Showing posts with label कविता-गाणी. Show all posts
Showing posts with label कविता-गाणी. Show all posts

Thursday, April 5, 2018

नन्ही पुजारन - मजाज़ लखनवी

नन्ही पुजारन

एक नन्ही मुन्नी सी पुजारन

पतली बाहें, पतली गर्दन

भोर भये मंदिर आई है

आई नहीं है, माँ लायी है

वक़्त से पहले जाग उठी है

नींद भी आँखों में भरी है

ठोड़ी तक लट आयी हुई है

यूँही सी लहराई हुई है

आँखों में तारों सी चमक है

मुखड़े पे चांदनी की झलक है

कैसी सुंदर है, क्या कहिये

नन्ही सी एक सीता कहिये

धुप चढ़े तारा चमका है

पत्थर पर एक फूल खिला है

चाँद का टुकडा फूल की डाली

कमसिन सीधी भोली-भाली

कान में चांदी की बाली है

हाथ में पीतल की थाली है

दिल में लेकिन ध्यान नहीं है

पूजा का कुछ ग्यान नहीं है

कैसी भोली और सीधी है

मंदिर की छत देख रही है

माँ बढ़ कर चुटकी लेती है

चुपके-चुपके हंस देती है

हँसना रोना उसका मजहब

उसको पूजा से क्या मतलब

खुद तो आई है मंदिर में

मन उसका है गुडिया घर में 


कवी - मजाज़ लखनवी

Wednesday, January 17, 2018

दिवस

दिवस

ओले-सुके,
चिंब-ओले
दिवस
वर्षभर धुवून,झटकून वाळत घातले.

काही खडखडीत वाळले,
चुरचुरीत झाले.

काही राहिले अर्धवट ओले,
अर्धवट कोरडे,
विचित्र वास देत राहिले.

काही उडून पडले
मोग-याच्या वेलावर
दरवळून गेले.

काही कॅक्टसमध्ये अडकले
भळभळले.

काही थारोळ्यात पडले
भिजकटले.

काही फुफाट्यात
अंगभर
धूळ माखले.

काही रस्त्यावर..
जड चाकांखाली
चेंगरले,
चिरडले.

काही दोरीवरच
शहाण्यासारखे
जस्सेच्या तस्से.

काही मात्र
पडले
काळजाच्या डोहात

आणखी ओले झाले,
भिजत,शहारत,
चमकत राहिले

ओल्या उबेत
ध्रुवपदासारखे
घोळत राहिले,

गवसणीतल्या सतारीसारखे
मूक झंकारत राहिले.

दिवस...दिवस..
वर्षभराच्या
दोरीवरचे..

दिवस... दिवस
ते दिवस..

   
कवयित्री - संजीवनी बोकील

चहा

चहा

चहाच्या  कपासोबतच त्याने
मैत्रीचा हात पुढे केला
तेंव्हा ती भांबावली
अरे लग्न झालेय
मूलं मोठी , छान सगळे चाललेय
म्हणाली

तो हसला आणि म्हणाला
अगं मी मैत्री म्हणतोय तुला ....!

ती पुढे म्हणाली

आणि कसं आहे
मला हे असं  आवडतच नाही
मी बरी नि माझे काम बरे
अशा गोष्टींसाठी
माझ्या कड़े वेळ ही नाही

तो पुन्हा हसला म्हणाला
अगं मी मैत्री म्हणतोय तुला ....!

हो हो तेच ते
इथे सगळ्यांचीच नजर असते
सगळ्यांना उचापती पडल्यात
प्रमोशन तोंडावर आहे
साध्या साध्या गोष्टींचेही  
काहूर करतात

तो पोट  धरुन हसला आणि म्हणाला
अगं म्हणूनच मी मैत्री म्हणतोय तुला ....!

इतके बोलताना  
धाप लागलेली तिला
चहा तर थंडगारच,
निवून गेलेला  

मग अचानक तिच्या डोळ्यात
उष्ण उष्ण  पाणी
कित्येक दिवसात खरे तर
असे म्हटलेच नाहीये कुणी

त्याने  शांतपणे खिशातून रुमाल काढला
सहजतेने तिच्या समोर धरला

मग ती अजूनच कोसळली
अजूनच स्फुन्दली
डोळ्यांच्या काठाने
मनसोक्त वाहिली

यावेळी तो हसला नाही
तिच्या नजरेत पाहून म्हणाला
इतक्याच साठी तर मी

मैत्री म्हणतोय तुला ....!!!!

कवयित्री - शशी डंभारे

Monday, January 15, 2018

असे जगावे

असे जगावे


असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही  चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना
संकटासही ठणकावुनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

करून जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर 

कवी - गुरु ठाकूर 

तुझी तू रहा!

तुझी तू रहा! 

कुणी नसलं तरी चालेल!
तुझी तू रहा
फक्त तुझ्याच डोळ्यांनी
तुझे जग पहा...
हास जेव्हा ओठ हसतील
रड जेव्हा डोळे रडतील.
हसण्यावर, अश्रूंवर,
तुझी सत्ता ठेवून रहा...
काटे जरी बोटी रुततील
फुफाट्यात पावले जळतील
फक्त तुला आवडलेलीच
फुले वेचीत रहा...
मुसळधार सरी येतील
तुझा अंगार विझवू बघतील
विझणाऱ्या ठिणगीवर
फुंकर घालीत रहा...
उसने मुकुट कुणी घालतील
जरी अंगरखे पेहरून सजतील
तुझ्या सुती वस्त्राचा
अभिमान तू वहा...
मग कुठेतरी कमळे फुलतील
सुगंध घेऊन वारे येतील
तुझ्या मोकळ्या गळ्यातले
गीत तोवर गात रहा... 
कवयित्री - संजीवनी बोकील   

Friday, December 8, 2017

हीच अमुची प्रार्थना

हीच अमुची प्रार्थना

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे।।

कवी - समीर सामंत
संगीतकार - कौशल इनामदार 
चित्रपट - उबुंटू (२०१७)

Monday, May 1, 2017

स्वातंत्र्यदेवीची विनवणी

स्वातंत्र्यदेवीची विनवणी


पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका।। 

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरू नका।। 

अज्ञानाच्या गळ्यात माळा, अभिमानाच्या घालू नका।
अंध प्रथांच्या कुजट कोठरी, दिवाभितासम दडू नका।। 

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका।। 

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे।
करतिल दुसरे बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका।। 

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा।
मेजाखालून मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका।। 

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांझ गोडवे गाऊ नका। 

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका।। 

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे।
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका।। 

पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मरा।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका।। 

गोरगरीबा छळू नका। पिंड फुकाचे गिळू नका।
गुणीजनांवर जळू नका। 

उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका। 
मीच विनविते हात जोडुनी वाट वा़कडी धरू नका।। 

परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।। 

भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतिचे शिर कापु नका।। 

कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका।
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका।। 

पुत्र पशुसम विकती ते नर, नर न नराधम गणा तया।
परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडु नका।। 

स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे।
सदन आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळु नका।। 

तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी।
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका।। 

सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामध्ये धरा।
सौजन्याच्या बुरख्याखाली शेपुट घालून पळू नका।। 

करा कायदे परंतु हटवा जहर जातिचे मनातुनी।
एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका।। 

समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका।
दासी म्हणूनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका।। 

नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा।
उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका।। 

माणूस म्हणजे पशू नसे। हे ज्याच्या हृदयात ठसे।
नर नारायण तोच असे। 

लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरू नका। 
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका।। 

कवी - कुसुमाग्रज 

Wednesday, July 29, 2015

अखेरचा सलाम....

 अखेरचा सलाम

हिंदूंचे तीर्थक्षेत्र रामेश्वर
तिथेच बहरला एक विज्ञानेश्वर

ना बुद्धीचा गर्व ना धर्माचा डंख
विहरला ज्ञान-आकाशात लावून अग्नीपंख

राष्ट्रोद्धारास्तव अर्पिली सदैव त्याने मती
जाहला निष्कलंक निष्कपट राष्ट्रपती

ऐसा नर न होणे पुन: नामे अब्दुल कलाम
विनम्र भावे करीतो त्यास अखेरचा सलाम......||

कवी - श्री. शीतल गांधी

Wednesday, April 8, 2015

मराठी अभिमानगीत

मराठी अभिमानगीत 

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी

आमुच्या मनामनांत दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरांत स्पंदते मराठी
आमुच्या नसानसांत नाचते मराठी

आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यांत रांगते मराठी
आमुच्या मुलांमुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरांत वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथेल्या फुलाफुलांत हासते मराठी
येथल्या दिशादिशांत दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते  मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून डोलते मराठी
येथल्या चराचरांत राहते मराठी

गीतकार - सुरेश भट
संगीतकार - कौशल इनामदार

माऊली माऊली

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

तुला साद आली तुझ्या लेकरांची
अलंकापुरी आज भारावली
वसा वारीचा घेतला पावलांनी
आम्हा वाळवंटी तुझी सावली
गळाभेट घेण्या भिमेची निघाली
तुझ्या नामघोषात इंद्रायणी

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा

दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा
लेऊनि तुळशी माळा गळा ह्या, पाहसी वाट त्या राऊळा
आज हारपलं देहभान, जीव झाला खुळा बावळा
पाहण्या गा तुझ्या लोचनांत भाबड्या लेकरांचा लळा

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची
उभी पंढरी आज नादावली
तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी
जिवाला तुझी आस गा लागली
जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माऊली

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, रूप तुझे

विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल

चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी
मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता
घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा

माऊली माऊली, माऊली माऊली
माऊली माऊली, माऊली माऊली

पुंडलिक वरदे हारि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय

गीतकार - गुरू ठाकुर
गायक - अजय गोगावले
संगीतकार - अजय-अतुल
चित्रपट - लय भारी (२०१४)

Monday, March 16, 2015

ती फुलराणी

ती फुलराणी 

हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे 
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ही खेळत होती
गोड निळ्या वातावरणात, अव्याज मने होती डोलत
प्रणयचंचल त्या भृलीला, अवगत नव्हत्या कुमारीकेला
आईच्या मांडीवर बसुनी, झोके घ्यावे गावी गाणी
याहुनी ठावे काय तियेला, साध्या भोळ्या फुलराणीला?

पूरा विनोदी संध्यावात, डोल दोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला, चुंबून म्हणे फुलराणीला
"छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे गं पहात होती?
कोण बरे त्या संध्येतून, हळूच पहाते डोकावून?
तो रविकर का गोजिरवाणा, आवडला अमुच्या राणीला?"
लाज लाजली या वचनांनी, साधी भोळी ती फुलराणी

आन्दोली संध्येच्या बसुनी, झोके झोके घेते रजनी 
त्या रजनीचे नेत्र विलोल, नभी चमकती ते ग्रहगोल
जादू टोणा त्यांनी केला, चैन पडेना फुलराणीला
निजली शेते निजले रान, निजले प्राणी थोर लहान
अजून जागी फुलराणी ही, आज कशी तळ्यावर नाही?
लागेना डोळ्याशी डोळा, काय जाहले फुलराणीला?

या कुंजातून त्या कुंजातून, इवल्या इवल्या दिवट्या लावून
मध्यरात्रीच्या निवांत समयी, खेळ खेळते वनराणी ही
त्या देवीला ओव्या सुंदर, निर्झर गातो त्या तालावर
झुलुनी राहिले सगळे रान, स्वप्नसंगमी दंग होऊन!
प्रणयचिंतनी विलीन वृत्ती, कुमारिका ही डोलत होती
डुलता डुलता गुंग होऊनी, स्वप्ने पाही मग फुलराणी.

"कुणी कुणाला अवकाशांत, प्रणयगायने होते गात
हळूच मागुनी आले कोण, कुणी कुणा दे चुंबनदान!"
प्रणय खेळ हे पाहुनी चित्ती, विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता, वाऱ्यावरती फिरता फिरता
हळूच आल्या उतरून खाली, फुलराणीसह करण्या केली
परस्परांना खूणवुनि नयनीं, त्या वदल्या ही आमुची राणी!

स्वर्गभूमीचा जुळवित हात, नाच नाचतो प्रभात वात
खेळूनी दमल्या त्या ग्रहमाला, हळूहळू लागती लपावयाला
आकाशीची गंभीर शांती, मंद मंद ये अवनीवरती
विरु लागले संशयजाल, संपत ये विरहाचा काल
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी, हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती, तरीहि अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, लख्ख पांढरा दहा दिशांना
जिकडे तिकडे उधळित मोती, दिव्य वऱ्हाडी गगनी येती
लाल सुवर्णी झगे घालूनी, हासत हासत आले कोणी
कुणी बांधिला गुलाबी फेटा, झगमगणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला, हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे, साध्या भोळ्या फुलराणीचे!

 गाऊ लागले मंगलपाठ, सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवी सनई मारुतराणा, कोकीळ घे तानांवर ताना!
नाचू लागले भारद्वाज, वाजविती निर्झर पखवाज
नवरदेव सोनेरी रविकर, नवरी ही फुलराणी सुंदर!
लग्न लागते! सावध सारे!सावध पक्षी! सावध वारे!
दवमय हा आंतरपाट फिटला, भेटे रविकर फुलराणीला!

वधूवरांना दिव्य रवांनी, कुणी गाइली मंगल गाणी
 त्यात कुणीसे गुंफत होते, परस्परांचे प्रेम! अहा ते!
आणिक तेथील वनदेवीही, दिव्य आपुल्या उच्छ्वासाही
लिहित होत्या वातावरणी, फुलराणीची गोड कहाणी!
गुंतत गुंतत कवी त्या ठायी, स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला, नवगीतांनी फुलराणीला!

कवी - बालकवी

Tuesday, March 10, 2015

पितात सारे गोड हिवाळा

 पितात सारे गोड हिवाळा

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायू हळूच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढऱ्या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमध्ये फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुऱ्या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्घ्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

कवी - बा. सी. मर्ढेकर
-----

कोलंबसाचे गर्वगीत

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जू दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राषून मातू दे दैत्य नभामधले, दडू द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळू दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनी मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नभ माथ्यावरती
आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हाला धाम

काय सागरी तारू लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहून घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू , जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारू शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला"

कवी - कुसुमाग्रज
------

Thursday, February 19, 2015

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात

म्यानातुन उसळे तरवारीची पात...वेडात मराठे वीर दौडले
म्यानातुन उसळे तरवारीची पात...वेडात मराठे वीर दौडले सात... ॥धृ.॥

"श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता
रण सोडुनि सेनासागर अमुचे पळता
अबलाहि घरोघर खया

ते फ़िरता बाजुस डोळे...किन्चित ओले...
सरदार सहा सरसवुनी उठले शेले
रिकबित टाकले पाय...झेलले भाले
उसळित धुळिचे मेघ सात निमिषात... ॥१॥

आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना
अपमान् बुजविण्या सात अरपुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात... ॥२॥

खालुन आग, वर आग ,आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात... ॥३॥

दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरन्गे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वारयावर गात ॥४॥

म्यानातुन उसळे तरवारीची पात...वेडात मराठे वीर दौडले सात... 

कवी - कुसुमाग्रज 
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायिका - लता मंगेशकर

Tuesday, February 10, 2015

आई, मला पावसांत जाउं दे

 आई, मला पावसांत जाउं दे
 
आई, मला पावसांत जाउं दे
एकदांच ग भिजुनी मला चिंब चिंब होउं दे ॥धृ.॥

मेघ कसे हे गडगड करिती
विजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगें अंगणांत मज खूप खूप नाचुं दे ॥१॥

खिडकीखालीं तळें साचलें
गुडघ्याइतकें पाणी भरलें
तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग, लावुं दे ॥२॥

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडूकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करूं दे ॥३॥

धारेखालीं उभा राहुनी
पायानें मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी वाट्टेल तें होउं दे ॥४॥

गायक : योगेश खडीकर
गीतकार : वंदना विटणकर
संगीत : मीना खडीकर

आयुष्यावर बोलू काही

 आयुष्यावर बोलू काही
 
जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही।

तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्‌या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही।

हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे, कातर बोलू काही।

उद्याउद्याची किती काळजी? बघ रांगेतून र्
’परवा’ आहे उद्याच नंतर बोलू काही।

शब्द असु दे हातामध्ये काठी म्हणूनी
वाट आंधळी प्रवास खडतर! बोलू काही।

 कवी: संदीप खरे

अखेरचा हा तुला दंडवत

अखेरचा हा तुला दंडवत

अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव ॥धृ.॥

तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले
आता दे परि सारे सरले, उरलं मागं नाव ॥१॥

हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता, धरती दे गं ठाव ॥२॥

 गीतकार : शांता शेळके
संगीतकार :आनंदघन
गायक :लता मंगेशकर
चित्रपट :मराठा तितुका मेळवाव

कणा

कणा

'ओळखलंत का सर मला', पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी,
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून;
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून;
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली.
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले-
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे'
पैशाकडे हात जाताच हसत हसत उठला
'पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला-
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा-
पाठीवरती हात ठेऊन नुसते 'लढ' म्हणा.'

कवी - कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)

Monday, January 12, 2015

केंव्हा तरी पहाटे

केंव्हा तरी पहाटे

केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली मिटले चुकून डोळे, हरवून रात गेली
सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचेउसवून श्वास माझा, फसवून रात गेली
कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशीकळले मला न केव्हा, निसटून रात गेली
उरले उरात काही, आवाज चांदण्यांचेआकाश तारकांचे, उचलून रात गेली
स्मरल्या मला न तेव्हा, माझ्याच गीत पंक्तीमग ओळ शेवटाची, सुचवून रात गेली



  गीतकार  - सुरेश भट
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक - पद्मजा फेनानी
कलाकार - अर्चना जोगळेकर
चित्रपट - निवडुंग

जीवनात ही घडी

जीवनात ही घडी

जीवनात ही घडी अशीच राहू दे
रंगविले मी मनात चित्र देखणे

हळूच तुला बघण्याचा छंद आगळा
पाहू दे असेच तुला नित्य हासता

प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे

लज्जेचा त्याविणका अर्थ वेगळा
स्पशार्तून अंग अंग धूंद होऊ दे

जाऊ दे असाच काळ शब्द झेलता
मिलनात प्रेमगीत धन्य होऊ दे


चित्रपट- कामा पुरता मामा
गीतकार - यशवंत देव
संगीत - यशवंत देव
स्वर - लता मंगेशकर

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...