Monday, December 31, 2012

पोरी, तुझं चुकलंच..!

अखेर तू गेलीसच. सुटलीस म्हणायचं का? हो तसंच म्हणायला हवं. खरं तर तुझं वय फुलायचं.. प्रेमात पडायचं.. पुढच्या आयुष्याची स्वप्नं पाहायचं. ती तू पाहिलीही असशील. तुझ्याबरोबर तुझा जो सखा होता, तो याच स्वप्नांचा भाग होता का? असेलही किंवा नसेलसुद्धा. त्यानं तुझ्यामध्ये कदाचित सखीसहचरी पाहिली असेल. किंवा नसेलसुद्धा. तुझ्या आईवडिलांनी त्याच्यामध्ये जावई पाहिला असेल. किंवा नसेलसुद्धा. मम्मी किंवा डॅडीनं स्वत:च्या गाडीतून तुला सोडायला किंवा आणायला यावं, अशा घरातली तू नव्हतीस. लोकल, बस, मेट्रो अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून धक्के खात ज्यांना कार्यालय किंवा घर गाठावं लागतं अशा कोटय़वधी भारतीयांसारखीच तू. स्थानकावर ताटकळत वाट पाहत उभं असताना समोर हवी ती लोकल, बस आली की आनंदानं डोळे चमकणाऱ्या कोटय़वधी भारतीयांमधलीच तू. त्या दिवशी १६ डिसेंबरला संध्याकाळी दिवसभराच्या रगाडय़ानंतर सुहृदाच्या साथीनं निघालीस, त्या दिवशीही असेच कोटय़वधी भारतीय कुठे ना कुठे बसची, मेट्रोची किंवा लोकलची वाट पाहत उभे असतील. तूही त्यांच्यापैकीच एक. समोर रिकामी बस पाहून तुला आनंद झाला असणार.. दोस्ताच्या साथीनं खिडकीची जागा पकडत गुजगोष्टी करीत घरापर्यंत जाता येईल असं तुलाही वाटलं असणारच. अशा छोटय़ा छोटय़ा आनंदाचे ठिपके जोडत दिवसभराची चतकोरातली रांगोळी पूर्ण करायची आणि आला दिवस सुखात गेला असं मानायची सवय आहेच ना आपल्याला. आजच्या दिवसात रिक्षानं उडवलं नाही.. मोटारचालकांनी संप केला नाही.. डोक्यावरची विजेची तार/ छप्पर/ पंखा अंगावर पडलं नाही.. पायाखालचा रस्ता खचला नाही.. आणि आपण धडय़ा अंगानं घरी आलो याचा आनंद देशभरातल्या कोटय़वधींना रोजच्या रोज घेता यावा अशी व्यवस्था आहे आपल्या देशात. तूही त्याच व्यवस्थेचा भाग होतीस. त्याच आनंदात तू त्या दिवशीही बसमध्ये चढली असशील. समोर दोन पायांची दिसतायत म्हणजे ती माणसंच असतील असा समज तू करून घेतलास आणि त्यातच बेसावध राहिलीस. आदिम अवस्थेतलं पशुत्व चाराचे दोन पाय झाले म्हणून माणसांमधनं गेलं असेल असं तुलाही वाटलं असणार.. तिथंच घात झाला. पोरी, तुझं चुकलंच..!
या महान म्हणवणाऱ्या, उदात्त परंपरा सांगणाऱ्या देशात अर्धनारीनटेश्वर पुजला जातो. या पुजल्या जाणाऱ्या प्रतिमेपुरती तरी त्यात अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री दिसते. तुझ्यासारख्या अनेकांना कळत नाही पोरी त्यातल्या पुरुषानं स्त्रीला कधीच पायपुसणं करून टाकलंय ते. काही दिवसांनी तर ही प्रतिमा अर्धीच राहील की काय अशी परिस्थिती येणार आहे. कारण स्त्रीबीज गर्भातूनच उपटून टाकण्यात आपल्याला कोण आनंद. ज्यांनी जीव वाचवायचा ते वैद्यकच न उमलणाऱ्या कळय़ा खुडण्यात आयुष्याचं सार्थक मानतात हे तुलाही माहीत असेलच. तुझ्या आईवडिलांच्या मनात तुझा गर्भ पाडून टाकायचा विचार कधी शिवला नसणार. म्हणून तर तू या देशात जन्माला येऊ शकलीस. तुझ्या आईवडिलांचं त्यासाठी कौतुकच करायला हवं. पण आता त्यांनाही वाटत असेल तू उगाचच जन्माला आलीस. त्यांनाही जाणवत असेल आता की आदिमाया, आदिशक्ती, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या सगळय़ा प्रतिमा आपल्या देशात फक्त पुजण्यापुरत्याच असतात. जे जे पूजनीय असतं त्याचं मातेरं करून टाकायचं ही आपली संस्कृती हे कळलं होतं का तुला कधी? आपण पृथ्वीला देव मानतो. तिच्यावरही असाच रोजच्या रोज बलात्कार करीत असतो. नद्यांनाही आपण देवच मानतो. पण सगळा प्रयत्न त्या कशा कोरडय़ाठिक्क होऊन नाहीशा होतील असाच. झाडांमध्ये, वेलींमध्येही आपण देवच बघतो. परंतु त्यांच्याही नशिबात हे असंच ओरबाडून घेणं. भूतदया हा तर आपल्या संस्कृतीचा पाया. पण ते सगळं नुसतं सांगण्यापुरतंच. प्रत्यक्षात समर्थानं असमर्थाला, धट्टय़ाकट्टय़ानं अशक्ताला, धनिकानं गरिबाला शक्य तितकं लुटणं हे वास्तव कळायच्या आतच तुझ्यावर माणसाची झूल पांघरून आलेल्या काळानं घाला घातला. तुला जे काही सहन करावं लागलं ते कळलं तरी हृदयाचा ठोका चुकतो. तू कसं सहन केलं असशील? या देशात स्त्रियांच्या अंगी बाकी काही गुण असो किंवा नसो. सहनशीलता मात्र असावीच लागते. या शब्दातसुद्धा आधी सहन करणं आहे आणि मग शील. तुला कळलं होतं का कधी ते? नाही ना. पोरी, तुझं चुकलंच..!
एक तर तू भारत नावाच्या देशात जन्माला आलीस. आलीस ते आलीस तेसुद्धा दिल्लीसारख्या शहरात. तुला काय वाटलं देशाची राजधानी इतर प्रांतांपेक्षा प्रगत असते? जगातल्या सर्वात मोठय़ा लोकशाहीचं सत्ताकेंद्र दिल्लीत आहे, म्हणून तुला मोठा अभिमानही वाटला असेल. पण आपल्याकडे लोकशाही म्हणजे ओरबाडणाऱ्या लोकांनी ओरबाडून घेणाऱ्या लोकांसाठी ओरबाडून राबवलेली व्यवस्था हे कधी आलं होतं का तुझ्या लक्षात? तुझी आई खेडय़ातली. तुझ्या वेळी ती बाळंत होताना दवाखान्यात वेळेला पोहोचू शकली. नाही तर तू मधेच आचके देत गेली असतीस. अगं खूप जण जातात असे आपल्याकडे तुला माहीतच असेल. तू मात्र आईच्या गर्भातून सुखरूप बाहेर आलीस. जन्मल्यानंतर तुला देवीच्या आजारानं नेलं नाही. गोवर किंवा टायफॉईड होऊन मेली नाहीस. काविळीनं तुझा बळी घेतला नाही. अ‍ॅनोफलिस डासाच्या मादीनं तुझं रक्त शोषलं नाही. त्यामुळे मलेरिया होऊन या जन्मातनं तुला कधी मुक्ती मिळाली नाही. पैसे भरून डॉक्टर झालेल्यानं चुकीचं औषध देऊन तुला मारलं नाही. त्यानं दिलेलं औषध बनावट निघालं नाही. अन्नातल्या विषबाधेनं तुझे प्राण घेतले नाहीत. शाळेला जाताना स्कूलबस होती का तुला? मग त्या स्कूलबस चालवणाऱ्यानं दारू पिऊन अपघातात तुला ठार केलं नाही. शाळेला सुटी असताना लहानपणी गावी गेली असशील. तिथं जीवजंतू चावल्यानं तुझा जीव गेला नाही. गावातल्या बेदरकार धनदांडग्यांच्या वाहनांनी उडवल्यावर तू कधी जायबंदी होऊन अपघातात गेली नाहीस. श्रीमंतांनी, मवाल्यांनी केलेले अन्याय मुकाट सहन करायचे असतात. कायद्याचं राज्य फक्त कागदावर असतं हे तुला कधी कळलं नसेल. त्यामुळे वाटलं असेल तुला आपली सुटका झाली. आपण वयानं मोठे झालो. अभ्यास करून चांगले गुण मिळवून हव्या त्या क्षेत्रात कारकीर्द करायची, असं ठरवलं असशील तू. पण तुला लक्षात आलं होतं का की चांगल्या कारकीर्दीसाठी, खूप पैसे मिळवून श्रीमंत होण्यासाठी इतके कष्ट करायची गरज नसते आपल्या देशात. तसं आलं असतं लक्षात तर कशाला गेली असतीस महाविद्यालयात. म्हणजे मग ती बसनं घरी जायची वेळच आली नसती तुझ्यावर. पोरी.. तुझं चुकलंच.
आता कळलं असेल तुला जिवंताला पायदळी तुडवायचं आणि तसा तो तुडवला गेल्यावर त्याच्या नावानं टिपं गाळायची ही आपली नवी मानवता आहे. म्हणून तर तुझ्यावरच्या अत्याचाराला वाचा फुटल्यावर आपण प्रयत्नात कमी पडलो नाही हे दाखवण्यासाठी सरकार तुझ्या मृतदेहासाठी खास विमान सोडू शकतं पण जिवंतांना मरणयातना देणारी व्यवस्था सुधारू शकत नाही. यामुळेच घरात हवे तितके दिवे लावून अंधार करण्याची ऐपत असणारे लोक इंडिया गेट, मुंबईतलं गेटवे ऑफ इंडिया वगैरे ठिकाणी तुझ्या नावानं मेणबत्त्या लावायला वेळ काढतात. पण आसपासच्या पददलितांसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. आता तर संसदेतले जागरूक प्रतिनिधी महिला रक्षणासाठी कडक कायदे करण्याची शपथ घेतायत. तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही असं ते बलिदान लादण्यासाठी जबाबदार असणारेच सांगू लागलेत. थोडक्यात काय, तुझ्यावर जी वेळ आली ती कोणावरही कधी येऊ नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत म्हणे. आता तुझ्या नावानं एखादा दिवस वगैरेही साजरा करण्याचं ठरवलं जाईल. स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याची शपथही घेतील सगळे. आणि हे होईल ते पाहायला तू नसशील. तेव्हा पोरी.. तुझं चुकलंच.

- लोकसत्ता (संपादकीय/अग्रलेख)
दि. ३१/१२/२०१२, सोमवार

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...