Sunday, December 23, 2012

हाफ़ राईस... दाल मारके

आईला खेटून झोपण्याची सवय सोडण्याची शिकवणी दिपूला त्या रात्री पहिल्यांदाच मिळाली. आपले , सावत्र का असेना, पण आजवर आपल्याबरोबर असलेले बाळ कुठे असेल अन कसे झोपले असेल याची काळजी सुनंदाला नव्हतीच. नवीन क्षितीजे तिच्या संसारात आली होती. आता फ़क्त ती आणि मन्नू!

अंगणातून येणारे किड्यांचे आवाज, खाली एक जाड जाजम, अंगावर एक घोंगडी, आजूबाजूला गुणगुणणारे डास आणि घराचे आतून बंद केलेले दार! पहिल्यांदाच दिपूला समजले. आपण काही तितके लहान नाही राहिलो आता. एकटे झोपता येईल इतके मोठे झालो आहोत. पण हे जिला सांगायचे अन कौतूक करून घ्यायचे ती..................... आई... नव्हती इथे...!
घोंगडी भिजेपर्यंत दिपू रडत होता. डासांना हाताने हाकलत होता. पहाटे तीन वाजले असावेत जेव्हा त्याला कशीबशी झोप लागली. आणि त्याला आठवत होतं! झोपल्यानंतर अगदी काहीच वेळात, म्हणजे, जरासाच वेळ झाला असेल, कुणाच्यातरी हाका ऐकू येत होत्या आणि आपल्या शरीराला धक्के बसत होते. काकूने पहाटे पाचला त्याला उठवलं होतं! स्वयंपाकघर झाडताना दिपूला झाडू कसा धरतात हेही माहीत नव्हतं! पावणेसहाला विशाल उठला. त्याला दूध बिस्कीटे मिळाली. दिपू बघत होता. विशालने विचारले. काल खेळायला मजा आली की नाही? दिपूला त्यातही आनंद वाटला. आपण खेळात होतो याची ऎकनॊलेजमेंट विशालने देणे म्हणजे काय झाले? दिपू निरागस हसला. तोवर काकूने त्याला ताटात कालची पोळी अन भाजी दिली. दिपूने विचारले, मला बिस्कीट... ! त्यावर काकू जे बोलली त्यावरून त्याला इतकेच समजले की जी मुले शाळेत जातात त्यांनाच दूध अन बिस्कीटे मिळतात!
पंधरा दिवसात दिपू काळवंडला! पण रमला बिचारा त्या घरातही! रमण्याशिवाय पर्यायच नव्हता. मधेच कुणीतरी बाहेरचे येऊन चौकशी करून जायचे. त्याची बडदास्त मस्त ठेवली आहे असे मत होत असावे त्यांचे! मात्र त्याला शाळेत घातले नव्हते. कारण त्याच्या शिक्षणाची जबाबदारीही घेईन असे तुकारामने कबूल केलेलेच नव्हते.
जीवाने आवाक्यात असेल त्या जीवाचे शोषण करून जगणे या प्रक्रियेला जीवन असे म्हणतात वाटते. जो बळी तो कान पिळी ही म्हण बदलायला हवी. जो बळी तोच जगू शके अशी ती म्हण करायला हवी!
एक माणूस झिजला तरच दुसरा त्याच्या जीवावर उभा राहू शकत असावा.......................दिपू झोपायला पंक्चरच्या दुकानात गेला. रात्री त्याला झोपच येत नव्हती. सहज त्याने फ़टीतून बाहेर पाहिले तर कांबळे काका कुठेतरी घाईघाईत बाहेर जात होते. काहीतरी प्रॊब्लेम झाला की काय? आत्ता काका कसे काय बाहेर गेले? त्याने लक्ष ठेवले. दहा मिनिटे झाली तरी काका येईनात. मग स्वयंपाकघरातला दिवा लागलेला त्याने पाहिला. काय वाटले कुणास ठाऊक! तो पटकन बाहेर आला अन स्वयंपाकघराच्या खिडकीखाली जाऊन उभा राहिला. स्वातीताई काकूंशी बोलत होती.स्वाती - पगाराचा प्रश्न होता का पण? आमच्या भावासारखा घरात राहात नव्हता का तो?
काकू - अगं मित्र सांगतात काहीतरी.. मग आपल्यालाही वाईट वाटतं की नाही??
स्वाती - त्याला एक दोन दिवसांनी देऊन टाकायचे मग... एवढे मनीषाचे एक्स रे झाल्यावर ... तो काही म्हणाला नसता...
काकू - तसं नाही गं! आपण असं उगाच राबवणं चांगलं आहे का एवढ्याश्या मुलाला?
स्वाती - आई? तू राबवतेस त्याला? तुझं तर मुलासारख प्रेम आहे.. आम्ही पण दोघी इतक्या प्रेमाने त्याला सगळं शिकवतो.
काकू - मग काय तर? एका मुलाला बरं वाटावं म्हणून माझ्या मुलीची तपासणी थांबली तर त्यात काय??
स्वाती - काहीच हरकत नाही आई.. पण... दिपूला नीट सांगीतलं असतंस तर त्याला समजलं असतं..
काकू - अंहं! त्या एवढ्याश्या मुलाला जेव्हा स्वत:च्या मनातून प्रेम वाटेल ना आपल्याबद्दल... तेव्हा तो आपोआप समजेल सगळं!
स्वाती - पण इतक्या उशीरा बाबांना काकांकडे जाऊन पैसे मागायला......
काकू - अगं उद्या सकाळी सहा वाजता न्यायचंय मनीषाला... म्हणून...
पायातला जोरच गेला होता. दिपू अक्षरश: मटकन बसला जमीनीवर! त्याचा एक हात खिशावर होता. दुसरा हात त्याने तोंडावर ठेवून जोरजोरात हुंदके द्यायला सुरुवात केली. त्याचा आवाज इतका झाला की आतमधे या दोघींनाही ऐकू गेला. बाहेर येऊन त्या पाहतायत तर दिपू रडतोय.
काकूंनी त्याला पटकन जवळ घेतला.काकू - काय झालं दिपू? का रडतोयस? कुणी मारलं वगैरे का?? सांग ना? रडू नकोस... चल आत चलदिपूने खिशातून शंभराच्या सगळ्या बारा नोटा काढून काकूंच्या हातात कोंबल्या व तो अजूनच जोराने रडू लागला.चांदवडला बसमधे बसल्यानंतर एका आजोबांच्या मांडीवर डोके ठेवून झोपताना त्याला जसे वाटले होते ...अगदी तसेच आज रडत रडत आवेगात काकूंच्या कुशीत शिरताना त्याला वाटले. चुकलो मी... काकू... चुकलो.. असे म्हणून तो आणखीनच त्यांना बिलगत होता. शेवटी स्वाती व मनीषाने खूप वेळ त्याला प्रेमाने समजून सांगीतल्यावर हुंदके देत देत तो बाजूला झाला. पहिल्यांदाच त्याने पाहिले... काकू अन दोन्ही ताया रडत होत्या....एक घर... मायेचं... तुटता तुटता वाचलं होतं...कांबळे काका आले. त्यांना सगळा प्रकार मनीषाने सांगीतला. दिपूला भीती वाटत होती. ते हसले. त्यांनी त्याला जवळ घेतले व म्हणाले...आत चल.. आजपासून समोर झोपायचं नाही...त्या रात्री... कित्ती कित्ती तरी वेळ ... काकूंच्याजवळ झोपलेल्या दिपूला... बरेच दिवसांनी सारखी त्याची आई आठवत होती.दिवाळी आली. जिकडे तिकडे नुसती जमेल तशी रोषणाई! फ़टाके! नवे कपडे! गोडधोड! आता विशालही बोलायला लागला होता. आता संध्याकाळी दररोज दोन तास खेळल्यामुळे दिपूचे शरीर चांगले तंदुरुस्त व्हायला लागले होते. आता तो पूर्ण दहा वर्ष तीन महिन्यांचा झाला होता.
घरोघरी लोक आपल्या घरचे फ़राळाचे नेऊ देत होते. तिकडचे घेऊन येत होते. एकमेकांच्या फ़राळाच्या चवीचे कौतुक चाललेले होते.दिपूला एक नवीन शर्ट पॆंट काकूंनीच घेतली होती. आणखीन एक जोडी त्याला पुढारी येऊन देऊन गेले होते. तो आभाळातच होता. त्यातच त्याला चाळीस रुपयांचे हवे ते फ़टाके घे असे स्वातंत्र्य काकांनी दिले. आणलेले फ़टाके नुसते पाहण्यातच त्याचा वेळ जात होता.त्याला आठवलं! मुहरवाडीची दिवाळी अशी नसायची. आणि... गेल्या वर्षीची आपली इथली... वडाळी भुईची दिवाळीही अशी नव्हती! या दिवाळीला म्हणजे आपण राजाच! फ़टाके काय, कपडे काय, चकल्या काय, करंज्या काय? त्यातच स्वातीताईला एका स्थळाने पसंती कळवल्याची बातमी आली. घरात नुसता उत्साह भरून वाहू लागला. मनीषाताई तिची थट्टा करू लागली. बुद्धीला जितके समजेल तितकी थट्टा मग दिपूही करू लागला. त्याने थट्टा केली की स्वातीताई त्याला मारायला धावायची. मग तो पळून जायचा.
मस्त धमाल चालली होती. दिपू बाहेर आला. रस्त्यावर मोठी मुले बाण लावत होती. तो मजा बघत बसला. चमनचिडी हा एक फ़टाक्याचा विचित्र प्रकार आहे हे त्याला समजलं! मोठ्या माळा कशा काय लोकांना परवडतात त्याला समजत नव्हतं! तो बाण लावत असलेल्या मोठ्या मुलांच्या अगदी जवळ उभा होता. त्यातला एक आला आणि बाण लावत असलेल्याला काहीतरी बोलला. वाक्य दिपूला ऐकू आलं! पण अर्थ कळला नाही. ’वो देख पटाखा जा रहा है, पटाखेपे पटाखा छोड’! यातला पहिला पटाखा मनीषाताईला म्हंटलं जातंय हे त्याला समजलं! पण तिच्या अंगावर कसा बाण सोडतील? नुसती थट्टा करत असतील! पण नाही. त्या मुलाने खरच बाणाची बाटली तिच्या दिशेला तोंड करून धरली. दुसरा एक जवळ आला. त्याने काही समजायच्या आतच बाणाची वात पेटवली. दिपूने मनीषाताईच्या नावाने जोरात हाक मारली तेव्हा ती पटकन दिपूकडे वळली अन सेकंदातच तिच्या लक्षात आले की काहीतरी विपरीत होत आहे. जोरात ती बाजूला सरकली. सरकली नसती तरी चाललं असतं! बाण नेमक्या दिशेने गेलाच नव्हता. पण मनीषाताई प्रचंड घाबरून घराकडे धावली. मुले जोरात हसू लागली. आणि दिपू मात्र पराकोटीचा संतापला. त्याने जवळ पडलेली एक बाटली उचलून जीव खाऊन त्या बाण लावत असलेल्या मुलाच्या डोक्यात घातली. बाटली हातातून सुटून त्या मुलाला नुसतीच चाटून गेलेली त्याला माहीतच नव्हते. त्याला वाटले ती जोरात त्याच्या डोक्यात आपटून फ़ुटली. कारण बाटली फ़ुटल्याचा आवाज आला होता. पण हे सगळं पाहायला तो थांबलाच नव्हता. आपल्या हातून तो कदाचित मेलेलाही असेल अशा वेड्या कल्पनेने दिपू तुफ़ान वेगात स्टॆंडवर धावला. समोर धुलिया-नाशिक बस निघाली होती. कसलाही विचार न करता तो बसमधे तीरासारखा घुसला. बस निघाली तेव्हा कंडक्टरने विचारले पैसे आहेत का? त्याने हो म्हणून सांगीतले. मात्र पंधराच मिनिटात समजले की त्याच्याकडे फ़ारच कमी पैसे आहेत. पाऊण तासाने जेव्हा पिंपळगाव (बसवंत) आणि शिरवाडच्या मधील एका ढाब्यावर बस जेवायला थांबली तेव्हा त्याला उतरवण्यात आले व इथे कुणी ओळखीचे भेटले की पुढचा प्रवास कर असे सांगण्यात आले.दिपू उतरला. तो भयानक घाबरलेला होता. त्याची अशी कल्पना होती मागून लगेचच आलेली जी दुसरी बस होती त्यात पोलीस असण्याची शक्यता होती. एका हौदामागे तो लपून बसला. दोन्ही बस जेवून जायला जवळपास पन्नास मिनिटे लागली. पण दिपू जागचा हालला नाही. बसेस गेल्यावर मात्र ढाबा एकदमच सुनसान झाला. दोन, तीन कारमधून आलेले कस्टमर्स सोडले तर आता स्टाफ़शिवाय कुणीच नव्हते.
हळुच दिपू गल्ल्यावरील मालकासमोर जाऊन अपराधी मुद्रेने उभा राहिला.मालक - कौन बे तू?
दिपूने मान खाली घातली होती.
मालक - बससे उतरा क्या? छुटगयी बस?
दिपुने नकारार्थी मान हलवली.
मालक - अरे कहॊंसे आया तू???
आता एक दोन पोरे तिथे जमा झाली.
मालक - कौनसे गाव का है?
दिपू - मुहरवाडी
मालक - ये कहापे आया रे पद्या?
पद्या - क्या?
मालक - मुहरवाडी सुना है?
पद्याने नकारार्थी मान हलवली. त्याला त्या मुलात काहीही इंटरेस्ट नव्हता.
मालक - अबे बोलता क्युं नही?
दिपू गप्पच होता.
मालक - भागके आया क्या? चोरी की है???
दिपूने खाडकन वर मान करून जोरजोरात नकारार्थी मान हलवली.
मालक - भूख लगी है क्या??
दिपू - ... हां!
मालकाने विचार केला. पोरगं लहान आहे. कामावर तर ठेवता येणार नाही कायद्याप्रमाणे! पण भटारखान्यात किरकोळ कामाला टःएवलं तर उपयोगीही पडेल अन जरा ताणही कमी होईल.
मालक - काम करेगा यहॊं?
दिपूने पुन्हा जोरात मान हलवली.. पण यावेळेस... होकारार्थी...
मालक - जा ... पहले खाना खालेदिपूला भटारखान्यात नेण्यात आलं! तिथल्या वासानेच त्याला गुदमरलं! रस्से, चिकन, दाल, बटाटे, मटार! सगळ्याचा एक नवीनचह वास तेथे भरून होता. कुणीतरी त्याला थाळीत काहीतरी रोटी अन सब्जी दिली.
दिपूने विचार केला. नंतर हाकलून दिलं तर माहीत नाही.. आत्ता तर खाऊन घ्यावं!
बकाबका तो खात होता. पण आणखीन मागीतलं नाही. नंतर पाणी पिऊन परत मालकासमोर उभा राहिला.
मालकाने आवाज दिला:मालक - पद्या, ये लडका कलसे अंदर काम करेंगा.. अभी इसको ऒर्डर लेना सिखा...अभी कोई गाडी नही आनेवाली मालेगाव छोडके...
दीपक अण्णा वाठारे! आयुष्याला पूर्णपणे भिन्न वळण लागेल अशा उंबरठ्यावर उभा होता. आणि तो व्यवसाय त्याला तूर्त तरी मान्य होता. पद्या त्याला एका टेबलापाशी घेऊन गेला. कस्टमर काहीतरी बोलला. पद्याने दिपूला सांगीतले.
पद्या - सुना? ये वहॊं जाके बोल
दिपू - कहॊं??
पद्या - वो काउंटरपे... वो अंदर आदमी खडा है ना काला? उसको...दिपूला तो आतला काळा माणूस अक्राळविक्राळच वाटला होता. मगाशी जेवताना हा कसा दिसला नाही? दिसला असता तर कदाचित दिपू जेवलाही नसता.
त्याच्याकडे एकदाच बघत चाचरत चाचरत दिपू म्हणाला. त्याचं नवं आयुष्य या क्षणाला सुरू होत होतं!
दिपू - ऒर्डर है...
तो - क्या???
दिपू - हाफ़ राईस... दाल मारके....

-----------------------------------------------------------------------------------------------------------
"हाफ़ राईस... दाल मारके" हे एक २३ भागांचं कथानक आहे..पूर्ण वाचण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा..
http://www.maayboli.com/node/15727
स्त्रोत - मायबोली 
लेखक - बेफ़िकिर 

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...