Sunday, February 21, 2016

...आणि म्हणे मराठी ‘डाउनमार्केट’! - श्री. कौशल इनामदार

‘मराठी अभिमानगीता’चा संपूर्ण प्रवास सविस्तर उलगडायचा तर तो अक्षरशः एका पुस्तकाचा विषय होईल. तरीही या प्रवासाची काही क्षणचित्रं मी इथं मांडतो.

आपल्याला पाय आहेत ही जाणीव आपल्याला सर्वांत अधिक कधी होते? खूप चालल्यानंतर पाय जेव्हा खूप दुखू लागतात, तेव्हा जशी पायांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होते, तशी एरवीच्या दैनंदिन व्यवहारात कधीच  होत नाही! पडसं झालं की नाकाच्या अस्तित्वाची जाणीव, बोट चिमटलं की बोटाच्या अस्तित्वाची जाणीव, तसंच जेव्हा माझी अस्मिता दुखावली गेली, तेव्हा मी एक मराठी माणूस, एक मराठी संगीतकार असल्याची जाणीव मला झाली!
२००८ च्या सप्टेंबर महिन्यात एका जिंगलच्या ध्वनिमुद्रणाच्या निमित्तानं मी मुंबईतल्या एका व्यावसायिक रेडिओ वाहिनीच्या (एफएम स्टेशन) स्टुडिओमध्ये गेलो होतो. काम झाल्यावर तिथं माझा मित्र असलेल्या एका रेडिओ जॉकीला मी अगदी सहज विचारलं: ‘‘काय रे, तुमच्या वाहिनीवर मराठी गाणी का नाही लागत?’’
‘‘आमची पॉलिसी आहे,’’ त्यानं उत्तर दिलं.
‘‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी गाणी न लावण्याची तुमची पॉलिसी आहे?’’ मी आश्‍चर्यानं विचारलं.
त्यानं मान डोलावली.
‘‘तुमची स्टेशनं आख्ख्या भारतात आहेत. अशी पॉलिसी तुमची भारताच्या इतर कुठल्या शहरांमध्ये आहे? कोइमतूरमध्ये तमीळ गाणी लावायची नाहीत, अशी पॉलिसी आहे? बंगळूरमध्ये कन्नड गाणी लावायची नाहीत, अशी पॉलिसी आहे? कोलकतामध्ये बंगाली गाणी लावायची नाहीत, अशी पॉलिसी आहे?’’ मी प्रश्‍नावर प्रश्‍न विचारत राहिलो.
‘‘अरे, मुंबईची गोष्ट वेगळी आहे मित्रा!’’ त्यानं मला समजावलं, ‘‘मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे.’’
‘‘मान्य आहे ना. कॉस्मोपॉलिटन बंगळूरही आहे! पण तिथं कन्नड गाणी लागतात की. कारण बंगळूरकर्नाटकाची राजधानी आहे, तशी मुंबईही महाराष्ट्राची राजधानी आहे. मग इथं मराठी गाणी लावायची नाहीत, असं धोरण तुम्ही अवलंबता?’’

पहिल्यांदा माझा मित्र निरुत्तर झाल्यासारखा झाला. पुढं म्हणालो: ‘‘तुम्ही हिंदी गाणी लावता आणि त्याचा आनंद आहेच आम्हाला. तुम्ही एखादं पंजाबी गाणंही लावता- उदाहरणार्थ: रब्बी शेरगिलचं ‘बुल्ला की जाणा’ (संदर्भ ः सोळाव्या शतकातले विख्यात पंजाबी सूफी कवी बुल्ले शाह / बुल्ला शाह यांची रचना) - त्याचाही आनंदच आहे; पण पंजाबी ते कॉस्मोपॉलिटन आणि मराठी ते व्हर्नक्‍युलर हा न्याय कुठला? म्हणजे रब्बीचं ‘बुल्ला की जाणा’ हे पंजाबी गाणं तुम्हाला चालतं; पण सलील कुलकर्णी-संदीप खरे यांचं ‘डिबाडी डिपांग’चं तुम्हाला वावडं का?’’
हे ऐकल्यानंतर मात्र त्या रेडिओ जॉकीनं शस्त्रं खाली ठेवली. तो म्हणाला: ‘‘खरं सांगायचं तर आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना, त्यांना असं वाटतं की मराठी गाणी लावली तर रेडिओ स्टेशनला एक ‘डाउनमार्केट फील’ येईल.’’
इथं मात्र मी चमकलो. ‘डाउनमार्केट फील?’ मराठीमुळं? एखादी भाषा ‘डाउनमार्केट’ असते, असं ठरवण्याचा अधिकार या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कुणी दिला? आणि ‘मराठी डाउनमार्केट’ म्हणजे तर हास्यास्पदच विधान होतं!

युनेस्कोच्या एका सर्व्हेनुसार जगात सुमारे ६ हजार ५०० भाषा आणि बोलीभाषा आहेत. त्यात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा क्रमवार लावल्या, तर एन्कार्टा विश्‍वकोशाप्रमाणे मराठीचा क्रमांक १५ वा आहे. १५ वी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही आकडेवारीच्या जोरावरच ‘डाउनमार्केट’ कशी असू शकते? इतकंच नव्हे तर, काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेनं ‘व्हॉयेजर’ नावाचं एक यान अंतराळात पाठवलं होतं. त्या यानातून पृथ्वीवरच्या संस्कृतीची नोंद करणारी एक ‘ग्रामोफोन रेकॉर्ड’ अंतराळात पाठवण्यात आली आहे. या ध्वनिमुद्रिकेचा हेतू हा, की परग्रहावरच्या जिवांना पृथ्वी आणि तिच्या संस्कृतीची माहिती उपलब्ध व्हावी. या ‘गोल्डन रेकॉर्ड’मध्ये परग्रहवासीयांच्या नावे एक संदेश ध्वनिमुद्रित केला गेला आहे. हा संदेश जगातल्या ५५ भाषांमध्ये ध्वनिमुद्रित केला गेला; ज्यामध्ये भारतातल्या नऊ भाषा आहेत. या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे. (मराठीमधला हा संदेश तुम्ही इथं ऐकू शकता http://voyager.jpl.nasa.gov/spacecraft/languages/marathi. html)

ही कथा इथंच संपत नाही. याच ‘गोल्डन रेकॉर्ड’मध्ये पृथ्वीतलावरचं संगीतही ध्वनिमुद्रित करून पाठवण्यात आलं आहे. जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांतल्या संगीताचा त्यात समावेश आहे. अमेरिका, मेक्‍सिको, जर्मनी, अझरबैजान, पेरू, चीन, बल्गेरिया, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रिया अशा विविध देशांमधलं संगीत त्या ध्वनिमुद्रिकेत आहे. यात भारताच्या संगीताचं प्रतिनिधित्व केसरबाई केरकर करतात. त्यांची बंदिश - ‘जात कहाँ हो’ - ही या ध्वनिमुद्रिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.

तात्पर्य काय, तर अंतराळातही कुणी परग्रहवासी मराठी समजू शकेल असं जिथं ‘नासा’ला वाटतं, तिथं महाराष्ट्राच्या राजधानीतच ‘तुमची भाषा ‘डाउनमार्केट’ वाटेल’ असं म्हणणाऱ्या या रेडिओच्या ‘वरिष्ठ’ अधिकाऱ्यांचा मला मनस्वी राग आला! बरं, मराठी गाणी महाराष्ट्रात ऐकायची नाहीत तर कुठं आसाममध्ये ऐकायची? त्या रेडिओ जॉकी असलेल्या मित्राशी मी फार वाद घातला नाही; पण तिथून मी बाहेर पडलो, तो अतिशय अस्वस्थ होऊनच. आता हा प्रश्‍न माझ्या उंबरठ्याच्या आत आला होता. जगभर मान्य केलेला सिद्धान्त आहे, की नवं संगीत किंवा स्थानिक संगीत लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर रेडिओसारखं दुसरं परिणामकारक माध्यम नाही; पण इथं आम्हाला हे माध्यमच बंद होतं! संगीतकाराची ओळख तो टीव्हीवरच्या कार्यक्रमात दिसतो यात नसून, त्याची किती गाणी लोकांच्या ओठांवर आहेत, यामध्ये असते. गुलजार म्हणतात तसं: ‘नाम गुम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है!’

पण याच गीताची पुढची ओळ आहे - ‘गर याद रहे!’ खरंतर ही परिस्थिती नवी नाही. गेल्या ४० वर्षांत उदयाला आलेल्या अनेक मराठी संगीतकारांनी उत्तमोत्तम रचना केल्या; पण त्या लोकांसमोर आल्याच नाहीत.
फक्त रेडिओबाबतच हा प्रश्‍न मर्यादित नव्हता. मुंबईत व्होडाफोनसारख्या मोबाईल कंपन्याही मराठीतून बोलायला नकार देत होत्या. पुणे, नाशिक, नागपूर इथेही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. चित्र विदारक होतं!
मुंबईमधली परिस्थिती अधिक बिकट होती आणि आहे. आज मुंबईमध्ये आपल्याला भाजीपाला ‘मराठी’तून विकत घेता येत नाही, की एका जागेहून दुसऱ्या जागी ‘मराठी’तून जाता येत नाही! जगाच्या पाठीवर कुठंही रीत अशीच आहे, की लोक ग्राहकाच्या भाषेत बोलतात. मुंबई हे एकमेव असं ठिकाण आहे - आणि हळूहळू महाराष्ट्रातली इतर शहरंही त्याच वाटेवर आहेत - की जिथं लोक विक्रेत्याच्या भाषेत बोलतात! आपण ‘ग्राहकराजा’ असं म्हणतो; पण ग्राहकाच्या भाषेला मात्र या बाजारपेठेत स्थान नाही! म्हणजे महाराष्ट्रात मुंबई आहे; पण मुंबईत महाराष्ट्र कुठंही दिसत नाही!

प्रश्‍न फक्त मुंबईचा नव्हता. एकूणच मराठी लोकांमध्येच मराठी भाषेच्या बाबतीत एक औदासीन्य आहे, असं प्रकर्षानं जाणवत होतं. मुळातच मराठी ‘डाउनमार्केट’ आहे, हा संकेत इतर भाषकांपर्यंत पोचतो तरी कुठून? कुणाकडून? आणि उत्तर येतं: आपल्याकडूनच! आणि जेव्हा आपल्यालाच आपली भाषा डाउनमार्केट आहे असं वाटू लागतं, तेव्हा तोच धोक्‍याचा इशारा असतो!

आपण जे आहोत - आणि आपण मराठी आहोत - त्याबद्दलच आपल्याला आतून चांगलं वाटलं नाही, तर प्रगतीचे दरवाजे आपल्याकरता बंद आहेत, हे सांगायला कुठल्याही मानसशास्त्रज्ज्ञाची गरज नाही! एकीकडं आपली भाषा बोलायची लाज बाळगायची, तर याच न्यूनगंडाचं दुसरं टोक म्हणजे आपल्या अस्मितेबद्दल सतत आक्रमक भूमिका घ्यायची.

अत्यंत विमनस्क अवस्थेत मी घरी आलो. माझ्या मनात विचार आला, की आपण राजकारण्यांना दोषी धरतो, सरकारच्या नावानं ठणाणा करतो; पण या सगळ्या प्रश्‍नाबाबत आपण काय करतोय, हा आत्मपीडाकारक प्रश्‍न सतत मला भेडसावत राहिला. पण मी काय करू शकत होतो? मी संगीतकार आहे आणि मी गाणं करू शकतो, एवढंच एक सत्य माझ्या डोळ्यांसमोर दिसत राहिलं. इंग्लिशमधल्या एका म्हणीचा दाखला देऊन पु. ल. देशपांडे यांनी एका भाषणात म्हटलं होतं: ‘A song has the longest life. आपण लहान मुलाच्या ओठावर एखादं मराठी रुळवलं, तर त्या गाण्याच्या निमित्तानं आपली भाषा, आपली संस्कृती ते मूल असेपर्यंत टिकून राहते.’ पुलंचे हे शब्द माझ्या कानात गुंजत राहिले.
‘मराठीचा आदर बाळगा’ असं इतर भाषकांना सांगण्याअगोदर खरी गरज होती ती मराठी माणसांच्या मनात मराठीचा अभिमान रुजवण्याची. मराठीला गरज होती एका अभिमानगीताची!
(क्रमशः)
--------------------------------------------------
एकेकाळी हिंदीत मराठी गायक-संगीतकारांचं वर्चस्व...
एफएम रेडिओ किंवा अन्य माध्यमांत मराठी गाण्यांकडं बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा असला, तरी मराठी गायक-गायिकांनी, संगीतकार-वादकांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अमीट ठसा उमटवला आहे. लता मंगेशकर आणि आशा भोसले ही त्यातली ठळक नावं. त्यानंतर सुमन कल्याणपूरकर, अनुराधा पौडवाल, साधना सरगम यांनी लोकप्रियता मिळवली होती. सी. रामचंद्र, वसंत देसाई, लक्ष्मीकांत, स्नेहल भाटकर, एन. दत्ता, दत्ताराम या संगीतकारांनी हिंदी चित्रपटांच्या माध्यमांतून असंख्य श्रवणीय गाणी दिली आहेत. वादकांमध्ये आणि संगीतसंयोजनातही अनेक मराठी मंडळी आघाडीवर होती.

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...