Saturday, November 10, 2012

गुलमोहर - शिरीष पै

          खिडकीबाहेर एक प्रचंड गुलमोहराचा वृक्ष आंपली दीर्घ छाया पसरून उभा होता. त्याच्या हिरव्यागार फांद्या थेट माझ्या खिडकीला भिडल्या होत्या. दिवसभर त्या वाऱ्यानं डुलत राहायच्या. जोराचा वारा आला की माझ्या टेबलावर असंख्य पिवळी पानं येऊन पडायची. पावसाचे दिवस होते ते. सारा गुलमोहर हिरवागार, अधिकाधिक हिरवागार होत चालला होता. मधून मधून मी त्या झाडाकडे बघत राहायची आणि मग आपल्या कामाकडे वळायची. तेवढंच मन टवटवीत होऊन जायचं. असे थोडे दिवस गेले आणि मग एके दिवशी पोपटी पोपटी राघूंचा एक थवाच्या थवाच त्या गुलमोहरावर राहायला आला आणि सारा दिवस कलकल करू लागला.
          असे बरेच दिवस गेले. पावसाळा संपला होता. राघूंचा कळप गुलमोहराचा निरोप घेऊन निघून गेला होता. आता त्याची पानं गळू लागली होती. हळूहळू त्याच्या फांद्या उजाड होत होत्या. शिशिरागम झाला आणि अवघ्या काही दिवसातच गुलमोहर पार उजाड होऊन गेला. त्या रोडावलेल्या, खंगलेल्या गुलमोहराकडे मला बघवेना. एके दिवशी मी माझ्या टेबलामागची खिडकी बंदच करून टाकली.
          थंडी संपली, हवा हळूहळू गरम होत चालली. माझी खिडकी बंदच होती. एके दिवशी फारच उकडत होतं म्हणून मी खिडकी उघडली तर काय! ओहो, माझ्या लाडक्या गुलमोहरावर लाल कळ्या फुटल्या होत्या. अरेच्या! अशी कशी विसरले मी त्याला? हे तर गुलमोहरांची झाडं बहरण्याचे दिवस. आता रस्तोरस्ती गुलमोहर फुलताहेत. काही काही गल्ल्या तर गल्लीभर बहरलेल्या गुलमोहरामुळे अथांग लाल होऊन गेल्या आहेत. जिवंत केलंय हे शहर गुलमोहरांनी.
          त्या वर्षी मी तो गुलमोहर पूर्ण बहरत गेलेला पहिला, पूर्ण फुलात गेलेला पहिला, पूर्ण जिवंत झालेला पहिला. ते वर्ष! एका गुलमोहराच्या सहवासात पूर्णपणे जागून घेतलेलं ते वर्ष. त्या वर्षानंच मला हे सांगितलं, हे शिकवलं कि इमारती जुन्या होतील, दगड झिजतात, विटा ढासळतात, पण त्यांच्याच बाजूला उभे असतात गुलमोहर, जे पुन्हा पुन्हा, पुन्हा पुन्हा नवा बहर धारण करतात, लाल लाल फुलांनी उमलून जातात आणि शेवटी त्या लाल फुलांचा सडा आपल्याच पायावर सांडत राहतात...


- गुलमोहर (सय)
लेखिका - शिरीष पै.  

No comments:

Post a Comment

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन एक नन्ही मुन्नी सी पुजारन पतली बाहें, पतली गर्दन भोर भये मंदिर आई है आई नहीं है, माँ लायी है वक़्त से पह...