Monday, July 21, 2014

रसगुणपूर्णमही - भालचंद्र नाईक

भारतीय इतिहासातील गणिताचे सुवर्णयुग म्हणजे आर्यभट्ट ते भास्कराचार्यांचा काळ! या गणितज्ञांच्या श्लोकांतील नोंदींमुळे त्यांच्या जन्मांचा अचूक काल निश्चित करणे शक्य झाले आहे. 

आर्यभट्ट
भास्कराचार्य
_________________________________________________________________________________

१९ एप्रिल १९७५ रोजी भारताने आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडला, त्याचे नाव होते 'आर्यभट्ट' आणि त्यानंतर चार वर्षांनी ७ जून १९७९ रोजी दुसरा उपग्रह अवकाशात सोडला, त्याचे नाव होते 'भास्कर १' . आर्यभट्ट आणि भास्कराचार्य हे दोन्ही जागतिक कीर्तीचे भारतीय गणिती होत. आर्यभट्ट ते भास्कराचार्य हा काळ म्हणजे भारतीय इतिहासातील गणिताचे सुवर्णयुग होय.
त्या काळातील ऐतिहासिक नोंदी दुर्मिळ असल्या तरी दोघांची जन्मवर्षे निश्चितपणे सांगता येतात; कारण त्या दोघांनी श्लोकांत त्यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. सध्याच्या २०१४ वर्षात भास्कराचार्यांची नऊशेवी जयंती साजरी होत आहे. भास्कराचार्यांनी 'लीलावती' हा ग्रंथ लिहिल्यानंतर एका श्लोकात त्याची माहिती दिली आहे, तो श्लोक - 

रसगुणपूर्णमहीसमशकनृपसमयेsभवन्ममोप्तत्तिः।
रसगुणवर्षेण मया सिद्धान्तशिरोमणी रचितः ।।

येथे अंकसंज्ञा त्या काळच्या प्रथेप्रमाणे शब्दार्थानुसार स्पष्ट होतात. उदा. रस = ६ (गोड, आंबट, तिखट, खारट, कडू आणि तुरट), गुण = ३ (सत्व, रज, तम), पूर्ण = ०, मही = १ (पृथ्वी). 'अंकानाम् वामतो गति:।' म्हणजे अंक उजवीकडून क्रमाने डावीकडे वाचले जातात. रसगुणपूर्णमही म्हणजे ६,३,०,१ हे १०३६  वाचावयाचे. १०३६ शालिवाहन शकात ७८ वर्षे मिळविली की १११४ हा इसवीसन मिळतो. २०१४ मध्ये घटनेला ९०० वर्षे पूर्ण होतात. स्वतः भास्कराचार्यांनी आपले जन्मवर्ष आणि ग्रंथलेखनाचे वर्ष 'गोलाध्याय' या ग्रंथातील श्लोकात दिले आहे. त्याचा सरळ अर्थ पुढीलप्रमाणे - 'शालिवाहन शके १०३६ मध्ये माझा जन्म झाला आणि छत्तिसाव्या वर्षी मी 'सिद्धान्तशिरोमणी' हा ग्रंथ रचला.' 
आर्यभट्टानेसुद्धा आपल्या जन्माविषयी आपल्या 'आर्यभट्टीय' या ग्रंथात एक श्लोक लिहिला आहे, तो असा -

षष्ट्यब्दानां षष्टिर्यदा व्यतीताः त्रयस्य युगपादाः ।
त्र्यधिकविंशतिरब्दाः मम जन्मनोsतीताः ।।

भारतीय संस्कृतीत कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी कालगणना आहे. यांपैकी तीन युगपाद संपल्यानंतर म्हणजे कलियुगाचा प्रारंभ झाल्यानंतर ३६०० (६० x ६०) वर्षे जेंव्हा संपली, तेंव्हा माझ्या जन्माला २३ वर्षे झाली. कलियुगाचा प्रारंभ इ.स. पूर्व ३१०१ या वर्षी झाला असे मानले गेले आहे. त्यानुसार आर्यट्टांनी इ.स. ४९९ मध्ये (३६०० - ३१०१ = ४९९) तेवीस वर्षे पूर्ण केली होती. यावरून त्यांचे जन्मवर्ष इ.स.(४९९ - २३) = ४७६ हे ठरते. आणखी एक भारतीय गणिती ब्रह्मगुप्त यांनीही एका श्लोकात आपले जन्मवर्ष सांगितले आहे. 

श्रीचापवंशतिलके श्रीव्याघ्रमुखे नृपे शकनृपाणाम् ।
पंचाशत्संयुक्तै: वर्षशतै: पंचभि: अतीतै: ।।
ब्रह्मस्फुटसिद्धान्त: सज्जनगण गणित गोलवित्प्रीत्यै: ।
त्रिंशतवर्षेण कृतो जिष्णुसुत ब्रह्मगुप्तेन ।।

श्रीचापवंशीय राजा श्रीव्याघ्रमुख याच्या काळात नृप शालिवाहन शकाची ५५० वर्षे (पंचाशत = ५०, पंचभि:शतै = ५००, ५० + ५०० = ५५०) पूर्ण झाली तेंव्हा जिष्णूचा (विष्णूचा) पुत्र ब्रह्मगुप्त याने वयाच्या तिसाव्या (त्रिंशत = ३०) वर्षी सज्जनलोक आणि गणितज्ञ यांच्यासाठी 'ब्राह्मस्फुटसिद्धान्त' हा ग्रंथ लिहिला. 
शालिवाहन शक ५५० मध्ये ७८ मिळविल्यास इ.स. ६२८ या वर्षी ब्रह्मगुप्तांचे वय ३० वर्षे होते, म्हणजे ब्रह्मगुप्तांचा जन्म (६२८ - ३० = ५९८) इ.स. ५९८ मध्ये झाला.
पंधराशे वर्षांपूर्वीच्या घटनांचा अचूक काळ या गणितज्ञांच्या नोंदींमुळे निश्चित करता येतो. त्यामुळे भारतीय इतिहास लेखनाला कितीतरी मदत झाली आहे. संस्कृत साहित्याच्या अभ्यासाने अजूनही अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकेल. यासाठी संस्कृत साहित्याचा अभ्यास झाला पाहिजे पाहिजे. 

- भालचंद्र नाईक (आपले जग, जुलै २०१४)
(मराठी विज्ञान परिषद - पत्रिकेतून साभार)


No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...