Monday, April 6, 2015

नाही 'भारतरत्न' तरी.. - गिरीष कुबेर

ही कहाणी आहे आपल्या सोयीस्कर स्मरणशक्तीची.. आपण सहजपणे विसरून गेलोय त्या केशव देव मालवीय यांची! सध्या 'भारतरत्न' पुरस्कारामुळे अनेकांच्या कानावर ज्यांचं नाव पडलं असेल ते पंडित मदन मोहन मालवीय, हे या केशव देवांचे काका. नरेंद्र मोदी यांना अलाहाबादमधून लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव पहिल्यांदा मांडणारे गिरिधर मालवीय हे पं. मदन मोहन यांचे नातू. पं. मदन मोहन यांनी 'बनारस हिंदु विश्वविद्यालया'ची स्थापना केली. पण केशव देव मालवीय यांचं काम तितकंच; किंबहुना त्यापेक्षाही मोठं आहे. त्यांच्या कामात हे असं हिंदु वगरे काही नसल्यानं बहुधा आपल्याला त्यांचा विसर पडला असावा. पण त्यांची आठवण जागवायला हवी..
ही १९५१ सालची घटना. पहिली पंचवार्षिक योजना पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी जन्माला घातलेली. पण तिचं गणित बिघडणार हे अगदी सुरुवातीलाच लक्षात आलं. कारण- तेलाच्या किमती. त्या काळी आपले हातपायसुद्धा हलवू न लागलेल्या अर्थव्यवस्थेत तेलासाठी २० कोटी रुपये वर्षांला खर्च करायला लागायचे. सगळे परकीय चलनातले. आपल्या त्या वेळच्या आयातीतला १५ टक्के खर्च एकटय़ा तेलाच्या आयातीवर व्हायचा. तो वाचवायचा तर एकच पर्याय होता- भारतात तेलसाठे शोधणं!

१९५६ साली 'बर्मा ऑइल' नावाच्या कंपनीला नहारकटिया आणि मोरान इथं तेलसाठे सापडले. त्याआधी तीन वर्षं 'स्टॅण्डर्ड व्हॅक्यूम ऑइल' कंपनीनं आसामात तेल उत्खनन सुरू केलं होतं. ही कंपनी म्हणजे पुढे जिचं नाव 'एस्सो' असं झालं ती! पण तरीही भारतात म्हणून तेल उत्खनन, शुद्धीकरण वगरे कामाला काही गती येत नव्हती. याचं कारण या कंपन्या. त्या आपापल्या मूळ कंपन्यांकडूनच तेल भारतात आणायच्या आणि आपल्या गळ्यात मारायच्या. या वातावरणात भारतात तेल उत्खननाचं महत्त्व पहिल्यांदा एका व्यक्तीनं जाणलं; ते म्हणजे केशव देव मालवीय!
केशव देवांना राजकारणात ओढलं मोतीलाल नेहरूंनी. केशव देव उच्चविद्याविभूषित. घरचं वातावरण हरिकथा निरूपकांचं. त्यांचे आजोबा आदी सर्व उत्तम प्रवचनकार होते. संस्कृत पंडित होते. मदन मोहन यांनाही तसंच प्रवचनकार व्हायचं होतं. पण केशव देव यांचं तसं नाही. ते त्या काळात रसायन अभियांत्रिकीचे पदवीधर होते. त्यामुळेच पंडित नेहरूंनी त्यांना नैसर्गिक साधनसंपत्ती आणि विज्ञान खात्याचं मंत्रिपद दिलं. एव्हाना मदन मोहन मालवीय आणि काँग्रेस यांचे संबंध तुटले होते. काँग्रेसच्या खिलाफत धोरणाविरोधात मदन मोहन होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली आणि माधव श्रीहरी अणे यांच्या साथीनं 'काँग्रेस नॅशनलिस्ट पार्टी'ची स्थापना केली. पण त्यात काही त्यांना यश आलं नाही. १९३७ सालीच त्यांनी राजकारण सोडलं.
.. मंत्री झाल्यावर केशव देवांनी पहिल्या दिवसापासून ध्यास घेतला तो भारतात तेल उत्खनन हाती घेण्याचा. त्यांच्याच आग्रहामुळे 'जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया'च्या अखत्यारीत पेट्रोलियम विभाग स्थापन केला गेला. भूगर्भात कुठे कुठे खनिज तेल आहे हे शोधायचं काम या विभागाकडे होतं. हे झाल्यानंतर मालवीय यांनी पुढची पाच र्वष देशाचा तेल उत्खननाचा कार्यक्रम तयार केला. पण तो राबवणार कोण? म्हणून मग हा केंद्रीय मंत्री देशभरातल्या विद्यापीठांना भेटी देऊ लागला; तरुण अभियंत्यांनी मोठय़ा प्रमाणावर या क्षेत्रात यावं यासाठी! त्यांनी शब्दश: युद्धपातळीवर तरुण अभियंते नेमले, २५० रुपयांच्या मासिक शिक्षणभत्त्यावर. काम वाढू लागल्यावर त्यांच्या लक्षात आलं की नुसतं जिऑलॉजिकलवर अवलंबून चालणार नाही. तेल उत्खननासाठी स्वतंत्र खातंच हवं. तसं ते स्थापन व्हावं यासाठी त्यांनी जातीनं पं. नेहरूंच्या मागे धोशा लावला. परंतु पंतप्रधान नेहरू दडपणाखाली होते.हे दडपण होतं अमेरिकी आणि ब्रिटिश तेल कंपन्यांचं. भारतात औषधालासुद्धा तेल सापडणार नाही, सबब भारतानं आमच्याकडूनच तेल घेत राहावं असा या कंपन्यांचा आग्रह होता. हे दोन देश कमी म्हणून की काय जागतिक बँकेनंही पंतप्रधानांना सल्ला दिला, 'तेल उत्खननात पडू नका. भारताला ते परवडणार नाही.' पं. नेहरू हा दबाव झुगारून देण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना साथ होती केशव देवांची. १९५९ साली स्थापन झालेली 'इंडियन ऑइल रिफायनरी' हा याच प्रयत्नांचा भाग. अमेरिका, ब्रिटन या दोन्ही देशांचे तज्ज्ञ भारतात तेल निघणारच नाही, असं सांगत असताना एन. ए. कालिनन नावाचे एक विख्यात भूगर्भशास्त्रज्ञ भारतात आले. ते रशियन होते आणि त्यांनी यावं यामागे प्रयत्न होते केशव देवांचे. या पथकानं भारतात पाहणी करून सल्ला दिला, 'नद्यांच्या खोऱ्यात उत्खनन हाती घ्या.. तेल सापडेल.' पण सरकारचा काही त्यावर विश्वास बसेना. त्यामुळे अमेरिकी आणि जर्मन अशा दोन तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा निर्णय झाला. या दोघांनीही सांगितलं की, तुमच्या देशात अजिबात तेल नाही. आश्चर्य हे की आपल्या नियोजन आयोगाचे सदस्यही याच मताचे होते. त्यांना वाटायचं आपल्याकडे तेल शोधणं म्हणजे वेडेपणा!
केशव देव मालवीय त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. पं. नेहरूंच्या मागे या संदर्भातली भुणभुण काही त्यांनी थांबवली नाही. शेवटी त्यांच्या आग्रहामुळे एक विभाग स्थापन केला गेला- 'ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस डायरेक्टोरेट'. १४ ऑगस्ट १९५६ या दिवशी या संस्थेच्या नावातलं डायरेक्टोरेट गेलं आणि कमिशन आलं- 'ऑइल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कमिशन'. म्हणजेच आजची 'ओएनजीसी'. मुख्य कार्यालय डेहराडून. हिमालयाचा पायथा, जेसलमेरचं वाळवंट, गुजरात, आसाम आदी ठिकाणी या विभागानं तेल उत्खनन सुरू केलं. प्रचंड नसíगक अडचणी. राजस्थान, गुजरातेत तर काम करताना 'खालून आग वर आग आग बाजुनी..' अशी स्थिती. धुळीची वादळं, अति ऊन, विंचू वगैरे.. याउलट आसामात काम करणाऱ्यांच्या पाचवीला दलदल आणि दलदलीबाहेर शरीरावर हल्ला करणारे राक्षसी डास. सोयी म्हणाल तर काहीही नाहीत. ही तरुण पोरं त्या वेळी चौदा-चौदा तास झपाटून काम करायची. प्रेरणा एकच- केशव देव मालवीय! त्यांच्या रेटय़ामुळे उत्खननाचं काम होतं राहिलं. केशव देव इतके झपाटलेले होते की देशभरच काय, जगात जिथं कुठे मदत मिळेल तिथून ती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असे.
अखेर गुजरातेत १९६० सालच्या जानेवारी महिन्यात अंकलेश्वर इथं एका विहिरीला तेल लागलं. पण ते हाताळायचं कसं, याचा काही अनुभव नव्हता आपल्या अभियंत्यांना. या तेलाआधी वायूचा असा काही झोत जमिनीतून बाहेर आला की आपले चार अभियंते आभाळातच फेकले गेले. तरीही काम थांबलं नाही. अखेर पुढच्या महिन्यात तिथून तेलगंगा वाहू लागली. तिचं स्वागत करायला थेट पंडित नेहरू आले. मालवीय यांनी या कामी किती वाहून घेतलंय हे ते पाहात होते. अडचणी, अपघात आणि आता हा अखेर तेलाचा झरा.. 
ती वाहणारी तेलगंगा पाहून पंडित नेहरूंनी त्या जागेला नाव दिलं - 'वसुधारा'. 'ओएनजीसी'च्या सर्व इमारतींचं नाव आजही 'वसुधारा' आहे ते त्यामुळे. नंतर १९७३ साली मुंबईजवळच्या समुद्रात तेल सापडलं. 'बॉम्बे हाय' नावानं ओळखल्या जाणाऱ्या तेलविहिरी त्या याच. जपानच्या मित्सुबिशी कंपनीनं त्यासाठी साधनसामग्री बनवून दिली. ही आपली पहिलीच सागरी तेल विहीर. त्यामुळेही असेल तिच्या खोदकामाचा आपला अंदाज चुकला. तेल काही निघेना. त्यामुळे मुंबईतल्या एका बडय़ा दैनिकानं त्या वेळी या साधनसामग्रीचा उल्लेख भंगार असा केला आणि हा प्रयत्न निरुपयोगी आहे हे सूचित केलं. वर्षभरानंतर ही तेल विहीर स्थिर झाली आणि तिच्यातून तेल वाहू लागलं. त्या वेळी त्या वर्तमानपत्रास खडसावण्याचं धाडस दाखवलं ते केशव देव यांनीच, मंत्री नसतानाही!
ते एव्हाना मंत्री नव्हते, कारण एका कथित प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला. कहाणी अशी, की परदेशी तेल कंपन्यांनीच त्यांच्याविरोधात कुभांड रचलं. एका खाणमालकानं काँग्रेसच्या उमेदवारासाठी १० हजार रुपयांची देणगी द्यावी अशी विनंती म्हणे मालवीय यांनी केली होती. मालवीय यांच्या स्वदेशी ऊर्जाकारणामुळे अनेक बडय़ा परदेशी कंपन्या दुखावल्या गेल्या होत्या. त्यांचा धंदा बुडाला होता. त्यामुळे त्यांच्या वतीनं हे कुभांड रचलं गेलं. त्यातलं खरं-खोटं कधीच सिद्ध झालं नाही. पण माध्यमांनी त्याचा खूप बभ्रा केला. त्यामुळे अखेर पंडित नेहरूंना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. ही घटना १९६३ सालची. 
म्हणजे तेल कंपन्यांच्या साठमारीचा इतिहास हा असा जुना आहे. जयपाल रेड्डी, त्याआधी मणिशंकर अय्यर वगरे तेल कंपन्यांनी घेतलेले बळी अलीकडचे. असो. पण या सगळ्यांपेक्षा केशव देवांचा मोठेपणा हा की मंत्रिपद गेलं तरी ते भारतीय तेल उत्खनन क्षेत्राच्या विस्तारासाठी कार्य करत राहिले. शेवटपर्यंत.. त्याचमुळे 'बॉम्बे हाय'वर परदेशी तेल कंपन्याप्रेरित टीका जेव्हा झाली; तेव्हा मंत्रिपदी नसतानाही त्यांना ती लागली आणि त्यांनी वर्तमानपत्राला आपले शब्द मागे घ्यायला लावले. तेव्हा केशव देव मालवीय हे भारतीय ऊर्जा क्षेत्राचे पितामह आहेत. त्यांचं आपण सदैव ऋणी राहायला हवं.
पण या स्मरणाचं आताच प्रयोजन काय?
कारण गेल्याच आठवडय़ात केंद्रीय तेलमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या कल्पनेतून साकार झालेला 'ऊर्जासंगम'. निमित्त होतं 'ओएनजीसी'च्या 'ओएनजीसी विदेश' या कंपनीच्या सुवर्ण महोत्सवाचं! इराण, इराक या देशांत तेलशुद्धीकरणाच्या कामाचा विचार आपण त्या वेळी केला होता, हे लक्षात घ्यायला हवं. खेरीज, 'इंडियन ऑइल'च्या १९६४ साली स्थापन झालेल्या बरौनी इथल्या तेलशुद्धीकरण कारखान्याचाही वाढदिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या 'ऊर्जासंगम'चं उद्घाटन झालं. डॅनियल एरगिनसारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा तेलतज्ज्ञ या सोहळ्यात बोलून गेला. ऊर्जा क्षेत्राचा निरीक्षक या नात्यानं 'ऊर्जासंगम'चं खास निमंत्रण होतं आणि त्याआधी तेलावर विविध पुस्तकं लिहिताना हा सर्व इतिहास कुठे ना कुठे भेटला होता. पण 'ऊर्जासंगम'च्या निमित्ताने तो ढवळून वर आला. या संगमात भारतातल्या ऊर्जा क्षेत्रासमोर पुढे काय वाढून ठेवलंय, तेलाची मागणी किती वाढणार आहे, आपण काय करायला हवं वगरे सर्व ऊहापोह झाला. हे छानच झालं.
खंत तशी एकच..
केशव देव मालवीय काही हवे तसे समोर आले नाहीत.
गेल्याच आठवडय़ात 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान केला गेला. मदन मोहनांच्या नातवांनी तो स्वीकारला. त्यानिमित्ताने मदन मोहन यांचं कार्यकर्तृत्व समोर आलं. तेही महत्त्वाचंच; पण आपल्यासारख्या ऊर्जांधळ्या समाजाला 'भारतरत्न' न मिळालेल्या दुसऱ्या मालवीयांचंदेखील स्मरण करून देणं आवश्यक वाटलं; इतकंच!

- लोकसत्ता (लोकरंग, लेख)
दि. ०५/०४/२०१५, रविवार

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...