Thursday, October 3, 2013

रे बाप्पा...- वर्षा चौगुले

नमस्कार बाप्पा!!!
कंटाळलास का रे एका जागेवर बसून ? कान गच्च झाले नाहीत ना स्पिकरचे आवाज ऐकून ? पण हे थोडं तू सहन कर रे... वर्षातून एकदा तर येतोस आम्हाला भेटायला... मग करू दे आम्हालाही तुझा जंगी पाहुणचार. थोडा आमच्या मनासारखा! म्हणजे ते तर तू दरवर्षी आम्हाला सहन करतोसच... पण समजून घे रे थोडं आम्हाला. यामागे आम्हा लोकांचं तुझ्यावरचं प्रेम असतं, भक्ती असते... बघ ना किती एवढ्याला लेकरांपासून जमिनीला टेकलेली प्रत्येक व्यक्ती तुझी वाट बघत असते... अगदी डोळ्यांत प्राण साठवून...

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुझं अगदी उत्साहात स्वागत झालं. मरगळलेल्या मनावर तुझ्या रुपात एक मोरपीस फिरून गेलं. पूजा, आरत्या, विधी, मंत्र हे सगळं अगदी मनापासून केलं गेलं. सगळं कसं तुझ्या आवडीचं... सगळ्यांनी सवड काढून मनापासून केलं रे !! खूश आहेस ना... ? काही चुकलं असेल, चुकून काही राहिलं असेल तर तुझ्या या अजाण लेकरांना माफ कर बाबा... पण खरंच रे सगळ्यांनी यथायोग्य, यथाशक्ती तुझं सगळं केलं... अगदी दोन वेळच्या पोटभर जेवणाला महाग असणाऱ्या लोकांनीसुद्धा आपल्या घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवला... खरंच खूश आहेस ना रे...? भीती वाटते रे आम्हा साध्या लोकांना... तू रागावशील म्हणून... आधीच इतकं सहन करत असतो. त्यात तू नाखूश झालास की, कशी एक चुटपुट लागून राहते. जिवाला... म्हणून पुन्हा पुन्हा विचारते... खूश आहेस ना ?
तुला माहिती आहे बाप्पा ? या तुझ्या उत्सवात आमच्याकडे एक मुलगा, ज्याला दोन्ही हात नाहीत, पाय नाहीत.. तरी तोंडात कुंचला धरून तुला रस्त्यावर रेखाटत असतो... तुझं हे विशालकाय शरीर, सोंड काढताना त्याचं शरीर सरपटत असतं... अगदी एखाद्या सापासारखं... खरचटत असतं... पण तू सगळं करवून घेतोस म्हणे रे त्याच्याकडून... मनापासून तो तुला धन्यवाद देत असतो. निदान तुझी सेवा करायला त्याला तोंड तरी तू शाबूत ठेवलंयस म्हणून... नाहीतर काय करणार होता तो सांग ना? तुझ्या समोरच तो असा झालाय म्हणे, आठवतंय का तुला? असाच त्याही वर्षी तुझ्या विसर्जनाचा दिवस होता... खूप गर्दी होती... वाहनांच्या गर्दीतून वाट काढत एक मुलगा पळत येत होता... पण त्याला तुझं जवळून दर्शन घ्यायचं होतं. म्हणून तो आपल्या आईचं बोट सोडून सुसाट पळत सुटला... मागून अशीच माणसांच्या गर्दीची लाट येत होती... याला धक्का लागला... त्या गर्दीत तो आडवा झाला... लक्षच नाही गेलं कुणाचं... आणि बघता बघता एक गाडी त्याच्या अंगावरून... आणि तो असा झाला... एक जिवंत हाडा-मांसाचा गोळा... पण बघ त्याची ध्येयासक्ती... हार नाही मानली त्याने... आजही तो तुझ्यासमोर त्याच्या जिद्दीवर तुझी सेवा करत असतो... किती वेड्यासारखं प्रेम करतात बघ ना तुझ्यावर... म्हणून म्हणते आम्हा वेड्यांची सेवा तू गोड मानून घेत जा...
बाप्पा, सगळेजण तुझ्याकडे काही ना काही गाऱ्हाणी घालत असतात... कारण तू सर्वांचं ऐकतोस हे आम्हा साऱ्यांना माहिती असतं... आणि न घातली गेलेली गाऱ्हाणीसुद्धा तू तुझ्या डोळ्यांनी पाहत असतोस, हेसुद्धा आम्हाला माहिती असतं... खूप भयानक झालंय रे सगळं जीवन... तुझ्या या मुक्कामात तू पाहिलं असशीलच... पण खरंच "माणूस' माणूसच आहे ना रे...? एकेकदा वाटायला लागलंय... कारण आई, बहीण, बायको, मुलगी ही सगळी नाती तो आताशा "स्त्री' या एकाच जातीत तोलायला लागलाय... या नात्यांची किंमतच कळेनाशी झालीय त्याला... मर्यादेची चौकटच उखडून टाकली आहे असं वाटतंय... इतके दिवस फक्त पाण्याची तहान माहिती होती... पण ती तहान आहे, की पाशवी भूक, हेच समजत नाहीय... यातून अनेक "निर्भयां'चे जीव टांगणीला लागलेत... त्यांच्या आई-वडिलांना मानाने जगण्याचे अभय मिळत नाहीय... आणि यातूनच रे बाप्पा, मुलांना जन्म द्यायलाच कुणी धजावत नाही... इतकी दहशत बसलीय प्रत्येक आईच्या मनात...
बाप्पा, एकीकडे भर दुष्काळात दिवाळी साजरी केली जाते... तर एकीकडे भर पावसाळ्यात लोकांना साधं प्यायला पाणी मिळत नाहीय... कर्जाच्या डोंगराखाली माणूस चेंगरून जातोय... काय करायचं म्हणून घरचा कर्ता पुरुष आत्महत्या करतो... त्याच्या मागे त्याच्या चितेत त्याचा म्हातारा बाप उडी घेतो... पण पुढे काय ? हे दोघे सुटले, म्हणजे सगळे प्रश्‍न सुटले का रे ? त्याच्या मागे त्यांच्या बायका-मुलांनी कुणाकडे पाहायचं ?... मग पुन्हा तेच चक्र... सावकारी आमिष... पुन्हा "बाई'च लागते डावाला, आपला संसार चालवण्यासाठी... तिला मरता येत नाही... कारण समोर तिची कच्ची-बच्ची रडत असतात... त्यांच्यासाठी तर तिला जगावंच लागतं... नाही तर त्यांच्यासहित मरावं लागतं... पण जन्म दिलेल्यांना जीव द्यायला लावायचं, तिच्या अडाणी हिशेबात बसत नाही आणि ती जगत राहते... बाप्पा थोडी कृपा कर रे त्यांच्यावर... निदान त्यांच्या डोळ्यांतून ओघळणारी आसवं जरी साठवलीस ना, तरी त्यांचा एक पावसाळा साजरा होईल... काय म्हणालास ? डोळे पण कोरडेच दिसताहेत ? माहिती आहे रे मला ते, म्हणूनच तुला म्हटलं, निदान डोळ्यांतून ओघळण्याइतकं तरी त्यांना पावसाचं दान दे... जाता जाता एक चक्कर त्यांच्याकडे मारून जा... तुझं विसर्जन कुठे करायचं म्हणून ते तुझी स्थापनाच करीत नाहीत... त्यांना थोडा तुझा दिलासा देऊन जा... ज्या नद्या, विहिरी, तळी कोरड्याने वाहत आहेत त्यात थोडा तुझा आशीर्वाद देऊन जा... शेतं बघ, कशी तहानेने व्याकुळ झाली आहेत. त्यांना घोटभर तुझ्या हाताने पाणी पाजून जा... फुलतील रे तुझ्यासाठी पुढच्या वर्षी नक्की ती... बस्स, तू त्यांच्यासाठी एक घोट बनून जा... 

बाप्पा, इतरांचं माहिती नाही; पण समोर ताट भरलेलं असूनसुद्धा काहींची पोटं अतृप्तच राहतात... आणि त्यांच्याकडे प्रामाणिकपणे राबणारे हात मात्र रिकामेच राहतात... काही योजना जाहीर केल्या जातात; पण ज्यांच्यासाठी जाहीर होतात, त्यांच्यापर्यंत येऊपर्यंत त्यांच्या मुदती संपलेल्या असतात... कारण कुठलेही असू दे, त्यांच्यावर इलाज नाही झाला तरी चालेल; पण राजकारण मात्र रंगलं पाहिजे... पोटात भाकरी नाही गेली तरी चालेल; पण गुत्त्यावर हजेरी लावली पाहिजे...
बाप्पा, तुझ्या स्वर्गलोकीसुद्धा माणसांना आत घेताना, थोडा माणसाच्या मेंदूचा एक्‍स-रे काढत जा... कारण कुठल्या वेळी कुठली कल्पना या वैज्ञानिक माणसांच्या डोकीत पिकेल याचा नेम नाही... तुम्हा देवलोकांत वृद्धाश्रम नाहीत ना ? मग कदाचित, तिथे ही लोकं आश्रम काढतील आणि उद्‌घाटनाला कदाचित तिथलाच एखादा मंत्री बोलावून तिकडेसुद्धा पक्ष स्थापन करतील...
आणि हो या आश्रमापासूनसुद्धा सावध रे बाबा... कुणी संत बनून यायचा आणि तुम्हा स्वर्गलोकीच्या मेनकांचा कधी ताबा घेईल, याचा तुम्हाला पत्तासुद्धा लागणार नाही... तू म्हणशील काय पण काय सांगतेस ? पण खरंच रे बाप्पा, हल्लीची ही हायब्रीड पिढी आहे, कधी कुठे काय पिकेल काही सांगता येत नाही...
एकपत्नी राम सगळ्यांना माहिती होता; पण "असा-राम'सुद्धा आता पाहायला मिळू लागलाय... त्याचं दर्शन घेतलं, की संपलंच सगळं...
जाऊ दे, तुला खूप सांगून झालं हे सगळं... कदाचित तुला दिसत असेल हे; पण काय चाललंय कळत नसेल, म्हणून मी आपलं वेड्यासारखी बडबडत बसले तुझ्याबरोबर... आता थोडा निवांत हो जाताना... निदान पुढच्या वर्षीपर्यंत तरी हे सगळं तुला सहन करावं लागणार नाही... पण तुला आम्ही आपला मानतो ना म्हणून हे सगळं सांगितलं... आपल्याच माणसाला आपलं दुःख कळतं ना ?... म्हणूनच...
बाप्पा, आता तुझी परतायची वेळ झाली ना ? तुही तुझ्या आई-बाबांना सांगून आला असशील, कधी परत येणार आहेस ते... किती नशीबवान आहेत ना ते, त्यांना खात्री आहे, की तुझा प्रवास लांबचा असला तरी तू सुखरूप परत येणार आहेस... मग आम्हालाही ही खात्री दे ना, की आमची पिल्लं संध्याकाळी सुखरूप परत येतील... गप्प नको होऊस असा... माहिती आहे हे तुझ्या हातात नाही. कारण इथे करते करविते आम्हीच आहोत... म्हणून फक्त आशीर्वाद दे, चांगला विचार करण्याचा... त्याप्रमाणे वागण्याचा... माणूस आहोत, माणुसकी जपण्याचा... आणि इतकी पण शक्ती देऊ नको आम्हाला, की आम्ही स्वतःला सर्वोच्च समजू... देशील ना ?... आता खरंच तुला निरोप द्यायला जिवावर आलंय... पण इलाज नाहीय... वाट बघेन पुन्हा येण्याची... तसा तू नेहमीच असतो रे मनात; पण तरीही... पुढच्या वर्षी लवकर या...!!! गणपती बाप्पा... मोरया!!!!!

- स्मार्ट सोबती (सकाळ)
दि. ३ ऑक्टोबर २०१३, गुरुवार

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...