Sunday, March 10, 2013

सयाजीराव आणि यशवंतराव

हे दोघेही समाजभान आणि साहित्य-कलांची जाण असलेले, लोककल्याण हे ध्येय असलेले नायक. सयाजीरावांची १५०वी जयंती व यशवंतरावांची जन्मशताब्दी उलटून चालली, तरी त्यांचे पुरेसे मूल्यमापन झालेले नाही..
११ मार्च रोजी बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या १५०व्या जयंती वर्षांची, तर १३ मार्च रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने आधुनिक भारताच्या इतिहासात असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या या दोन समाजपुरुषांचं स्मरण करणं समयोचित आणि न्यायोचित ठरेल. एक 'न्यायी राजा' मानला गेला, तर दुसरा 'जनतेचा राजा' मानला गेला. दोघंही सामान्य कुटुंबातून पुढे आलेले. सयाजीराव गुराख्याचं पोर, तर यशवंतराव शेतकऱ्याचं पोर. सयाजीराव बडोदा संस्थानचे राजे झाले, तर यशवंतराव संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. एकाचा काळ स्वातंत्र्यपूर्व, तर दुसऱ्याचा स्वातंत्र्योत्तर. एकाचा नियंत्रक ब्रिटिश, तर दुसऱ्याचा हायकमांड. पण दोघांनीही आपल्या कुशल नेतृत्वाने, बहुजनवादी राजकारणाने, संघटन कौशल्याने कालच्या-आजच्या आणि उद्याच्या पिढय़ांसाठी आदर्शाचे मानदंड उभे करून ठेवले आहेत.  या दोघांनाही तळागाळातल्या जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण होती. बहुजन समाजाला बरोबर घेत, अभिजनांचा आदर करत केवळ बेरजेचंच राजकारण करण्यावर त्यांनी भर दिला. यशवंतरावांचं राजकारण सयाजीरावांसारखंच बहुजनवादी होतं. असं राजकारण करण्यासाठी आयडिऑलॉजी असावी लागते. सयाजीरावांची लोकशाहीवर अढळ निष्ठा होती, तर यशवंतराव रॉयिस्ट होते. विचारवंत, कलावंत, लेखक, शास्त्रज्ञ व संशोधक यांचा योग्य मानसन्मान करण्याचं, त्यांची कदर करण्याचं सांस्कृतिक भान दोघांकडेही होतं. 'राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे' अशी यशवंतरावांची तळमळ होती आणि सयाजीरावांचं तर ते जणू ब्रीदवाक्यच होतं. राजकारण हा समाजकारणाचाच भाग असतो. सर्वसमावेशक राजकारण करण्यासाठी कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि समाजभान यांची चांगली जाण असावी लागते. त्याचा प्रत्ययही या दोघांमध्ये येतोच.आपल्याला आखून दिलेल्या चौकटीतही चांगलं काम करता येतं. एवढंच नव्हे तर आतून ढकलून ढकलून ती चौकट रुंदावताही येते, याचं उत्तम उदाहरण म्हणूनही सयाजीराव आणि यशवंतराव यांच्याकडे पाहता येतं. सयाजीरावांनी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा यांची पायाभरणी केली, तर यशवंतरावांनी साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ यांसारख्या संस्थांची निर्मिती केली. पण नुसत्या चांगल्या संस्था उभारून भागत नाही. त्या योग्य माणसांच्या हातीही सोपवाव्या लागतात. त्यांना पुरेसं स्वातंत्र्य द्यावं लागतं. सयाजीराव आणि यशवंतराव यांनी अनुक्रमे सावळाराम यंदे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची निवड केली, त्यांनीही त्या संस्थांना लौकिक मिळवून दिला. सयाजीरावांनी हरहुन्नरी व कल्पक यंदे यांना महाराष्ट्रातून बडोद्याला बोलावून घेऊन त्यांना छापखाना व प्रकाशन संस्था सुरू करण्यास सांगितली. यंदे यांनी 'सयाजी विजय' हे वर्तमानपत्र चालवलं, 'ग्रंथमाला', 'श्रीसयाजी साहित्यमाला', 'श्रीसयाजी-बालज्ञानमाला' प्रकाशित करून अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची, 'व्यायामकोशा'सारख्या कोशांची निर्मिती केली. 'श्यामची आई' हे आज अभिजात मानलं जाणारं साने गुरुजी यांचं पुस्तक यशवंतरावांच्या शिफारशीमुळेच 'इंद्रायणी साहित्य'कडून प्रकाशित होऊ शकलं. सयाजीरावांमुळे डॉ. आंबेडकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ शकले. स्वत: त्यांनीही इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, आफ्रिका या देशांचे दौरे करून तेथील आधुनिक बदल समजावून घेतले. सयाजीरावांनी १९३२ साली कोल्हापूरमध्ये भरलेल्या अ.भा.म.साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं, तसंच १९३३ साली शिकागो इथं झालेल्या दुसऱ्या  जागतिक धर्म परिषदेचं उद्घाटनही केलं. यशवंतरावांनी १९६५च्या हैदराबादमधील साहित्य संमेलनाचं उद्घाटकपद तर १९७५च्या कराडमधील साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद भूषवलं. कराडच्या साहित्य संमेलनात सरकारचा प्रतिनिधी म्हणून दुर्गा भागवत या नैतिक तोफखान्यापुढे आपल्यावर नामुष्की ओढवली जाणार, याची पूर्ण कल्पना असतानाही यशवंतराव त्या प्रसंगाला सामोरे गेले आणि ती परिस्थिती सावरून घेऊन त्यांनी संमेलन निर्विघ्न पार पडू देण्याचा उमदेपणाही दाखवला! यशवंतराव अनेक साहित्य संमेलनांना हजर राहत. व्यासपीठावर जाऊन स्वत:चाच सत्कार-समारंभ घडवून आणण्याऐवजी श्रोत्यांत बसून संमेलनाचा आस्वाद घेत. स्वत:च्या अंगावरची सत्तेची झूल अशी सहजतेनं उतरवता येणं, हे सयाजीराव-यशवंतरावांना जमायचं. सयाजीरावांनी बडोदा संस्थानात वस्त्रोद्योगाची स्थापना केली. बालविवाह बंदी, अस्पृश्यता निर्मूलन, घटस्फोट याविषयीचे कायदे केले. ग्रंथालयं काढली, शाळा-कॉलेजेस काढली. विद्यापीठाची स्थापना केली. तर यशवंतरावांनी सहकार उद्योगाची पायाभरणी करतानाच त्याची सत्ता एकवटू नये यासाठी त्याच्या  विकेंद्रीकरणावर भर दिला.  सयाजीरावांचं वैभव आणि राजेपण यामुळे सामान्य जनता त्यांच्याकडे आकर्षित व्हायची, तर यशवंतरावांना तळगाळातल्या प्रश्नांची कल्पना असल्याने ते कुणाशीही सहजतेनं संवाद करू शकायचे. लोकांनाही त्यांच्याबद्दल आपलेपणा आणि विश्वास वाटायचा. संवदेनक्षम मन आणि मनमिळाऊ स्वभाव ही दोघांचीही वैशिष्टय़ं होती. त्यामुळेच त्यांच्या वाटय़ाला आलेलं जनतेचं प्रेम, विलोभनीय होतं. गेल्या वर्षी दोघांवरही दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या, त्या सामान्य वकुबाच्या आहेत ही गोष्ट वेगळी. दोघांच्याही भाषणांचे-लेखांचे संग्रह प्रकाशित झाले. याआधीही सयाजीरावांना केवळ ब्रिटिशांचे मांडलिक ठरवणारं आणि त्यांचा भाबडेपणाने उदो उदो करणारं लेखनही झालं आहे, तसंच यशवंतरावांविषयीही अभिनंदन, गौरवपर लेखन जसं कमी नाही, तसंच अकारण अभिनिवेशी आणि पूर्वग्रहदूषित लेखनही कमी नाही. पण दोघांचीही चिकित्सक, सत्यान्वेषी आणि तटस्थ पण सविस्तर चरित्रं मात्र अजून प्रकाशित होऊ शकलेली नाहीत. सयाजीराव-यशवंतराव यांच्यासारख्या समाजपुरुषांची पुन:पुन्हा चरित्रं लिहिली जाणं, त्यांच्या कामाचं पुन:पुन्हा मूल्यमापन  होणं, हे त्यांच्या कर्तृत्वाचं यथायोग्य मूल्यांकन करण्यासाठी गरजेचं असतं. आणि भावी पिढय़ांसाठीही. पण तसे समर्थ चरित्रकार अजूनपर्यंत या दोघांनाही मिळालेले नाहीत. यापुढच्या काळात तरी मिळावेत आणि आपला बौद्धिक आळसही संपावा, अशी आशा करू या. 'विचारांची, माणसांच्या मनांची मशागत करणे आणि त्याचे आदर्श परिणाम घडवून आणणे या नेतृत्वाच्या कसोटय़ा असतात' असं यशवंतरावांनी म्हटलं आहे. ते या दोघांनाही लागू पडतं.

-लोकसत्ता (संपादकीय/अग्रलेख)
दि. ९/३/२०१३, शनिवार.  

2 comments:

 1. ही दोनही व्यक्तिमत्वे फार महान होती..आज त्यांच्या तोडीचा एकाही नेता राज्य वा राष्ट्र पातळीवर नाही ही वस्तुस्थिती भयानक आहे
  रवींद्र अभ्यंकर

  ReplyDelete
  Replies
  1. ते नाहीत हेच बरं अहे… आत्ता जे चाललाय ते बघून त्यांना फार वाईट वाटलं असतं पण अर्थात ते किंवा त्यांच्यासारखे लोक असते तर ही वेळंच आली नसती…

   Delete

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...