Wednesday, February 18, 2015

पुलं पोस्टात; गदिमा मामलेदार कचेरीबाहेर...! - शरद पवार

बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर मी नेहमीच माझ्या मतदारसंघातल्या सर्व घटकांमधल्या लोकांच्या भेटी वेगवेगळ्या कामांच्या निमित्तानं घेत असे. पुण्यापासून जवळच असलेल्या बारामतीत होणाऱ्या साहित्य, कला, संगीत, नाटक आदी उपक्रमांमध्येही मी बारकाईनं लक्ष घालत असे व अशा संस्थांमधून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमागं उभा राहत असे. त्या काळी सर्व छोट्या-मोठ्या शहरांमध्ये ‘सानेगुरुजी कथामाला’ हा कार्यक्रम उत्साहात साजरा होई. आमच्या बारामतीच्या ‘सानेगुरुजी कथामाले’च्या एका मोठ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ख्यातनाम कवी-गीतकार ग. दि. माडगूळकर आणि सिद्धहस्त साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना एकत्रितपणे आमंत्रित केलं होतं. ठरल्याप्रमाणे कथामालेचा कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीनं पार पडला. या मोठ्या पाहुण्यांसाठी माझ्या घरीच दुपारच्या भोजनाची व्यवस्था केलेली होती. त्याप्रमाणे कार्यक्रम संपवून आम्ही घरी आलो. भोजनाची सर्व तयारी झालेली होती. पानंसुद्धा घेतलेली होती. तर्कतीर्थांच्या पानाभोवती सुरेख रांगोळी घातलेली होती आणि पानात सर्व शाकाहारी पदार्थ वाढलेले होते. बाकी आम्हा सगळ्यांच्या ताटांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांची रेलचेल होती. जेवण सुरू करण्यापूर्वी तर्कतीर्थांनी मला जवळ बोलावलं आणि विचारलं - ‘‘हा ‘पंक्तिप्रपंच’ कशासाठी? तसं बघितलं तर, तुमच्या पानात जे वाढलेलं आहे, तेही चालतं आम्हाला आणि जमलंच तर आम्ही घेतोसुद्धा!’’ हे ऐकून तर्कतीर्थांचं ताट बदलण्यात आलं. तर्कतीर्थ स्वत-च्या वाहनानं बारामतीला आलेले होते. त्यामुळं त्यांची परतीची सोय झालेली होती; परंतु गदिमा ऊर्फ अण्णा आणि पुलं यांना पुण्याला पोचवायचं होतं. त्या वेळी माझ्याकडं स्वत-ची जीपगाडी होती; परंतु एवढ्या थोरा-मोठ्यांना जीपनं प्रवास घडवावा, याबद्दल मला थोडा संकोच वाटत होता. गावातले माझे एक सहकारी भगवानराव काकडे बऱ्यापैकी सधन होते आणि त्यांच्याजवळ एक चांगली मोटारगाडीही होती. मी त्यांना विनंती केली - ‘‘आपण तुमच्या गाडीनं पाहुण्यांना पुण्यापर्यंत सोडू या.’’ माझे पाहुणे म्हटल्यानंतर साहजिकच काकडे यांची कल्पना अशी झाली, की कुणीतरी फार मोठी माणसं असली पाहिजेत. काकडे लगेच तयार झाले आणि आम्ही गदिमा व पुलं यांना घेऊन पुण्याकडं निघालो. काकडे स्वत-च गाडी चालवत होते आणि मी पुढच्या सीटवर त्यांच्या शेजारी बसलो होतो. प्रवास सुरू झाला तशी काकडे यांनी पाहुण्यांची विचारपूस करायला सुरवात केली. त्यांनी पहिलाच प्रश्न टाकला - ‘‘कोणच्या गावाकडचं म्हणायचं?’’ 
‘‘आम्ही पुण्यालाच असतो,’’ असं उत्तर दोघांनीही दिलं. त्यांचा पुढचा प्रश्‍न - ‘‘काय काम करता?’’ आता या प्रश्नाचं उत्तर काय येईल, याबाबत मी थोडासा धास्तावलोच होतो; तर अण्णांनी म्हणजे गदिमांनी उत्तर दिलं - ‘‘आम्ही लिव्हतो.’’
त्यांचा परत प्रश्न आलाच - ‘‘कुठं पोस्टाबाहेर बसता की मामलेदार कचरीसमोर?’’ आता संभाषणाची सूत्रं पुलंनी स्वत-कडं घेतली आणि सांगितलं - ‘‘मी पोस्टात बसतो आणि हे (गदिमा) मामलेदारांच्या कचेरीबाहेर बसतात.’’ काकडे यांचं समाधान अर्थातचं झालेलं नव्हतं.
त्यांनी पुन्हा विचारलं - ‘‘काय, घरदार चालंल इतकं पैसं मिळतात का ?’’
पुलंनी लगेच उत्तर दिलं - ‘‘लोक आम्हाला लिहिल्याचे बऱ्यापैकी पैसे देतात.’’ काकडे यांच्या शंका अद्यापही संपलेल्या नव्हत्या. त्यांनी पुढं विचारलं - ‘‘तुम्ही या एवढुशा कामाचे  लोकांकडून फार पैसं घेत असला पाहिजे. आवं, जरा विचार करा...काय एक-दोन-चार तर कागद लिव्हायचे आन्‌ किती पैसं घ्यायचे? बरं, तुम्ही पडला शिकली-सवरलेली माणसं आणि तुमच्याकडं कागद लिव्हायला येणारा अडाणी, गरीब. हे काय बरोबर नाही. तुमचं सगळं शिक्षण तर सरकारच्या पैशातच व्हतं ना; मग थोडं माणुसकीनं वागा की राव. कशाला गरिबांचे तळतळाट घ्यायचे?’’ हे सगळं ऐकून महाराष्ट्राचे ते दोन मोठे साहित्यिक, अर्थातच गदिमा आणि पुलं, एकमेकांकडं बघून हसत होते. मीही या संभाषणात माफक सहभाग दाखवून शांतपणे बसलो होतो.

...आणि पी. सावळाराम नगराध्यक्ष झाले!

वसंतराव नाईकसाहेबांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात वसंतदादा पाटील हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. मी स्वत- प्रदेश सरचिटणीस म्हणून सर्व काम बघत असे आणि दिवसभर मी दादरच्या टिळक भवन कार्यालयातच असायचो. एके दिवशी टिळक भवनामध्येच मला सायंकाळी चार वाजता प्रदेशाध्यक्ष वसंतदादांचा फोन आला. दादांनी मला फोनवर सांगितलं, की सायंकाळी चार वाजता ते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी जाणार आहेत आणि मीसुद्धा वेळेवर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोचावं.
कुठल्या संदर्भात ही बैठक आहे, याची मला काहीही माहिती देण्यात आलेली नव्हती. ठरल्या वेळी मी ‘वर्षा’वर पोचलो...तर आत नाईकसाहेब, वसंतदादा व ग. दि. माडगूळकर बसलेले होते. गदिमा त्या वेळी विधान परिषदेचे सदस्यही होते. आता या तिघांच्या बैठकीत मला कशासाठी बोलावलं असावं, हे काही मला कळेना ! साधारणत- सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या, की प्रचारसाहित्यासाठी गदिमांची मदत घेतली जात असे; पण निवडणुका तर अजून खूपच लांब होत्या. 
मला वसंतदादांनी सांगितलं - ‘‘एका महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुझ्यावर सोपवायची आहे. आज संध्याकाळी तू ठाण्याला मुक्कामाला जायचं. दोन दिवसांनी ठाण्याच्या नगराध्यक्षांची निवड होणार आहे. ठाणे नगरपालिकेत आपलं बहुमत नाही. आपल्याला बरीच मतं कमी पडतायत; पण प्रयत्नांची पराकाष्ठा कर आणि आपला अध्यक्ष होईल, याची काळजी घे.’’ विचारलं - ‘‘उमेदवार म्हणून कुणाचं नाव नक्की केलं आहे का? की तिथल्या सदस्यांमधून निवड करण्याची प्रक्रिया राबवायची आहे? याबाबतीत मी काय करावं, हेही सांगावं.’’ खरं म्हणजे माझ्या प्रश्नावर मला वसंतदादांकडून उत्तर अपेक्षित होतं; पण गदिमा ऊर्फ अण्णांनीच उत्तर द्यायला सुरवात केली. आता अण्णा निवडणुकीच्या उमेदवाराबद्दल काही सांगत आहेत, हे लक्षात आल्यावर मला थोडंसं आश्‍चर्यचकित व्हायला झालं. 
अण्णा म्हणाले - ‘‘अरे, आपल्या ठाण्याच्या पालिकेत आमचा एक सहकारी निवडून आला आहे आणि तोच अध्यक्ष झाला पाहिजे, अशी तयारी करावयाची आहे. त्या उमेदवाराचं नाव सावळाराम पाटील! हे सावळाराम पाटील माझ्या सांगली जिल्ह्यातले असून, इस्लामपूर तालुक्‍यात येडं मच्छिंद्र म्हणून एक गाव आहे, तिथले ते रहिवासी. आमच्या या भागानं दोन मोठी माणसं पाहिली आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील आणि दुसरे सावळाराम पाटील.’’ बैठक संपवून मी निघालो. माझी खात्री होती, की मतांची जुळवाजुळव काही सोपी नाही. खरंतर अशी निवडणूक हे अण्णांचं काम नव्हे; परंतु त्या काळी महाराष्ट्रात कुठल्याही गावापासून शहरापर्यंत विवाहाच्या प्रसंगी शेवटी बॅंडवर ‘जा, मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गीत हमखास वाजवलं जायचं. या अत्यंत लोकप्रिय अशा गीताचे रचनाकार म्हणजेच हे सावळाराम पाटील ! पुढं ते ‘पी. सावळाराम’ म्हणून ख्यातनाम झाले. मी त्यांची गाणी गुणगुणतच ठाण्यात दाखल झालो. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते प्रभाकर हेगडे, वसंतराव डावखरे आणि इतर सहकाऱ्यांसमवेत मी त्या वेळी तासन्‌तास बैठका घेतल्या.
या सगळ्यांशी माझ्या भेटी-गाठी सतत दोन दिवस सुरूच होत्या. तिसऱ्या दिवशी रीतसर निवडणूक झाली आणि आमचे उमेदवार सावळाराम पाटील विजयी झाले. ठाण्याच्या पालिकेतूनच मी वसंतदादांना फोन लावला व निकाल सांगितला आणि विजयी नगराध्यक्षांना भेटीला घेऊन यायचं आहे, असंही सांगितलं.  वसंतदादांनी मला सांगितलं - ‘‘त्यांना घेऊन तू ‘वर्षा’वरच ये. माडगूळकर अण्णांनासुद्धा मी बोलावून घेतो.’’ आम्ही फुलांचा गुच्छ घेऊन ‘वर्षा’वर पोचलो. नाईकसाहेब, वसंतदादा आणि गदिमा एकत्र बसलेलेच होते. आत गेल्यावर गदिमांनी गुच्छ माझ्या हातातून घेतला आणि पी. सावळाराम यांना दिला आणि त्यांना आनंदानं घट्ट मिठी मारली. नंतर गदिमांनी मला जवळ बोलावून घेतलं. पाठीवर एक जोरकस थाप मारली आणि ते मला म्हणाले - ‘‘गड्या, आज फार मोठं काम केलंस तू...येड्याचा पाटील तू थेट ठाण्याचा अध्यक्ष केलास. शाब्बास रे बहाद्दरा...!’’

- सकाळ (सप्तरंग)
दि. १५/०२/२०१५, रविवार

2 comments:

  1. फारच छान. पण एक सांग मला, हे तू लिहितोस कि बाकीच्या वर्तमानपत्रात वाचलेले इथे post करतोस?

    ReplyDelete
  2. ह्या ब्लॉग वरचे सर्व लेख, कविता ह्या मी कुठे न कुठे तरी वाचलेल्या आहेत. इथे फक्त post करतो जेणे करून बऱ्याच लोकांपर्यंत ते पोहोचेल :)

    ReplyDelete

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...