Saturday, April 13, 2013

"टेस्ट ट्यूब बेबी" च्या बाबाची गोष्ट

                   नैसर्गिक यंत्रणांचे गूढ उकलण्यासाठी आपल्या मेंदूचा जेवढा म्हणून उपयोग करता येईल, तेवढा करत करत माणसाने विज्ञानाच्या क्षेत्रात अवकाशालाही गवसणी घालण्याचे स्वप्न पुरे केले. तरीही एकूण आकळलेली माहिती फारच कमी आहे, याचे भान मात्र सुटले नाही. त्यामुळेच हा न संपणारा शोध अद्याप सुरूच राहिला आहे. अँटिबायोटिक्सपासून डीएनए मॅपिंगपर्यंतच्या सगळ्या संशोधनातून माणसाचे आयुष्य अधिक काळपर्यंत कसे आरोग्यपूर्ण राहील, याचा विचार झाला. जन्म आणि मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या माणसाच्या धडपडीतूनच 'टेस्ट टय़ूब बेबी'च्या रूपाने माणसाने विज्ञानाच्या क्षेत्रात एक अनोखे पाऊल टाकले. या 'टेस्ट टय़ूब बेबी'च्या जनकांपैकी रॉबर्ट एडवर्ड्स यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाने मानवाच्या जगण्यातील या एका सुंदर शोधाचे पुन्हा स्मरण होणे साहजिक आहे.
              मानवी अपत्यजन्म कसा होतो, यामागची शास्त्रीय सत्ये माणसाने जाणली खरी; पण तरीही हमखास अपत्यजन्माची हमी देणारी प्रक्रिया ही त्याच्यासाठी वैज्ञानिक कलाविष्कार होती. माणसाचे ते स्वप्न सत्यात आणणारे सौदागर होते ब्रिटनचे रॉबर्ट एडवर्ड्स व डॉ. पॅट्रिक स्टेपेटो. या दोघांनी अथक संशोधनानंतर, स्त्रीच्या गर्भाशयाबाहेर गर्भधारणा घडवून आणण्यात यश मिळवले. अपत्यप्राप्तीसाठी अनेक वैद्यकांचे उंबरठे झिजवलेले लेस्ली व जॉन ब्राऊन हे दाम्पत्य जेव्हा डॉ. स्टेपेटो व एडवर्ड्स यांच्याकडे आले, तेव्हा त्यांनीही हा विश्वास सार्थ ठरवला. २५ जुलै १९७८ रोजी लुसी ब्राऊन या गोंडस मुलीचा जन्म या बाह्य़ पात्र फलनाने झाला. कुरळ्या केसांच्या, निळ्या डोळ्यांच्या या मुलीने सगळ्यांचेच लक्ष वेधले, पण अनेकांनी भीतीचे दरवाजे उघडेच ठेवले होते. ती जगेल का, जगली तर तिला रोग होतील का, तिला मुलेबाळे झाली तर त्यांच्यात काही दोष असतील का, अशा अनेक प्रश्नांनी रिकाम्या डोक्यांमध्ये काहूर मांडले असताना एडवर्ड्स व स्टेपेटो मात्र त्यांच्या तंत्रावर कमालीचा विश्वास ठेवून होते. आज लुसीही आई झाली आहे, म्हणजे खरे तर काहीच विपरीत घडलेले नाही. लुसीचा जन्म व नंतर विवाहापासून ते तिला मुलगा होईपर्यंत डॉ. एडवर्ड्स सावलीसारखे तिच्या मागे उभे राहिले. विज्ञानाच्या सत्यतेच्या ध्यासापलीकडे असलेले माणूसपण त्यात लपले होते. डॉ. एडवर्ड्स यांना २०१० मध्ये टेस्ट टय़ूब बेबी तंत्रासाठी नोबेलही मिळाले. तो योग स्टेपेटो यांच्या नशिबी नव्हता, कारण त्यांचे त्यापूर्वीच म्हणजे १९८८ मध्ये निधन झाले.
                 मूल जन्माला घालणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे, असे समजून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वैज्ञानिकांना मान्य नव्हता. काही जोडप्यांना मूल का होत नाही, हा प्रश्न त्यांना सतावत होता. १९४८ मध्ये डब्ल्यू मेकली कॉनेल या दिग्दर्शकाने एक चित्रपट 'टेस्ट टय़ूब बेबी' याच नावाने काढला होता.  त्यामधील मूळ कल्पना 'बाह्य़ पात्र फलनातून अपत्यप्राप्ती' हीच होती. ही कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी मात्र तीन दशके लोटावी लागली. 'टेस्ट टय़ूब बेबी' हा मानवी मनातून निर्माण झालेल्या विज्ञानकल्पनेचा मूर्त आविष्कार होता. त्यामुळे पृथ्वीवरील समस्त मानवाच्या जीवनात काही आमूलाग्र बदल घडणार नव्हता, की त्याचे जगणे संपन्न होणार नव्हते. त्याच्या वेदनांचे हरण होणार नव्हते की त्याच्या आयुष्याची दोरी लांबणार नव्हती. तरीही या शोधाने माणसाला एका अप्राप्य गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचे समाधान मात्र मिळाले. निसर्गावर मात करण्याच्या माणसाच्या विजिगीषू वृत्तीतून हे संशोधन झाले. मृत्यू लांबवण्यासाठी आणि वेदना संपवण्यासाठी जसे औषधशास्त्र विकसित होत गेले, तसेच अनावश्यक संतती वगळण्याचे आणि टाळण्याचे संशोधन माणसाने याच वृत्तीतून केले. आपण स्वत:च्या बुद्धीच्या जोरावर निसर्गनिर्मित गोष्टींवर अल्प प्रमाणात का होईना नियंत्रण मिळवू शकतो, हे समाधान माणसासाठी अधिक महत्त्वाचे होते. वैज्ञानिक संशोधनाचा हा प्रवाह अखंड सुरू असतानाच माणसाने संस्कृतीच्या विकासात अनेक नव्या संकल्पनांची भर घातली. अपत्यप्राप्तीला दत्तकाचा पर्याय शोधला. पुरुषी अहंकारातून निर्माण झालेल्या वंशसातत्याच्या खुळचट कल्पनांमुळे स्त्रीचा होत असलेला छळ कमी करण्यासाठी सामाजिक पातळीवर अनेक प्रयत्न केले गेले. निसर्गनियम डावलण्यापेक्षा समूहाने राहणाऱ्या माणसाने आपल्या सांस्कृतिक क्षेत्रावर जमलेली परंपरांची पुटे दूर करत नव्या, प्रगतिशील विचारांना वाट करून दिली. टेस्ट टय़ूब बेबी हे त्याचे एक फलितरूप आहे. मूल होणे हा केवळ चमत्कार नाही आणि त्याचा नशिबाशीही संबंध नाही, हा विचार आत्ता कुठे शहरी भागात रुजायला लागला आहे. रॉबर्ट एडवर्ड्स व डॉ. पॅट्रिक स्टेपेटो यांना त्याचे श्रेय द्यायला हवे. जगण्याचा आनंद केवळ वंशसातत्यात नाही, ही विचारप्रणाली प्रगत देशांनी ज्या सहजतेने स्वीकारली. ती सहजता भारतासारख्या, परंपरेचा कमालीचा पगडा असलेल्या देशात स्वाभाविक नसली तरी अशक्य नाही. जन्माचे वैज्ञानिक सत्य उलगडल्याने अपत्यप्राप्ती होत नसलेल्या स्त्रियांवरील सामाजिक बहिष्कार कमी होण्यास मात्र निश्चितच मदत झाली आहे हे सत्य मान्य करायला हवे.
                 आल्डस हक्सले यांनी त्यांच्या 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' या पुस्तकात 'ब्रीडिंग फार्मस' अशी संकल्पना मांडली होती. तसे काहीतरी घडेल व माणूस निसर्गाचेच खेळणे करून टाकेल, अंडपेशीची निवड करणे म्हणजेच एक छोटा गर्भपात आहे, असे अनेक नैतिक मुद्दे हमसून धुमसून मांडले गेले. टेस्ट टय़ूब बेबीच्या वैज्ञानिक आविष्कारानंतरच्या गेल्या पस्तीस वर्षांमध्ये अशी काही अनागोंदी घडली नाही, हे सुचिन्ह असले, तरीही या तंत्रज्ञानाचे उद्योगात रूपांतर मात्र झाले. वर्षांला साडेतीन लाख बालके टेस्ट टय़ूब बेबी तंत्राने जन्म घेत आहेत. आता त्या तंत्राचे वैद्यक बाजारपेठेत रूपांतर झाले आहे, हे खरे असले तरी पन्नास लाख जोडप्यांच्या मुखावर अपत्यप्राप्तीच्या सुखाचा आनंद विलसतो आहे तो एडवर्ड्स व स्टेपेटो यांच्या टेस्ट टय़ूब बेबी तंत्राचाच परिणाम आहे. एडवर्ड्स यांना भारतात येण्याची मनोमन इच्छा होती, पण ती अखेपर्यंत या ना त्या कारणाने फलद्रूप होऊ शकली नाही. आज त्यांच्या रूपाने असंख्य जोडप्यांसाठी टेस्ट टय़ूब बेबी या जैवतंत्राच्या रूपाने 'कल्पवृक्ष' लावून 'बाबा' मात्र अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे.

- लोकसत्ता (संपादकीय/अग्रलेख)
दि. १३/०४/२०१३, शनिवार   

1 comment:

  1. अत्यंत सुंदर लेख आहे .. मुद्दा वैज्ञानिक असूनाशी सोपी शब्दरचना आहे ...सर्वाना समजेल असे लिखाण आहे ...सुंदर .रवींद्र अभ्यंकर

    ReplyDelete

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...