Thursday, November 8, 2012

वैज्ञानिक पुलं

           साहित्य, संगीत,  नाटक  इ.  कला क्षेत्रांत रमत असताना,  पुलंना आप ल्या  संस्कृतीची, जुन्याची ओढ होती,   परंतु सनातनी  गोष्टींची चीड  होती.  समाजाला उपकारक असे  शोध, त्यामागची शास्त्रज्ञांची धडपड याचे त्यांन कौतुक वाटे. वैज्ञानिक उपक्रम राबवणाऱ्या संस्था, प्रयोगशाळा, पुण्यातील 'आयुका' सारख्या संस्थांना सुद्धा 'पु. ल. देशपांडे फाऊंडेशन' तर्फे देणग्या दिल्या होत्या. पुलंचा एक कमी परिचित पैलू म्हणजे, समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा, व विशेषतः मराठीतून विज्ञानाचा प्रसार व्हावा, याबद्दल त्यांना खूप आस्था होती.
            'मराठी विज्ञान परिषदेने' १९७१ मध्ये प्रसिद्ध केलेल्या 'अस्मिता महाराष्ट्राची' या ग्रंथाला पुलंची प्रस्तावना होती! त्या प्रस्तावनेतील काही भाग....

            ...मी जीवनातील कोडी बुद्धीने आणि अभ्यासाने जाणून घेईन, ही जिद्द आणि मला ती जाणता येतील हा आत्मविश्वास म्हणजे वैज्ञानिक दृष्टी. माणसाला अज्ञात अशा असंख्य गोष्टी आहेत. परंतु त्या अज्ञाताचा भेद करून त्या मी ज्ञात करून घेईन, ह्या धडाडीने निसर्गाचे विराट स्वरूप जाणून घेणे हे वैज्ञानिकांचे कार्य आहे. आणि ते वैयक्तिक साक्षात्काराच्या समाधानात न राहता, त्या ज्ञानाभवती कसलीही गूढ वलये किंवा बुवाबाजी न करता, ते ज्ञानसोपान स्वच्छपणे ग्रंथातून दाखवणारे हे जगाचे खरे उपकर्ते आहेत. वैयक्तिक मोक्षाकडून सामाजिक मोक्षाकडे नेणारे विज्ञान हे जपतप - अनुष्ठानापेक्षा अधिक तारक आहे. विठ्ठलाला अठ्ठावीस युगात हटवता न आलेला पंढरपुरातला कॉलरा विज्ञानाने हटवला..नव्या मोटारीपुढे नारळ फोडून तिची गुलाल लावून पूजा करणारे मोटार नावाची एक नवीन देवता निर्माण करतात. ते मनाने वैज्ञानिक झालेले नसतात. खंडाळ्याच्या घाटात एक शिंगरोबाचे देउळ आहे. त्याला दहा पैसे ठवून प्रवास निर्विघ्न कर असे म्हणणाऱ्यांना दहा पैशाच्या जकातीवर देव खूष होतो, हा देवाचा अपमान आहे असे वाटत नाही. त्या शिंगरोबाला दहा हजार रुपये दिले तरी पेट्रोल शिवाय मोटार चालणार नाही...वैज्ञानिकांनी आता विज्ञान परिषद स्थापन केली आहे. खरे सांगायचे तर विज्ञानाच्या बाबतीत आमची पिढी ह्या पोरांसमोर साक्षात अडाणी आहे...चंद्रावरच्या स्वारीचे माझे शिक्षण माझ्या कुटुंबातील बालगोपालांनी केले आहे. आणि हे सारे ज्ञान त्यांनी मराठी पुस्तकांतून आणि लेखांतून मिळवले आहे. मराठी परिभाषेला हसणारे लोक मराठी भाषेला मिळणाऱ्या ह्या नव्या शक्तीकडे पाहतच नाहीत..


स्रोत - अज्ञात.

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...