Tuesday, September 22, 2015

इस्लामचा अर्थ - सलीम खान

SalimKhan.jpg
इस्लामचा अर्थ आहे - शांती , अमन , पीस! ज्या धर्मात एकमेकांना भेटताच ' अस्-सलाम-वालेकुम ' म्हटलं जातं आणि उत्तर मिळतं- ' वालेकुम-अस्-सलाम '; ज्याचा अर्थ- 'खुदाकडून तुम्हाला शांती लाभो आणि खुदा तुमचा सांभाळ करो '. असा धर्म हिंसक असू शकतो ? ' बिसमिल्लाह इर्र रहेमान निर्र रहीम '- याचा अर्थ , त्या खुदाच्या नावाने सुरूवात करतो , जो रहेमान आहे, रहेम करणारा आहे, महेरबान आहे, महेरबानी करणारा आहे. या अशा धर्मात दहशतवाद कुठून आणि का आला? याला जबाबदार आहे ' चुकीचं शिक्षण'. या विषयावर लिहिण्याचा इरादा नव्हता. पण अशी एक बातमी ऐकली की राहावलंच नाही. काही दिवसांपूवीर्चीच गोष्ट. दिल्लीच्या रामलीला मैदानात निरनिराळ्या पंथांतील मुस्लिम आणि इतर काही शांतताप्रेमी एका मेळाव्यात सहभागी झाले होते. कुराण आणि हदीसचा हवाला देत या लोकांनी दहशतवादावर कठोर शब्दांत टीका केली. इस्लाम दहशतवादाच्या विरोधात असून इस्लामचा जन्मच दहशतवादाशी लढण्यासाठी झाला आहे , असं प्रतिपादन त्यांनी केलं. प्रत्येक मुसलमान व्यक्तीने दहशतवादाच्या विरोधातील या लढाईत सहभागी  झालं पाहिजे , असा फतवाही त्यांनी तिथे जारी केला. ही एक खूप चांगली सुरूवात आहे आणि तिचा आवाज  खूप दूरपर्यंत पोहोचेल. या आधीही अनेक फतवे जारी केले गेले आहेत. का आणि कुठून हे फतवे दिले गेले याचा शोध लावणं कठीण आहे. कारण मुसलमानांतही अनेक पंथ, जमाती आहेत. फतवे जारी करण्याचा अधिकार कुणाला आहे व त्यांना तो कुणी दिला, त्याचं महत्त्व किती, याचा छडा लावणंही तितकंच कठीण. मात्र, उपरोल्लेखित फतव्याचं  महत्त्व हे की हा अनेकांनी एकत्र येऊन दिला आहे आणि कुराण तसंच हदीसचा हवाला देऊन जारी केला आहे.
गेल्या वर्षी माझा मुलगा सलमान खानला लालबागच्या गणपती मंडळाने उत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं. सलमान तिथं गेला आणि संध्याकाळच्या आरतीत सहभागी झाला. कित्येक टीव्ही चॅनल्सनी ती दृश्यं पुन्हा पुन्हा झळकवली. मग काय- दुसऱ्या दिवशी फतव्यांचा पाऊस पडला आणि असा निकाल जारी करण्यात आला की आजपासून सलमान मुसलमान नसेल. त्याला इस्लाममधून काढण्यात आलं आहे. मी विचारतो , यापूवीर् त्याला इस्लाममध्ये दाखल कोणी आणि कधी केलं होतं , जी मेंबरशिप आता रद्द करण्यात आली आहे? या लोकांना हे माहित आहे का की सलमानची आई एक महाराष्ट्रीयन हिंदु आहे. आणि सलमानची नाळ त्याच्या आईच्या धर्माशी जोडलेली आहे. त्याची आई आपल्या घराचा निरोप घेऊन या घरी आली जरुर , पण आपले आईवडील, भाऊबहिणी, नातेवाईक आणि धर्म यांच्याकडे तिने पाठ फिरवली नाही. आईच्या धर्माचा आदर  करणं सलमानही तिच्या कुशीतच शिकला असून प्रत्येक धर्म हेच शिकवतो. एक किस्सा ऐकवतो ज्याच्यामुळे लेखात थोडा हलकेफुलकेपणा येईल. मला कुणीतरी विचारलं , 'अखेर तुम्हा लोकांचा धर्म कोणता ?' मी म्हणालो , ' जेव्हा आमच्या गाडीचा अचानक करकचून ब्रेक लागतो आणि आम्ही एखाद्या अपघातातून बचावल्याचं जाणवतं , तेव्हा माझ्या तोंडून नकळत उद्गार निघतो , ' अल्लाह खैर ', माझ्या पत्नीच्या तोंडून निघतं , ' अरे देवा ' आणि माझी मुलं एकत्रित उद्गारतात ' ओह शिट् '. आमच्या  कुटुंबातील नॅशनल इंटिग्रेशनचा हा एक छोटासा फॉर्म्युला आहे. प्रत्येक धर्मात कडवे लोक आहेतच. पण मुसलमानांत याचं प्रमाण जरा ज्यादाच आहे. याचं कारण बहुतेक हे असावं की या मुसलमानांना शिकवणाऱ्या मौलवी-मुल्लांनी इस्लामचा ना बारकाईने अभ्यास केलाय ना त्यांनी इस्लामला समजून घेतलंय. हिंदुस्तानात मुसलमानांची संख्या जवळपास पंधरा कोटी इतकी आहे. मात्र, इस्लामचा आत्मा जाणणारे पंधरा जणही मला नाही भेटलेले.९० टक्के मुसलमान ' इस्लाम ' या शब्दाचा अर्थ काय हेही सांगू शकणार नाहीत, याची मला खात्री आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर कुठल्याही मशिदीच्या समोर उभे रहा आणि नमाजनंतर बाहेर येणाऱ्या लोकांना ' इस्लामचा अर्थ' विचारा. माझं म्हणणं खरं असल्याचं तुम्हाला पटून जाईल. 

जगभरातल्या प्रत्येक देशातला मुसलमान हा आपल्या देशाच्या संस्कृतीशी जोडला गेलेला आहे. चीनमधील मुसलमान चिनी माणसांप्रमाणे राहतो; त्याचं खाणंपिणं, राहणी सगळं चिन्यांसारखंच आहे. तसंच मलेशियाच्या मुसलमानांचं आणि रशियातील मुसलमानांचंही आहे. रशियातील मुसलमान दिसतो रशियनच! फक्त हिंदुस्तानच्या मुसलमानांनी आपली एक अशी ओळख निर्माण केली आहे जिची मुळं कुठून आलीयत ते आजतागायत लक्षात आलेलं नाही. या ओळखीमुळेच ते या देशात वेगळे लक्षात येतात . पैगंबराची कुठली तस्वीर वा स्केच पाहून यांनी हा लांबलचक कुर्ता आणि आखुड पायजामा तसंच जाळीची टोपी असा आपला गणवेश बनवला कुणास ठाऊक ? माजी केंदीय राज्यमंत्री सलीम शेरवानी यांनी एकदा मला म्हटलं होतं की , मुसलमानांचा आचार आता त्यांची ओळख नाही तर त्यांची ओळख आहे छोट्या भावाचा पायजमा आणि मोठ्या भावाचा कुर्ता! दाढी राखणं धर्माला अनुसरून आहे पण ती नीट राखली तरच. हे जे असे कपडे परिधान करतात त्या अवताराचा इस्लाममध्ये कुठेच काही उल्लेख नाही. ग्रंथांमध्ये असं म्हटलं गेलंय की कपडे साफसुथरे आणि सुसभ्य असले पाहिजेत , ज्यांनी शरीर नीट झाकलं जाईल. हिंदुस्तानात तर कायमच पोशाख  असेच असत आले आहेत. सुवर्णमंदिरात आजही डोकं झाकूनच जावं लागतं. पाकिस्तानात दोन अशा व्यक्ती होऊन गेल्यायत ज्यांची नावं अतीव आदरानं घेतली जातात. मोहम्मद अली जिना रहेमतुल्लाअलेय- आणि अलामा इकबाल रहेमतुल्लाअलेय म्हणजे खुदा यांच्यावर कृपेचा पाऊस पाडो.  या दोन्ही सुप्रसिद्ध व्यक्तींना दाढी नव्हती आणि ते ' असे ' कपडेही परिधान करीत नव्हते.  इस्लाममध्ये ' अमल ' अर्थात ' कर्मा ' वर खूपच  कटाक्ष आहे. असंही म्हटलं गेलं आहे की , ' कर्मा ' मुळेच एखाद्या व्यक्तीला स्वर्गात प्रवेश मिळू शकेल , नमाज वा रोज्यांमुळे नाही. एक मुसलमान बिझनेसमन आहेत ज्यांना मी नीट ओळखतो. दोस्त बनण्याच्या वा बनवण्याच्या लायकीचे ते नाहीत कारण आपल्या तमाम दोस्तांचाही त्यांनी वापरच केलाय. ते नियमितपणे नमाज पढतात आणि रोजेही ठेवतात. हजयात्राही करून आलेत. पण जेव्हा कधी तोंड उघडतात , त्यांच्या तोंडून असत्यच बाहेर येतं. दोनएक लाखांचा घोटाळा करून परतत असतील तर मरिन ड्राइव्हला ब्रिजच्या खाली थांबून दोन किलो ज्वारी खरेदी करून कबुतरांना खायला घालतात. यामुळे ती कबुतरं इतकी जाड झालीयत की त्यांना उडताच येत नाही. एक अशी हदीस आहे की , बेईमानीचा एक घास खाल्ला तर ७० वेळांचा नमाज पुसला जातो. आता मला सांगा हे किती घास खात असतील?  

हाजीअली , हाजीमलंग , मकदूमशाह बाबांचा दर्गा आदी ठिकाणी फकिरांची जी गर्दी जमा दिसते , त्यांची पोटं या अशा मुसलमानांच्या अपराधीपणाच्या भावनेतूनच भरली जातायत. पहिली गोष्ट ही की , बेईमानीच्या पैशानं दानधर्म करू नये आणि दुसरी - खैरात करावी तर हतबल-लाचारांमध्ये ; धडधाकट , माजलेल्यांसाठी नाही. कॅथलिक पादरी बनण्यासाठी कॉलेजच्या डिग्रीनंतर ६ वर्षांचं प्रशिक्षण दिलं जातं. नंतरच चर्चमध्ये धाडलं जातं.  मुसलमानांचा मार्गदर्शक बनण्यासाठी असे कोणतेही निर्बंध नाहीत. ९० टक्के मुसलमान कुत्र्याला एक अपवित्र प्राणी मानतात. माझे व्याही , माझा मुलगा सोहेलचे सासरे अरुण सचदेव जकार्तामध्ये राहतात. दोन वर्षांपूर्वी  भीषण पुरामुळे त्यांचं घर बुडू लागलं. 

त्या परक्या देशात त्यांना फक्त त्यांच्या कुत्र्याची सोबत होती. त्याला घेऊन ते टेरेसवर गेले. तीन तासांनंतर बचावकार्याची एक बोट आली , जिनं त्यांना वाचवलं. मात्र त्या बोटीचा नावाडी चुकीच्या शिक्षणाचा बळी होता , त्यानं कुत्र्याला सोबत घेण्यास नकार दिला. पाणी उतरल्यावर ते घरी पोहोचले तर कुत्रा मेलेला आढळला.  आजही त्या आठवणीनं त्यांचे डोळे भरून येतात.   दोन हजार वर्षांपूवीर् रेबीजवर काही उपचार नव्हते. या आजारामुळे माणसं खूप तडफडून मरत असत. ज्यूंनी तेव्हा इतपत शोध लावला होता की , कुत्रे रेबीजचे वाहक असून कुत्रा चावल्यास या आजाराची लागण होते. त्यामुळे कुत्र्यांना घरापासून दूर ठेवत. शंभर वर्षांपूवीर् उपचारांचा शोध लागला , मात्र हे उपचारही खूप क्लेशकारक होते. १४ मोठमोठाली इंजेक्शन्स पोटात घ्यावी लागत . आज निव्वळ तीन इंजेक्शन्स दिली जातात आणि कुत्र्यांनाही इंजेक्शन देऊन रेबीजपासून इम्युन केलं जातं. म्हणजे ज्या कुत्र्याला इंजेक्शन दिलं गेलंय त्याला रेबीज होत नाही. आता कुत्राही तितकाच स्वच्छ आणि नापाक आहे , जितक्या बकऱ्या , मेंढ्या आणि गायी-म्हशी. पण तरीही कुत्र्यासारख्या अत्यंत ईमानी प्राण्याला हात लावणंही कित्येक मुसलमानांना रुचत नाही. वास्तवत:, कुत्र्याचा उल्लेख कुराणातही आहे,  सुरायेकैफमध्ये. जर खुदाला या प्राण्याबद्दल आक्षेप असेल तर या पवित्र ग्रंथात या प्राण्याचा उल्लेख  कशासाठी असता? पण कुणी वाचेल तर त्यांना हे  समजेल ना!  

या महिन्याच्या दोन तारखेला पाकिस्तानात बॉम्बस्फोट झाला. ४०-५० लोक मारले गेले आणि कित्येक जखमी झाले. स्फोटाचं कारण- कुठल्याशा डॅनिश वृत्तपत्राने प्रेषित महंमदाची काही चुकीची चित्रं वापरली , जी कार्टूनच्या स्वरुपात होती. कार्टून काढणारा आहे आणि ज्या वृत्तपत्राने ती छापली तेही आहे. ज्या संपादकांनी ती छापली तेही आहेत. मात्र ज्या लोकांचा त्या चित्रांशी काहीही संबंध नव्हता ते निरपराध मात्र नाहक मारले गेले आहेत. त्या साऱ्यांना मारणारा होता एक मानवी बॉम्ब. आत्महत्येला कुराणात ' हराम मौत ' असं संबोधण्यात आलं आहे. आत्महत्या करणाऱ्याच्या जनाज्याला खांदा देणंही मना आहे. ही बातमी वाचून एक गोष्ट आठवते. एक पूर्ण आंधळा इसम ट्रेनमधून प्रवास करीत होता. गाडीत खूप गदीर् होती. गदीर्त त्याचं कुणाशी तरी भांडण झालं. त्या इसमाने या आंधळ्याला थप्पड लगावली. आंधळ्याला राग आला आणि त्यानं खिशातून पिस्तुल काढून सहा गोळ्या झाडल्या. यात सहा प्रवासी मारले गेले. मात्र त्यात तो माणूस नव्हता ज्यानं त्या आंधळ्या इसमाला थप्पड लगावली होती. या गोष्टीचं शीर्षक आहे ' ब्लाइंड रेज '. ( जागतिक साहित्यातली ही सर्वात लहान कथा मानली जाते.) मला एक मौलवी ठाऊक आहेत जे काही न वाचता , न समजून घेता , लोकांना निरनिराळे हवाले देऊन चुकीच्या गोष्टी समजावत असतात. त्यांचं असं म्हणणं आहे की , ' फक्त कलमा पढणाऱ्या मुसलमानांनाच स्वर्गात दाखल केलं जाईल. ' मग हे बाकीचे जे कोट्यवधी , अब्जावधी लोक आहेत ते कुठे जातील ? ते म्हणतात , ' मला काय माहीत ? खुदाला माहीत. ' चांगली कर्मं करणारे गैरमुस्लिम स्वर्गात का दाखल होणार नाहीत ? पुन्हा तेच उत्तर , ' आम्हाला काय ठाऊक , खुदाला  ठाऊक. ' मग आपल्याला जेवढं कळतं , तेवढंच बोलणं हितावह नाही का ? मी त्यांना एका मोठ्या संकटात टाकलं. काही दिवसांपूवीर् सीरॉक हॉटेलच्या मागे समुदात खडकांवर बसलेली एक मुसलमान मुलगी आणि मुसलमान मुलगा भरतीच्या लाटांमुळे समुदात ओढले गेले. मोहन रेडकर नावाचा तरुण आईचा रिपोर्ट देण्यासाठी वांद्याला आला होता. तो त्याचवेळी असाच हिंडत समुदकिनारी गेला होता. या दोन मुसलमान मुलांना वाचवताना त्यानं आपले प्राण गमावले. ही दोन्ही मुलं आपलं आयुष्य पार पाडून जेव्हा कधी या जगाचा निरोप घेतील , तेव्हा त्यांना कसं वाटेल ? आम्हाला वाचवणाऱ्याला स्वर्गाच्या दारावर  अडवण्यात आलं ? अशा अन्यायकारक रीतीने प्रवेश मिळणाऱ्या स्वर्गात पाऊल ठेवायला त्यांना आवडेल? काही लोकांना सुनामीची भीती वाटते. जी कधीही येऊ शकते. काही लोकांना ग्लोबल वॉमिर्ंगची काळजी वाटते. मला वाटणारी भीती त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक गंभीर स्वरुपाची आहे. मला कधी कधी निव्वळ विचारानंच पराकोटीची भीती वाटते की, या कोट्यवधी मुसलमान मुलांचं काय होणार, जे या मदरशांमध्ये शिक्षण घेतायत. ज्या भाषेत ते शिकताहेत त्यात त्यांना पुढचं काही शिक्षण मिळू शकेल? पुढची काही पुस्तकं त्यांना  त्या भाषेत मिळू शकतील? या शिक्षणानंतर त्यांना एखादी नोकरी मिळू शकेल? आजचं युग शिक्षणाचं युग आहे. सर्वसामान्य मुसलमानही शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावा यासाठी सर्व समाजघटकांनी प्रयत्न करावेत. तब्बल पंधरा कोटींच्या या समाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना सामावून घेणं आवश्यक आहे. आपल्या नजीकच्या मुसलमानांना अशा मदरशांपासून वाचवा , जिथं चुकीचं शिक्षण दिलं जाण्याची शक्यता आहे. कारण एकवेळ अशिक्षितपणा , अडाणीपणा परवडला पण चुकीचं आणि अर्धवट शिक्षण धोक्याचं ठरू शकेल. सर्वसामान्य मुसलमान मुलांना अशा शाळांमध्ये पाठवा जिथं ते असं शिकतील की , खुदाचं अस्तित्व नाकारणाऱ्याला काफिर म्हटलं जातं , हिंदुंना नव्हे. कारण हिंदु तर पर्वत , नद्या आणि दगडाधोंड्यातही ईश्वराचा शोध घेत आलाय , तो तर अवघ्या सृष्टीची पूजा करतो. या मुलांनी हेही शिकलं पाहिजे की ' सारे जहाँ  से अच्छा हिंदोस्ता हमारा'! 

मी तर या लोकांना मुसलमान मानतच नाही आणि आपल्यालाही अशी विनंती करीन की , ' जेहादी मुसलमान ' असं संबोधून या लोकांना मान देऊ नका. हे तर माणुसकीचा खून करणारे लोक आहेत आणि त्यांना ' खुनी ' असंच संबोधलं गेलं पाहिजे. कोणत्याही धर्माचा पालक होण्यासाठी आधी माणूस असणं आवश्यक असतं. टीव्हीवर ते चिंधड्या उडालेले देह , तुटलेले हात-पाय पाहून आपण यांना ' माणूस ' तरी म्हणू शकू? 
सायकल म्हटलं की सर्वसामान्य गरीब भारतीय माणूस डोळ्यासमोर येतो. सायकलवरून मुलं घरून शाळेत आणि शाळेतून घरी येतात. रोजच्या जगण्याचं सामान सायकलला लटकवलेल्या पिशव्यांतून जातं. कोणे एकेकाळी तरुण सायकलवरून कॉलेजात जात आणि डिग्री कमावत. छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनाही याच  वाहनाने उद्योगधंद्यात हात दिला. दोन चाकांच्या या अतिशय सरळसाध्या यंत्राचा या देशाच्या प्रगतीत खूप मोठा वाटा आहे. आमच्या ऋषिमुनींनी , संतांनी आणि वडीलधाऱ्यांनी गायीला मातेचा दर्जा दिला कारण एका गायीवर एका घराची गुजराण होत असे. तिची बाळं म्हणजेच बैल शेत नांगरण्याच्या कामी येत , बैलगाडी खेचत , मोट ओढत आणि लोकांना एका गावातून दुसऱ्या गावीही घेऊन जात. इतकंच काय तर मृत्यूनंतर आपल्या चामड्याचं दानही देत. असाच काहीसा दर्जा सायकललाही दिला गेला तर चुकीचं ठरणार नाही. पन्नास-साठ वर्षांपूवीर् आमच्या बाप-दादांनी कधी चुकून तरी असा विचार केला असेल का , की हे सैतानी प्रवृत्तीचे लोक या सीध्यासाध्या सायकलचाही 'हत्यारा' सारखा वापर करतील आणि कितीएक निरपराध लोकांचा बळी घेतील? अलीकडे कुठे एखादी बॅग ठेवलेली दिसली, एखादी स्कूटर उभी दिसली वा अशीच विनामालकाची कार कुठे पार्क केलेली दिसली तर शंकेची पाल चुकचुकून मनात भीती दाटून येते. तशीच ही सीधीसाधी सायकलही आता संशयाच्या घेऱ्यात उभी आहे. बिचाऱ्या अब्दुलभाई, कादरभाई आणि मुस्तकिनलाही अशाच संशयानं घेरून टाकलं. इस्लामही जिथे या लोकांच्या कचाट्यातनं वाचलेला नाही , इस्लामची प्रतिमाही यांनी बिघडवून टाकलीय , तिथं सायकल काय चीज आहे! हे तेच लोक आहेत ज्यांच्यामुळे जगभरात सगळीकडेच शांतताप्रेमी  मुसलमानांकडेही संशयाच्या नजरेनं पाहिलं जातंय.  

या मूठभर जल्लादांना न जाणे कोणाचं नुकसान करायचं होतं ; पण वास्तवात यांनी सर्वाधिक नुकसान केलंय ते सर्वसामान्य मुसलमानांचं आणि एका शांतताप्रेमी धर्माचं , ज्याला 'इस्लाम' असं म्हटलं जातं. या धर्माला मानणारे दोन पवित्र गंथांचा आधार घेतात. एक आहे ' कुराण ' आणि दुसरा ' हदीस ' - दोन्हींतही शेकडो जागी' खुदा' चा उल्लेख रहीम किंवा रहमान असा करण्यात आला आहे. या अज्ञानी आणि भरकटलेल्या लोकांनाही जन्मानंतर त्यांच्या आईवडिलांनी अशीच काही नावं ठेवली असतील. कुणाचं नाव रहीम असेल तर कुणाचं रहमान-कुणाचं हसन तर कुणाचं हुसैन. त्यांना काय ठाऊक की त्यांची अवलाद या पवित्र नावांना इतकं बदनाम करून सोडणार आहे. आज जगात सगळीकडेच दहशत आणि भीतीचं वातावरण आहे. देशोदेशीच्या विमानतळांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था आढळते. यातही कित्येक ठिकाणी असं दिसतं की मुसलमानांसाठी वेगळी रांग आहे आणि त्यांची अधिकाधिक कसून तपासणी केली जातेय. मूठभर हैवानांमुळे सरळसाध्या माणसांना त्रास होतोय तो हा असा.. काही वर्षांपूर्वी अॅमस्टरडॅम इथं घडलेली घटना. संशयापोटी अंधेरी का जोगेश्वरीच्या १२ भारतीय पर्यटकांना तिथे रोखून धरण्यात आलं. दहाबारा दिवसांनी भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर ही निरपराध माणसं आपल्या घरी परतली. त्यांच्याकडे आक्षेपार्ह असं काहीही नव्हतं , शस्त्रं नव्हती हे सिद्ध झालं. कोणताही वाईट इरादा घेऊन ते गेले नव्हते. या लोकांच्या कुटुंबियांना नाहक किती मानसिक त्रास झाला असेल याचा अंदाज लावू  शकता. हा प्रकार कुणाच्या मेहरबानीतून झाला , हे सांगण्याची गरज आहे? याच काळात माझा मुलगा सोहेल एका शूटिंगच्या निमित्ताने अमेरिकेहून जर्मनीला पोहोचला. शूटिंगच्याच गरजेपोटी त्यानं तीन-चार दिवसांची दाढी राखली होती. रात्रीच्या शूटिंगमुळे त्याला तीनचार दिवस झोपही नव्हती मिळाली. झालं , साऱ्यांना जाऊ देण्यात आलं आणि नेमकं त्याला अडवण्यात आलं. त्याचं नशीब आणखीनच वाईट होतं. इंग्रजी समजणारा एकही अधिकारी तिथे उपस्थित नव्हता आणि सोहेलला जर्मन भाषा येत नव्हती. दहा तास ते त्याची चौकशी करीत राहिले. सोहेल त्यांना पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारत होता. ' प्रॉब्लेम काय आहे ? मला का अडवण्यात आलंय?' अखेर एक इंग्रजी बोलणारा अधिकारी तिथे पोहोचला आणि सोहेलला सोडून देण्यात आलं. घरी परतल्यावर त्यानं मला हा किस्सा ऐकवला. त्याचा राग ओसरला नव्हता. मी त्याला म्हटलं , तू या सगळ्यासाठी कुणाला जबाबदार धरतोस ? जर्मन अधिकाऱ्यांना की स्वत:च्या दाढीला ? की , तुझ्या नावाच्या पुढे जे ' खान ' आडनाव लागलंय त्याला ? थोडा वेळ विचार करून तो म्हणाला , नाही यातल्या कशालाही नाही. मी त्या मूठभर अज्ञानी मुसलमानांना यासाठी जबाबदार समजतो जे अकारण  निरपराध लोकांचा बळी घेत सुटलेत.   

बॉम्बस्फोट घडवताना हे ' आपल्याला कुणाला मारायचंय ' याचा विचार करतात का ? स्फोट होतो तेव्हा यांच्या नजरेला गदीर्तली म्हातारी कोतारी माणसं आणि लहानगी मुलं दिसतात का? त्यांना मारण्याची अनुमती तर युद्धातही नसते हे इस्लामला थोडंफार जाणणारा एखादा इसमही सांगू शकेल. लहान मुलं , वयोवृद्ध आणि स्त्रियांना त्रास पोहोचवण्यास मनाईच नसून हा खूप मोठा अपराधही मानला जातो. या लोकांनी ' जेहाद ' चा कुठून काय अर्थ काढला आहे , कुणास ठाऊक ? जेहादचा अर्थ आहे- संघर्ष करणं , लढा देणं. जसं मी म्हणतो की फिल्म इंडस्ट्रीत पंधराएक वर्षांच्या ' जद्दोजहद ' नंतर , संघर्षानंतर मला ओळख मिळाली. हे लोक ज्या शब्दाचा अर्थही जाणत नाहीत त्याच्या साह्यानं ' जन्नत ' मध्ये (स्वर्गात) पोहोचू इच्छितात! प्रेषित महंमद यांच्या वक्तव्यांना वा कृतींना ' हदीस ' म्हटलं जातं. अशी एक ' हदीस ' आहे की -  एका निरपराध माणसाचा खून हा अवघ्या माणुसकीचा गळा घोटण्यासारखाच आहे.  

बस दुश्वार है हर काम का आसां होना। आदमी को मयक्सर नहीं इन्सां होना। (गालिब)   

जयपुरच्या घटनेनंतर जेव्हा मी हा लेख लिहिण्याचा इरादा जाहीर केला तेव्हा माझ्या एका मित्राने विरोध दर्शवित म्हटलं , तुम्हाला पुन्हा पोलिस प्रोटेक्शनमध्ये दिवस काढायचेत का ? तुम्हाला तुमचं आयुष्य प्रिय नाही? जयपूरसारख्या कालपरवापर्यंत सुरक्षित भासणाऱ्या ठिकाणी मनात कोणतीही भीती न बाळगता जे त्या दिवशी हिंडत होते त्यांनाही तर जगणं प्रिय होतं असेल. सेकंदभर आधीही त्यांना याचा अंदाज आला असेल का  की मृत्यू किती समीप येऊन उभा ठाकलाय..? वयाच्या ७२व्या वर्षी मी अनेकदा मृत्यूचा विचार करतो. मृत्यूचा विचार येतो तेव्हा त्याच्याशी संबंधित अनेक विकारांचीही आठवण येते. निभीर्डपणाने सत्य बोलण्याने जर मृत्यू ओढवणार असेल तर त्याहून अधिक  चांगला मृत्यू तो कोणता? आणि घाबरायचं कुणाला ? या लोकांना ? हे तर स्वत:च घाबरलेले आहेत. हे गदीर्त बॉम्ब ठेवून आपल्या बिळात घुसून बसतात. यांना माहीत आहे का , इस्लामच्या प्रत्येक लढ्यामागे एक हेतू होता . आणि प्रत्येक लढा आमनेसामने झाला आहे. ही धर्मासाठीची लढाई आहे असं म्हणून यांनी स्वत:ची फसगत करू नये. ही धर्माची लढाई नाही , ही पैशासाठीची लढाई आहे! 

काही दिवसांपूर्वी  माझी भेट महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर.. पाटीलसाहेब यांच्याशी झाली , तिथे इतरही काही मंडळी उपस्थित होती. दहशतवादाचा विषय निघाला आणि जोरदार चर्चा सुरू झाली. यात धर्माचाही उल्लेख झाला. मी म्हणालो , ही धर्माची वा मजहबची लढाई नाही. ही पैशाची लढाई आहे. पाटीलसाहेब म्हणाले , सलीमजी अगदी बरोबर बोलताहेत. जेव्हा कधी आम्ही या लोकांना पकडलंय आणि त्यांचा गुन्हा शाबित झालाय , तेव्हा एक गोष्ट नेहमी आढळून आलीय , ती म्हणजे- यांच्याजवळ , बँकेत वा घरात पाच , सहा , दहा  लाख रूपये सापडतात. कोणताही कामधंदा नसताना यांच्याकडे हे पैसे आलेले असतात. धर्माला मानणारे , धर्मानुसार वाटचाल करणारे हे असं काम का करतील ? अल्लातालानी असंही म्हटलं आहे की ज्याला माझ्या निमिर्तीविषयी (मी जन्माला घातलेल्या गोष्टीविषयी) प्रेम नाही , त्याच्याबद्दल मलाही प्रेम नाही. हे लोक जे मारले जातात त्यांना काय , खुदाखेरीज अन्य कुणी निर्माण केले आहे ? मला आपल्या शेजारी राष्ट्रांनाही एक हदीस ऐकवायची आहे. रसुलअल्लाचं सांगणं आहे - ' वो मुसलमान नहीं है जिसका पडोसी उसके पडोस में रहने में अपने आपको महफूझ नहीं समझता. ' (तो माणूस मुसलमान असू शकत नाही ज्याच्या शेजाऱ्याला त्याच्या शेजारी राहताना सुरक्षित वाटत नाही.) म्हातारी माणसं आपल्या मुला-नातवंडांना  स्वत:च्या जमान्याच्या किस्सेकहाण्या ऐकवित असतात. एखादा दहशतवादी कायद्याच्या कचाट्यातून सुटला आणि म्हातारा झाला तर तो आपल्या मुला नातवंडांना काय सांगणार की- मी काही वर्षांपूवीर् मुंबईत आणि जयपूरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले आणि कित्येक मुलं , बायका आणि म्हाताऱ्याकोताऱ्यांचा बळी घेतला होता. ही अशी खुनी कहाणी तो ऐकवू शकेल ? पण मला खात्री आहे की अब्दुलभाई, कादरभाई आणि मुस्तकिनकडे आपल्या मुलानातवंडांसाठी माणुसकीच्या आणि प्रेमाच्या कितीएक कहाण्या असतील ज्या ते अभिमानाने ऐकवू शकतील. 

अब्दुलभाई , कादरभाई आणि मुस्तकिन - ही कोण मंडळी आहेत ? या कुण्या कहाणीतल्या व्यक्तिरेखा नाहीत. हे आहेत सर्वसामान्य हिंदुस्तानी. अब्दुलभाई तर माझे ड्राइव्हर होते. एकदा १५ ऑगस्टला आम्ही पनवेलला निघालो होतो. पाऊस पडत होता. मध्येच अब्दुलभाईंनी गाडी थांबवली आणि ते गाडी मागे घेऊ लागले. मला कळेना , पण मी गप्प राहिलो. त्यांनी गाडीतून उतरून रस्त्यावर पडलेला तिरंगा उचलला , ज्यावरून काही गाड्या निघून गेल्या होत्या. त्यांनी तो झेंडा साफ केला आणि गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवला. म्हणाले , देशाच्या झेंड्याचा अवमान होत होता. माझ्या तोंडून निघून गेलं , वाह अब्दुलभाई वाह! या अशा देशप्रेमी डाइव्हरला दहशतवादी कारवायांपोटी किती त्रास झाला असेल याचा अंदाज आहे ? अब्दुलभाई आज हयात नाहीत. खुदा  त्यांना स्वर्गवास देवो. कादरभाई मेकॅनिक होता. अशीच रस्त्यावर ओळख झाली. पनवेलहूनच परतत होतो आणि गाडीतून पेट्रोल गळू लागलं. रस्त्यात छोटंसं गॅरेज दिसलं. मेकॅनिक कादरभाईनं ट्यूबच्या मदतीनं गळती थांबवली आणि सांगितलं की एवढ्यानं तुम्ही मुंबईपर्यंत जाऊ शकाल. तिथं एखाद्या गॅरेजमध्ये काम करवून घ्या. मी त्याला देण्यासाठी पाचशेची नोट पुढे केली तर तो म्हणाला , माझी मजुरी शंभर रुपये आहे. मी म्हणालो, मी तुला खुशीनं पाचशे रुपये देतोय. पण तो ऐकेना. जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन त्यानं पाचशेचे सुटे आणले आणि मला देऊन म्हणाला , मला माझ्या मजुरीचे शंभर तेवढे द्या. दहशतवादानं सगळं वातावरण इतकं गढूळ करून टाकलंय की कादरभाईसारख्या इमानदार कारागीरालाही नाहक शिक्षा भोगावी लागू शकेल. खुदा कादरभाईला दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन देवो. मुस्तकिनचं नाव मी काही दिवसांपूवीर्च वृत्तपत्रात वाचलं होतं. तो धारावीत राहणारा एक सर्वसामान्य मुसलमान आहे. त्याच्या मुलाने शेजारच्या एका मुलीवर बलात्कार केला. मुस्तकिन या गुन्ह्याचा साक्षीदार  होता. त्यानं आपल्या शेजारणीसोबत जाऊन मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली आणि अटक करायला लावली. केस सुरू असतानाच शेजारीण मुलीला घेऊन कुठेतरी निघून गेली.  आता मुस्तकिनच्या मुलाला शिक्षा होण्याची शक्यता कमी झाली. मुस्तकिनने कोर्टाकडे मागणी केली की, आणखी कुणा साक्षीदाराची काय गरज ? मी स्वत: माझ्या मुलाला हे दुष्कृत्य करताना पाहिलेलं आहे. त्याच्या या प्रतिपादनामुळे मुलाला दहा वर्षांची  शिक्षा झाली. या देशात दहशतवाद अंतर्गत मदतीखेरीज वाढूच शकत नाही. त्यांना ही मदत अब्दुल, कादर वा मुस्तकिनकडून मिळू शकेल? बिल्कुल नाही. पण आपल्यातील संशयाच्या वातावरणानं अब्दुल, कादर आणि मुस्तकिनला आमच्यापासून बरंच दूर केलं आहे. कोणी मिल्लतनगरला राहतो तर कुणी बेहरामपाड्यात. या धर्मनिरपेक्ष देशात झोपडपट्ट्याही धर्माच्या रोगानं पछाडल्या आहेत. गरीबी हा एक मोठा आजार आहे हा भाग  वेगळाच. दहशतवादाचा हा वणवा भडकण्यापासून रोखायचा असेल तर अब्दुल, कादर आणि मुस्तकिनला आम्हाला आमच्यासोबत, आमच्यात ठेवलं पाहिजे. तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाही आहात, तुम्ही आमचीच माणसं आहात हा दिलासा आम्ही त्यांना दिला पाहिजे. ज्या दिवशी त्यांना हा विश्वास वाटू लागेल, तो या देशातला दहशतवादाचा अखेरचा दिवस असेल. 

चला, आपल्यातलं हे संशय, द्वेषाचं दाट धुकं दूर करू आणि भडकत चाललेला दहशतवादाचा वणवा विझवून टाकू.  हा देश तितकाच तुमचाही आहे, जितका आमचा आहे. या देशाच्या संरक्षणासाठी आमच्याइतकेच तुम्हीही जबाबदार आहात! 

काही वर्षांपूर्वी, माझा मुलगा अरबाजने मला विचारलं होतं की मी हातावर काय गोंदवून घेऊ ? मी म्हटलं , लव्ह इच अदर या पेरिश. एकमेकांवर प्रेम करा अथवा जळून खाक व्हा. जे स्वत:ला मुजाहिद मुसलमान म्हणवतात त्या जालिमांनाही मला काही सांगायचंय. 'जयपूरमध्ये तुम्ही घडवलेल्या बॉम्बस्फोटात एक मुस्लिम मुलगी वाचली आहे. पण तिची आई इतकी नशीबवान नव्हती. ती तुमच्या हातून मारली गेलीय. आता ती मुलगी रोज रडरडून आपल्या वडिलांना विचारते , मम्मी कहा है , मम्मी को बुलाओ. बापाची अद्याप इतकी हिंमत नाही झालेली की तिला सांगावं - तुझी आई मरून गेली आहे आणि आता ती कधीच परतणार नाही. बाप तोंड उघडतो पण आवाजच निघत नाही , नुसती आसवं गळत राहतात. तुम्ही लोक तर खूप बहादूर आहात. मग एवढं छोटंसं काम करा. जा, त्या मुलीला सांगा की तुझी आई आता कधीच परतणार नाही. छाती फुगवून तिला सांगा की तुझ्या आईला आम्हीच मारलंय आणि तुझ्यासारख्याच इतरही अनेक लहानग्यांच्या डोक्यावरनं आम्ही आईवडिलांचं छत्र हिरावून घेतलंय.  

तुम्हाला लोक निरनिराळ्या नावांनी ओळखतात. कुणी तुम्हाला मुजाहिद मुसलमान म्हणतं तर कुणी भरकटलेले मुसलमान. कुठल्याही कारणाने तुम्ही मुसलमान असाल तर मी मात्र नाही.       


स्त्रोत - निनावी. 

1 comment:

  1. विश्वास , फार सुंदर लेख आहे. बरोबर आहे धर्म वाईट नसतोच. लोकच कधीकधी चुकीचा अर्थ लावतात. जेहाद चा अर्थ स्व-संरक्षणा साठी लढा / संघर्ष असा आहे. त्याचा हवा तसा अर्थ लावला गेलाय. thanks for sharing !
    शिल्पा

    ReplyDelete

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...