Tuesday, April 28, 2015

कंबोडिया.. एक भयानक सत्य! - संदीप कुलकर्णी

मला मुळातच प्रवासाची आवड असल्याने संधी मिळेल तेव्हा पर्यटनाला जातच असतो. व्हिएतनाममध्ये येऊन मला दोन वर्षे होत आली होती. या दोन वर्षांत मी संपूर्ण व्हिएतनाम पिंजून काढला; पण शेजारचा कंबोडिया हा देश मात्र बघायचा राहून गेला होता. पेशाने शिक्षक असल्याच्या अनेक फायद्यांपैकी महत्त्वाचा फायदा हा, की भरपूर फिरता येऊ शकते. कारण, शिक्षक हा वर्षातून साधरणत: २०० दिवसच काम करत असतो. एका आठवड्याचा ‘स्प्रिंग ब्रेक‘ मिळाल्यानंतर मी कंबोडियाचा बेत आखला. ‘गुगल‘वरून माहिती घेतली. त्यावेळी अंगकोरवट येथील विष्णूचे पुरातन मंदिर पाहण्यासारखे आहे, असे समजले. सीम रिप या शहरातील अंगकोरवट मंदिर पाहून पुन्हा व्हिएतनामच्या प्रवासाला निघालो. व्हिएतनाम ते कंबोडिया हा प्रवास बसनेही करता येतो. या प्रवासामध्ये आमची बस एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबली. तिथे एक छोटी मुलगी पुस्तकांचा संच विकण्यासाठी आली होती. ‘एकतरी पुस्तक घ्या‘ अशी विनंती ती करू लागली. त्यामुळे फारसा उत्सुक नसतानाही मी तिच्याकडून एक पुस्तक घेतले. ‘फर्स्ट दे किल्ड माय फादर‘ हे त्या पुस्तकाचे नाव. 
सहज म्हणून पुस्तकाचे पहिले पान वाचले आणि चक्रावूनच गेलो. प्रवासातील पुढच्या चार तासांमध्ये ते २४० पानांचे पुस्तक मी वाचून संपवले. कंबोडियामध्ये १९७५ ते ७९ या कालावधीमध्ये प्रचंड नरसंहार झाला. त्या संहारातून बचावलेल्या एका मुलीची आत्मकथा म्हणजे ते पुस्तक. कंबोडिया म्हटले, की बहुतेकांचे आकर्षण अंगकोरवट हेच असते. माणुसकीला लाजवेल, अशा नरसंहाराकडे मात्र साहजिकच दुर्लक्षच होते. व्हिएतनामला परतल्यानंतर एकाच आठवड्यानंतर मी पुन्हा एकदा कंबोडियाला गेलो. त्या नरसंहाराशी निगडीत असलेल्या ठिकाणांना भेट देऊन त्या भयानक सत्याचा जवळून अनुभव घेतला. त्या भीषण संहारामध्ये चार वर्षांतच २० लाख नागरिक मारले गेले. त्यातील दहा लाख नागरिकांची तर अमानुष कत्तल झाली आणि उर्वरित लोक भूकबळी किंवा रोगांचे शिकार झाले. त्यावेळी कंबोडियावर खमेर रूज लोकांचे राज्य होते. ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ कंबोडिया‘च्या सदस्यांना ‘खमेर रूज‘ म्हटले जात असे. अंदाजे दहा लाख लोकांची जिथे हत्या झाली, त्यांना आता ‘किलिंग फिल्ड्‌स‘ म्हणतात. येथे ट्रकमध्ये कोंबून माणसांना आणले जात असे आणि त्यांची हत्या करून पुरले जात असे. अशा जवळपास ३०० जागा कंबोडियात आहेत आणि त्यापैकी केवळ ८५ ‘किलिंग फिल्ड्‌स‘चे उत्खनन झाले आहे. आजही हे काम सुरूच असून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सतत वाढतच आहे. या ३०० ‘किलिंग फिल्ड्‌स‘पैकी सर्वांत मोठी जागा कंबोडियाच्या राजधानीमध्येच आहे. या देशाची राजधानी फुनाम पेन्ह ही आहे. इथे आतापर्यंत दोन हजारांहून अधिक मृतांचे अवशेष सापडले आहेत. या सर्वांत मोठ्या ‘किलिंग फिल्ड्‌स‘ला भेट देण्याचे ठरविले. तत्पूर्वी, ‘खमेर रूज‘ अस्तित्वात आले कसे आणि त्यांनी या हे सर्व का केले, याची थोडक्‍यात माहिती घेऊ.
१९५३ मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कंबोडिया हा देश म्हणून उभा राहत होता. १९७० च्या दशकाच्या सुरवातीस देशात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला होता. १९७० मध्ये सिंहौक या पंतप्रधानास पायउतार व्हावे लागले. अमेरिकेच्या मध्यस्थीने लॉन नूल या लष्करी अधिकाऱ्याकडे देशाची सूत्रे सोपविण्यात आली. पण तोदेखील या भ्रष्टाचाराला आळा घालू शकला नाही. सामान्य जनतेचा, विशेषत: ग्रामीण भागातील गरीब कंबोडियन जनतेचा सरकारवर आणि सरकारी कर्मचाऱ्यांवरील राग वाढतच होता. भरीस भर म्हणून व्हिएतनाम-कंबोडियाच्या सीमेवर होणाऱ्या अमेरिकी सैन्याच्या बॉम्बहल्ल्यांमुळे तेथील जनता अधिकच संतापली. या सगळ्याचा फायदा घेत ‘कम्युनिस्ट पार्टी‘ने आपले बस्तान बसवले. त्यांचा प्रमुख होता पॉल पॉट. या पक्षाच्या सैनिकांना ‘खमेर रूज‘ म्हणून ओळखले जात असे.
१७ एप्रिल १९७५ रोजी पॉल पॉटच्या सैन्याने कंबोडियाच्या राजधानीवर सशस्त्र हल्ला करत ताबा मिळवला. यामुळे सुरवातीला अनेकजण आनंदी झाले. पण त्यांचा हा आनंद अगदी काही तासांपुरताच टिकला. कारण, त्या दिवसापासून कंबोडियन जनतेच्या आयुष्यातील सर्वांत भीषण काळाला सुरवात झाली होती. त्या काळात ३० लाख लोकसंख्या असलेले फुनाम पेन्ह हे शहर ४८ तासांत रिकामे करण्यात आले. या सर्व शहरवासीयांना बळजबरीने खेड्यांकडे नेण्यात आले. ज्यांनी विरोध केला, त्यांना सरळ ठार केले जात होते. पॉल पॉटने त्याच्या स्वप्नातला कंबोडिया प्रत्यक्षात आणायला सुरवात केली. पॉल पॉटच्या ‘खमेर रूज‘कडे जेमतेम १५,००० सैनिक होते. त्यातही प्रामुख्याने अशिक्षित आणि ग्रामीण भागातील तरुण होते. ‘शहरात राहणारा, शिकलेला, लॉन नूलच्या काळात कोणत्या ना कोणत्या प्रकारे शासनात काम करणारे, शिक्षक, वकील, डॉक्‍टर, इंजिनिअर हे आपले शत्रू आहेत,‘ अशी पॉल पॉटची ‘थिअरी‘ होती. या सर्वांची हत्या करण्याचे पॉटने आदेश दिले. त्यानंतर कोणतीही चौकशी न करता सर्व शिक्षितांच्या हत्या करण्याचे धोरण ‘खमेर रूज‘ने स्वीकारले. त्यामुळे सर्वसामान्य जनता आपली ओळख लपवायला लागली. पण त्याचा फार काही फायदा झाला नाही. एखाद्याकडे पुस्तक सापडणे, हादेखील त्याच्या शिक्षित असण्याचा पुरावा गृहीत धरला जात असे. त्यामुळे लोकांनी आपापली पुस्तके लपवली, जाळली. चष्मे असणाऱ्यांनी आपले चष्मेही फेकून दिले. पण त्यानंतर चष्मा घातल्याने नाकावर उमटणाऱ्या खुणांद्वारे शिक्षित असल्याचा निष्कर्ष काढून लोकांना ठार करण्यास ‘खमेर रूज‘ने सुरवात केली. १९७५ ते १९७६ या एका वर्षात शहरांत राहणारे जवळपास दोन लाख नागरिक मारले गेले. ‘खमेर रूज‘ने देशाच्या सर्व सीमा बंद केल्याने या कालावधीत कुणीही देशातून बाहेर पळून जाऊ शकत नव्हता. विमानतळ, बस, रेल्वे या सगळ्या सेवा पूर्णपणे बंद केल्या होत्या. मारल्या गेलेल्यांचा दोष एकच.. त्यांना लिहिता-वाचता येत होते किंवा ते शहरात राहत होते.
‘खमेर रूज‘च्या काळात पॉल पॉटने सर्व प्रकारच्या उत्सवांवर बंदी घातली होती. प्रेम, भावना आणि धर्माच्या कुठल्याही गोष्टीवर त्याच्या राज्यात बंदी होती. सर्वांना सारखेच कपडे घालण्याची सक्ती होती. हा ‘गणवेश‘ म्हणजे काळा शर्ट, काळी पॅंट आणि लाल मफलर. ‘शिक्षण घेतल्याने आपली विचारसरणी लोकशाही व स्वातंत्र्यास अनुकूल होते,‘ असे सांगत पॉटने शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ बंद केले. ‘कंबोडियामध्ये सर्वजण फक्त तांदुळाचीच शेती करतील आणि प्रत्येकाला दिवसभरात दोन वाटी भात असाच आहार मिळेल,‘ असाही आदेश लागू करण्यात आला. ‘खमेर रूज‘च्या राज्यात सर्वजण सकाळी ७ ते सायंकाळी ७ शेतात काम करतील, हा नियम होता. या दिनक्रमात दुपारी एका तासाची सुटी असे. ‘दिवसभरात मिळणारे अन्न खाऊन काम करण्याची ताकद आपल्यात असलीच पाहिजे; अन्यथा मरायला तयार राहा‘ असा वटहुकूमच पॉल पॉटने काढला होता. या व्यवस्थेला विरोध करणाऱ्याची हत्या निश्‍चित होती. सर्वांनी एकत्रच राहायचे, असाही आदेश होता. त्यामुळे वैयक्तिक घर, मालकी हक्क वगैरे गोष्टी पूर्णपणे नामशेष झाल्या होत्या. कंबोडियाचे चलनही पूर्णपणे नष्ट झाले होते. पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या झोपड्यांमध्ये राहायच्या. अशा प्रकारचे अत्याचार सतत चार वर्षे सुरू होते. त्यातच शिक्षित लोक सापडले, की त्यांच्या हत्या करण्याचे सत्रही सुरूच होते. पण या हत्या करण्यासाठी बंदुकीच्या गोळ्या ‘खर्च‘ होत होत्या. त्यावेळी पिकवलेल्या तांदुळाचा मोबदला म्हणून चीनकडून कंबोडियाला शस्त्रास्त्रे मिळत असत. बंदुकीच्या गोळ्या महाग असल्याने ‘मिळेल त्या हत्याराने हत्या करा‘ असा आदेश पॉल पॉटने ‘खमेर रूज‘ला दिला. त्यामुळे ‘खमेर रूज‘च्या सैनिकांनी कुदळ, फावडे, सुरे यांनीही हत्या करण्यास सुरवात केली. ही हत्यारे आजही फुनाम पेन्हमधील वंशसंहाराच्या संग्राहलयात पाहता येतात. यातील बहुतांश हत्या ‘किलिंग फिल्ड्‌स‘मध्ये केल्या जात असत.  
फुनाम पेन्हमधील एक एकराच्या ‘किलिंग फिल्ड‘मध्ये गेल्यावर प्रथम मी घाबरलोच. एरवी स्मशानभूमीत जातानाही आपण थोडा विचार करतो. ही स्मशानभूमी तर २० हजार प्रेतांची आहे आणि या सर्वांना केवळ चार वर्षांतच ठार मारण्यात आले आहे! या ‘किलिंग फिल्ड‘मध्ये एकूण १३ ‘विशेष जागा‘ आहेत. इथे फिरताना आपल्याकडे एक रिमोट दिला जातो. प्रत्येक ‘स्पॉट‘वर गेल्यानंतर या रिमोटने त्या जागेचा क्रमांक दाबला, की ‘रनिंग कॉमेंट्री‘ सुरू होते. प्रत्येक ठिकाणी काय व्हायचे, याचे वर्णन त्यात केले जात असे. तिथे असलेले ‘स्पॉट‘ खालीलप्रमाणे : 
१. ट्रक स्पॉट : ज्यांची हत्या करायची आहे, त्यांना ट्रकमध्ये भरून आणायचे आणि या ‘स्पॉट‘वर उतरवायचे. 
२. डार्क अँड ग्लूमी डिटेन्शन : सहसा येथे दिवसा उजेडी कैद्यांना आणले जात असे. त्यांना रात्री ठार मारले जायचे. दिवसभर त्यांना या अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवले जात असे. 
३. वर्किंग ऑफिस : ज्यांची हत्या होणार आहे, त्यांच्या नोंदी इथे ठेवल्या जात असत. 
४. केमिकल सब्स्टन्स स्ट्रॉंग रूम : मृतदेहांचा वास येऊ नये म्हणून त्यांच्यावर डीडीटी फवारले जात असे. त्याचा साठा या खोलीत असे. 
५. मास ग्रेव्ह १ : या खड्ड्यात ४५० मृतदेह सापडले. 
६. मास ग्रेव्ह २ : या खड्ड्यात १६६ मृतदेह सापडले. 
७. मास ग्रेव्ह ३ : या खड्ड्यात २०० मृतदेह सापडले. 
८. वॉक ऑन द हॉरर लेक : या तळ्यात अनेक मृतदेह फेकले गेले. त्यातील २०० हून अधिक मृतदेह तरंगत होते. तळ्यात असलेले असंख्य मृतदेह अद्यापही बाहेर काढण्यात आलेले नाहीत.
९. आणि १० ग्लास बॉक्‍स १ आणि २ : येथे ठार मारण्यात आलेल्यांचे कपडे होते. 
१०. चायनीज सेरेमोनियल किओस्क 
११. सर्व्हायव्हर स्टोरी 
१२. मास ग्रेव्ह ४ : या खड्ड्यात डोके उडवलेले १५० मृतदेह सापडले
१३. या ‘किलिंग फिल्ड‘मधील हृदय हेलावणारी जागा म्हणजे ‘किलिंग ट्री‘! : माणूस किती नीच पातळीपर्यंत जाऊ शकतो, याचा अनुभव इथे उभे राहिल्यानंतर येतो. तान्ही बाळं, एक-दोन वर्षांच्या मुला-मुलींना मारण्यासाठी या झाडाच्या खोडाचा उपयोग केला गेला. लहान मुलांना मारण्याचेही पॉल पॉटने विचित्र समर्थन केले होते. ‘एखाद्या कुटुंबातील एका व्यक्तीला मारले, तर ते संपूर्ण कुटुंब संपवलेच पाहिजे. ही लहान मुले सोडून दिली, तर भविष्यात ते बदला घेऊ शकतील,‘ अशी त्याची धारणा होती. या झाडासमोरील ‘कॉमेंट्री‘ ऐकताना मी नकळतच रडू लागलो होतो. आतापर्यंत शंभराहून अधिक लहान मुलांचे सांगाडे येथे सापडले आहेत. ‘खमेर रूज‘च्या एका अधिकाऱ्याने २००९ मध्ये न्यायालयात या हत्यांची जबाबदारी स्वीकारली. त्याची कबुली या ‘कॉमेंट्री‘मध्ये ऐकता येते. ते ऐकल्यानंतर ‘तो अधिकारी माणूस तरी असेल का‘ हाच प्रश्‍न मनात येतो. माझे अश्रू थांबतच नव्हते. तिथल्या एका पर्यटकाने मला सावरले.

येथील एका झाडाचे नाव ‘मॅजिक ट्री‘ आहे. याला असे का म्हटले जाते, हे समजले नाही. ‘खमेर रूज‘चे सैन्य रात्री हत्या करत असे, तेव्हा ‘ग्लूमी डार्क रूम‘मध्ये डांबून ठेवलेल्यांना किंचाळण्याचा आवाज ऐकू जाऊ नये, म्हणून या झाडावर ध्वनिवर्धक टांगून ‘खमेर रूज‘च्या ‘वैभवशाली‘ परंपरेचे गीत मोठ्या आवाजात लावले जात असे. ‘कॉमेंट्री‘मध्ये ते गीत सुरू झाले, तेव्हा छातीत धडकीच भरली. 
शेवटचा ‘स्पॉट‘ म्हणजे ‘मेमोरियल स्तूप‘! उत्खननामध्ये सापडलेले मानवी सांगडे, कवट्या, हाडे हे सर्व काचेच्या एका उंच कपाटात ठेवण्यात आले आहे. त्यात पुरुष, स्त्रिया, लहान मुले, त्यांना कोणत्या पद्धतीने ठार करण्यात आले अशा विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वेक्षणानुसार, त्या चार वर्षांमध्ये दर चार कंबोडियन नागरिकांपैकी दोघे मारले गेले. 
ही भयानक ‘किलिंग स्पॉट्‌स‘ बघितल्यानंतर मी पॉल पॉटचा खासगी तुरुंग पाहण्यास गेलो. इथे कैद्यांचा अमानुष छळ केला जात असे आणि तेथून ‘किलिंग फिल्ड्‌स‘मध्ये पाठविले जात असे. इथे एक विचार सतत मनात येतो.. आपल्याच देशातील नागरिकांचा बळी घेणाऱ्या ‘खमेर रूज‘च्या सैनिकांची माणुसकी चार वर्षांसाठी इतक्‍या खालच्या थरास कशी गेली? आतापर्यंतच्या वाचनानुसार, माझे मत असे होते की जर्मनीत हिटलरने केलेला नरसंहार हा ठाऊक असलेल्या सर्वांत मोठा आणि भयानक होता. पण कंबोडियात पॉल पॉटने केलेला संहार हिटलरपेक्षा कैकपटीने मोठा आणि भीषण होता. या संहारामध्ये ज्यांनी मारले आणि मेले ते एकाच देशाचे नागरिक होते. त्यांचा धर्म, भाषा, त्वचेचा रंग, संस्कृतीही वेगळी नव्हती. फरक एवढाच, की मारले गेले ते शिकलेले होते आणि ज्यांनी मारले ते अशिक्षित. मी स्वत: व्यवसायाने शिक्षक असूनही पहिल्यांदाच असे वाटले, की शिक्षणानेही आपला जीव जाऊ शकतो. त्या काळात कंबोडियातील जनता शिकली नसती, तर कदाचित त्यांचे जीव वाचलेही असते, हा विचारही तरळून गेला. आयुष्यात प्रथमच मला अशिक्षित असण्याचा ‘फायदा‘ जाणवत होता.
(क्रमश:)
 
 

- सकाळ (पैलतीर)
दि. ०८/०४/२०१५, बुधवार
 
   

1 comment:

  1. i m relay shock when i read this thanks for publish

    ReplyDelete

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...