Monday, February 23, 2015

शास्त्रांचे उंबरठे ओलांडून.. - मिलिंद थत्ते

हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट अतिप्रसिद्ध आहे. ही गोष्ट पुन्हा सांगण्याची गरज नाही, पण ही घडते मात्र वारंवार. डॉ. जगदीशचंद्र बसूंचे आपण जेमतेम नाव ऐकलेले असते. टिळकांचे जसे एकच वाक्य आपल्याला माहीत आहे, तसे डॉ. बसूंचेही - ‘वनस्पतींना भावना असतात’. त्यांनी शास्त्रात जी क्रांती घडवली त्याविषयी आपल्याला सूतराम माहिती नाही. त्यांनी भौतिकशास्त्रातल्या नियमांनी जीवशास्त्रातल्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या. शास्त्रा-शास्त्रात त्यावेळी कठोर भिंती होत्या, अगदी जातिपातीसारख्या. आमच्या शास्त्रातले याला काय कळते, अशी डॉ. बसूंची हेटाळणी त्या शास्त्रातल्या ब्रह्मवृंदांनी केली होती. बसूंच्या संशोधनानंतर खूप वर्षांनी त्यांची महती मान्य झाली. शास्त्राशास्त्रातल्या भिंती काहीशा ढासळल्या. आपल्याच शास्त्राच्या चष्म्यातून सत्य काय ते दिसते या धारणेतून शास्त्रज्ञ बाहेर येऊ लागले. आता याची पुढची पायरी गाठणे गरजेचे आहे.
नैसर्गिक शास्त्रे आणि समाजशास्त्रे यात अजूनही अस्पृश्यता आहे. ‘विहीर’ चित्रपटातला एक छान संवाद आहे - ‘‘आयुष्याला पाने तीन, आर्ट्स, कॉर्मस आणि सायन्स.’’ या तिन्हींचा आपापसात काही संबंध नाही, एकात शिरलेल्याला दुसरीकडे जाता येत नाही अशी आपली पक्की व्यवस्था. एका जातीत जन्म झाला की दुसर्‍यात जाता येत नाही तसेच हे. अनेक संशोधने घडतात, ती एकांगी शास्त्रअभ्यासातून. अणुबॉम्बचा शोध हा शास्त्रातला मोठा शोध होता. अणुबॉम्बचा शोध लावणार्‍या शास्त्रज्ञांना आपलं हे बाळ किती विध्वंस करू शकतं हे एकदा पाहण्याची मोठी उत्सुकता होती. त्यांच्या त्या संशोधनाची आणि उत्सुकतेची मोठी किंमत जगाला मोजावी लागली. जपाननं तर किंमत मोजलीच, पण आताही अनेक राष्ट्रे मोठा खर्च अण्वस्त्रसज्जतेवर करतच आहेत. तीही किंमत आहेच. आपल्या शास्त्राचे, नवोन्मेषाचे समाजावर काय परिणाम होणार आहेत याची जाणीव शास्त्रज्ञांना असायलाच हवी.
एका बाजूला शास्त्रज्ञांचे समाजांधळेपण, तर दुसर्‍या बाजूला समाजाचे अभिसरण घडवणार्‍या कार्यकर्त्या मंडळींमध्ये शास्त्राविषयी हेटाळणीचा भाव असतो. ‘त्यांना प्रयोगशाळेच्या बाहेरचं काय कळतंय’ असं म्हटलं जातं. ‘सगळं ज्ञान लोकांजवळच असतं’ असंही म्हटलं जातं. पारंपरिक ज्ञान लोकांकडे असतं हे खरंच आहे; पण बदलत्या काळात जेव्हा मृगात मृगासारखा पाऊस पडत नाही, जमिनीत शिरलेल्या रसायनांमुळे वनस्पतींमधल्या काही गुणांची हानी झाली आहे, तेव्हा पारंपरिक ज्ञानाची मात्रा लागू पडतेच असं नाही. उदंड जंगल असताना शेतीतल्या राबासारख्या काही रिती रूढ झाल्या. जमिनी मोकळ्या असताना फिरती शेती परवडण्याजोगी होती. आता जंगल आणि जमिनी दोन्हीचे माप आटले आहे. आता जुन्या नुस्ख्यांवर अवलंबून राहणे कसे परवडेल? यामुळे परंपरेचे एकांगी प्रेम हेही समाजशास्त्र्यांना सोडणे भाग आहे. आमच्या जवळचे एक उदाहरण आहे. सरपणावर चूल पेटते आणि अन्न शिजते. देशातले ७५ टक्के लोक आजही अन्न शिजवण्यासाठी सरपणावर अवलंबून आहेत. आमच्या अनुसूचित क्षेत्रात तर ८२ टक्के लोक सरपण वापरतात. हे सरपण कमी लागावे म्हणून काही शास्त्रज्ञांनी फार मौलिक संशोधन केले आहे. चुलीत एकेक करत त्यांनी बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. अशा सर्व सुधारणा करून तयार झालेल्या चुलीत सरपण खूपच कमी लागते, पण तरीही या चुली ग्रामीण भागात लोकप्रिय झाल्या नाहीत. अशी एक चूल मीही गेली दोन वर्षे वापरतो आहे; पण आमच्या गावातल्या एकानंही अशी चूल हवी असं म्हटलं नाही. 
काय असेल लोकांचं कारण? 
ही चूल कार्यक्षम असल्यामुळे उष्णता अजिबात बाहेर जात नाही. म्हणजे या चुलीचा थंडीत-पावसात शेकायला उपयोग नाही. पावसाळ्यात जेव्हा कपडे वाळत नाहीत, तेव्हा चुलीवर एक चौकोनी शिंकाळे टांगून कपडे वाळवतात. तोही उपयोग या चुलीचा नाही. चुलीत फार सुधारणा केल्यामुळे या चुलीची किंमतही फार झाली आहे. त्यात सरकार किंवा एखाद्या संस्थेने सवलत दिली, तर किंमत उतरते खरी; पण आताची चूल तर पूर्ण फुकट आहे की! आताच्या चुलीत सरपण थोडं जास्त लागतं, लागू दे की, तेही फुकटच आहे. असं लोकांचं डोकं चालतं. सरपण वाचवण्याची गरज नेमकी कोणाला आहे, असा प्रश्न पडतो. 
ज्यांनी चुलीचं इतकं चांगलं भौतिकशास्त्रीय संशोधन केलं, त्यांनी जमिनीवरचं समाजशास्त्रही लक्षात घ्यायलाच हवं. आपल्या देशात गुणवत्तेपेक्षा पैसा वाचवणं महत्त्वाचं मानलं जातं. हे अर्थशास्त्रही समजायला हवं. म्हणून जगदीशचंद्रांची आठवण येते. शास्त्रांनी दरवाजे उघडून लोकांजवळ यावं, समभावानं एक प्रकाश शोधावा, तर खरी मजा येईल!
(लेखक समावेशक विकासासाठी काम करणार्‍या ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)
- लोकमत
दि. २३/०२/२०१५

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...