Wednesday, March 11, 2015

बायकांच्या दृष्टिकोनातून नवरे - मुकुंद वझे

गेल्या शतकातील अनेक रंजक ललित तसंच वैचारिक पुस्तके कालौघात वाचकांच्या स्मरणातून पुसली गेली आहेत. अशा काही पुस्तकांची किमान तोंडओळख करून देणारे पाक्षिक सदर 'विस्मृतीत गेलेली पुस्तके'
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पुस्तक - 'आमचा संसार', 
लेखक- रघुनाथ गोविंद सरदेसाई, 
ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, 
प्रथमावृत्ती- १९४८, मूल्य- २ रु.

'हंस' मासिकात ऑगस्ट १९४७ ते एप्रिल ४८ या काळात 'बायकांच्या दृष्टिकोनातून नवरे' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह. मासिकात प्रसिद्ध झालेले लेख शीर्षकावरून वाटतात त्याप्रमाणे स्त्रियांनी लिहिलेल्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यासंबंधीच्या लिखाणाबाबत आहेत. मात्र, या स्त्रिया काही सामान्य स्त्रिया नव्हत्या. रमाबाई रानडे, आनंदीबाई कर्वे, लक्ष्मीबाई टिळक, लीलाबाई पटवर्धन, आनंदीबाई जोशी या स्त्रियांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल त्यांच्याच लिखाणातून काय चित्र उभे राहते, ते मांडण्याचा प्रयत्न र. गो. सरदेसाई यांनी केला आहे. पैकी पहिल्या चौघींची आत्मवृत्ते (अनुक्रमे) 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी', 'माझे पुराण', 'स्मृतिचित्रे', 'आमची अकरा वर्षे' ही प्रसिद्ध आहेत. तसेच 'डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र व पत्रे' हे काशिबाई कानिटकरांचे पुस्तक अशा चरित्र व आत्मचरित्रांवर आधारित असे हे पुस्तक आहे.
पंचवीसेक वर्षांपूर्वी सुनीताबाई देशपांडे यांचे 'आहे मनोहर तरी' हे आत्मकथन खूप गाजले. माधवी देसाई, सुमा करंदीकर, कमल पाध्ये यांचेही असेच लेखन चर्चेत राहिले. परंतु हे पुस्तक यापेक्षा थोडे वेगळे आहे. ते जवळजवळ ७० वर्षांपूर्वी लिहिले गेले आहे. दुसरं म्हणजे हे पुस्तक एका पुरुषाने तटस्थपणे आणि संबंधित पुस्तके प्रसिद्ध झाल्यानंतर बऱ्याच काळाने लिहिलेले आहे. रमाबाई रानडे व काशिबाई कानिटकर यांची पुस्तके १९१० व १९१२ साली प्रकाशित झाली. 'स्मृतिचित्रे'- १९३६, 'माझे पुराण'- १९४४, तर 'आमची अकरा वर्षे'- १९४५ मध्ये.  र. गो. सरदेसाईंचा जन्म १९०५ मधला. हे लेख लिहितेवेळी लेखकाची चाळिशी उलटलेली. म्हणजे अशा प्रकारच्या लिखाणाला आवश्यक अशी अनुभवसंपन्नता व संयम स्वाभाविकपणे आलेला. त्यामुळेच हे लिखाण मोजक्या शब्दांत केले गेले आहे. आणि तरीही आपल्या निष्कर्षांला आवश्यक ते संदर्भ देण्यात त्यांनी हयगय केलेली नाही. आपले निष्कर्ष मांडताना सरदेसाई यांनी त्या- त्या पुरुषांच्या कर्तृत्वाची, कार्यपद्धतीची उंची व वैशिष्टय़े मांडली आहेत. आणि तरीही त्यांच्या निष्कर्षांचा कल या प्रसिद्ध आणि कर्तृत्ववान स्त्रियांच्या सहानुभूतीचा आहे.
न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल ते लिहितात, 'रमाबाईंची रानडय़ांसंबंधीची भावना निरतिशय भक्तीची दिसते. रानडय़ांची रमाबाईंविषयीची भावना वात्सल्यपूर्ण सत्ताधाऱ्याची दिसते. रानडय़ांनी रमाबाईंना 'मी सांगतो ते मुकाटय़ाने कर,' असे हरेक प्रसंगी म्हटले आहे. रमाबाईंना काही विचारस्वातंत्र्य दिल्याचे उदाहरण सबंध पुस्तकात सापडत नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.'' (पृ. ८) आपण म्हणू ते बायकोने सर्व मुकाटय़ाने मान्य करावे, त्यासंबंधी कसलीही शंका तोंडानेही उचारू नये असा त्यांचा खाक्या दिसतो. (पृ. ९) त्याला काही अंशी रमाबाईंची स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाच्या खुजेपणाची (न्यायमूर्तीच्या तुलनेत) जाणीव हीही कारणीभूत होती. याउलट, आनंदीबाई जोशी यांच्या तुलनेत गोपाळराव खूपच सामान्य होते. परंतु आनंदीबाईंनी गोपाळरावांबद्दल सदैव कृतज्ञताच बाळगली. त्यांच्यासंबंधीचे सरदेसाईंचे भाष्य असे- ''स्त्रीशिक्षणावरील जबर निष्ठा हा गोपाळरावांचा प्रशंसनीय गुण होता व त्याबद्दल आनंदीबाईंनी त्यांच्याविषयी प्रकट केलेली कृतज्ञताही योग्य होती. पण  गोपाळरावांनी मात्र आनंदीबाईंना बोचून काढले.'' (डॉ. आनंदीबाईंची शोकांतिका अशी, की विदेशी अ‍ॅलोपथीचे पद्धतशीर शिक्षण घेऊन परतल्यावर दुखणे विकोपाला गेल्यावरही त्यांच्यावर आयुर्वेदिक औषधाचे प्रयोग गोपाळरावांनी केले. आनंदीबाईंबरोबरच गोपाळरावांनी केलेला हा स्वत:चाही पराभव होता. पण 'पत्रव्यवहारातून दिसणारा आनंदी-गोपाळ यांचा संसार' हे बंधन स्वत:स घातल्याने सरदेसाई यांच्या लिखाणात याचा निर्देश होत नाही.) गोपाळराव जोशी व न्या. रानडे यांच्यात कृतिशीलतेच्या बाबतीत जे अंतर होते त्यांचा सरदेसाई वाजवी उल्लेख करतात. म्हणजे गोपाळरावांनी आनंदीबाईंच्या शिक्षणासाठी स्वत: कष्ट, अवहेलना सोसली; पण न्यायमूर्तीनी मात्र घरच्या बायकांकडून रमाबाईंच्या शिक्षणाला होणाऱ्या विरोधालाही प्रतिकार केला नाही. ते सर्व रमाबाईंनाच सोसावे लागले. परंतु आनंदीबाई व रमाबाई दोघींनाही जी तुच्छतेची वागणूक मिळाली, त्याचे मूळ पुरुषी अहंगंडात काही प्रमाणात नक्कीच होते. तसे साम्य लेखक दाखवत नाही.
आनंदीबाई जोशी व रमाबाई रानडे यांच्या उलट आनंदीबाई (बाया) कर्वे यांची स्थिती आहे. त्या आपल्या 'माझे पुराण'मध्ये म्हणतात, ''कर्व्यांचे वागणे माझ्याशी काय, मुलांशी काय, सडेतोडपणाचे, तुटकपणाचे व हिशेबी असे. मात्र कर्वे माझ्याशी तसे वागतात हे मी कोणाच्या लक्षात आणून दिले नाही.'' पार्वतीबाईंच्या या विधानावर लेखकाचे भाष्य असे- ''कव्र्यानी जरूर तेथे आपल्या कर्तबगार बायकोची बाजू घेतली नाही, ही रुखरुख आनंदीबाईंच्या मनाला अजून बोचत आहे.'' (पृ. ३२)
इथे असे वाटते की, आनंदीबाईंनी कर्व्यांच्या त्यांच्याशी तुटक, हिशेबी वागण्याचा उल्लेख इतरांसमोर केला नाही याचेही मूळ त्यांच्यावर असलेल्या मध्ययुगीन संस्कारांत आहे. आणि ते आनंदीबाई जोशी व रमाबाई रानडे यांना समांतर आहे. पण सरदेसाई या शक्यतेकडे दुर्लक्षच करतात. लग्नानंतर आनंदीबाईंना पूर्वीप्रमाणे कर्व्यांना 'अण्णा' म्हणणे अवघड वाटू लागले, याचे कारण सरदेसाईंच्या मते, जुने संस्कार हे होते.
इथे थोडीशी चुकभूल झाली आहे. अण्णा हे आपल्याकडे आणि कर्नाटक-तामीळनाडूमध्ये मोठय़ा भावाला म्हटले जाते. नवऱ्याला मोठय़ा भावाच्या नात्याचे निदर्शक असलेल्या 'अण्णा' या संज्ञेने हाक मारणे कुणाही स्त्रीला अनुचितच वाटणार. त्यात नव्या-जुन्या मूल्यांचा संबंध नसतो. याउलट, कमलाबाई फडके लग्नानंतरही ना. सीं.चा उल्लेख 'अप्पा' या नावानेच करीत. मग त्यांना कोणत्या मूल्यांचे म्हणायचे?
लक्ष्मीबाई टिळकांबाबतही सरदेसाई यांनी संयमित लिहिले आहे. टिळकांच्या विरोधाभासी स्वभावाचे दाखले लक्ष्मीबाईंच्या लिखाणातून उद्धृत करून ते सांगतात- ''टिळकांनाही आपली बायको शिकून मोठी व्हायला हवी होती, पण त्यासाठी त्यांनी स्वत: काहीच कष्ट घेतले नाहीत. त्याही आर्य पतिव्रता होत्या. 'आज जी मी काही आहे ती टिळकांमुळेच आहे..' असा लक्ष्मीबाईंचा भाव आहे.'' (पृ. ५०)
लीलाबाई व माधव ज्युलियन यांचा संसार या सर्वापेक्षा वेगळा झाला. तो खूप प्रौढपणी झाला. दोघेही सुशिक्षित होते. आणि इतर सर्व स्त्रियांच्या मानाने लीलाबाईंनी माधव ज्युलियन यांच्या स्वभावाच्या मर्यादा स्पष्टपणे सांगितल्या आहेत. माधवरावांबद्दल त्यांना आदर आहे; पण आंधळा वाटेल असा भक्तिभाव नाही.
'आमचा संसार' हे नेटकेपणाने, संयमित शैलीत केलेले विवेचन आहे. मात्र, ते वाचत असताना जाणवते की, न्यायमूर्ती रानडे, गोपाळराव जोशी, अण्णा कर्वे, रेव्ह. टिळक आणि माधव ज्युलियन यांनी आपल्या पत्नीला दिलेल्या वागणुकीस बेफिकीरपणा कारणीभूत होता. या बेफिकिरीचा प्रज्ञेशी, पुरुषी अहंभावाशी, स्वकेंद्रिततेशी संबंध कसा असतो, याचा शोध अधिक सखोलपणे घेतला जायला हवा होता. र. गो. सरदेसाईंचे ७० वर्षांपूर्वीचे हे लिखाण म्हणूनच पथदर्शक मानावे लागते. 

- लोकसत्ता (लोकरंग, विस्मृतीत गेलेली पुस्तके)
दि. ०४/०१/२०१५, रविवार

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...