Wednesday, January 17, 2018

दिवस

दिवस

ओले-सुके,
चिंब-ओले
दिवस
वर्षभर धुवून,झटकून वाळत घातले.

काही खडखडीत वाळले,
चुरचुरीत झाले.

काही राहिले अर्धवट ओले,
अर्धवट कोरडे,
विचित्र वास देत राहिले.

काही उडून पडले
मोग-याच्या वेलावर
दरवळून गेले.

काही कॅक्टसमध्ये अडकले
भळभळले.

काही थारोळ्यात पडले
भिजकटले.

काही फुफाट्यात
अंगभर
धूळ माखले.

काही रस्त्यावर..
जड चाकांखाली
चेंगरले,
चिरडले.

काही दोरीवरच
शहाण्यासारखे
जस्सेच्या तस्से.

काही मात्र
पडले
काळजाच्या डोहात

आणखी ओले झाले,
भिजत,शहारत,
चमकत राहिले

ओल्या उबेत
ध्रुवपदासारखे
घोळत राहिले,

गवसणीतल्या सतारीसारखे
मूक झंकारत राहिले.

दिवस...दिवस..
वर्षभराच्या
दोरीवरचे..

दिवस... दिवस
ते दिवस..

   
कवयित्री - संजीवनी बोकील

No comments:

Post a Comment

खेळाचे पत्ते (भाग २ ) - श्री. मकरंद करंदीकर

गंमतीदार पत्ते, गंजिफा खेळ, नियम, इतिहास !!  # amazing_playing_cards   गेल्या शनिवारी याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर खूप जणांनी त्याचे क...