Sunday, July 27, 2014

शताब्दी पहिल्या महायुद्धाची - लता राजे.

          जगाचा नकाशा बदलून टाकणाऱ्या पहिल्या महायुद्धाची सुरवात झाली ती ऑस्ट्रियाच्या राजपुत्राच्या हत्येनं. 1914 मध्ये 28 जुलैला सुरू झालेलं हे युद्ध 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत चाललं. एका व्यक्तीच्या रक्तपातानं जगभरात रक्ताचा सडा पडला! या महायुद्धाच्या शताब्दीची सांगता येत्या 28 ला होत आहे. जगाला वेठीला धरणाऱ्या या युद्धामुळं नेमकं काय घडलं, त्याचा वेध... 


             युरोपातला वसंत ऋतू मोठा देखणाच असतो. मे आणि जूनमधला सुट्टीचा काळ आजही प्रसन्न आणि सुखद वातावरणानं भारलेला असतो, तर शतकापूर्वी तो किती देखणा असावा याची कल्पना यावी. युरोपियन वसंताचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वत्र लागवडीचे नव्हे, तर शुद्ध जंगली गुलाबांचे भरभरून फुललेले ताटवे! वाईल्ड रोझेस- अशाच गुलाबांचा एक गुच्छ बोस्नियाच्या दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रियन शाही दांपत्याला सरायेवोचा जनतेतर्फे भेट देण्यात आला होता. शतकापूर्वीची घटना- ऑस्ट्रियाचे आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनंड आणि त्यांची पत्नी काऊंटेस सोफी शोटेक हे शाही पाहुणे औपचारिक सत्कार सोहळ्यासाठी सरायेवोच्या टाऊन हॉलकडे निघाले होते. ऐन वसंताची माध्यान्ह वेळ! बाराच्या ठोक्‍यास हे दांपत्य त्यांच्या खास गाडीत बसते, तोच ध्यानीमनी नसताना गोळी सुटली आणि तिनं फ्रान्झ फर्डिनंड व सोफी दोघांचाही अचूक वेध घेतला. लाल गुलाबांच्या रंगात रक्ताचाही लाल रंग! गोळी झाडणारा तरुण सर्बियनच होता. नाव होतं गावरिलो प्रिन्सीप. त्यानं केलेला गोळीबार आणि रक्तपात केवळ सरायेवोपुरता मर्यादित राहिला नाही. त्यातून उद्‌भवला एक जगड्‌व्याळ महासंग्राम तथा "ग्रेट वॉर.‘ शांतिकरार होईपर्यंत "ग्रेट वॉर‘ हेच नामामिधान राखलेल्या या महासंगराला दिलेली "पहिले महायुद्ध‘ ही संज्ञा केवढा अनर्थ सूचित करते- हे पहिलं, मग दुसरं कदाचित तिसरंही यापुढं आणि नंतर अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या शब्दांत सांगायचं तर चवथं महायुद्ध झालंच तर निश्‍चितच ते भाले, बरच्या आणि गोफण गुंडे घेऊन लढवलं जाईल.
         अटकसत्र आणि तपासानंतर उघड झालं, की हत्येचा हा पूर्वनियोजित कट होता. आणि त्या दिवशी म्हणजे 28 जुलै 1914 रोजी सरायेवोच्या टाऊन हॉलपर्यंतच्या मार्गावर गावरिलो प्रिन्सीपसह त्याचे आणखी पाच साथीदार रस्त्यावरच्या दिव्यांच्या खांबापाशी प्रत्येकी एक याप्रमाणं दबा धरून बसले होते. बोस्निया, सर्बिया, युगोस्लाव्हिया या सुमारास खंडित झालेली राष्ट्रे होती! आणि परकीय साम्राज्यांच्या अधिपत्याखाली मोठा भाग गेला होता. अशा विखुरलेल्या स्लाववंशी प्रजेला एकत्र आणून म्हणजे आग्नेय युरोपमध्ये एकजूट घडवून स्वतंत्र सरकार स्थापणं, परकीय सत्ता झुगारणं या हेतूनं "ब्लॅक हॅंड‘ ही गुप्त संघटना सर्बियात क्रियाशील झाली होती आणि गावरिलो प्रिन्सीप त्यांत सक्रिय होता. बोस्निया, सर्बिया, बल्गेरिया, अल्बेनिया या बाल्कन राष्ट्रांमध्ये वर्चस्व ठेवण्यासाठी ऑस्ट्रिया आणि सर्बिया यांच्यांत स्पर्धा होती, वैरभावही वाढतच होता.
       आजच्या परिभाषेत "ब्लॅक हॅंड‘ ही संघटना दहशतवादी म्हणूनच गणली जाईल. या संघटनेला ऑस्ट्रियाशी पर्यायाने ऑस्ट्रियन शाही कुटुंबाशी संघर्ष करायचा होताच, शिवाय 28 जुलै हा दिवस या दांपत्यानं सरायेवो भेटीसाठी निवडून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. 28 जुलै हा दिवस सर्बियन इतिहासात काळा दिन मानला जातो, आजही! 1389 मध्ये 28 जुलै याच दिवशी सर्बियाचा झार (रशियाचा नव्हे) दुसान याला तुर्कांनी कोसोवोच्या लढाईत पराभूत करून बाल्कन क्षेत्रावर तुर्की अंमल प्रस्थापला होता. त्यामुळे "ग्रेटर सर्बिया‘चं ध्येय अपुरंच राहिलं होतं. उणीपुरी पाच शतकं हा स्लाव वंश तुर्की अमलास विरोध करीत राहिला. बाल्कन क्षेत्रावरील ऑटोमन तुर्की साम्राज्याची पकड ढिली होत असल्याचं पाहून स्लाववंशी आशा बाळगून होते. तथापि, 1878 मध्ये ऑस्ट्रियानं बोस्नियावर आक्रमण करून 1908 मध्ये ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यात बोस्निया विलीन करून घेतला आणि झार दुसानच्या ग्रेटर सर्बियन साम्राज्याच्या स्थापनेचं जनतेचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणं दुरापास्त बनलं. त्यामुळे 28 जुलै हा दिवस स्लाव जनतेला अत्यंत दुःखद वाटे.
          आर्चड्यूक फ्रान्झ फर्डिनंड यांना खरे तर बोस्नियाच्या दौऱ्याच्या दरम्यान धोका असल्याची कल्पना गुप्तचरांनी दिली होती. तथापि, हे आर्चड्यूक ऑस्ट्रियाच्या सिंहासनाचे वारस होते. आणि राजपुरुषानं असं घाबरून चालत नाही, या मताशी ते घट्ट चिकटून राहिले. शिवाय आता ते बोस्नियन फौजेचे कमांडर-इन-चीफ असल्यानं हा दौरा त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा होता. हीच तारीख त्यासाठी निवडण्यात एक भावनिक भाग होता. फ्रान्झ फर्डिनंड यांची पत्नी सोफी शोटेक ही झेकोस्लोव्हाकीयन राजघराण्यातील राजकुमारी होती. आणि ऑस्ट्रियन दरबार तिला कधीही आपल्यात समाविष्ट करीत नव्हता. झेक राजकुल त्यांच्या मते निम्नस्तरीय होते. हा प्रेमविवाह होता आणि नेमका 28 जुलै 1900 रोजी म्हणजे बरोबर चौदा वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना चार अपत्येही झाली होती. आपला हा दुसरा मधुचंद्रच अशा भावनेतून ऑस्ट्रियन राजकुलात दबलेल्या सोफीला बरोबर घेऊन आर्चड्यूक सरायेवोला आले होते आणि "ब्लॅक हॅंड‘नं डाव साधला. ही दुर्घटना मर्यादित स्वरूपात बोस्निया- हर्जेगोविना यांच्यावर दबाव, बंधनं तथा गुन्हेगारांना शिक्षा करून संपविणं शक्‍य होतं. बोस्नियात ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्याचा गव्हर्नर म्हणून ऑस्कर पोटिओरेक यानेही गुप्तवार्तांचे इशारे धुडकावून आपला बेजबाबदारपणा दाखविल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करता आली असती. पण तसं घडायचं नव्हतं. हा रक्तपात सरायेवोपुरता सीमित न राहाता जगभरात रक्ताचं शिंपण घडवणारा ठरला. प्रिन्सीपच्या गोळीबाराचे प्रतिसाद जगभर उमटावेत असाच दुर्दैवी योग आला. हे हत्याकांड झालं; मात्र महिनाभरात जुलै 1914 मध्ये ऑस्ट्रियाची एक अक्षौहिणी (डिव्हिजन) बोस्निया, सर्बिया, हर्जेगोविना, मॉन्टेनेग्रो यांच्या सीमेपाशी खडी झाली आणि बघता बघता तिची व्याप्ती कमानीच्या गतीने वाढत गेली. पहिल्या महायुद्धानं जगाच्या व्यवहारांनाच नव्हे तर मानवी जीवनाला आणि मुख्यतः युद्धतंत्राला गती दिली; तर दुसऱ्या महायुद्धानं प्रचंड प्रवेग दिला आणि पानापानोळ्यासारखी माणसं चिरडली गेली, सिंहासनं डळमळली, मुकुट मोडले आणि मानवी जीवनातील उलथापालथीत कित्येकांचं नेमकं काय झालं, याचा आजही तपशील उपलब्ध होऊ शकत नाही. 
          युरोपियन संस्कृती ही जगभरात नेत्रदीपक आहे, आदर्श आहे असा युरोपचा तेव्हा दावा होता. शतकापूर्वी हे वैभव डोळे दिपवत होतंही. संस्कृती प्रगतीचा कळस म्हणजे युरोप असं मानलं जाई. मोठमोठी राजघराणी, त्यांच्या उदार आश्रयानं बहरास येणाऱ्या विविध कला, वास्तुशिल्पांचे उत्कृष्ट नमुने, संशोधनास दिलेला वाव पाहाता ते सर्व चकीत करणारंच होतं. शिवाय जवळपास बहुसंख्य युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती आणि साम्राज्यं इतर खंडांतून वाढत गेली होती. त्यामुळे जीत आणि जेता या भूमिकेतून अशा वसाहतवादी युरोपीय देशांमध्ये एक आढ्यता पोसली गेली होती. पण म्हणून सर्व युरोपभर सारं काही शांत आणि सुंदर, शिव, सरळ होतं, असं मुळीच नाही. स्पर्धा तर होतीच, शत्रुत्वही वाढत होतं. रशियाच्या अवाढव्य विस्ताराकडं पाहून कोणीही बिचकावं, तर जर्मनीच्या युद्धसज्जतेकडं बघून बोबडी वळावी अशी वस्तुस्थिती होती. युरोपच्या प्राचीन इतिहासाकडं नजर टाकली तर अधिक खोलात न जाताही लक्षात येतं, की जर्मनी हे राष्ट्र कायम युद्धधोरण, सामग्री, सज्जता याबाबत दबदबा राखून होतं. इंग्लंड आणि रशिया यांची तर एक प्रथाच होती. राजकन्या विवाहास योग्य वयाच्या झाल्या, की त्यांना पहिली स्थळं जर्मन राजपुत्रांची पाहिली जात. अगदी सम्राज्ञी व्हिक्‍टोरियाचे पतीही (प्रिन्स अल्बर्ट) जर्मन होते. आणि व्हिक्‍टोरियाच्या कन्येसाठी जर्मनीचाच वर निवडला होता. याच कन्येचा पुत्र म्हणजे पहिल्या महायुद्धातले एक नायक जर्मनीचे कैसर विल्यम दुसरे! त्यांच्या विरोधात व्हिक्‍टोरियाचाच नातू म्हणजे इंग्लंडचे राजे पाचवे जॉर्ज! ते एका परीनं आत्येभाऊ व मामेभाऊ यांचंही युद्ध होतं. वरपांगी सुंदर दिसणाऱ्या या युरोपची वस्तुस्थितीही फारशी निरोगी नव्हती. जर्मनीबद्दलचं भय व आशंका वाढत चालली होती आणि त्यास कारण ठरला एकोणिसाव्या शतकातील जर्मनीचा लोकोत्तर नेता बिस्मार्क! जर्मनी खंडित देश होता. डचीज (म्हणजे ड्यूकच्या अमलाखाली), प्रिन्सिपॅलिटीज (प्रिन्सच्या अधिपत्याखाली) अशी सहाशे छोटी-मोठी संस्थानं तिथं होती. पण बिस्मार्क वेगळा निघाला. खरा मुत्सद्दी. मॅकियावेलीनंतर खंडित संस्थानातून राष्ट्र उभारणी करण्याचे स्वप्न पाहाणारा हा राजनीतिज्ञ होता. हे तुकडे एकत्र करून जर्मन साम्राज्य उभं करणारा आणि ते बलाढ्य व्हावं म्हणून अखंड झटणारा बिस्मार्क हे एक वेगळेच संशोधनाचं प्रकरण आहे. त्याचं जीवन संपलंही होतं; पण त्याचं अखंड, शक्तिशाली जर्मन साम्राज्य रशियाखेरीज अन्य राज्यांना, देशांना घाबरवीत होतं. तत्पूर्वी नेपोनियन बोनापार्ट या झंझावातानं युरोपचा एवढा थरकाप उडविला होता, की वसाहतवादी साम्राज्यांना आपापल्या वसाहतीतूनही लढावं लागलं होतं. पण नेपोलियनचं पर्व संपून सुमारे शतकभराची शांत वाटचाल युरोप करीत होता. समाज शांत वाटला तरीही जर्मनी, रशिया आणि इटलीमध्ये टोकाची, अतिरेकी मतांची राजकीय विचारधारा पसरू पाहत होती. आहे रे आणि नाही रे यांतील दरी वाढून, उच्चस्तरीय नागरिक आमच्या घामावर, श्रमांवर वैभव भोगत आहेत, ही जाणीव श्रमिकांमध्ये, दुर्बलांमध्ये मूळ धरू लागली होती. नेपोलियननंतर युरोपनं पाहिलेली महत्त्वाची युद्धं म्हणजे फ्रॅन्को-प्रशियन (1870-71), अँग्लो-बोअर (1899-1902) व रुसो-जापनीज (1904-5) ही तीन म्हणावी लागतील. बाल्कन युद्ध 1912-13 मध्ये होऊन बल्गेरिया, ग्रीस, सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो यांची युती झाली होती. त्यात तुर्कस्तान दबून गेलं होतं, ऑटोमन सुलतानांच्या साम्राज्यास दणका मिळाला होता, तर बल्गेरियानं ग्रीस, तुर्कस्तान, सर्बिया, रुमेनिया, मॉन्टेनेग्रो या युतीकडून हादरा घेतला होता.
          पण जुलैमधील हत्याकांडानंतर ऑस्ट्रियाने बोस्निया, सर्बियाच्या सरहद्दीकडे कूच करताच जगाला राजकीय हादरे बसू लागले. ते युरोपपुरते राहिले नाहीत. आफ्रिका आणि द लेव्हान्त (त्यांत सीरिया आहे) मध्यपूर्व, इतर वसाहती खेचल्या जाऊ लागल्या. घनघोर लढाया येथे सुरू झाल्या, तर चीनच्या किनारपट्टीपासून अतिपूर्वेच्या बेटांपर्यंत, पॅसिफिक द्वीपांपर्यंत सागरी लढाया सुरू झाल्या. उत्तरेस नॉर्थ अटलांटिकपर्यंत हे वादळ पोचलेच, तर दक्षिणेच्या महासागरांनाही शांत राहाता आलं नाही. पाहाता पाहाता हे जागतिक युद्ध बनलं एवढी त्याची परिमिती भराभरा वाढत गेली. त्यात इंग्लंड अलिप्त राहू शकलं असतं, असं काही विश्‍लेषकांचं मत होतं, पण ज्या ज्या देशांनी वसाहतींचं साम्राज्य उभं केलं होतं, त्या त्या देशांना अलिप्त राहाणं अशक्‍यप्राय होतं. कारण आधीच असंतोष स्पष्ट करणाऱ्या वसाहतींना काबूत ठेवण्याची गरज साम्राज्यवादी देशांना होतीच; शिवाय अंगठ्याएवढं इंग्लंड किंवा पसाभर फ्रान्स कोठून सैनिक जमविणार होतं? मनुष्यबळ ही समस्या तर सर्व साम्राज्यवादी, वसाहतखोर युरोपीय राष्ट्रांना होतीच आणि त्यावर सहज व राजमान्य होणारा मार्ग म्हणजे जिथं जिथं साम्राज्यं पसरली होती, त्या त्या देशांमधील मनुष्यबळाचा वापर करून घेणं ही रहाटी पूर्वापार आहे. प्रबळ सम्राटाच्या सर्व मांडलिक राजांना युद्धातून सहभाग पूर्वीही घ्यावाच लागे. इंग्लंडच्या वसाहतीतील मुकुटमणी (ज्युवेल इन द क्राऊन) म्हणजे तेव्हाचा हिंदुस्थान हे उघड होतं. भारतातील अफाट लोकसंख्येचा वापर इंग्लंडनं यापूर्वीही अफगाणी युद्धात, तसेच 1857 च्या विद्रोहातही केला होताच. त्यामुळे या युद्धात भारतीय सैनिक लढाईसाठी पाठविले गेले, ही नवलाची बाब नव्हती.
         सरायेवोच्या हत्याकांडानंतर ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्यासह जर्मनीनं युती केली. दुसऱ्या महायुद्धात "ऍक्‍सिस‘ अँड "ऍलाइज‘ असे पक्ष बनले होते, तर या पहिल्या महायुद्धात "सेंट्रल पॉवर‘ आणि "आन्तान्त‘ असे दोन पक्ष पडले. 1914 च्या नोव्हेंबरमध्ये "सेंट्रल पॉवर‘मध्ये तुर्कस्तान, तर 1915 च्या ऑक्‍टोबरमध्ये बल्गेरिया सहभागी झाले. रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या "आन्तान्त‘मध्ये 1914 च्या ऑगस्ट महिन्यात जपानचा समावेश झाला. इटली 1915 च्या मे महिन्यात, तर पोर्तुगाल मार्च 1916, रुमानिया ऑगस्ट 1916 आणि ग्रीस नोव्हेंबर 1916 मध्ये सहभागी झाले. 1917 च्या एप्रिलमध्ये अमेरिका "आन्तान्त‘मध्ये येताच बरोबर दक्षिण अमेरिकी देश व चीनही आले. "सेंट्रल पॉवर‘नं सर्बिया व बेल्जियम यांच्यावर 1914 मध्येच आक्रमण करून त्यांना गिळून टाकलं. फ्रान्सनं आफ्रिकेतील स्वतःच्या वसाहतीतील सैनिक आणले, ब्रिटिश इंडियन आर्मी, तर पश्‍चिम आघाडीवर जबरदस्त लढली. एवढेच नव्हे तर भारतीय सैनिक मेसोपोटेमिया रणक्षेत्रात झुंजार ठरलेच; शिवाय मेसोपोटेमियन रेल्वे (आताचा इराक)चे आश्‍चर्यकारक जाळे त्यांनी उभे केले. रशियन आणि पोर्तुगीज सैनिक पश्‍चिम युरोपवर, तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचे सैनिक गॅलीपोलीत प्रचंड संख्येनं धारातीर्थी पडले. खरे म्हणजे गॅलीपोलीची चढाई ही योजना चर्चिल व इतर काही धुरिणांची होती आणि युद्धतंत्राचे निकष लावता ती तद्दन निकृष्ट होती. कदाचित अन्य मार्ग अशक्‍य ठरला असेल
          भारतीय सैनिकांनी या युद्धात प्रचंड चिकाटीनं लढा दिला. नेमके किती भारतीय लढले, याबाबत दुमत आहे. 1.4 मिलियन की 1.7 मिलियन हे निश्‍चित करता येत नाही. मात्र, 9 लाख 50 हजार सैनिक आणि 4 लाख 50 हजार आघाडीमागे श्रमणारे व 6 लाख अन्य कामगार (त्यांत रेल्वे मजूरही) होते. त्यात वायव्य सरहद्द प्रांत (अखंड भारत), पंजाब (त्यात हरियानाही समाविष्ट), गढवाल, कुमाऊ, राजपुताना व बेंगॉल रेजिमेंट्‌स यांचा प्रामुख्यानं भाग होता. ईशान्य भारतातील सैनिक बेंगॉल रेजिमेंटमध्ये समाविष्ट होते. या सैनिकांची पाठवणी बहुतांशी जहाजांतून झाली. आणि एका जहाजाचं नाव तर "लॉयल्टी‘ होतं. पूर्व युरोपियन व पश्‍चिम युरोपियन रणक्षेत्रे (थिएटर्स), इजिप्त, पॅलेस्टाइन आणि आफ्रिका या आघाड्यांवर भारतीय वीर तुफान लढले. त्यांतील 50 हजार भारतीय सैनिक धारातीर्थी पडले, असा अधिकृत आकडा आहे. 65 हजार जखमी झाले, तर 10 हजार आजपर्यंत बेपत्ता म्हणूनच नोंदले गेले. इंडिया गेट (दिल्ली) हे एकमेव स्मारक या सैनिकांसाठी आपण उभारले आहे. तेथे "अज्ञात सैनिक‘ म्हणून एक समाधी आहे. आणि 1971 पासून तेथे अक्षय ज्योती बसविली आहे. आता शतकानिमित्तही या लक्षावधी सैनिकांसाठी काही करावं, अशी कोणा भारतीयाला आस नाही. असे सैनिक पाठविण्यास महात्मा गांधींनी पाठिंबा दिला होता. लोकमान्य टिळक मंडालेच्या कारावासातून नुकतेच सुटले होते. इतर नेते स्पष्ट काही बोलत नव्हते. अशा पाठिंब्यातून स्वातंत्र्य मिळविणे सोपे जाईल, ब्रिटिशांचे मतपरिवर्तन होईल, हा गांधींचा आडाखा होता. मुस्लिम लीगनं पूर्ण पाठिंबा दिला होता आणि भारतातील मोठ्या संस्थानांनी सैनिक पाठविण्यास उत्तम सहकार्य केलं होतं. एवढंच नव्हे, तर बिकानेर नरेश महाराजा गंगासिंह हे स्वतः आघाडीवर लढायला गेले. आणि अखेर शांतता करारावर (आर्मिस्टिस) सप्टेंबर 1918 मध्ये व्हर्सायच्या प्रासादात जेव्हा सह्या झाल्या, तेव्हा त्या दस्तावेजावर गंगासिंह यांनीही सही केली आहे. या आवर्तनाचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर थोडा परिणाम झाला. "जबाबदार सरकार‘, "हिंद स्वराज्य‘ या कल्पनेची बीजे ब्रिटिशांना स्वीकारावी लागली. मात्र, लगेच स्वराज्य काही मिळाले नाही. उलट युद्ध समाप्तीनंतर, "रौलेट कायदा‘ आणि त्यातून "जालियनवाला बाग‘ प्रकरणं निघाली. कळसाध्यायातून "काळा अध्याय‘ निघाला.
          जगभर या भीषण युद्धाचे सामाजिक परिणाम झाले. युद्ध सुरू होताना इंग्लंडमध्ये पॅंकहर्स्ट मायलेकी स्त्रियांच्या मताधिकारासाठी लढत होत्या. (सफ्रजीट) युद्धाच्या वेळी ब्रिटिश सरकारला महिलांच्या सहभागाचीही (परिचर्या, अन्य नागरी सेवा) गरज पडली, तेव्हा युद्ध समाप्तीनंतर हा मताधिकार देणं अत्यावश्‍यक ठरलंच. युरोपियन पुरुष समुद्री भोवऱ्यांत खेचले जावेत, तसे युद्धात खेचले होते. या युद्धाच्या तपशिलात सर्वांत छोटा सैनिक नमूद झाला आहे; त्याचं नाव "जॉन कॉंडन‘ - रॉयल आयरिश रेजिमेंट डाइड इन ऍक्‍शन, वय 14 वर्षं. ब्रिटिशांपुरतं पाहायचं तर सर्वांत वयस्क सैनिक लेफ्टनंट हेन्री वेबर. आघाडीवर कामी आला, तेव्हा त्याचं वय 68 वर्षं होतं; तर जर्मन व रशियन अहवालात दिसलं, की 80-80 वर्षांचे निवृत्त सैनिकही आघाडीवर कामी आले. सोम, वर्दुन, फ्लॅंडर्स, मेसोपोटेमिया, इजिप्त या काही महत्त्वाच्या आघाड्यांनी अभूतपूर्व रक्तपात पाहिला. नेपोलियनच्या मोहिमांनीही एवढे बळी घेतले नव्हते. वायप्रेस आघाडीवर निसर्गानं प्रचंड कोंडी केली. या महायुद्धाचं व्यूह, धोरण आपल्या हयातीतच जर्मन मुत्सद्दी श्‍लायफन यानं आखून ठेवलं होतं. श्‍लायफन प्लॅन ही संज्ञा त्यामुळं रूढ झाली; तर दुसऱ्या महायुद्धात रोमेल प्लॅन ही संज्ञा उदयास आली. 11 मिलियन (1 कोटी 10 लाख) मानवांच्या प्राणांचं मोल घेऊन हे युद्ध 1918 मध्ये थांबलं. रशिया सर्वांत आधी बाहेर पडला, कारण रशियात क्रांती सुरू झाली होती. आणि नियमाप्रमाणं क्रांती स्वतःचीच पिलं खाऊ लागली होती. खुद्द जर्मनीत अन्नटंचाई आणि बंडाळी आटोक्‍याबाहेर गेली. रशिया काढता पाय घेत असताना जर्मनीनं रशियावर केविलवाणी शांती लादली आणि बाल्टिक, पोलंड, युक्रेन व कॉकेशस ताब्यात घेऊन रशियाला मोकळं केलं; तर जर्मनीवर त्याहूनही "आन्तान्त‘ राष्ट्रांकडून दयनीय शरणागती लादली गेली. आगगाडीच्या डब्यांत जर्मनीला ही शरणागती स्वीकारावी लागली. या मानहानीपासून जर्मनांनी कैसरना दूर ठेवलं. कैसर विल्यम दुसरे हे नेदरलॅंड्‌समध्ये (तटस्थ राष्ट्र) विजनवासात निघून गेले. त्यांचे उत्तराधिकारी प्रिन्स हिंडेन बर्ग यांनी सर्व सांभाळून घेतलं. केवळ राजनीतिज्ञच नव्हे तर एक उत्कृष्ट सेनानी (स्वतः लढणारा), जनतेला शांत करू शकणारा नेता म्हणून हिंडेन बर्गचं नाव नमूद झालं आहे. जिंकलेला सर्व प्रदेश जर्मनीला सोडावा लागला. अत्यंत लाजिरवाण्या अवस्थेत लादलेली ही शरणागती होती. फ्रान्सनं जर्मनीचा पश्‍चिमी लचका असा तोडून घेतला, की तेथील गुरंढोरंही हिरावून नेली. हा संगर इथं थांबला नाही. याच महायुद्धात जर्मनीचा एक सैनिक होता. कॉर्पोरलच्या हुद्द्यावर लढून, पराक्रम गाजवून त्यानं जर्मनीचा "आयर्न क्रॉस‘ हा शौर्य बहुमान पटकावला होता. शरणागतीच्या रेल्वे डब्यापाशी खिन्न उभ्या राहिलेल्या या तरुण कार्पोरलनं तिथंच प्रतिज्ञा केली- "फ्रान्सलासुद्धा याच डब्यांत शरणागती पत्करायला लावीन‘. या तरुणाचं नाव होतं ऍडॉल्फ हिटलर! शरणागती आणि आर्मिस्टिस (व्हर्साय प्रासाद) या दोन घटनांमध्येच बीजे पेरली गेली- दुसऱ्या महासंगराची!

- सप्तरंग (सकाळ)
दि. २०/०७/२०१४, रविवार

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...