Sunday, April 21, 2013

मी न माझा - वीणा गवाणकर

चीन, जपान इत्यादी पूर्वेकडील देशांतून येणारा शेंगदाणा तेथील स्वस्त मजुरीमुळे अमेरिकन शेंगदाण्याच्या मानाने स्वस्त पडे. खेरीज त्याच्यावर आयात करही माफक होता.  त्याचा परिणाम अमेरिकेतील शेंगदाणा पडून राहण्यावर झाला. त्याला बाजारपेठ मिळेना. या समस्येला तोंड देण्यासाठी शेंगदाण्याचे औद्योगिक दृष्ट्या महत्त्व सरकारला पटवून देणं भाग होतं. त्यासाठी उभ्या अमेरिकेत प्रा. कार्व्हरखेरीज अधिक योग्यतेचा दुसरा कोण असणार!
१९२० साली यासंबंधीची बैठक माँटगोमेरी इथे होणार होती. म्हणून, शेंगदाणा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी १९१९ मध्ये स्थापन केलेल्या, United Peanut Growers Asso. या संघटनेने प्रा. कार्व्हरना पाचारण केलं होतं. आपल्या 'लाडक्या' शेंगदाण्याची जाहिरात करण्याची संधी प्रा. कार्व्हर सोडते तरच नवल!
शेंगदाण्यापासून बनवलेल्या निरनिराळ्या उत्पादनांचे नमुने दोन भल्या मोठ्या खोक्यांत भरून प्रा. कार्व्हर १३ सप्टेंबर १९२० रोजी माँटगोमेरीच्या सिटी हॉलमध्ये भर दुपारी पोहोचले.
सिटी हॉलमध्ये पोहोचायला उशीर झाल्याने, त्यांची वाट पाहून पिनट असो. चे सभासद दुपारच्या जेवणासाठी सिटी हॉल सोडून एका हॉटेलात गेले होते. डॉ. कार्व्हर भर उन्हात तडक त्या हॉटेलच्या दाराशी पोहोचले. दरवानाने त्यांना अडवलं.
"काळ्यांना या  हॉटेलात मज्जाव आहे."
प्रा. कार्व्हरनी हातातली खोकी खाली ठेवली. घामाने थबथबलेले आणि थकव्याने, भुकेने थरथरणारे, साठी उलटलेले प्रा. कार्व्हर कसेबसे उभे राहिले. या दरवानाशी काय हुज्जत घालणार! ते म्हणाले -
"माझं नाव कार्व्हर, मला युनायटेड पिनट असो. च्या बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. त्या लोकांना मी इथे आल्याचं कळवाल तर बरं !"
दरवानाने आत निरोप धाडला. मग त्यांना मागच्या दराने आत घेण्यात आलं. एका मोठ्या दालनाच्या बाहेर उभं करून सांगण्यात आलं-
"शेंगदाणेवाले शेतकरी आत्ताच जेवायला बसले. तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल."
काही वर्षांनंतर या प्रसंगाची आठवण सांगताना प्रा. कार्व्हर म्हणाले, "या उपेक्षेला, अवमानाला उत्तर म्हणून, सामान उचलून चालू लागणं मला कठीण नव्हतं. मीही माणूस आहे. माणसाच्या मानापमानाच्या भावना मलाही आहेत. तेथून तडक निघावं अशी प्रबळ उर्मी क्षणभर माझा ताबा घेऊन गेली. पण मी विचार केला; माझ्या वैयक्तिक भावनेच्या कौतुकासाठी किंवा उद्योगपती-व्यापारी यांच्या संपत्तीची वृध्दी करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. मी आलो आहे त्या गरीब शेतकऱ्यांसाठी, ज्यांनी माझ्या शब्दावर विसंबून भुईमूग पेरला त्यांच्यासाठी. या संघटनेच्या ठरावाचा फायदा त्या गरीब शेतकऱ्यांना मिळणार होता म्हणून! "
तर या बैठकीपुढे हजर व्हायला  त्यांना दुपारचे दोन वाजले. सर्व सभासद थंड आणि अलिप्त वाटत होते. पण झाल्या प्रकारचा कोणताही परिणाम वागण्यात न दाखवता प्रा. कार्व्हरनी आपली खोकी उघडली.….
"गाईच्या शंभर पौंड दुधापासून दहा पौंड चीज निघतं. पण शेंगदाण्याच्या तेवढ्याच दुधापासून वीस पौंड चीज निघतं. तसंच शेंगदाण्यात जीवनसत्व 'ब' असून Pellagra (पेलाग्रा) रोगावर ते गुणकारी आहे." ही व अशी विधानं ऐकून सारी सभा स्तब्ध झाली.…
याच संघटनेतर्फे 'वेज अँड मिन्स कमिटी' पुढे उभे राहण्यासाठी त्यांना तारांवर तारा पाठवून बोलावण्यात आलं. २० जानेवारी १९२१ रोजी त्यांना वॉशिंग्टन इथे हजर व्हायचं होतं.
'टस्कगी निग्रो शाळेमध्ये' या तारांनी वातावरण कसं भारून टाकलं. सारेजण त्यांचं अभिनंदन करायला धावत होते. टॅरिफ बिलावर बोलायला प्रा. कार्व्हर वॉशिंग्टनला जाणार! शाळेच्या दृष्टीने केवढ्या अभिमानाची घटना ही! मात्र सारेजण एका बाबतीत चिंतित झाले होते.
डॉ. कार्व्हरांचा पोषाख!! अठ्ठावीस वर्षांपूर्वी वर्गबंधूंनी जबरदस्तीने त्यांच्या अंगावर चढवलेला सूट ते आजही वापरीत होते. त्या पोषाखावरून सगळे त्यांना छेडीत होते. आता तरी नवीन पोषाख शिवा म्हणून आग्रह करीत होते; पण अंहं! शेवटी ते साऱ्यांना म्हणाले -
"हे पहा! जर लोकांना माझा नवीन पोषाख पाहायची इच्छा असेल तर तो मी एका खोक्यात घालून पाठवून देतो. आणि जर त्यांना मीच हवा असेन, तर आहे त्या पोषाखात त्यांनी मला स्वीकारलं पाहिजे."
वेज अँड मिन्स कमिटीच्या सदस्यांना पिनट असो. च्या ठरावाची कुणकुण लागली होती. त्यांच्या मते हे माकडाचं खाणं 'शेंगदाणा' म्हणजे जकातीच्या स्वरूपात एक मोठा विनोदच होता. त्या विनोदावर 'भाष्य' करण्यासाठी कमिटीने फक्त दहा मिनिटांचा अवधी दिला होता.
प्रा. कार्व्हर यांनी आपल्या अल्पमोली आणि बहुगुणी शेंगदाण्याबद्दल दहा मिनिटात अशा काही खुमासदार भाषेत माहिती दिली की, समस्त कमिटीची उत्सुकता चाळवली गेली. शेंगदाण्याबद्दलच्या अद्भुत माहितीने सारी सभा तटस्थ झाली. आपली दहा मिनिटं संपताच प्रा. कार्व्हर आपल्या जागेवर परतू लागले, तेव्हा अध्यक्षांसकट साऱ्या सभेने त्यांना विनंती केली की, अधिक विस्तृत विवेचन करावं.
प्रा. कार्व्हरांनी सभा जिंकली होती. विनोदाचा विषय ठरवला गेलेल्या उपेक्षित शेंगदाण्याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.
आपल्या सोबत आणलेल्या भल्या मोठ्या पेटाऱ्यातून छोट्या छोट्या बाटल्या, डबे, काचनळ्या इत्यादी खजिना काढून त्यांनी त्याचं एक प्रदर्शन टेबलावर भरवलं, शेंगदाण्यापासून बनू शकलेल्या असंख्य पदार्थांचं प्रदर्शन! प्रदर्शनातील पदार्थांची माहिती देताना शेंगदाण्याचं वैद्यकीय दृष्ट्या आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्व विशद करण्यास ते विसरले नाहीत. आपण बराच वेळ आपल्या लाडक्या शेंगदाण्याविषयी बोलत आहोत हे ध्यानी येताच प्रा. कार्व्हरांनी आपलं भाषण आवरतं घेतलं. अध्यक्षांच्या लक्षात येताच त्यांनी कार्व्हरना विनंती केली -
"तुमच्यावर वेळेचं बंधन नाही. जास्तीत जास्त माहिती द्याल तर या कमिटीवर उपकार होतील."
या संधीचा पुरेपूर फायदा प्रा. कार्व्हरनी घेतला. आपल्या विनोदी व मिष्किल शैलीत त्यांनी शेंगदाण्यापासून तीनशे पदार्थ कसे बनवता येतात हे सांद्यत सांगितलं. शेंगदाण्यापासून बनवता येणारा 'शाकाहारी' मांसाहार, कालवं इत्यादी पदार्थ मांसाहारी पदार्थांची उणीव भासू देत नाहीत. शेंगदाण्याच्या सालापासून वेगवेगळे तीस टिकाऊ रंग बनवता येतात. सारांश, शेंगदाण्याचा कोणताच घटक फुकट न जाता त्यापासून काही ना काही उपयुक्त पदार्थ बनू शकतात याची त्यांनी ग्वाही दिली.
"हे सारे पदार्थ तुम्ही स्वतः तयार केलेत का? कुठे?"
"होय. हे सारे पदार्थ मी आपल्या प्रयोगशाळेत तयार केले आहेत. अलाबामातील 'टस्कगी' निग्रो शाळेत मी शिक्षक आहे. आमचं रताळ्यावरही संशोधन चालू आहे. त्यापासून आतापर्यंत शंभर निरनिराळ्या गोष्टी तयार करण्यात आम्हाला यश मिळालं आहे."…
एका श्रोत्याने त्यांना विचारलं - "तुम्हाला हे सारं सुचलं कसं?"
"कसं म्हणजे? बायबलमधून! जेनेसिसच्या पहिल्याच भागात म्हटलेलं आहे -'भूतलावर उगवणारी प्रत्येक वनस्पती, प्रत्येक बी, प्रत्येक फळ, तुमच्या अन्नाची गरज भागवेल. मांसाहारासारखा तुम्ही तिचा उपयोग करू शकाल.' यातूनच मी प्रेरणा घेतली. विधाता निरर्थक कधी तरी बोलेल का?"

- मी न माझा (एक होता कार्व्हर)
लेखिका - वीणा गवाणकर    
      
              

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...