Thursday, March 5, 2015

माणसं

अशोक कोठावळे

कमीत कमी बोलायचं आणि कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता काम करत राहायचं, ही मॅजेस्टिक प्रकाशनच्या अशोक कोठावळे यांची खासीयत. त्यामुळेच त्यांच्या मॅजेस्टिक प्रकाशनला बघता बघता साठ वर्षं आणि साहित्याला वाहिलेल्या 'ललित' मासिकाला ५० वर्षं कधी झाली, ते कळलंच नाही. पण २०१२चा सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठी असलेला श्री. पु. भागवत पुरस्कार देऊन महाराष्ट्र सरकारने मॅजेस्टिक प्रकाशन आणि अशोक कोठावळे यांची नेमकी दखल घेतली. अर्थात या पुरस्काराचे खरे मानकरी आपले वडील केशवराव कोठावळे आणि त्यांनी गोळा केलेला लेखकांचा गोतावळा आहे, हे अशोकरावही मानतात. कारण १९५२ ला मॅजेस्टिक प्रकाशन आणि १९६४ ला ललित मासिक सुरू केल्यावर १९८३ साली निधन होपर्यंत प्रकाशनाची-मासिकाची धुरा केशवरावच वाहत होते. पण अशोकरावांचं कसब म्हणजे वडिलांनी उभा केलेला प्रकाशनाचा डोलारा त्यांना केवळ सांभाळलाच नाही, तर वाढवलादेखील! केशवरावांनी दांडेकर, दळवी, कर्णिक असे लेखक जमवले-जपले, तसंच अशोकरावांनी भारत सासणे, रंगनाथ पठारे यांच्यासारखे नव्या पिढीचे लेखक मॅजेस्टिकच्या छायेखाली आणले. अशोकराव वडिलांच्या प्रकाशनाच्या व्यवसायात येणार हे ठरलेलंच होतं. शिवाय वरच्यावर घरी येणारे मोठमोठे साहित्यिक पाहून आणि त्यांच्या गप्पा ऐकून अशोकरावांनीही मनोमन याच व्यवसायात येण्याचं मनात पक्कं केलं होतं. अशोकरावांनी दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर टाकल्यावर दुसऱ्या दिवसापासून केशवरावांनी त्यांना आपल्याबरोबर न्यायला सुरुवात केली. मात्र सगळ्यात आधी अशोकरावांना काम मिळालं, ते 'ललित' मासिकाच्या अंकावर पत्ते टाकण्याचं. हे काम चोखपणे सुरू असतानाच अशोकरावांचे काका तुकारामशेट यांनी केशवरावांच्या संमतीने प्रकाशनाच्या बरोबरीने लॉटरी तिकिटांचा व्यवसाय सुरू केला. साधारणपणे १९६८ सालापासून १९८० पर्यंत अशोकरावांनी लॉटरीच्या धंद्यात लक्ष घातलं. पुढे १९८३ ला अचानक केशवरावांचं निधन झालं आणि मॅजेस्टिक प्रकाशनापासून ते ललित मासिकापर्यंतची संपूर्ण जबाबदारी अशोकरावांवर आली. सुरुवातीला अशोकरावांना ती पेलवेल की नाही, याबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केली. पण त्याचवेळी मॅजेस्टिक आणि केशवरावांचा भावनिक आधार असलेले जयवंत दळवी अशोकरावांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले आणि मॅजेस्टिकचा कारभार अशोकरावांकडे आला. दळवींनी दाखवलेला विश्वास पुढच्या काळात अशोकरावांनी सार्थ ठरवला. मॅजेस्टिक आणि ललित वाढतच राहिला. सोबत मॅजेस्टिक बुक डेपोचाही विस्तार झाला. नुकतीच अशोकरावांनी ललितची पन्नाशी साजरी केली, तेव्हा उपस्थित असलेला प्रकाशन क्षेत्रातला गोतावळा पाहिल्यावर खात्रीच झाली की, अशोकराव केशवरावांच्याच पाऊलखुणांवर उभे आहेत!

- महाराष्ट्र टाईम्स (संपादकीय)
दि. ०६/०७/२०१३, शनिवार 

-- x -- 

रत्नाकर कुलकर्णी

प्रकाशनाच्या व्यवसायात ग्रंथनिर्मितीएवढेच ग्रंथविक्री आणि ग्रंथप्रसाराचे महत्त्व आहे. रत्नाकर कुलकर्णी यांनी कॉन्टिनेन्टल प्रकाशनाची ही दुसरी बाजू समर्थपणे सांभाळली. त्यामुळेच कर्तृत्ववान अनंतराव कुलकर्णी यांचे कनिष्ठ चिरंजीव आणि व्यासंगी अनिरुद्ध कुलकर्णी यांचे कनिष्ठ ‌बंधू एवढीच त्यांची ओळख नाही. 'कॉन्टिनेन्टल' आणि महाराष्ट्र साहित्य परिषद या दोन्ही संस्थांमध्ये त्यांनी उमेदीने काम केले. स्वभावाने परखड, स्पष्टवक्ते; पण प्रेमळ अशी त्यांची निकटवर्तीयांमध्ये ओळख होती. त्यांचे अक्षर वळणदार, सुंदर होते. कॉलेजमध्ये असताना ते क्रिकेट खेळत असत. अनंतराव कुलकर्णींसारख्या पित्याचे मार्गदर्शन आणि सहवास त्यांना लाभला होता. घरात आणि 'कॉन्टिनेन्टल'मध्ये सातत्याने साहित्यिकांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा वावर असे. या साऱ्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्यावर झाला. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. अनंतरावांनी स्थापन केलेल्या 'कॉन्टिनेन्टल'ची धुरा त्यांनी बंधू अनिरुद्ध यांच्यासमवेत सांभाळली होती. स्पर्धेच्या युगात त्यांनी स्वीकारलेले काम प्रकाशनासाठी पोषक ठरले. 'कॉन्टिनेन्टल'च्या ग्रंथविक्री, वसुली आणि ग्रंथप्रसाराचे काम त्यांनी सुमारे ४५ वर्षे केले. ‌पुस्तक विक्रेत्यांशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. दुकानात बसून पुस्तक विक्री करण्यापेक्षा गावोगाव प्रत्यक्ष हिंडण्यावर त्यांचा भर असे. त्यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्र पालथा घातला होता. त्यामुळे अनेक विक्रेत्यांशी त्यांची मैत्री जुळली होती. लेखक आणि अन्य प्रकाशकांशीही त्यांचे उत्तम संबंध होते. पुस्तक प्रदर्शनांच्या निमित्ताने आणि रसिक म्हणून त्यांनी भरपूर प्रवास केला. एकूणच भटकंतीची आवड असल्याने देशात आणि परदेशांत ते नेहमी जात असत. प्रकाशनाबरोबरच साहित्य परिषदेच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. कार्यवाह, कोषाध्यक्ष, साहित्य महामंडळावर परिषदेच्या वतीने प्रतिनिधित्व, घटना समितीचे निमंत्रक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या. परिषदेचे पुरस्कार, घटना दुरुस्ती, ग्रंथालय, साहित्यपत्रिका, अतिथी निवास या संदर्भातील समित्यांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले. प्रकाशन परिषदेशी त्यांचे जवळचे संबंध होते. जागतिक मराठी परिषदेचेही ते सदस्य होते. देशात आणि परदेशांत झालेल्या अधिवेशनांना ते आवर्जून उपस्थित राहात. अलीकडील काळात त्यांना कॅन्सरने गाठले होते. तरीही नव्या पिढीच्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी ते 'कॉन्टिनेन्टल'मध्ये जात असत. ग्रंथनिर्मिती, ग्रंथविक्री, ग्रंथप्रसार, साहित्य व्यवहार या क्षेत्रात ते सातत्याने कार्यरत राहिले. प्रकाशनाच्या क्षेत्रामध्ये प्रदीर्घ काळ सक्रिय असणारे, अनुभवी, अनेक घडामोडींचे ज्येष्ठ साक्षीदार असलेले व्यक्तिमत्त्व आता काळाच्या पडद्याआड गेले आहे

- महाराष्ट्र टाईम्स (संपादकीय)
दि. २१/०९/२०१३, शनिवार

-- x --

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...