Monday, November 5, 2012

कराचीच्या लालाजींची आणि लोकमान्य टिळकांच्या आवाजाची गोष्ट

     बुधवार, दि. २२ सप्टेंबर, १९१५ची ही गोष्ट. त्या रात्री पंधरासोळा वर्षांचा एक तरुण आपल्या ध्वनिमुद्रणयंत्रासह थेट कराचीहून गायकवाडवाड्यात गाणं ऐकायला आला होता. या तरुणानं ध्वनिमुद्रिकेत कैद केलेला लोकमान्य टिळकांचा आवाज गेल्या महिन्यात केसरीवाड्यात पुन्हा एकदा निनादला. हे साध्य झालं ते हे ध्वनिमुद्रण करणार्‍या शेठ लखमीचंद ईसरदास नारंग यांच्यामुळे, हे ध्वनिमुद्रण जपून ठेवून ते जतन करणार्‍या श्री. मुकेश नारंग यांच्यामुळे आणि ते लोकांसमोर आणण्यासाठी प्रचंड कष्ट केलेल्या माधव गोरे, मंदार वैद्य व श्रीमती शैला दातार यांच्यामुळे.
          सेठ लखमीचंद ईसरदास नारंग हे कराचीतले धनवंत व्यापारी. आधुनिक कराचीचे एक शिल्पकार. १८९९ सालचा त्यांचा जन्म. वडिलांचा, म्हणजे ईसरदास नारंगांचा, हिर्‍यांचा व्यापार होता. कराचीतल्या मीठादर भागातल्या बावन्न खोल्यांच्या भल्यामोठ्या हवेलीत नारंग कुटुंबीय राहत असत. लालाजी, म्हणजे सेठ लखमीचंद, विलक्षण हुशार, हरहुन्नरी आणि कष्टाळू होते. त्या काळच्या शिरस्त्याप्रमाणे, आणि ईसरदास नारंगांचं वय होत आल्यामुळे, वयाच्या दहाव्या वर्षी ते वडिलांच्या व्यवसायात उतरले. वयाच्या पंधराव्या वर्षी लालाजींची ओळख कराचीतील एक प्रतिष्ठित, दयाळू आणि धनवान असामी म्हणून होती. एक मोठ्ठं साम्राज्य त्यांनी कोवळ्या वयात उभं केलं होतं. साहजिकच भारतातल्या तमाम संस्थानिकांशी, उद्योजकांशी आणि राजकीय नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध होते.
          ईसरदास नारंग व्यवसायाच्या कामांनिमित्त अनेकदा मुंबईला जात असत. या मुंबईभेटींमध्ये शास्त्रीय गायनाच्या बैठकींना, संगीतनाटकांना हजेरी लावणं ठरलेलं असे. अगदी लहानपणापासून लालाजी आपल्या वडिलांबरोबर मुंबईला अशा कार्यक्रमांना जात. या काळात कानी पडलेलं गाणं आणि एकुणातच गाण्याची असलेली उपजत आवड यांमुळे लालाजीही वयाच्या दहाव्याबाराव्या वर्षापासून बैठकींना हजेरी लावू लागले. हे संगीतप्रेम दृढमूल झालं ते अमेरिकेत लागलेल्या ध्वनिमुद्रिकांवर आवाज सुईच्या मदतीनं कैद करण्याच्या शोधामुळे.  
      त्या काळातल्या संगीताला आश्रय देणार्‍या धनवंतांपेक्षा लालाजी वेगळे होते. कलेइतकंच त्यांचं कलावंतांवर प्रेम होतं. प्रचंड पैसा मिळवला तरी कलावंताला, त्याच्या कलेला मान देणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटत असे. त्यामुळे बालगंधर्व, मा. कृष्णराव यांसारख्या गायकांबरोबरच, अब्दुल करीम खाँसाहेब, उस्ताद फैय्याजखाँसाहेब, सुरेशबाबू माने, केसरबाई केरकर अशा अनेक दिग्गजांशी त्यांचा स्नेहबंध निर्माण झाला. लालाजी या थोर गायकांच्या बैठकींना आवर्जून हजेरी लावत, किंवा त्यांना आपल्या घरी आमंत्रण देत. त्यांचं गाणं मनसोक्त ऐकत. या महान कलावंतांचं गाणं जतन करून ठेवणं अत्यावश्यक आहे, हे लालाजींनी ओळखलं होतं. प्रत्येकच कलावंत काही व्यावसायिक ध्वनिमुद्रणांसाठी अनुकूल नसे. शिवाय अशा खाजगी बैठकींची ध्वनिमुद्रणं बाजारात कशी उपलब्ध असणार? आपल्या दिवाणखान्यातल्या या मौल्यवान स्वरांचा आनंद नंतरही लुटता यायलाच हवा, म्हणून ते बैठकी ध्वनिमुद्रित करून ठेवत. खरं म्हणजे संगीतातली नजाकत, बारकावे आणि शुद्धता या ध्वनिमुद्रणयंत्रामुळे लोप पावतात, अशी तत्कालीन दिग्गजांना खात्री होती. त्यामुळे ध्वनिमुद्रणं करण्यासाठी ते नाखूश असत. पण लालाजींच्या संगीतप्रेमाबद्दल, त्यांच्या दिलदार वृत्तीबद्दल, त्यांच्यातल्या माणूसपणाबद्दल या कलावंतांच्या मनात यत्किंचितही किंतु नव्हता. त्यामुळे हे कलावंतही लालाजींसमोर गाताना भरभरून गात. त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे ध्वनिमुद्रण करू देत. १९१० सालापासून लालाजींनी अशी ध्वनिमुद्रणं करायला सुरुवात केली होती. 
        लालाजी दरवर्षी चारपाच महिने पुण्यात येऊन राहत असत. गाणं ऐकण्यासाठी. लालाजी येणार त्याच्या महिनाभर आधी बसमधून त्यांचे सेवक पुण्यात दाखल होत. गणेशखिंड रस्त्यावर मफतलाल बंगल्याशेजारी डनलेवन हाऊस नावाचा मोठा बंगला होता. हा बंगला लालाजींनी भाड्यानं घेतलेला असे. तिथे लालाजींचे सेवक अगोदर सारी व्यवस्था लावत. मग एका ट्रकातून लालाजींची ध्वनिमुद्रण यंत्रं कराचीहून येत. मग विमानातून लालाजी पुण्याला येत. गणेशोत्सवाच्या जरा आधीच लालाजींचं आगमन होई. गणेशोत्सवात पुण्यात दररोज जलसे असत, आणि बालगंधर्व व मास्तर कृष्णराव यांचं गाणं या जलशांमध्ये ऐकायची संधी मिळत असे. शिवाय इतरही दिग्गज गायक गणरायाच्या चरणी आपली सेवा अर्पण करत असत. लालाजी क्वचित पाचगणीला जात. तिथे ’सकाळ’च्या संस्थापक-संपादक असलेल्या डॉ. नानासाहेब परुळेकरांच्या बंगल्यावर त्यांचा मुक्काम असे. या मुक्कामात रोजच गाण्यांच्या बैठकी होत. लालाजी गायकांना मोठ्या मानानं पुण्याला बोलावत. त्यांचा आदरसत्कार करत. त्यांच्या बैठकी आयोजित करत, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या बैठकींचं ध्वनिमुद्रण करत. पुण्यात किंवा आसपासच्या शहरात ’गंधर्व नाटक कंपनी’चा मुक्काम असेल, तर लालाजी नाटकांना हजेरी लावत. नाटक संपल्यानंतर कंपनीतल्या प्रत्येकाला चांदीची नाणी भरलेला चांदीचा तांब्या देत. 


- कराचीच्या लालाजींची आणि लोकमान्य टिळकांच्या आवाजाची गोष्ट
लेखक व संकलक - चिनूक्स (मायबोली)

संपूर्ण लेखासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.


No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...