Wednesday, February 11, 2015

आठवणीतलं बेळगाव - अनिल पवार

रोजच्या रामरगाड्यात बऱ्याच गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. कळत-नकळत त्याकडं दुर्लक्ष होतं. मग कधी थोडी उसंत मिळाल्यानंतर कपाट आवरायला घ्यावं अन्‌ जुना अल्बम हाताला लागावा, तसं आज झालंय. अल्बम जुना झालेला असतो, कधी त्यावर थोडी धूळ साचलेली असते, फोटोंचे रंग विरळ झालेले असतात, काही फोटोंतील माणसं, संदर्भ पटकन लक्षात येत नाहीत... पण फोटोवरून हलकेच हात फिरवताना, अल्बमची पानं पलटताना मन मागं धाव घेऊ लागतं अन्‌ कॅमेऱ्यात बंदिस्त झालेले ते क्षण लख्ख होऊन समोर उभे राहू लागतात. कृष्णधवल रंगातील त्या फोटोंच्या आठवणी मात्र रंगीबेरंगी असतात... पुस्तकात जपून ठेवलेल्या मोरपिसासारख्या... बेळगावच्या आठवणी या अशा आहेत.
बाकी कोणत्याही आठवणींपेक्षा लहाणपणीच्या आठवणींचा ठसा- मग त्या कोणत्याही असोत, आपल्या मनावर अधिक खोलवर उमटतो, टिकून राहतो. साहजिकच आपल्या बालविश्‍वात गहिरे रंग भरलेल्या, आपल्यावर कळत-नकळत संस्कार केलेल्या, मूल्यांचा, चांगल्या गोष्टींचा वारसा दिलेल्या माणसांविषयी, घराविषयी, गावाविषयी आपण नेहमीच कृतज्ञ राहतो, राहायला हवं. आपल्या माणूसपणाची ती खूण असते. बेळगावनं अशा खुणा आजही जाग्या ठेवल्या आहेत. त्यांना बेळगावच्या लाल मातीचा गंध आहे आणि तिथल्या पाण्याची चवही. बेळगावच्या लोण्यासारखीच तिथली माणसंही अस्सल आणि तिथल्या कुंद्याइतकीच गोड! खास बेळगावी भाषेत बोलणाऱ्या या माणसांच्या वागण्यात सहजता आणि आपलेपणा ठायीठायी आहे.
तेव्हा आजही बेळगाव म्हटलं, की डोळ्यांपुढं येतं आणि आठवत राहतं, ते लहानपणीचंच बेळगाव. त्याच्या आठवणी साहजिकच घरापासून सुरू होतात. वीसेक जणांचं एकत्रित कुटुंब, लाल कौलांचं भलंथोरलं तीन मजली घर आणि दारात फुलांनी बहरलेला मोठा मांडव यामुळं गल्लीत आमचं घर उठून दिसायचं. एकाच घरात राहात असलो, तरी प्रत्येक काकांचा संसार स्वतंत्र होता. चुलत भावंडांमुळं आणि माणसांचा राबता यामुळं घर नेहमीच भरलेलं असे. आईला स्वच्छता अतिशय प्रिय. तिच्या हाताला विलक्षण चव होती. हा वारसा तिला तिच्या आईकडून मिळाला होता. आमचे खाण्यापिण्याचे सगळे लाड तर आईनं पुरवलेच, पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे परिस्थितीची जाणीव ठेवून शहाणपणानं वागण्याचे मोलाचे संस्कारही केले. वडील मराठा मंडळ्‌स हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होते. शिवाय सामाजिक कार्याबरोबरच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कामातही त्यांचा सहभाग असे. या सगळ्यामुळं त्यांचा दिनक्रम व्यग्र असे, पण त्यातूनही वेळ काढून रात्री "गंमत जंमत ऐका ले,‘ "घेईरे सोनुल्या घास प्रीतीचा,‘ अशी बालगीतं ते आम्हाला ऐकवायचे. माझी लेक लहान असताना तिला ती ऐकवून त्यांच्या आठवणींना अन्‌ माझ्या बालपणाला मी कितीदा तरी उजाळा दिला आहे. वडिलांच्या हायस्कूलचं ग्रंथालय म्हणजे वाचनाची आवड असलेल्यांसाठी खजिनाच होता. तिथल्या गोष्टींच्या नव्या कोऱ्या पुस्तकांनी, "अमरकथा‘च्या संस्कारक्षम चित्रकथांनी वाचनाची गोडी लावली; तर वेताळच्या कॉमिक्‍सनी अद्‌भुत दुनियेची सफर घडविली. बालपणीचा काळ खऱ्या अर्थानं सुखाचा करण्याचं काम या सगळ्यांनी केलं.
 घर हे भाचरांसाठी सगळ्याच बाबतीत कौतुक करून घेण्याचं हक्काचं ठिकाण असतं. त्यात नातवांचे लाड करणारी आजी असली, तर दुधात साखरच. बेळगावपासून पाऊण तासाच्या अंतरावरील कडोलीत एसटी बसमधून उतरल्यानंतर मामाचं घर गाठेपर्यंत आम्हाला दम नसायचा. तिथं स्वयंपाकघरात शेणानं सारवलेल्या छोट्या ओट्यावर बसून चुलीपुढं बसलेल्या आजी किंवा मामीच्या हातची तांदळाची गरम भाकरी आणि अंड्यांची कोशिंबीर (म्हणजे आताच्या भाषेत बुर्जी) पितळी थाळीत घेऊन खाणं यासारखा परमोच्च आनंद दुसरा नसायचा. आंब्याचा, वाटाण्याच्या शेंगांचा हंगाम सुरू झाला की मामाकडून कधी बोलावणं येतं याची आम्ही वाटच बघायचो. मग आम्ही भाचरं आणि मामेभावंडं धमाल करायचो. मामाच्या भल्यामोठ्या घरातील एक खोली आंब्यांनी भरून गेलेली असे. त्या खोलीत जायचं आणि आंब्यांवर मनसोक्त ताव मारायचा ही आमची चैन होती. भल्या सकाळी मामा म्हशीचं दूध काढायचा आणि फेसाळलेलं दूध ग्लास भरून द्यायचा. ते पिताना ओठांवर पांढऱ्या शुभ्र मिशा उमटायच्या... कधी शेतात जाऊन वेलांवरील वाटाण्याच्या शेंगा तोडण्याचा आणि तोडताना त्या भरपेट मटकावण्याचा कार्यक्रम चालायचा; तर कधी सकाळी परसात शेकोटी पेटवून तिची ऊब घेता घेता शेतावरचा गडी वाटाण्याच्या शेंगा त्यात खरपूस भाजून द्यायचा. त्या अर्ध्या कच्च्या, गरमागरम शेंगांची चव काही औरच. मामाच्या गावी जाण्याची ओढ वाटण्याचं आणखी एक आकर्षण म्हणजे रात्री झोपताना आजीकडून गोष्टी ऐकायला मिळायच्या. आजी सुगरण तर होतीच; पण गोष्टीवेल्हाळही. तिनं सांगितलेल्या गोष्टी कितीतरी वेळा ऐकूनही आमचं समाधान होत नसे. कडोलीतच माझी आत्याही होती. तिचाही आमच्यावर भारी जीव. स्वतःच्या हातानं पदार्थ करून ती आग्रहानं खायला घालायची. तिच्या घरी असलेले "चांदोबा‘चे जुने अंक वाचायला मिळणं हेही तिथं जाण्याचं एक कारण असायचं. गावातील एसटी स्टॅंडलगतच्या दगडी पारावर मधोमध बकुळीच्या फुलांचं डेरेदार झाड होतं. सकाळी झाडाखाली पडलेली बकुळीची फुलं वेचण्याची आम्हा मुलांमध्ये स्पर्धा लागायची. मंद सुगंधाच्या त्या फुलांनी ओंजळ अन्‌ मन कधी भरून जायचं ते कळायचंही नाही. मामाच्या गावानं असं भरभरून दिलं. हे सुख कशात मोजता येईल?
शिवजयंती अनेक शहरांत उत्साहात साजरी होते; पण बेळगावमधील शिवजयंतीच्या उत्साहाला तोड नसते. सीमावासीयांचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र बेळगावातील घराघरांत पोचविण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रावरील व्याख्यानमालेचा वाटा मोठा आहे. सीमाभागात कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभं राहणाऱ्या मराठी जनतेकडून या व्याख्यानमालेला उदंड प्रतिसाद मिळायचा. रात्रीचे आठ वाजले की स्वेटर, बसण्यासाठी जाजम अशा जामानिम्यासह लहान मुले, महिलांसह लोकांच्या झुंडीच्या झुंडी युनियन जिमखान्याच्या दिशेनं निघत. आजूबाजूच्या खेडोपाड्यांतीलही असंख्य लोक व्याख्यानमालेला आवर्जून येत. चढत्या रात्रीबरोबर व्याख्यानाला रंग चढायचा. बाबासाहेब आपल्या प्रभावी वक्तृत्वातून साक्षात शिवकाल हजारो श्रोत्यांपुढं उभा करीत. कधी स्लाइड शोच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील गडकोटांचं दर्शन घडवायचे. शिवरायांच्या राज्याभिषेकाचा भव्य सोहळाही आम्ही तिथंच रंगमंचावर अनुभवला. या सगळ्याचं आम्हाला भारी अप्रूप वाटे.
आनंदाचा ठेवा ठरलेल्या अशा किती गोष्टी सांगाव्यात? घराला लागूनच असलेल्या मारुतीच्या मंदिरात उत्साहात साजरी होणारी हनुमान जयंती, नवरात्रात झांजांच्या निनादात निघणारी रोज रात्रीची पालखी आणि या सगळ्यावर कळस म्हणजे दसऱ्याचा विलक्षण देखणा सोहळा... घरापासून दोनेक किलोमीटरवरील पोलिस हेडक्वार्टरमध्ये पहाटे वाजविल्या जाणाऱ्या बिगुलाची सुरावट... निलजीजवळील वडिलोपार्जित, हिरवं वैभव मिरवणाऱ्या शेतमळ्यात चुलत भावंडांसमवेत घालविलेली सुटी... बेळगावला पाणीपुरवठा करणारा राकसकोप जलाशय, खानापूरजवळील असोगा येथील मंदिर, रामनाथाचं मंदिर आदी ठिकाणी मित्रांसमवेत सायकलवरून काढलेल्या सहली... तर कधी बेळगावातील मामाच्या मोटारीतून केलेली गोकाक, राकसकोपची सैर... सुटीच्या दिवशी कधी झाडांवरील कैऱ्या, पिकलेली जांभळं खाण्यासाठी केलेली पायपीट; तर कधी भुईकोट किल्ल्यातील भ्रमंती... पहाटे लवकर उठून अरगन तळ्याच्या रस्त्यावर धावायला जाण्याचे दरवर्षी केलेले संकल्प... विधानसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा आमच्या परीनं केलेला प्रचार... सीमाप्रश्‍नावर जनजागृतीसाठी पहाटे निघणाऱ्या प्रभात फेऱ्यांमध्ये उत्साहानं घेतलेला भाग... असे कितीतरी संस्मरणीय क्षण बेळगाव म्हटलं की आठवत राहतात.
आज इतक्‍या वर्षांनंतर बाकीच्या शहरांप्रमाणेच बेळगावचाही चेहरामोहरा पालटला आहे. एकेकाळी "गरिबांचं महाबळेश्‍वर‘ अशी ओळख असलेल्या बेळगावातील हवा आणि हवामानही बदललं आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्यानं आता तिकडं जाणं कमी झालं आहे; पण असाच कधी बेळगावचा विषय निघतो आणि तिथले दिवस, ते क्षण एकामागून एक उलगडत जातात. काळाच्या ओघात हरवून गेलेल्या अनेक गोष्टींच्या आठवणी मन हळवं करतात. बेळगाव सोडून पंचवीसेक वर्षं उलटली; पण आजही माझ्या आठवणीतलं बेळगाव असं आहे.... न विसरता येण्यासारखं. बेळगावच्या आठवणी या अशा आहेत.

लेखक - श्री. अनिल पवार
ललित, सकाळ (साप्ताहिक सकाळ)
दि. ०९/०२/२०१५, सोमवार     

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...