Monday, November 26, 2012

काचेचे भांडे - शिरीष पै

... घार पिलांना नजरेनं पोसते म्हणतात. तशी आईही मुलींच्या अब्रूचं सारखं रक्षण करीत असते. त्या काळात तर समजाच्या तोंडी एकच वाक्य असे, 'स्त्रीची अब्रू म्हणजे काचेचं भांडं, एकदा फुटलं कि पुन्हा सांधायचं नाही.' मुलगी वयात आली की तिच्या बोलण्या-चालण्या-वागण्याला डोळ्यात तेल घालून जपायचं हे तिच्या आईचं परम कर्तव्य होऊन बसायचं. 'मुलगी म्हणजे बापाच्या छातीवरची जळती शेगडी,' वयात आलेल्या मुलीचे बाप तेंव्हा म्हणायचे. 
आणि आता...आता काय परिस्थिती आहे? तीच! किंवा त्याहूनही भयानक...आजच्या ह्या जगात माणसाचे प्राण कसे सुरक्षित राहतील हे एकच भय माणसाला ग्रासून राहिले आहे. मग बायकांच्या अब्रूची तर गोष्टच सोडा! त्यातून 'बायकांची अब्रू म्हणजे काचेचं भांडं!, एखादा पुरुष जेव्हा आजच्या जगात स्त्रीवर बलात्कार करतो तेव्हा त्याच्या अब्रूचे खोबरे होत नाही. पण तो ज्या स्त्रीवर - किंवा बालिकेवर बलात्कार करतो - तिच्याकडे पाहण्याची लोकांची दृष्टी मात्र बदलते. त्या स्त्रीचेही मन दुभंगते. तिचा आत्मविश्वास फाटतो. तिच्या डोक्यावर घडलेल्या घटनांचा दुष्परिणाम होतो.
..का आपलं मन हे असं घडलं आहे? का समाजाचे विचार तरी अशा दिशेनं धावत असतात? आज जग पुढं गेलंय, समाज सुधारलाय, स्त्री सुशिक्षित झालीय, बंडखोर झालीय, स्वच्छंदी झालीय, निर्भय झालीय, तरी तिच्या अब्रूचा प्रश्न आला की लोक तसाच आणि तोच विचार करतात, असं का?
निसर्गही पुरुषाच्या बाजूचाच आहे. त्यानं पुरुषाला स्त्रीहून अधिक बलदंड केलं आहे. स्त्रीचा उपभोग घेऊनही तो मुक्त राहतो आणि स्त्रीला मात्र गर्भाचे ओझे वहावे लागते. स्त्री मिळवती झाली, घराबाहेर पडली तरी घरी परत येताच घराची जबाबदारी तिच्यावर अधिक पडते. घर ही पुरुषाची विश्रांती आहे, तर स्त्रीचा कैदखाना आहे. निसर्गानंच तिच्यावर अपत्यसंगोपनाची, कुटुंबाची जबाबदारी अधिक लादली आहे. अशा परिस्थितीत स्त्री मुक्त होणार कशी आणि कधी? कायद्यानं गर्भपात संमत केला आणि गर्भधारणा होऊ न देण्याची उत्तम साधनं उपलब्ध झाली तरी...तरीही झालेल्या मुलाचं ओझं स्त्री फेकून देणार कशी?

- काचेचे भांडे (सय)
लेखिका - शिरीष पै      

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...