Saturday, January 31, 2015

एअरफोर्स वन - सारंग थत्ते (निवृत्त कर्नल)

आजपर्यंत कधीच न झालेली गोष्ट यंदा होते आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट देण्याचे प्रसंग तसे बर्‍याचदा आले. पण आजपर्यंत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षानं भारतीय प्रजासत्ताकदिन किंवा स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाला उपस्थिती लावली नव्हती. यंदा प्रथमच तसं होतंय. भारताच्या खास आमंत्रणावरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा खास पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र जगभरात अलीकडेच घडलेल्या अनेक दहशतवादी कारवाया आणि अतिरेक्यांनी दिलेल्या धमक्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, ते कितपत सुरक्षित आहेत याबाबत सार्‍यांनाच उत्सुकता आहे. विशेषत: ज्या विमानानं ओबामा भारतात येणार आहेत, त्या विमानाचं असं काय वैशिष्ट्य आहे? वॉशिंग्टन ते नवी दिल्लीपर्यंतचा प्रवास ओबामा त्यांच्या खास विमानातून करतील जे बोईंग कंपनीने तयार केले आहे. हवाई संदेशाच्या भाषेत या विमानाचे नाव आहे ‘एअर फोर्स वन’. खरं तर ते उडतं ‘व्हाईट हाऊस’च आहे. त्याची वैशिष्ट्यं पाहिल्यावर आपल्याला कळेल, त्याला जगातील सर्वात सुरक्षित विमान का म्हटलं जातं?
 
सहा मजल्यांच्या उंचीचे
तीन मजली विमान
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकरिता बोईंग कंपनीने ७४७-२०० बी या मॉडेलची दोन विमाने तयार केली आहेत. विमानांना त्यांच्या शेपटावर लिहिलेल्या क्रमांकामुळे ओळखले जाते. त्यानुसार एकावर नंबर आहे २८००० आणि दुसर्‍यावर २९०००. बर्‍याचदा ही दोन्ही विमाने राष्ट्रपतींच्या बरोबरच असतात. ‘एअरफोर्स वन’मध्ये सुमारे ४००० चौरस फूट जागा आहे.  पंचतारांकित हॉटेलपेक्षाही हे हवाई कार्यालय उच्च दर्जाचे आहे. काम आणि आरामासाठी येथे ऐसपैस जागा आहे. राष्ट्रपतींकरिता वेगळ्या खोल्या, ग्रंथालय, व्यक्तिगत कार्यालय, शयनगृह, स्नानगृह अशा अनेक गोष्टी येथे आहेत. सर्वात वरच्या मजल्यावर चालक दल आणि दळणवळणाची संचार साधने आहेत. मधल्या मजल्यावर बाकी सर्व व्यवस्था आणि सर्वात खाली सामान ठेवण्याची व्यवस्था आहे. विमानाची उंची एका सहा मजली इमारतीइतकी म्हणजे ६३ फूट आहे.
 
२००० माणसांचा ‘तयार’ स्वयंपाक!
राष्ट्रपती जेव्हा परदेश दौर्‍यावर जातात तेव्हा निवडक सहकार्‍यांना त्यांच्याबरोबर ‘एअर फोर्स वन’मध्ये जाण्यासाठी निवडले जाते. विमानात एक मोठा संमेलन कक्ष आहे. गरज पडल्यास त्यालाच भोजन कक्ष बनवले जाते. इथल्या स्वयंपाकघरात एकावेळी १०० लोकांचे जेवण बनवण्याची सोय आहे, मात्र विमानाच्या कोठारात २००० लोकांचे खाणे फ्रीजरमध्ये ठेवलेले असते. गरजेच्या वेळी ते गरम करायचं की झालं! दौर्‍याबरोबर जाणार्‍या वर्तमानपत्राचे वार्ताहर, अन्य माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. विमानामधून फॅक्स, ई-मेल वगैरेसाठी सॅटेलाइटद्वारे संपर्क साधला जातो; शिवाय मनोरंजन किंवा इतर कामांसाठी टेलिव्हिजनवर हवा तो कार्यक्रम पाहण्याची सोय!
 
स्वयंचलित लोडर
सुरक्षेच्या कारणास्तव ‘एअरफोर्स वन’ची बरीचशी माहिती गोपनीय ठेवली जाते. विमानात एक डॉक्टरची सेवा सर्वकाल उपलब्ध असते आणि आवश्यक तपासण्या आणि अत्याधुनिक उपचारांची सोय तेथे असते. राष्ट्रपतींच्या रक्तगटाशी मिळत्या रक्ताच्या बाटल्या विमानात उपलब्ध असतात. विमानाच्या एका कक्षात फोल्डिंग स्वरूपात शस्त्रक्रिया टेबलही उपलब्ध असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची औषधे आणि औषधालयाचीही सोय येथे आहे. ‘एअरफोर्स वन’ प्रकृती व स्वास्थ्याच्या बाबतीत अतिशय जागरूक आहे. विमानाच्या खालच्या मजल्यावर सामान चढवायला स्वयंचलित लोडरची व्यवस्था आहे. ज्यामुळे कोणत्याही विमानतळावर ‘एअरफोर्स वन’ला त्या विमानतळाच्या सामान चढवायच्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत नाही. यामुळे सुरक्षेला असणारा धोका बर्‍याच प्रमाणावर टाळला जातो.

३६००० फुटांवरही सुरक्षित
या विमानाची दळणवळण यंत्रणा सवरेत्तम आहे. अगदी उडत्या विमानातूनही जगातील कोणत्याही कोपर्‍यात कोणत्याही अडथळ्यांशिवाय संवाद होऊ शकतो आणि हा संवाद पूर्णपणे सुरक्षित असतो. कोणीही या गोष्टी टॅप करून ऐकू शकत नाही. फॅक्स, रेडिओ, टेलिव्हिजन आणि कार्यालयीन अन्य उपकरणे ज्या पद्धतीने जमिनीवर उपयोगात येतात त्याच पद्धतीने इथेसुद्धा केली जातात. ३६,००० फूट उंचीवरून चाललेल्या या विमानात कार्यालयीन सर्व काम सहजपणे तर होतंच, पण तरीही अत्यंत सुरक्षित. अणुस्फोटापासूनही हे विमान सुरक्षित राहू शकते. खरे तर इलेक्ट्रॉनिक्सची साधने अवकाशात विकिरण प्रभावामुळे विमान चालवण्यात अडथळा आणू शकतात, पण ‘एअरफोर्स वन’वर असलेली सर्व उपकरणे अशा प्रकारे बनवलेली आहेत की त्यावर असलेल्या सुरक्षा कवचामुळे विमानावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. विमानावर शत्रूनं मिसाइल हल्ला केला, तरीही उष्ण गोळे फेकून मिसाइलच्या मार्गात बदल करता येऊ शकतो आणि ‘एअरफोर्स वन’ला वाचवता येऊ शकतं.
 
राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याचीही सोय!
विमानावरील सर्व कर्मचार्‍यांची कठोर चौकशी केल्यानंतरच त्यांना या विमानात काम करण्याची परवानगी दिली जाते. बहुतेक कर्मचारी सशस्त्र सेनेमधून आलेले असतात. विमानात कोणत्याही प्रकारे विषबाधा वगैरे घटना होऊ नये म्हणून स्वयंपाकी आणि स्वयंपाकाचे सामान खरेदीसुद्धा गुप्तपणे केली जाते. राष्ट्रपतींचे अंगरक्षक म्हणजे गुप्तहेर संघटनेचे एजंट आपल्या शस्त्रासकट सुरक्षेसाठी २४ तास दक्ष असतात. नोव्हेंबर १९६३ मध्ये राष्ट्राध्यक्ष केनेडी यांच्या हत्त्येनंतर लिंडन जोन्सन यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ ‘एअरफोर्स वन’वर दिली गेली होती. १९४३ मध्ये फ्रान्क्लीन रुझवेल्ट अमेरिकेचे प्रथम हंगामी राष्ट्राध्यक्ष होते. ज्यांनी कासाब्लांका येथे अमेरिकेबाहेर दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी बैठक बोलावण्यासाठी बोईंग ३१४ विमानाचा उपयोग केला होता. सुरुवातीला बी-२४ बॉम्बरमध्ये फेरफार करून राष्ट्राध्यक्षांकरिता उपयोगात आणले गेले होते. तेव्हा याचे नामकरण ‘गेस व्हेअर टू’ असे केले होते. त्यानंतर इतक्या वर्षांत जसेजसे राष्ट्रपती बदलत गेले आणि उद्योगात बदल घडून आले तसेतसे उड्डाणाकरिता नवीन नवीन विमाने बनवली गेली. आता उपयोगात असलेली विमाने २०१७ मध्ये परत बदलली जातील.
 
उडतं  ‘व्हाईट हाऊस’
लांबी - २३१ फूट १० इंच
उंची - ६३ फूट ५ इंच
पंखांची रुंदी - १९५ फूट ८ इंच
इंजिन - चार जनरल इलेक्ट्रिक 
सीएफ- ६/८०सी२बी१जेट इंजिन
थट्र - ५६७०० पॉण्ड 
प्रत्येक इंजिन
जास्तीत जास्त वेग - ६३० से ७०० मैल प्रतितास
उड्डाणी उंची- ४५,१०० फूट
इंधन - ५३६११ गॅलन
पृथ्वीची अर्धी फेरी पूर्ण इंधनासकट
वजन - ८३३००० पौंड
एकूण प्रवासी समता -
७० (चालक/कर्मचारी दल २६)
टेलिफोन - ८५
टेलिव्हिजन - १९
विजेच्या तारा - २३८ मैल
 
- मंथन, लोकमत 
दि. ३१/०१/२०१५, शनिवार

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...