Sunday, March 10, 2013

सयाजीराव आणि यशवंतराव

हे दोघेही समाजभान आणि साहित्य-कलांची जाण असलेले, लोककल्याण हे ध्येय असलेले नायक. सयाजीरावांची १५०वी जयंती व यशवंतरावांची जन्मशताब्दी उलटून चालली, तरी त्यांचे पुरेसे मूल्यमापन झालेले नाही..
११ मार्च रोजी बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या १५०व्या जयंती वर्षांची, तर १३ मार्च रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने आधुनिक भारताच्या इतिहासात असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या या दोन समाजपुरुषांचं स्मरण करणं समयोचित आणि न्यायोचित ठरेल. एक 'न्यायी राजा' मानला गेला, तर दुसरा 'जनतेचा राजा' मानला गेला. दोघंही सामान्य कुटुंबातून पुढे आलेले. सयाजीराव गुराख्याचं पोर, तर यशवंतराव शेतकऱ्याचं पोर. सयाजीराव बडोदा संस्थानचे राजे झाले, तर यशवंतराव संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. एकाचा काळ स्वातंत्र्यपूर्व, तर दुसऱ्याचा स्वातंत्र्योत्तर. एकाचा नियंत्रक ब्रिटिश, तर दुसऱ्याचा हायकमांड. पण दोघांनीही आपल्या कुशल नेतृत्वाने, बहुजनवादी राजकारणाने, संघटन कौशल्याने कालच्या-आजच्या आणि उद्याच्या पिढय़ांसाठी आदर्शाचे मानदंड उभे करून ठेवले आहेत.  या दोघांनाही तळागाळातल्या जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण होती. बहुजन समाजाला बरोबर घेत, अभिजनांचा आदर करत केवळ बेरजेचंच राजकारण करण्यावर त्यांनी भर दिला. यशवंतरावांचं राजकारण सयाजीरावांसारखंच बहुजनवादी होतं. असं राजकारण करण्यासाठी आयडिऑलॉजी असावी लागते. सयाजीरावांची लोकशाहीवर अढळ निष्ठा होती, तर यशवंतराव रॉयिस्ट होते. विचारवंत, कलावंत, लेखक, शास्त्रज्ञ व संशोधक यांचा योग्य मानसन्मान करण्याचं, त्यांची कदर करण्याचं सांस्कृतिक भान दोघांकडेही होतं. 'राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे' अशी यशवंतरावांची तळमळ होती आणि सयाजीरावांचं तर ते जणू ब्रीदवाक्यच होतं. राजकारण हा समाजकारणाचाच भाग असतो. सर्वसमावेशक राजकारण करण्यासाठी कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि समाजभान यांची चांगली जाण असावी लागते. त्याचा प्रत्ययही या दोघांमध्ये येतोच.आपल्याला आखून दिलेल्या चौकटीतही चांगलं काम करता येतं. एवढंच नव्हे तर आतून ढकलून ढकलून ती चौकट रुंदावताही येते, याचं उत्तम उदाहरण म्हणूनही सयाजीराव आणि यशवंतराव यांच्याकडे पाहता येतं. सयाजीरावांनी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा यांची पायाभरणी केली, तर यशवंतरावांनी साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ यांसारख्या संस्थांची निर्मिती केली. पण नुसत्या चांगल्या संस्था उभारून भागत नाही. त्या योग्य माणसांच्या हातीही सोपवाव्या लागतात. त्यांना पुरेसं स्वातंत्र्य द्यावं लागतं. सयाजीराव आणि यशवंतराव यांनी अनुक्रमे सावळाराम यंदे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची निवड केली, त्यांनीही त्या संस्थांना लौकिक मिळवून दिला. सयाजीरावांनी हरहुन्नरी व कल्पक यंदे यांना महाराष्ट्रातून बडोद्याला बोलावून घेऊन त्यांना छापखाना व प्रकाशन संस्था सुरू करण्यास सांगितली. यंदे यांनी 'सयाजी विजय' हे वर्तमानपत्र चालवलं, 'ग्रंथमाला', 'श्रीसयाजी साहित्यमाला', 'श्रीसयाजी-बालज्ञानमाला' प्रकाशित करून अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची, 'व्यायामकोशा'सारख्या कोशांची निर्मिती केली. 'श्यामची आई' हे आज अभिजात मानलं जाणारं साने गुरुजी यांचं पुस्तक यशवंतरावांच्या शिफारशीमुळेच 'इंद्रायणी साहित्य'कडून प्रकाशित होऊ शकलं. सयाजीरावांमुळे डॉ. आंबेडकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ शकले. स्वत: त्यांनीही इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, आफ्रिका या देशांचे दौरे करून तेथील आधुनिक बदल समजावून घेतले. सयाजीरावांनी १९३२ साली कोल्हापूरमध्ये भरलेल्या अ.भा.म.साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं, तसंच १९३३ साली शिकागो इथं झालेल्या दुसऱ्या  जागतिक धर्म परिषदेचं उद्घाटनही केलं. यशवंतरावांनी १९६५च्या हैदराबादमधील साहित्य संमेलनाचं उद्घाटकपद तर १९७५च्या कराडमधील साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद भूषवलं. कराडच्या साहित्य संमेलनात सरकारचा प्रतिनिधी म्हणून दुर्गा भागवत या नैतिक तोफखान्यापुढे आपल्यावर नामुष्की ओढवली जाणार, याची पूर्ण कल्पना असतानाही यशवंतराव त्या प्रसंगाला सामोरे गेले आणि ती परिस्थिती सावरून घेऊन त्यांनी संमेलन निर्विघ्न पार पडू देण्याचा उमदेपणाही दाखवला! यशवंतराव अनेक साहित्य संमेलनांना हजर राहत. व्यासपीठावर जाऊन स्वत:चाच सत्कार-समारंभ घडवून आणण्याऐवजी श्रोत्यांत बसून संमेलनाचा आस्वाद घेत. स्वत:च्या अंगावरची सत्तेची झूल अशी सहजतेनं उतरवता येणं, हे सयाजीराव-यशवंतरावांना जमायचं. सयाजीरावांनी बडोदा संस्थानात वस्त्रोद्योगाची स्थापना केली. बालविवाह बंदी, अस्पृश्यता निर्मूलन, घटस्फोट याविषयीचे कायदे केले. ग्रंथालयं काढली, शाळा-कॉलेजेस काढली. विद्यापीठाची स्थापना केली. तर यशवंतरावांनी सहकार उद्योगाची पायाभरणी करतानाच त्याची सत्ता एकवटू नये यासाठी त्याच्या  विकेंद्रीकरणावर भर दिला.  सयाजीरावांचं वैभव आणि राजेपण यामुळे सामान्य जनता त्यांच्याकडे आकर्षित व्हायची, तर यशवंतरावांना तळगाळातल्या प्रश्नांची कल्पना असल्याने ते कुणाशीही सहजतेनं संवाद करू शकायचे. लोकांनाही त्यांच्याबद्दल आपलेपणा आणि विश्वास वाटायचा. संवदेनक्षम मन आणि मनमिळाऊ स्वभाव ही दोघांचीही वैशिष्टय़ं होती. त्यामुळेच त्यांच्या वाटय़ाला आलेलं जनतेचं प्रेम, विलोभनीय होतं. गेल्या वर्षी दोघांवरही दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या, त्या सामान्य वकुबाच्या आहेत ही गोष्ट वेगळी. दोघांच्याही भाषणांचे-लेखांचे संग्रह प्रकाशित झाले. याआधीही सयाजीरावांना केवळ ब्रिटिशांचे मांडलिक ठरवणारं आणि त्यांचा भाबडेपणाने उदो उदो करणारं लेखनही झालं आहे, तसंच यशवंतरावांविषयीही अभिनंदन, गौरवपर लेखन जसं कमी नाही, तसंच अकारण अभिनिवेशी आणि पूर्वग्रहदूषित लेखनही कमी नाही. पण दोघांचीही चिकित्सक, सत्यान्वेषी आणि तटस्थ पण सविस्तर चरित्रं मात्र अजून प्रकाशित होऊ शकलेली नाहीत. सयाजीराव-यशवंतराव यांच्यासारख्या समाजपुरुषांची पुन:पुन्हा चरित्रं लिहिली जाणं, त्यांच्या कामाचं पुन:पुन्हा मूल्यमापन  होणं, हे त्यांच्या कर्तृत्वाचं यथायोग्य मूल्यांकन करण्यासाठी गरजेचं असतं. आणि भावी पिढय़ांसाठीही. पण तसे समर्थ चरित्रकार अजूनपर्यंत या दोघांनाही मिळालेले नाहीत. यापुढच्या काळात तरी मिळावेत आणि आपला बौद्धिक आळसही संपावा, अशी आशा करू या. 'विचारांची, माणसांच्या मनांची मशागत करणे आणि त्याचे आदर्श परिणाम घडवून आणणे या नेतृत्वाच्या कसोटय़ा असतात' असं यशवंतरावांनी म्हटलं आहे. ते या दोघांनाही लागू पडतं.

-लोकसत्ता (संपादकीय/अग्रलेख)
दि. ९/३/२०१३, शनिवार.  

Monday, March 4, 2013

माझे भन्नाट पुणे..!!

           काही जण (पुणेरी भाषेत "अजाण बालके") कधी कधी असा इतका फालतू प्रश्न विचारतात की " तुम्हाला पुणे का आवडते?" आता मग मी विचार केला की एका छोट्या उत्तरात सांगून टाकावे कि बुवा आम्हाला पुणे का आवडते..? आमच्याकडे मुद्दाम मराठीत बोला म्हणून कधी सांगावे लागत नाही, True freedom of thoughts, म्हणून प्रत्येक जण आपले स्वतःचे मत मांडू शकतो, आणि ते सुद्धा सर्वांना पटेल अशा पद्धतीने, पुण्यात काही उणे नाही वगेरे ठीक आहे, पण पुणे आवडायला काहीतरी कारणच हवे असे मला वाटत नाही !
- उन्हाळ्यातले काही दिवस (रात्री नव्हे) सोडले तर उरलेल्या दिवसात असलेले cool पुणे,
- किरकोळ पानझडीचे दिवस सोडले तर हिरवे असलेले पुणे,
- पावसासाठी थेट लंडनशी comparison होणारे एकमेव शहर म्हणजे पुणे (अहो पाऊस कधी पण येऊ शकतो आणि या चौकात असेल तर पुढच्या चौकात पण असेल याची काही ग्यारंटी नसते म्हणून.;),
- गिनीजबुकाला सुद्धा नोंद करायला लागली असे आमचे Two Wheelers चे पुणे (आणि ते चालवणारे आम्ही "धन्य" पुणेकर..;),
- सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे, जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे, मालुसर्यांच्या 'सिंव्हा' सारख्या मर्दानगी चे पुणे, पेशव्यांच्या 'सर्व' पराक्रमांचे पुणे, लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे, शनिवारवाड्यात 'सांडलेल्या' रक्ताचे पुणे, अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे, पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे,  'ध' चा 'मा' केलेल्यांचे पुणे 'न' ला 'न'च आणि 'ण' ला 'ण'च म्हणणारे पुणे,
- इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे, 'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं.चे पण पुणे ,
- नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि  टिळक रोड वरचे पुणे ,
- सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे  स्कूल चे पुणे, आब आणि रुबाब वाल्या बिशप्स, लॉयलाज, मिराज आणि हेलेनाजचे पण  पुणे,
- SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडियाचे  पुणे ,
- आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून (की बांधून?) Two Wheeler वाल्या…पुणे RTO कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे,
- Info Tech park चे पुणे,Koregaon Park चे पुणे,
- कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे, चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे, वैशाली च्या yummy सांभार चे पुणे, रुपालीच्या भन्नाट कॉफीचे  पुणे, तुळशीबागेतल्या स्वस्ताई आणि गर्दीचे पुणे 

- आणि कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे, college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे, 
- Office मधून गायब होऊन तिच्या सोबतचे , Adlabs आणि R Deccan वाले पुणे  ,
- पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे,  Nike आणि Reebok वाले पण पुणे , 

- खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ  च्या मिसळीचे पुणे,  आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे, कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुड लक च्या मस्का पाव विथ cutting चे पुणे , कॅड बी आणि कॅड एम चे पुणे, सोडा शॉप चे पण पुणे, 
- अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे, University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात 'दिवे लावणार्यांचे' पुणे , 
- कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे (तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही ..;) , 
- नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड  आणि नालाह पार्क चे पुणे, 
- खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे, आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे, 
- शनिवार वाड्याने नाकारून  सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिले त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार  मस्तानीचे पुणे,
- बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे,  Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपीज् च्या 'नळी' वालेपुणे, सदशिवातल्या बिनधास्त Non veg वाले पुणे, आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुऱ्यातले रात्रीचे लजीज पुणे, 
- मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे, पुण्याच्या ढोलांचा 'आव्वाज' जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय - अतुल चे पुणे , आमच्या डोंगरांवरच्या पर्वती,तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे, 
- आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे, Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे,
- शिकणाऱ्यांचे पुणे आणि चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे, - 'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे, मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि...
- देशाचा defense शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या आमच्या Southern Command चे पुणे, 
- तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे, बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे, स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी (सध्या जास्तच) pot holes वालेपण पुणे, 
- सगळीकडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे, ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान " अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे, फटकळ , खवचट , उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे , 'इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही' अशी ख्याती मिरवणारे पुणे!, 
- ०२० चे आणि MH "बारा" चे पुणे, आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे , जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे, सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे, शेख खान आणि D 'souza ,D 'casta चे पण पुणे, 
- पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे, आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या " फुलराणी ' चे पुणे , भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या "त्या फुलराणी' चे पुणे, 
- ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे, 
- अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे , जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे  पुणे , अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या , एका पायावर सलग ३५ तास उभे राहणाऱ्या , अखंड ७५ तास टाळ्या वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले त्या ७६० पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या अजब विक्रमादित्य धनंजय कुलकर्णींचे पुणे,
- भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे, पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे, bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या wisdom tree चे पुणे, आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या 'NFAI ' चे पुणे  - काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक "सवाई" चे पुणे , बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे, नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे, उगवती वरच्या ,वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे, पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे, घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना , डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! , शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे , दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे, कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे , फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराजचे पुणे, 

- आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे, नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे, आणि 31 December आणि गटारी च्या रात्री रेकॉर्ड ब्रेक दारू बरोबर हुक्का अन बिड्या फुंकून फुल्टू Chill होणारे पुणे, 
- रात्री उशिरा सगळ्या रस्त्यांवरच्या मोकाट कुत्र्यांचे पुणे, जगातल्या सगळ्यात "प्रेमळ" आणि "स्वस्त" रिक्षांचे पुणे, गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे , प्रचंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे, 
- लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे, प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे,आमच्या केसरी सकाळ प्रभात आणि आता मटा , Mirror वाल्यांचे पुणे आणि आज का आनंद आणि संध्यानंद चे पुणे, 
- दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे आणि Valentine day ला गुलाबाला दमवत  झुलवणारे पुणे, दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे, Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे, भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे, ऐन december च्या थंड रात्री Ice cream किंवा Chilled Beer रिचवणारे पुणे, सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे, Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे...
- सण असो वा नसो अक्ख्या दुनियेला नटवणाऱ्या आमच्या रांका, पेडणेकर, लागू आणि पी. एन. जींचे पण पुणे,
- पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे, आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile?" असे पण म्हणणारे पुणे, अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे, जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc, Volks Wagon आणि Jaguar बनवणारे पुणे,

- सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे, Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे पुणे, पर्वतीवर practice करून Everest ला गवसणी घालणारे पण पुणे!! पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे, उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे, Saturday Night ला झिंग आणणाऱ्या pubs चे पुणे, Sunday ला सकाळी प्याटीस, पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणाऱ्यांचे पुणे, 
- कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे, घोटाळे बाज खासदारांचे पुणे , नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे , नवीन दादांचे पुणे, जुन्या भाईंचे पुणे, बारा महिने २४ तास online असणारे , पण दुकाने मात्र दुपारी दोन चार तास बंद ठेवणारे , असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !!
- आणि इथे राहणाऱ्या "माझे" पुणे…  

आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत, आणि काही अजाण बालके एक फालतू प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते?



स्रोत - अज्ञात   

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...