Monday, March 9, 2015

स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळा पैलू समोर आणणाऱ्या टेलिव्हिजनवरील जाहिराती

गेल्या अनेक वर्षांपासून स्त्रिया या भारतीय जाहिरात क्षेत्राच्या केंद्रबिंदू राहिल्या आहेत. भारतीय टेलिव्हिजनवरील आजवरच्या व्यवसायिक जाहिरातींवर नजर टाकल्यास स्त्रियांचा वावर हा प्रामुख्याने सेक्स सिम्बॉल किंवा गृहिणीच्या भूमिकेपुरता मर्यादित असल्याचे दिसून येते. मात्र, टेलिव्हिजनवरील काही जाहिराती या सगळ्याला अपवाद ठरल्या आहेत. स्त्रियांचे पारंपरिक पद्धतीने चित्रण न करता आत्मविश्वास असलेले स्त्रियांचे रूप या जाहिरांतीच्या माध्यमातून जगासमोर आले. अशाच काही जाहिरातींवर टाकलेली नजर.

 डव्ह- डव्ह या साबण कंपनीने मध्यंतरी जगभरात महिला आणि त्यांच्या सवयींचा आढावा घेणारी एक मोहिम चालविली होती. डव्हच्या मते जगातील बहुतांश महिला या स्वत:च्या सौंर्दयाबाबत कायम असमाधानी असतात. त्यामुळे डव्हने अशा स्त्रियांना एकत्र बोलावून एका चित्रकाराला कॅनव्हासवर त्यांची चित्रे काढायला सांगितली. ही सर्व चित्रे दाखवताना त्या चित्रकाराने प्रत्येक स्त्रीला तुम्ही सांगता त्यापेक्षा तुम्ही सुंदर आहात, असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न विचारला. त्यानंतर या स्त्रिया कशाप्रकारे व्यक्त झाल्या हे, पाहण्यासाठी या जाहिरातीचा व्हिडिओ नक्कीच बघितला पाहिजे.

व्हिस्पर- भारतामध्ये बराच काळ स्त्रियांना अनेकप्रकारे दडपून ठेवण्यात आले होते. यामध्ये परंपरा आणि संस्कृतीचा मोठा वाटा होता. भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात स्त्रियांच्या मासिक पाळीविषयीच्या प्रचलित असलेल्या समस्येला व्हिस्परने आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून वाचा फोडली होती.

टायटन वॉचेस- गेल्या काही वर्षांत भारतातील सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत असून सध्याच्या स्त्रिया या प्रगती करताना आणि स्वत:विषयी ठाम भूमिका घेताना दिसत आहेत. कॉर्पोरेट, समाजसेवा, राजकारण आणि अगदी घरात घरातदेखील या स्त्रिया आत्मसन्मानाने वावरत आहेत. या स्त्रिया खंबीर आहेत, स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची धमक त्यांच्यात आहे आणि ते निर्णय चुकलेच तर त्या पश्चाताप करत बसताना दिसत नाहीत. केवळ रडण्यासाठीच पुरूषाच्या खांद्याचा आधार या स्त्रियांना नको असून आपल्या मनातल्या चांगल्या-वाईट गोष्टी हक्काने सांगता येतील, असा जोडीदार त्यांना हवा आहे.
पीसी ज्वेलर्स- भारतीय कुटुंबव्यवस्थेतील पुरूषकेंद्रित संस्कृती नाकारणारी कमावती स्त्री आणि या सगळ्याला तितकाच पाठिंबा देणार तिचा नवरा या सगळ्याचे प्रभावी चित्रण पीसी ज्वेलर्सच्या जाहिरातीत करण्यात आले आहे.
टीव्हीएस स्कुटी- स्त्रियांचा वावर हा केवळ चार भिंतींपुरताच मर्यादित नसावा किंवा त्यांनी काय घालावे, खावे याच्या मर्यादा दुसऱ्यांनी आखू नयेत. कारण, स्त्रियांना स्वत:ला काय वाटते, हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. अशाचप्रकारचा संदेश टीव्हीएस स्कुटीच्या या जाहिरातीतून देण्यात आला आहे. या जाहिरातीमध्ये दाखविण्यात आलेली तरूणी पोंगलच्या दिवशी तिच्या आईला ज्याप्रकारे आश्चर्याचा धक्का देते, त्यावरून दर्शकांना सण आणि परंपराकडे अधिक सुक्ष्मपणे पाहण्याची दृष्टी मिळते.

- लोकसत्ता, लाईफस्टाईल 
दि. ०९/०३/२०१५, सोमवार  

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...