Sunday, February 28, 2016

एका गाण्यानं खूप काही घडून आलं ! - श्री. कौशल इनामदार

खासगी रेडिओवाहिनीमध्ये आलेल्या अनुभवानंतरची अस्वस्थता बराच काळ टिकून राहिली. एरवी या अस्वस्थतेचं रूपांतर रात्रीच्या जेवणाच्या वेळी होणाऱ्या चर्चेत होतं. मग सरकारच्या नावानं ठणाणा करून, राजकीय पक्षांवर दोषारोप करून आपण आपल्या सदसद्विवेकबुद्धीवरचा ताण हलका करतो आणि दुसऱ्या दिवसापासून आयुष्याच्या रहाटगाडग्यात पुन्हा अडकून जातो.

या वेळी मात्र असं झालं नाही. एका आत्मपीडाकारक प्रश्‍नानं माझी पाठ सोडली नाही. तो असा की मी माझ्या मातृभाषेसाठी काय करत होतो? उत्तर आलं: ‘काही नाही.’ काय करू शकत होतो? मी संगीतकार आहे... मी गाणं करू शकतो आणि मग एक विचार माझ्या मनात रुंजी घालू लागला.

तुम्ही आमच्या भाषेतल्या गाण्यांना ‘डाउनमार्केट’ म्हणता? ठीक. मग तुम्ही ‘अपमार्केट’ कशाला म्हणता? रहमानचा स्टुडिओ, इळैराजाचे वादक हे ‘अपमार्केट’ आहे का? तर आम्ही तिथं जाऊन हे गाणं करू. तुम्ही म्हणता, यशराज स्टुडिओ हा आशिया खंडातला सर्वांत आधुनिक स्टुडिओ आहे? आम्ही तिथं या गाण्याचं ध्वनिमुद्रण करू. तुम्ही म्हणता, विश्‍वदीप चटर्जी (ज्यांनी ‘थ्री इडियट्‌स’, ‘हम दिल दे चुके सनम’ किंवा आत्ताचा ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटांचं ध्वनिनियोजन केलं) हे भारतातले आघाडीचे ध्वनिसंयोजक आहेत? तर आम्ही त्यांना सांगू, या गीताचं ध्वनिनियोजन करायला. या गाण्यात १० नव्हे; २० नव्हे, १०० नव्हे; ३०० गायक गातील! जगातलं सर्वांत भव्य गाणं आम्ही मराठीत करू, मराठीबद्दल करू आणि मग तुम्ही आम्हाला म्हणूनच दाखवा की ‘हे ‘डाउनमार्केट’ आहे म्हणून आम्ही ते लावणार नाही...!’

आणि मग शब्दांचा शोध सुरू झाला. आधी विचार आला, की ‘महाराष्ट्रगीत’ पुन्हा करावं का? श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा’ या गीताच्या वास्तविक दोन प्रचलित चाली होत्या. एक शंकरराव व्यासांची; जी ज्योत्स्ना भोळे आणि जी. एन. जोशी गायले होते आणि दुसरी ‘आनंदघन’ यांची; जी लता मंगेशकर, आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर गायले होते. दोन्ही चालींमध्ये गोडवा होता. माझ्या मनात आलं, की ‘महाराष्ट्रगीत’ आपण रोज गात राहिलो असतो, तरी ‘मराठी अभिमानगीत’ करायची वेळच आली नसती! पण ‘जे वापरात नाही ते गंजतं’ हा वैश्‍विक न्याय आहे आणि दुर्दैवानं या ‘महाराष्ट्रगीता’चंही काहीसं हेच झालं. आज पाण्याला आपण ‘जल’ म्हणत नाही, ‘तुरंग’ म्हणजे घोडे हे आपल्याला माहीत नसतं, ‘गिरा’ शब्द आता वापरात नाही! वापर नसेल तर शब्दकोशातला एकेक शब्द असाच गळून पडेल.

माधव ज्यूलियन यांच्या ‘मराठी असे आमुची मायबोली’ या कवितेचाही विचार केला; पण या दोन्ही गाण्यांमध्ये अभिमानापेक्षाही भिडस्तपणा जास्त होता. शिवाय दोन्ही गाण्यांमध्ये संस्कृतप्रचुर मराठी होती. आज बोलल्या जाणाऱ्या भाषेत अशी एखादी कविता होती जीमध्ये मराठीविषयी निःसंदेह अभिमान असेल. मग खूप वर्षांपूर्वी ऐकलेल्या सुरेश भट यांच्या ‘मायबोली’ या कवितेचं मला स्मरण झालं.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी


वीज लखलखावी तसे हे शब्द माझ्या मनात लकाकले! हेच ते शब्द! पहिल्याच ओळीत भाषेबद्दल केवळ अभिमानच नव्हता, तर एक तृप्तीची भावना होती, कृतज्ञतेची भावना होती. मी चाल लावायला घेतली. भट यांचे शब्दच इतके ओजस्वी होते, की चाल ‘लावायचे’ कष्टच पडले नाहीत. चाल स्फुरत गेली. कवितेचा प्रत्येक शब्दन्‌ शब्दच ती चाल सुचवत होता.

चाल लागली; पण आता प्रश्‍न असा होता, की एवढ्या मोठ्या प्रमाणात गाणं करायचं तर पैसे लागणार होते. मला स्वतःलाच सगळा खर्च करायला आवडला असता; पण हे स्वप्न खिशापेक्षा मोठं होतं. अस्मिता पांडे ही माझी मैत्रीण घरी आली होती. तिच्याशी गप्पा मारत असताना मी तिला म्हटलं: ‘‘मायकल जॅक्‍सनची एखादी सीडी ५०० रुपयांना मिळते. आपण लोकांना आवाहन केलं, की तुम्ही ५०० रुपये द्या, आम्ही जगातलं सर्वांत भव्य गाणं करून तुम्हाला सीडी देऊ, तर लोक पैसे देतील?’’

‘‘लोकांचं माहीत नाही’’ अस्मिता तिच्या पर्समधून ५०० रुपयाची नोट काढत म्हणाली: ‘‘पण हे माझे ५०० रुपये.’’ माझ्या लक्षात आलं, की यात ताकद आहे. दोन हजार लोकांनी ५०० रुपये दिले तर खर्च तर निघेलच; पण दोन हजार लोक - या गाण्याच्या निर्मितीमध्ये माझाही सहभाग आहे - म्हणून ते गाणं वाजवतील, गुणगुणतील, गातील!
मी मित्रांना, आप्तांना कल्पना सांगू लागलो. सुरवातीला लोक साशंक नजरेनं पाहायचे. ‘‘एका गाण्यानं काय होणार?’’पासून ‘‘हे तू स्वतःला प्रसिद्धी हवी आहे म्हणून करतो आहेस!’’ असे अनेक प्रश्‍न, अनेक आरोप झाले! मी शांतपणे सर्वांना उत्तरं द्यायचो.

‘‘एका गाण्यानं काय होणार, हे मला खरंच माहीत नाही; पण हिमालयाची यात्रा करायची असेल, तर पहिलं पाऊल तरी घराबाहेर टाकाल की नाही?’’

किंवा

‘‘मला प्रसिद्धी हवी म्हणून करणार असलो, तरी गाणं सुरेश भट यांचं करणार आहे ना मी? सवंग मार्गानं तर प्रसिद्धी मिळवणार नाही? आणि मला जी मेहनत घ्यावी लागेल ती लागेलच की!’’ अशी उत्तरं द्यायचो. हळूहळू माझ्या म्हणण्यातली कळकळ लोकांपर्यंत पोचत गेली असावी आणि दोन महिन्यांतच पैशाचा ओघ सुरू झाला. मग मी चेन्नईला गेलो. रहमानच्या स्टुडिओत इळैराजाच्या वादकांसोबत गाण्यातल्या स्ट्रिंग्ज ध्वनिमुद्रित केल्या. मुंबईला येऊन माझ्या संपर्कात असलेल्या सर्व गायकांना विनंती केली, की या गाण्यात त्यांचा सहभाग म्हणून त्यांनी एक ओळ गावी. प्रतिसाद माझ्या अपेक्षेपलीकडचा होता. फक्त गायकच नव्हे; तर मला ज्येष्ठ असलेले आणि माझे समकालीन संगीतकारही माझ्या एका हाकेवर या गाण्यात सहभागी झाले. २४ ओळींमध्ये जवळजवळ ११० प्रस्थापित गायक गायले. मग विचार आला, की या गाण्याचा शेवट एका भव्य समूहगानानं का होऊ नये? म्हणून मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात एके दिवशी समूहगानाचं लोकांना वर्तमानपत्राद्वारे निमंत्रण दिलं. माझा अंदाज होता, की २००-२५० लोक येतील. कारण, तो सुट्टीचा दिवस नव्हता. पहिल्या १५ मिनिटांत १०-१२च लोक आले. पुढच्या अर्ध्या तासात मात्र सभागृह खच्चून भरलं आणि मोजले तेव्हा एकूण ३५६ लोक आले होते! गंमत म्हणजे, या ३५६ लोकांमध्ये केवळ मराठीच नव्हे; तर गुजराती, सिंधी, पंजाबी, मारवाडी, तमीळ, मल्याळी, हिंदी, बंगाली असे विविधभाषक लोक आले होते; तेही आपणहून! स्वतः संगीतकार असलेल्या विनय राजवाडे या माझ्या मित्रानं समूहगानाचं अप्रतिम संयोजन केलं. खरं सांगायचं, तर त्या दिवशीपर्यंत आपण नेमकं काय केलंय, याचा अंदाज आला नव्हता; पण ध्वनिमुद्रण झाल्यावर जेव्हा सर्वांना ते गाणं ऐकवलं आणि शेवटी ३५६ लोकांचा आवाज एकमेकांमध्ये मिसळला, तेव्हा त्या गाण्याचा आवाका लक्षात आला. माझ्यासह तिथं उपस्थित सर्वच गायकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यांत पाणी दाटून आलं!

२००८ च्या सप्टेंबर महिन्यात सुरू झालेलं हे गाणं २७ फेब्रुवारी २०१० ला ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये प्रकाशित झालं, तेव्हा ८००० लोक उपस्थित होते. गाणं झाल्यानंतर ते सगळे उठून उभे राहिले आणि टाळ्यांचा गजर थांबेचना, एवढंच मला आठवतंय. सव्वा वर्षाच्या माझ्या प्रवासात महेश वर्दे, उन्मेष जोशी, उत्पल मदाने या माझ्या अनेक मित्रांनी साथ दिली; पण जो मित्र सावलीसारखा सोबत राहिला, तो म्हणजे मंदार गोगटे! हे गाणं माझं स्वप्नंच होतं! पण मी पाहिलेल्या स्वप्नावर विश्‍वास ठेवून श्रद्धेनं काम केलं ते मंदारनं. या सव्वा वर्षात मी आणि मंदारनं दुसरं एकही व्यावसायिक काम केलं नाही!

गाणं तयार झाल्यावर मी मुंबईच्या ‘बिग एफएम’ इथं फोन लावला आणि त्यांच्या अधिकाऱ्याशी बोललो. त्यांनी गाणं ऐकताक्षणी अनेक वर्षं सुरू असलेल्या धोरणाला बगल दिली. २७ फेब्रुवारीला गाणं प्रकाशित झालं आणि २८ फेब्रुवारीला सुरेश भट यांच्या गाण्याचे शब्द मुंबईच्या खासगी एफ.एम. वाहिनीवर दुमदुमले. पुण्याच्या ‘रेडिओ मिर्ची’नंही या गाण्याची दखल घेतली आणि मराठी गाण्यांसाठी पुरस्कार सुरू केले. जगात जिथं जिथं म्हणून मराठी माणूस आहे, तो हे शब्द गायला लागला. अमेरिकेत जन्माला आलेली मराठी मुलं आनंदानं हे गीत गाऊ लागली. शेखर रहाटे नावाच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या फॅशन डिझायनरनं ऑस्कर ॲवॉर्डसपूर्व फॅशन शोमध्ये ‘मराठी अभिमानगीता’वर रॅम्पवॉक सादर केला! मुंबईच्या गोरेगावकर शाळेच्या १५०० मुलांना मराठी अभिमानगीत गाताना पाहून रत्नागिरीतल्या दोन शिक्षकांना वाटलं, की हेच आपल्या शहरातही झालं पाहिजे आणि २६ जानेवारी २०११ रोजी रत्नागिरीच्या शिवाजी स्टेडिअमवर इंग्लिश, मराठी आणि उर्दू माध्यमातल्या ८००० मुलांनी हे गीत एकत्र सादर केलं, तेव्हा तिथं जमलेल्या लोकांचे कंठ दाटून आले होते. पद्मभूषण संगीतकार (कै.) श्रीनिवास खळे व संगीतकार प्यारेलाल यांच्यापासून ते महानायक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत सर्वांनाच या गाण्याची मोहिनी पडली.

‘एका गाण्यानं काय होणार?’ असं म्हणणाऱ्या माझ्या मित्रांना उत्तर मिळालंय का ते माहीत नाही; पण मला मात्र ते मिळालंय. या एका गाण्यानं माझं आयुष्य बदलून टाकलं होतं आणि माझा हा वसा एका गाण्यावरच थांबणार नव्हता, हेही माझ्या ध्यानात आलं होतं. मराठी माणूस एकत्र येत नाही ही दंतकथा आहे, अशी खात्री मला पटली आणि माझ्या मातृभाषेशी माझं नव्यानं नातं जुळलं.

-----------------------------------------------------------
देशाच्या एकोप्याचं गीत आणि त्याची लोकप्रियता....
प्रत्येक देशाचं राष्ट्रगीत असतंच आणि त्याचं स्थान सर्वोच्च असतं, यात दुमत होऊच शकत नाही. मात्र, ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या गीतानं काही वर्षांपूर्वी अनेकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. देशाच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन आणि त्या त्या भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नामवंतांना घेऊन हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर तसंच गाणं चित्रित करायचा प्रयत्न झाला; पण त्याला पहिल्या गाण्यासारखा प्रतिसाद मिळाला नाही. देशातल्या काही वाहिन्यांनीही आपली ओळख निर्माण करण्याच्या हेतूनं विविध क्षेत्रांतल्या नामवंतांना घेऊन अशी खास गाणी तयार केली होती. मात्र, त्या गाण्यांनाही मर्यादितच प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...