Friday, December 6, 2013

लांच्छनास्पद लिलाव


ज्या देशाला आपला इतिहास जपता येत नाही, त्याचा भूगोल बिघडतो, हे वाक्य आपण ठायीठायी ऐकतो आणि विसरतो. १९७१च्या युद्धात गौरवशाली कामगिरी केलेल्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचे संग्रहालय मोडीत निघणे आणि नौकेचा लिलाव करण्याची वेळ येणे, हे लांच्छनास्पदच आहे. ५०० कोटींपर्यंत खर्च करण्यास कुणी खासगी कंपन्या पुढेच आल्या नसतील , तर आपण अशा पांढऱ्या हत्तीचे लोढणे गळ्यात बांधायचेच कशाला , असा महाराष्ट्र सरकारचा एकंदर सूर दिसतो आहे . १५ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाची मूळ किंमत आधी ७५ कोटी रुपये इतकीच होती . केंद्रात आणि राज्यातही सरकारे आली व गेली ; मुख्यमंत्री बदलले , संरक्षणमंत्री बदलले , पण कुणालाही या आरमार संग्रहालयाकडे लक्ष द्यावेसे वाटले नाही .
वास्तविक आज संरक्षण दलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा युद्धसामग्री खरेदीतील घोटाळे, दुर्घटना, चुकीची राजकीय धोरणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील सुंदोपदसुंदी यामुळे बदलत आहे. दुर्दैवाने त्यात युद्धातील कामगिरीमधील शौर्य, शांतताकाळातील खडतर प्रशिक्षण, जिवावर बेतणारे प्रसंग हे झाकले जाते . तिन्ही सैन्यदलांना आज अधिकाऱ्यांची उणीव भासते आहे . अशा वेळी विक्रांतवरचे आरमार संग्रहालय पुढच्या पिढीस प्रेरणादायी ठरले असते. किनारी राज्यात राहूनही आज नौदलाच्या कार्याचे दर्शन घेण्याची संधी सर्वसामान्यांना मिळत नाही. ती विक्रांत संग्रहालयाद्वारे उपलब्ध होती. मुंबईतील जहाजवाहतूक कंपन्या, विमान कंपन्या , सागरी पर्यावरण विभाग, आदींची एकत्र मोट बांधता आली असती. हा प्रकल्प व्यवहार्य नव्हता, तर आतापर्यंत तरी खर्च का केला ? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले वचन त्यांचेच युती सरकारही पाळू शकले नाही व जाहीर सभांमधून तरुणांमध्ये स्फुल्लिंग चेतविण्याच्या भाषा करताना या प्रश्नावर विरोधी पक्ष म्हणून जनजागृती करणेही त्यांना जमले नाही. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनेही याबाबतीत समित्या नेमून चालढकल करण्याचेच धोरण स्वीकारले. विक्रांतमागे जनआंदोलनांचाही पुरेसा रेटा उभा राहू शकला नाही. विविध क्षेत्रांतील धनाढ्यांची मुंबई व महाराष्ट्रात कमी नाही . यापैकी कित्येकजण विविध प्रश्नांवर राष्ट्रभावना रुजविण्याचे धडे देत असतात. त्यांच्यापैकीही कुणी अशा प्रकल्पासाठी पुढे आले नाही. कोणतीही गोष्ट लिलावात निघणे, हा आपल्या लौकिकावरचा बट्टाच मानला जातो व तेच या लिलावाचे सार आहे .

- संपादकीय, धावते जग (महाराष्ट्र टाईम्स) 
दि. ६ डिसेंबर २०१३, शुक्रवार 

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...