कंबोडिया.. एक भयानक सत्य (भाग २) - संदीप कुलकर्णी

कंबोडिया.. काहीसा दुर्लक्षित आणि बराचसा अनोळखी देश.. सध्या व्हिएतनाममध्ये वास्तव्यास असलेले ‘सकाळ‘चे वाचक संदीप कुलकर्णी यांनी पर्यटनाच्या निमित्ताने कंबोडियाला भेट दिली. अंगकोरवट येथील पुरातन मंदिर पाहून परतताना एका लहानग्या विक्रेत्या मुलीने त्यांना एकतरी पुस्तक विकत घेण्याची विनंती केली.. तिचं मन राखण्यासाठी संदीप यांनी एक पुस्तक घेतलं.. ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर‘ हे ते पुस्तक..! कंबोडियात १९७५ ते १९७९ या चार वर्षांच्या कालावधीत २० लाख नागरिकांची कत्तल झाली.. त्या नरसंहारातून बचावलेल्या एका मुलीची ती आत्मकथा वाचून संदीप कुलकर्णी यांनी मग कंबोडियाचा ‘तो‘ काळा इतिहास वाचून काढला, संबंधित ठिकाणांना भेट दिली आणि त्यातील अनुभव ‘पैलतीर‘साठी शब्दबद्ध केले. हा या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा भाग.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
'किलिंग फील्ड‘ बघून मी ‘एस-२१‘कडे निघालो.. ‘एस-२१‘ हा प्रत्यक्षात तुरुंग नसून ती एक शाळा होती. ही त्या काळातील सर्वांत मोठी सरकारी शाळा होती. यात तीन मोठे ब्लॉक आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये तीन मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर पाच वर्गखोल्या आहेत. पहिल्या मजल्यावरील वर्गांत साधारणत: ६० ते ७० कैद्यांना दिवसभर डांबून ठेवले जात असे. दिवसभरात सर्व कैद्यांना फक्त मारहारणच केली जात असे. हे वर्ग जसेच्या तसे ठेवण्यात आले आहेत. अजूनही त्या वर्गांमध्ये भीषण अत्याचाराच्या खुणा आढळून येतात. या तुरुंगात चार वर्षांत ३०,००० कैद्यांना डांबून ठेवल्याची नोंद आहे. एकदा ‘एस-२१‘मध्ये रवानगी झाली, की मृत्यू अटळच! या तुरुंगात रवानगी होऊनही केवळ नशीब बलवत्तर असल्याने सात जण वाचले. यापैकी दोघांना पाहण्याचा योग आला होता. योगायोगाने, मी गेलो त्याच दिवशी ‘हिस्टरी चॅनेल‘तर्फे तिथे चित्रिकरण सुरू होते. ‘एस-२१‘मधून बचावलेल्यांपैकी दोघे जण त्या चित्रिकरणासाठी आले होते. ‘क्रूर अत्याचार होणारी जागा‘ म्हणूनच या तुरुंगाची ओळख आहे. वर्गातील फळ्यांचा उपयोग कैद्यांची नावे लिहिण्यासाठी केला गेला होता. मी शिक्षक आहे. ‘भावी नागरिक घडविणारी‘ शाळा हीच नागरिक संपविण्यासाठी वापरली गेली, हे बघून मी पुन्हा हताश झालो. सकाळपासून ‘किलिंग फील्ड्‌स‘ आणि ‘एस-२१‘ तुरुंग पाहिल्यानंतर एक प्रश्‍न सतत मनात येत होता. तो म्हणजे, त्या चार वर्षांत कंबोडियामध्ये सुरू असलेल्या या विचित्र गोष्टींचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काय पडसाद उमटत होते?
या प्रश्‍नाचं उत्तर ‘एस-२१‘मधील दोन नंबरच्या ब्लॉकमध्ये मिळाले. हा ब्लॉक म्हणजे त्या काळातील छायाचित्रांचा संग्रह आहे. लेखाच्या पहिल्या भागात नमूद केल्याप्रमाणे, पोल पोटने कंबोडियाच्या सर्व सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे बाह्य जगाशी कंबोडियाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. कुणीही देशाबाहेर जाऊ शकत नव्हता. अशा पद्धतीने देश चालविणे अवघड जाईल, हे कालांतराने पोल पोटच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने स्वीडनमधील कम्युनिस्ट पक्षाशी संपर्क साधून त्यांच्या नेत्याला कंबोडियामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. १९७८ मध्ये तब्बल चार वर्षांनंतर कंबोडियामध्ये बाहेरील देशातून पहिली व्यक्ती आली. ही व्यक्ती म्हणजे गर्नर बर्गस्त्रोम.. हा नेता दोन दिवस नोम पेनमध्ये थांबला. त्याच्यासाठी ‘खमेर रूज‘च्या अधिकाऱ्यांनी खास मेजवानीचा बेत आखला होता. सर्वत्र ‘शेतात काम करणारे‘ नागरिक त्याला दाखविण्यात आले. ‘कंबोडियाची वाटचाल एका शेतीप्रधान समाजाकडे सुरू असून सर्वजण आनंदी आहेत,‘ असे ‘खमेर रूज‘कडून भासविण्यात येत होते. या समाजबांधणीच्या नव्या प्रयोगात थोडेफार विरोधक असतीलच, त्यांची हत्या झाली; पण ती संख्या थोडीशीच होती आणि देशात सर्व आलबेल आहे, अशी त्याची खोटी समजूत काढण्यात आली. युरोपमध्ये परतल्यानंतर बर्गस्त्रोमने पोल पोट आणि ‘खमेर रूज‘चे कौतुक केले आणि संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ‘कंबोडियाचा नेता‘ म्हणून पोल पोटचे स्थान पक्के झाले. हे सर्व वाचल्यानंतर मी राग येण्याच्या पलीकडच्या अवस्थेत जाऊन पोचलो. 
अक्षरश: जड पावलांनी ‘एस-२१‘च्या बाहेर येऊन टॅक्‍सीने मी हॉटेलवर पोचलो. रात्रीच्या जेवणासाठी भारतीय रेस्टॉरंटचा शोध घेतला आणि पटकन जेवण आटोपून ‘पोल पोटचा शेवट कसा झाला‘ याचे वाचन करण्याचे ठरवले. पलीकडच्या टेबलवर असलेल्या दोन भारतीयांकडे बघून स्मित हास्य केले. त्यांनीही प्रतिसाद दिला आणि आमची चर्चा सुरू झाली. ते पुण्याचे आहेत हे समजल्यावर इंग्रजीतून सुरू झालेले संभाषण पटकन मराठीत आले. त्या भेटीमुळे स्वत:ला खूपच नशीबवान समजतो. कारण, त्या रेस्टॉरंटमध्ये ज्यांच्याशी ओळख झाली, ते भागवत कंबोडियामध्ये गेली दहा वर्षे एका स्वयंसेवी संस्थेतर्फे अहिंसा प्रसाराचे काम करतात. कंबोडियाच्या इतिहासातील माझी गोडी जाणून त्यांनी ‘खमेर रूज‘मध्ये काम केलेल्या सैनिकाची मुलाखत घ्यायला आवडेल का, असे विचारून माझा आनंद त्यांनी द्विगुणित केला. मला तर हे हवेच होते. मी लगेच होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पुन्हा भेटण्याचे ठरले. ‘त्या व्यक्तीला काय विचारावे‘ अशा अनेक प्रश्‍नांनी रात्रभर मनात गोंधळ चालू होता. त्या भेटीच्या उत्सुकतेपोटी मला नीट झोप लागलीच नाही.
सकाळी ११ वाजता ठरलेल्या ठिकाणी आम्ही भेटलो. ती व्यक्ती तशी वयस्करच होती. मेंग उन हे त्यांचे नाव. आता भागवत हे अस्सल कंबोडियन भाषेत बोलू शकतात. ते आणि त्यांचे सहकारी मनोज यांनी आमच्या मुलाखतीमध्ये द्विभाषिकाची भूमिका पार पाडली. मेंग उन ‘खमेर रूज‘मध्ये काम करत होते, तरीही त्यांना कधीच कुणाला ठार मारण्याचे काम आले नव्हते. केवळ बळजबरीमुळे त्यांना ‘खमेर रूज‘मध्ये सामील व्हावे लागले. पोल पोट तसा त्यांच्या कामावर खुश होता. कारण, त्या काळात प्रामुख्याने मासे मिळण्याचे ठिकाण हे मेंग उन यांचे गाव असल्याने त्या गावातील खूपच कमी लोक मारले गेले होते. पण त्यांच्यासमोर होणाऱ्या हत्या मेंग उन कधीच रोखू शकले नाहीत. केवळ दु:ख व्यक्त करण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीच नव्हते. ते स्वत: शिक्षित होते. तरीही चार वर्षे त्यांनी ओळख लपवून ठेवली. त्यांनी आपले बायबलदेखील एक वर्ष लपवून ठेवले. पण ‘खमेर रूज‘च्या सैनिकांना संशय आला, तेव्हा मेंग उन यांनी सगळ्यात आधी ते बायबल फाडून फेकून दिले. त्यांची दोनदा चौकशीही झाली. त्यांच्या गावातील ‘खमेर रूज‘चा अधिकारी थोडा माणुसकी जपणारा असल्याने ते थोडक्‍यात बचावले. दुसऱ्या चौकशीदरम्यान त्यांना आपला मृत्यू अटळ आहे, असेच वाटले होते. १९७७ नंतर प्रत्येक दिवस हा शेवटचाच, असे म्हणत ते जगले. आपली खरी ओळख कधीही ‘खमेर रूज‘ला कळेल, अशी त्यांची खात्री होती. त्या दरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबालाही याची जाणीव करून दिली होती. हा प्रसंग ऐकताना नकळत माझ्या अंगावर शहारे आले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ‘धर्मग्रंथ आपला जीव घेऊ शकतो‘ हे मानणे मला तर फारच जड गेले.

‘खमेर रूज‘चा अस्त!
१९७८ च्या डिसेंबरमध्ये पोल पोटने पारंपरिक शेजारी आणि शत्रू असलेल्या व्हिएतनामला विनाकारण डिवचण्यास सुरवात केली. ही पोल पोटची सर्वांत मोठी चूक होती. पण ही चूक कंबोडियन जनतेच्या पथ्यावर पडली. खऱ्या अर्थाने, पोल पोटच्या साम्राज्याचा अस्त व्हिएतनाममुळेच झाला, असे म्हणावे लागेल. डिवचल्याने चिडलेल्या बलाढ्य व्हिएतनामच्या सैन्याने कंबोडियावर आक्रमण केले. व्हिएतनामच्या सशस्र आणि शक्तिशाली सैन्यासमोर ‘खमेर रूज‘च्या निभाव लागलाच नाही. १५ ते २० दिवसांत ‘खमेर रूज‘मध्ये फूट पडली. येथील काही अधिकारी व्हिएतनामच्या सैन्यास जाऊन मिळाले. पोल पोटसह त्याचे काही निष्ठावंत थायलंड सीमेजवळील जंगलात पळून गेले.
अशा प्रकारे ७ जानेवारी, १९७९ रोजी व्हिएतनामचे सैन्य नोम पेनमध्ये घुसले आणि कंबोडियामधील भीषण अवस्था जगासमोर आली. ‘एस-21‘मधील सडलेल्या मृतदेहांची छायाचित्रे व्हिएतनामच्या सैनिकांनी प्रसिद्ध केली. आजही ही छायाचित्रे ‘एस-21‘मध्ये आहेत. पुढील एक-दोन वर्षांत संपूर्ण जगाला याची ओळख होऊ लागली. बळजबरीने खेडेगावात पाठवलेले नागरिक पुन्हा शहरात दाखल होऊ लागले. आता संपूर्ण कंबोडिया व्हिएतनामच्या अधिपत्याखाली होता. ‘खमेर रूज‘कडून फुटलेल्या काही अधिकाऱ्यांकडेच देशाची सूत्रे सोपविण्यात आली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला..

पोल पोटला कधीच शिक्षा झाली नाही..
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पोल पोटविरुद्ध खटला सुरू झाला. ‘खमेर रूज‘च्याच अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या कंबोडिया सरकारने पोल पोटच्या विरोधात कधीच सशक्त पुरावे दिले नाहीत. १९९८ पर्यंत पोल पोट थायलंड जवळील जंगलात पत्नी, एक मुलगी आणि त्याच्या काही निष्ठावंतांसोबत राहत होता. १९९० पर्यंत पश्‍चिम कंबोडियाच्या जंगलात लपून त्याच्या कारवाया सुरू होत्या. कंबोडियाच्या नव्या सरकारने पोल पोटवर कधीच सरळ खटला भरला नाही. त्यामुळे हा क्रूरकर्मा व्यवस्थित आपले जीवन जगत होता. १५ एप्रिल, १९९८ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी हृदयविकाराने पोल पोटचा झोपेतच मृत्यू झाला. आज त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या चार अधिकाऱ्यांवर नावापुरता खटला चालू असून आता फक्त दोषारोपाचा खेळ सुरू आहे.
या सर्वांनंतर माझ्या मनातून दोन विचार जातच नव्हते. एक म्हणजे, लहानपणी शाळेत आणि घरीही मोठ्यांकडून शिकवली गेलेली म्हण.. ‘जैसी करनी, वैसी भरनी‘ ही म्हण पोल पोटच्या बाबतीत पूर्णपणे खोटी ठरली. त्याला त्याच्या कर्माची फळे मुळीच भोगावी लागली नाहीत. त्याला साधे तुरुंगातही जावे लागले नाही. १९९० पासून त्याला त्याच्या राहत्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले. यापेक्षा कंबोडियाचे दुर्दैव ते कुठले!
दुसरे म्हणजे, केवळ हिंसेच्या बळावर मिळविलेले ‘पोल पोट‘चे साम्राज्य केवळ चारच वर्षे टिकले. केवळ हिंसेच्या बळावर मिळालेली सत्ता किंवा यश हे कधीच कायमस्वरूपी नसते, याची प्रखर जाणीव झाली. अर्थपूर्ण यश मिळवायचे असेल, तर अहिंसा हा महत्त्वाचा मार्ग असतो आणि हिंसेचा मार्ग चुकीचाच असतो, हे कंबोडियाचा भयानक इतिहास समजल्यानंतर अधिकच प्रकर्षाने जाणवू लागले. नकळतच, भारताला अहिंसेच्या मार्गाने मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व वाटू लागले. आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे गुपित निश्‍चितच गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गात आहे, याची मला प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. एका सशक्त आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, याचाही प्रत्यय आला. त्या काळात दुर्दैवाने कंबोडियामध्ये सशक्त नेतृत्वाचा अभाव असल्याने तो देश अमानवीय काळाकडे लोटला गेला, असा माझा निष्कर्ष होता. शेवटी ‘दे दी हमें आझादी बिना खडक बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल‘ हे बोल नकळत ओठांवर आले आणि कंबोडियाच्या अद्‌भूत भेटीमुळे एका नव्या प्रेरणेने मी ‘अहिंसा‘ या विषयाकडे पाहण्यास सज्ज झालो... 
       
- सकाळ (पैलतीर)
दि. २९/०४/२०१५, बुधवार  

Comments