Monday, November 5, 2012

स्टेशन - डॉ. अनिल अवचट

       लहानपणापासून मला रेल्वेतल्या टी. सी. या व्यक्तीविषयी कुतूहल आहे. आकर्षण आणि भीतीही. ट्रेनमध्ये टी. सी. तिकीटं तपासायला डब्यात आला,की माझ्या छातीत धस्स होतं. कल्पनेनंच मला वाटतं की, मी तिकीट घरी विसरलोय किंवा येताना कुठंतरी पाडलंय. खिशात शोधू लागतो आणि खिशात असूनही ते हाताला लागत नाही. मग आता, मघा कल्पना केली तसं खरोखरीच होणार. आता पेनल्टी किती भरावी लागते, कोण जाणे. ट्रेनमध्ये कुणी ओळखीचं भेटलं होतं का, की ज्याच्याकडे पैसे उसने मागता येतील. असा विचार सुरु. पुन्हा एकदा शांतपणे सगळं बघितल्यावर ते सापडतं आणि मग हुश्श.
         जेव्हा एखाद्या स्टेशनात गाडी थांबते, तेव्हा टी. सी. प्लॅटफॉर्मवर डब्याच्या दारासमोर उभा राहतो. लोक त्याला येऊन चिकटू लागतात. हा यादी बघत असतो. त्यावेळी मला  टी. सी. चा खूप हेवा वाटतो.
          एकदा एका  टी. सी.शी माझ्या निवांत गप्पा झाल्या होत्या.
      पुण्याहून नागपूरकडे महाराष्ट्र एक्स्प्रेसने निघालो होतो. रात्री साडेदहा-अकराला इथून सुटली. कुण्या संस्थेने बोलावलं असल्यानं  फर्स्टक्लासचं तिकीट काढलं होतं. डब्यात गर्दी नव्हती. दोन-चार कंपार्टमेंटमध्ये तुरळक माणसं होती. मी तर एकटाच होतो. पुणं सुटल्या सुटल्या काही वेळातच पन्नास-पंचावन्न वयाचे, काळा कोट, चष्मा घातलेले  टी. सी. माझ्या कंपार्टमेंटमध्ये येऊन बसले. यावेळी माझं तिकीट हातात तयार होतं. तिकीट बघून त्यांनी हातातील कागदावर खूण केली. ते उठू लागताच मी म्हणालो, "काम संपलं असलं तर बसा की इथंच." ते बसले. कुलकर्णी त्यांचं नाव.
       मी म्हटलं, "काय आपलं पुणं स्टेशन स्वच्छ होतं हो पूर्वी? आता मी पाहतो, तर इथं कितीतरी माणसं स्टेशनात उभ्या असलेल्या गाड्यांचे संडास वापरतात. स्टेशनात कसा वास येतो. काही उपाय नाही का यावर?"
         ते म्हणाले, "अहो, सात-आठशे माणसं या स्टेशनात राहतात. तुम्ही रात्रीच्या वेळी सहा नंबर प्लॅटफॉर्मवर जा. तिथं तर रेग्युलर स्वयंपाकच चाललेला असतो. काटक्या जमवून आणतात. तीन दगडांच्या चुली मांडतात आणि सुरु. बरं यांच्या गरजा कमी. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरवलं की, एकदा या सगळ्यांना बाहेर काढून यांच्यावर खटले भरायचे."
          "मग?"
          "आमचा सगळा स्टाफ एकत्र केला आणि पोलिसांच्या मदतीने आम्ही दोनशे लोक उचलले. अटक करून रेल्वे कोर्टापुढे उभे केले. त्यांना कोर्टाने तुरुंगात पाठवलं. लहान मुलं असली, तर रिमांड होममध्ये पाठवलं. ती मोहीम आम्ही पुढं चालूच ठेवली. दुसऱ्या दिवशी दोनशे पाठवले. तिसऱ्या दिवशी कोर्टाचा निरोप आला की, आता माणसं पाठवू नका, कारण तुरुंगातून, रिमांड होममधून आता जागा नसल्याचं कळवलंय. बोला आता. ठीक आहे. त्यांनी तरी कुठं जायचं? राहा बाबा हो."
          मी म्हटलं, "पण स्टेशनात काही असलं, तरी हा फर्स्टक्लासचा डबा चांगला वाटला मला. प्रशस्त आहे. स्वच्छ आहे."
          "अहो, हा काहीच नाही. पूर्वी ब्रिटीशांच्या काळात फर्स्ट क्लासचा काय रुबाब होता! आम्हीसुद्धा या डब्यात पाय ठेवायला घाबरायचो. इतकी स्वच्छता. इथले अटेंडंटसुध्दा अगदी तयार. आता ह्या आपल्या पुढाऱ्यांचं राज्य आलं. काही संस्कृती नाही हो यांना. यांच्याबरोबर दहा-वीस चमचे मंडळी. जेवतात कसे? कांदे हाताने फोडतात. त्यांच्या साली इथेच डबाभर उडत असतात. काही म्हणायला गेलं की डाफरतात. आईमाईचा उद्धार. यांच्यातल्या  पुढाऱ्याकडे फर्स्ट चा पास किंवा कूपन असतं. पण इतरांची सेकंडची तिकिटं. जागा मात्र इथल्या अडवतात."
          "मग तुम्ही काय करता?"
         "रागरंग पाहून करतो. एकदा मात्र मी त्यांची तिकिटं चेक केली. बाकी सगळे सेकंडचे निघाले. मी तिकडे जायला सांगताच सगळे वाघासारखे गुरगुरायला लागले. मी पुढाऱ्यांना हात जोडून सांगितलं की, 'आपल्या माणसांना तिकडे मी अॅडजस्ट करायला सांगतो. त्यांनी तिकडं जाण्यात तुमची शोभा आहे. मी इथं गाडी थांबवू शकतो. आमचे अधिकारी येतील. तुमची शोभा राहणार आहे का?' मग दिलं पाठवून त्यांनी इतरांना सेकंडमध्ये."
           "स्टेशनवर तुमचा पब्लिकचा संबंध येतो. तुम्ही पब्लिकला कसं हँडल करता?"
           "स्टेशन आलं की आम्ही खाली जाऊन उभं राहतो. पब्लिक येतंच. जागा असेल तर देऊन टाकतोच. पण जागा नसली, तर काय करायचं? आपल्याला जागा मिळणार नाही; असं लक्षात आलं, की आधी गोडीनं बोलणारे लोक आवाज चढवतात आणि शेवटी तर शिवीगाळही करतात."
           "मग तुम्ही काय करता?"
         "काय करणार? आपलं ऐकून घ्यायचं. आमचे इतर टी. सी. लोक यावर फार चिडतात. वैतागतात. मी त्यांना म्हणतो, 'अरे, रेल्वे खातं आपल्याला जो पगार देतंय ना, तो शिव्या खाण्यासाठीच आहे, असं समजायचं. नाहीतर इतरांसारखं आपल्याला कुठं कष्टाचं काम करावं लागतं? स्टेशनातून लिस्ट आणायची, त्याप्रमाणे लोक आहेत की नाही बघायचे, खुणा केल्या कि झालं काम. नंतर अधूनमधून येणारे प्रवासी चेक करायचे. दोन-चार तिकीटं फाडायची. संपलं. आपल्याला इतर क्लार्क लोकांसारखं पत्रांना उत्तरं द्यावी लागत नाहीत. फायलिंग करावं लागत नाही. एका जागी सात-आठ तास बसून रेटून काम करावं लागत नाही. मग सरकार हे कशाला पैसे देईल? शिव्या खायलाच की नाही?"
          मी हसू लागलो. म्हणालो, "पण या रात्री अपरात्रीच्या ड्यूट्यांमुळे तुमचं रोजचं जीवन खूप डिस्टर्ब नाही का होत?"
          "होतं न. रात्री जिथं ड्यूटी एंड होते, त्या स्टेशनात आमच्यासाठी झोपायची सोय असते. पण ती कशी, तर 'ही खोली आणि पसरा इथं' या टाइपची. तिथं एक पोरगा असतो. तो आम्ही मागितलं, तर जेवण आणून देतो. मग झोपायचं. पण या स्टेशनच्या गडबडीत झोप लागत नाही. परत काही तासांतच दुसरं कनेक्शन असलं, तर त्या गाडीला उठावंच लागतं. मुलाला सांगून ठेवतो उठवायला. समजा, दुसरी गाडी रात्री अडीचला आहे, तर उठवावं लागत नाही. आधीच टक्क जागे असतो."
           "आणि घर?"
           "इतक्या अपरात्री घरी जातो की आता आमची मुलंही ओळखीनाशी झाली आहेत. ती काय करतात, काय शिकतात हेही माहित नाही. मिसेस सगळं बघते. कधी सणवार, लग्नाला जाणं हे आम्हाला जमत नाही. आता आम्हाला घरचे लोक गृहीतच धरत नाहीत. हे येणारच नाहीत, तर यांना कशाला विचारायचं म्हणतात. समजा, आम्ही अमुक कार्यक्रमाला येतो म्हटलं तर त्यांनाच आता नको असेल. त्यामुळे नातेवाइकांच्या ओळखी नाहीत. मित्रमंडळी नाहीत. माझी रिटायरमेंट जवळ आलीय. नंतर काय करणार, कसं होणार ते माहित नाही. मुलीसाठी मिसेस बघतेय स्थळं. समजा लग्न जमलं आणि मी जर तिथं उभं राह्यलो, तर नातेवाईक मिसेसना विचारतील, 'हा कोण माणूस आहे?'"
           असं म्हणून ते हसू लागले.


- स्टेशन (पुण्याची अपूर्वाई)
लेखक - डॉ. अनिल अवचट.
  
  

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...