावर आदळला. मास्टर रॉस आणि फर्स्ट ऑफिसर रेलिंग घट्ट पकडूनही दुसऱ्या बाजूला फेकले गेले. त्यातून सावरण्यापूर्वी त्यांच्या लक्षात आलं, की भलामोठा अजस्त्र शक्तिशाली हात पाण्याखालून सगळ्या बोटीला उचलतो आहे. ह्या बोटीला ढकलत तो जमिनीकडे घेऊन चालला आहे. आणखीन काही क्षणांत त्या झाडांना, इमारतींना ओलांडून ही बोट सागरकिनाऱ्यापलीकडे जाऊ लागेल. बुद्द्धी चक्रावून टाकणारा हा आयुष्यातील पहिलाच अनुभव. त्याकडे केवळ पाहत राहण्यावाचून काही करता येणं आता आपल्या हातांत उरलेलं नाही. 

- चक्रीवादळ
लेखक - प्रभाकर पेंढारकर

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...