Friday, December 6, 2013

चक्रीवादळ(२) - प्रभाकर पेंढारकर

काल हेडलाईन होती: 900 Perish In Cyclone. त्यावेळी आपण संपादकांना म्हटलं होतं, हा आकडा खरा नाही. मृतांचा आकडा किती तरी मोठा असणार. आज 'इंडियन एक्सप्रेस' ह्या टाइपापेक्षा मोठी अक्षरे आहेत हेडलाईनची :
दहा गावे पूर्ण वाहून गेली. 
वादळाचे बळी ०००.
किती बेपत्ता आहेत? किती जखमी? - माहित नाही. गेल्या चोवीस तासांत हा फरक. नऊशेवरून हा आकडा सात हजारावर. उद्या तो किती असेल? आणखीन किती बळी घेतले म्हणजे हे खुनी वादळ तृप्त होईल?
अंकाची पहिली प्रत सूर्यनारायण मूर्तीच्या टेबलावर आली. अद्याप ओली शाई. काळी, मृत्यूचा स्पर्श असल्यासारखी अक्षरं. आता हजारो प्रती छापल्या जाण्यापूर्वी फिरून एकदा तपासणी. मूर्तीचे डोळे झरझर काही छोट्या पण महत्वाच्या बातम्यांवरून फिरत होते:
चिराला आणि मछलीपटनम विभागांतील निदान शंभर खेडी अद्याप पाण्यानं वेढलेली आहेत. ह्या भागात आलेल्या सागरलाटेची उंची बावीस फूट होती. ती झाडांवरून, घरांवरून वाहत होती. ते पाहिलेल्या लोकांनी सांगितलं, आमच्या  डोळ्यांवर आमचा विश्वास बसत नव्हता…
ह्या भागातील लोकांची पहिली गरज पिण्याचं पाणी. त्यासाठी पाण्याचे टँकर्स पाठवण्यात आलेले आहेत…
दोन हेलिकॉप्टर्स ह्या भागात शिजवलेल्या भाताची पाकिटं ह्या लोकांना पुरवत आहेत… सर्व तर्हेच्या मदतीसाठी आपण सज्ज आहोत, असं सैन्यानं फिरून कळवलं असलं तरी त्यांना बोलवायची गरज लागणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे…
सैन्याकडे प्रशिक्षित जवान आहेत. छोट्या होडया आहेत. त्यांचे इंजिनिअर्स वाहून गेलेले पूल त्वरेनं बांधू शकतील आणि मुख्य म्हणजे त्यांच्या वायरलेस मशिनरीमुळं दूरवरच्या खेड्यांतील माणसांशी लगेच संपर्क साधता येइल. पण राज्य सरकारनं सैन्याऐवजी काकीनाड्याहून स्पेशल आर्म्ड रिझर्व्हड पोलिसांची बटालियन ह्या मदत-कार्यासाठी मागवलेली आहे…
सूर्यनारायण मूर्ती वाचायचा थांबला. मनाशी म्हणाला, "लोक समजतील न समजतील. पण ज्यांना कालची बातमी आठवत असेल, की चरणसिंगांनी आंध्रमध्ये राष्ट्रपती-राजवट लवकरच येण्याची शक्यता व्यक्त केली होती, त्यांना ह्या घटनेचा अर्थ समजू शकेल."
आतल्या पानांवर आणखीन काही छोट्या छोट्या पण अर्थपूर्ण बातम्या होत्या:
केंद्र सरकारनं आंध्र आणि तामिळनाडूमधील वादळानं निराश्रित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. आंध्रमधील हानीची पाहणी करण्यासाठी शेती खात्याचे राज्यमंत्री श्री. भानुप्रताप सिंग सागर किनाऱ्यावरच्या पाच जिल्ह्यांना लवकरच भेट देतील…
नॅशनल स्टुडंट्स युनियनच्या आंध्र शाखेनं कपडे आणि इतर आवश्यक गोष्टी वादळग्रस्तांसाठी जमवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या सेक्रेटरीनं कळवलं आहे, की ज्यांना आर्थिक मदत करायची असेल त्यांनी चेक वा रोख रक्कम गांधी-भवनातील कार्यालयात सचिवाकडे देऊन त्याची पावती घ्यावी…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं वादळ-विमोचन-समिती स्थापन केली असून अवनीगड्डा भागात त्यांचं काम सुरु झालं आहे…
ह्याबरोबर आणखी एका बातमीनं सूर्यनारायण मूर्तीचं लक्ष वेधून घेतलं : काँग्रेसचे अध्यक्ष के. ब्रह्मानंद रेड्डी हे उद्या विजयवाड्याला पोहोचतील. पंचायत-राज्यमंत्री आर. नरप्पा रेड्डी हे त्यांच्याबरोबर वादळ-विभागाच्या दौऱ्यात राहतील.
मूर्ती वाचायचा थांबला. के. ब्रह्मानंद रेड्डी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर मी कायमचा राजीनामा देईन, असं मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटल्याची बातमी ह्याच पानावर आली होती. आज हे दोघं इंदिरा गांधींना विरोध करण्यासाठी एकत्र येत आहेत. संजय गांधींची कोथगोदमची भेट ह्याच आंध्रप्रदेशनं काही कोट्यावधी रुपये खर्च करून मोठ्या धूमधडाक्यानं साजरी केली होती.
हे सर्व काय आहे? क्षणात होत्याचं नव्हतं करणारं वादळ कित्येक वर्षातून एकदा येतं; पण राजकारणात फक्त पानांच्या सळसळीनं होत्याचं नव्हतं एका दिवसात होतं. बोललेले शब्द विसरले जातात. दिलेली वचनं टाळ्यांचा कडकडात विरण्यापूर्वीच फिरवली जातात. हे सर्व खरोखरच काय आहे?ब्रह्मानंद रेड्डींच्या पाठोपाठ इंदिरा गांधीही ह्या वादळग्रस्त विभागाला भेट देतील. केंद्र सरकारच्या मंत्र्यांबरोबर शर्यत लागल्यासारखे राज्य सरकारचे मंत्री इथं हजर होतील. सरकारी यंत्रणा वादळातील लोकांच्या मदतीचं काम बाजूस ठेवून ह्या व्ही. आय. पीं. च्या स्वागतासाठी राबवली जाईल. ह्या सर्वांतून ह्या वादळग्रस्तांचं जीवन सावरलं जाणार आहे की वादळानं उद्ध्वस्त झालेल्या भूमीवर निवडणुकींच्या आगमनापूर्वीच्या रणधुमाळीची ही सुरुवात आहे?…
सूर्यनारायण मूर्तीनं विचार करायचं थांबवलं आणि वृत्तपत्राच्या प्रती छापायला सांगितल्या. शेवटी वर्तमानपत्रं ही फक्त माहिती पुरवण्याकरता असतात. त्यांबद्दल विचार करायचा वा नाही हे नागरिकांनीच ठरवायचं असतं.

- चक्रीवादळ
लेखक - प्रभाकर पेंढारकर  

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...