Wednesday, September 17, 2014

गाणाऱ्याचे पोर (१) - राघवेन्द्र भीमसेन जोशी

मोठा होत गेलो, तसा भीमण्णांच्या बाळपणाच्या कितीतरी आठवणी वडीलधाऱ्यांकडून कानांवर पडत. त्या मी लगेच टिपून मनात साठवत असे. त्या ऐकताना आपले वडील हे इतरांसारखे नसून 'महापुरुष' आहेत, याची जाणीव होऊ लागली. किती म्हणून आठवू? आजोबा, काका, मावश्या, आत्या, सर्वांच्या तोंडी 'भीमण्णा' लहानपणीचा 'भीमू'!
'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात!' भीमूचा गळाच पाळण्यात दिसू लागला होता. तीन वर्षांचे असतानाच आईला 'आडिेशिदळु यशोदे' हे पुरंदरदासांचे भजन कसे नीट म्हणायचे, हे तो शिकवू लागला होता. मानेवर रुळणारे सुंदर काळेभोर जावळ व पाणीदार डोळ्यांचे हे बाळ लहानपणी सर्वांचेच फार लाडके होते. जोशी घराण्यातल्या त्या पिढीचा हा पहिला नातू. 'थोरला' हे बिरुद घेऊनच जन्मला होता. 'आम्हासाठी का दिले थोरपण?' हे जगाला नंतर कळले. वडील गुराचार्य प्रकांडपंडित, इंग्रजीचे गाढे अभ्यासक, अत्यंत कर्मठ राहणी. त्यामुळे साग्रसंगीत पूजा-अर्चा रोजच होत असे. सकाळच्या वेळी घरात साजूक तुपातल्या वातींचा, कापराचा व तुळशीचा वास भरून जात असे. शिवाय जोडीला वडिलांचा मंत्रघोष! सहज बरोबर घेऊन चालताना भीमूला ते संस्कृत शिकवत. आठव्या वर्षीच वडिलांनी त्याचा 'अमरकोश' शिकवून पाठ करून घेतला होता. मस्तकातील बुद्धीची ज्योत तेव्हापासूनच तळपत होती! अशा सात्विक संस्कारात भीमण्णांचा मूळ पिंड तयार झाला. ती सात्विकता आतून जन्मभर गेली नाही. त्याची अनुभूती 'संतवाणी'त जगाला झाली.
कुशाग्र बुद्धी व आश्चर्यकारक ग्रहणशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यात होत्या; पण त्याचबरोबर एक अलौकिक गुणही त्याला चिकटून आला होता, तो म्हणजे 'नादवेडेपणा'. या वेडाने मात्र इतर सर्व गोष्टींना मागे टाकले होते. कोणतीही मिरवणूक घरापुढून जाऊ लागताच, हे असतील नसतील त्या कपड्यांत बाहेर पळत सुटत व त्या मिरवणुकीत सामील होत. सर्व वाद्ये वाजणे बंद होईपर्यंत घरी येण्याचे नावच नसे. सर्कस आल्यावर तर तंबूतून दोन-दोन दिवस बाहेरच पडत नसत. तेथल्या बँडसमोरच त्यांचा मुक्काम असे. शेवटी कंटाळून आजोबांनी त्यांच्या शर्टवरच 'हा जोशी मास्तरांचा मुलगा आहे. कृपया खालील पत्त्यावर याला आणून सोडणे' अशी सूचना लिहिली होती.
तीन वर्षांचे असताना वडील, आई आणि भीमूबाळ एका भाड्याच्या घरात राहत होते. स्वयंपाकघर खाली व वरच्या मजल्यावर निजायची खोली होती. रात्री 'धप्प्' असा आवाज आला म्हणून आजोबांनी कंदिलाची वात मोठी केली व पाहतात तो 'भीमू' अंथरुणात नव्हता. ते जिन्याने खाली आले व हे बाळ दिसले. हात देऊन त्याला उठवण्यास जाताच त्याने हात झिडकारला व समोर दिसणारा  पाण्याचा अख्खा तांब्या हातात घेऊन सरळ तोंडाला लावला. पूर्ण पाणी पिऊन जिन्याने वर जाऊन आपल्या जागी झोपला. इतक्या लहानपणीसुद्धा कसल्याच आधाराची त्यांना सवय नव्हती. ते स्वयंभू होते. त्या वेळीच एकदा कोंबड्यांच्या पिलांमागे लागून त्यांच्या खुराड्यात शिरले व अडकून बसले. मोठ्याने रडण्याऐवजी आईचे भजन गात बसल्याची आठवणही मला आजोबांनी सांगितली. 
पुढे एका वेळी कुत्र्याची आठ पिले घरी आणून ती आडोशाला लपवली. रोज दूध-भाकऱ्या कमी होऊ लागताच यांची चोरी उघड झाली व त्या पिलांना स्वगृही परतावे लागले!
सहाव्या वर्षी वडिलांची मोठी सायकल हे नुसते शिकले नव्हते, तर त्यात तरबेजही झाले. त्यावर दोन मित्रांना बसवून व समोरच्या हँडलवर जिवंत विंचवाची माळ लटकावून गावभर फिरणे, हा एक छंद. (इति माझे बंडे काका आजोबा) सर्व खेळ अतोनात प्रिय. फुटबॉल उत्तम खेळत. पोहणे तर वडिलांनीच शिकवलेले. वडिलांनी त्यांना मल्लखांबातील सर्व धडे दिले होते. त्यामुळे शाळेच्या तपासणीला येणारे 'खान' नावाचे अधिकारी अगोदरच निरोप पाठवत, 'शाळा तपासणी होईलच; पण मला जोशी मास्तरांची त्यांच्या मुलाबरोबर मल्लखांबाची प्रात्याक्षिके पहायची आहेत.' ते आल्या वेळी तासभर या दोघा पिता-पुत्रांचा मल्लखांब चाले व सर्व शाळा पाहायला हजर असे. भीमण्णा नेहमी मित्रांच्या गराड्यातच असत. रोज काहीतरी तक्रार घेऊन कोणीना कोणी घरी येत. त्या वयातली त्यांची मस्तीच तशी होती. एकदा फुटबॉल खेळताना यांनी मारलेली किक समोरच्या खेळाडूच्या डोक्यात बसली व तो दिवसभर बेशुध्द होता. त्यामुळे फुटबॉल खेळणे सुटले. यांच्या एक-एक बाललीला ऐकताना मी नेहमीच आनंदून जाई. आताच्या 'सुपरमॅन'चे सर्व गुण भीमण्णांत त्या वेळि होते, असे मला वाटते.…।
……. हे चैत्रीपाडव्याला बदामीला मामाकडे गेल्या वेळी तेथे एका माजलेल्या हुप्प्याने एकाचे गुढीवरील चांदीचे भांडे पळवले. त्या हुप्प्याला पाहताच बायका किंचाळत व पुरुषही पुढे जात नसत. कोणीतरी पैज लावली, की 'कोण ते भांडे परत आणतो ते पाहू!' झाले, भीमण्णांनी विडा उचलला व त्याचा त्यांनी पाठलाग सुरु केला. मातीच्या जवळजवळ असलेल्या कुंब्याच्या घरांवरून दोघेही उड्या मारत पळू लागले. दीड-दोन तासांच्या पळापळीनंतर दोघेही रक्तबंबाळ होऊन समोरासमोर आले. चक्क दोन्ही योद्ध्यांचे द्वंद्व सुरु झाले; पण भीमण्णांच्या तीन-चार ठोशांनंतर तो भांडे टाकून जो पळाला, तो परत बदामीत दिसला नाही. लाख लोकांना जे जमणार नाही, ते करून दाखवीनच! ही जिद्द कायमचीच. असल्या विजयाचा आनंद भीमण्णांच्या चेहऱ्यावर जिंकलेल्या मैफिलीत पुढे बरेचदा दिसला.…… 
…… एकदा मात्र एक बाका प्रसंग उभा राहिला. भीमण्णांचे प्रगतिपुस्तक जोशी मास्तरांच्या हाती आले व त्यात हे परीक्षेला उपस्थितच न राहिल्याने सर्व विषयांत शून्य मार्क होते. जातिवंत 'मास्तरां'चे संतापाने पित्त खवळले व इतर भावंडांना, "तो येताच पकडून माझ्यासमोर त्याला हजर करा, नाहीतर आज तुम्हा सर्वांचीही गच्छंती करतो!" अशी तंबी मिळाली. झाले. भीमण्णा घरात शिरताच सर्व त्यांच्यावर तुटून पडले व पकडून त्यांना वडिलांपुढे उभे केले. पाठच्या नारायणला वडिलांनी चिंचेचा फोक तोडून आणण्यास सांगितले. त्याने यांना फार मार बसू नये, म्हणून छोटी फांदी तोडून आणली. ती त्याच्याच पाठीवर बसून मोडली! नवीन जाड फांदीच्या फोकाने भीमण्णांच्या पाठीवर फटके बसू लागले. हे हाताची घडी घालून शांत उभे होते. डोळ्यात पाण्याचा टिपूस नाही, कि तोंडातून शब्द नाही. आई मध्ये पडावयास जाताच मास्तरांनी तिला कोपऱ्यात ढकलून दिले. सर्व घर भीतीने चिडीचिप्प झाले होते. एका क्षणी गुराचार्य मारून थकले व स्वतःच भीमण्णांना विचारले, "आयुष्यात तू पुढे काय करणार आहेस बाबा?" त्यावर मात्र त्यांच्या तोंडून आवाज फुटला व ते म्हणाले, "मी फक्त गाणेच म्हणणार आहे!"……. त्या वयातला भीमण्णांचा दृढनिश्चय पाहून आश्चर्य वाटते. रुळलेल्या वाटेने जाण्यासाठी या 'स्वरभास्करा'चा जन्म नक्कीच झाला नसावा! (ही आठवण नारायणकाकाकडून ऐकलेली)


No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...