२००२ ते २०१५. तब्बल एक तपापेक्षाही जास्त काळ उलटलाय. कर्नाटकातल्या
दांडेली अभयारण्यातून वीस हत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात घुसले. अन्न आणि
पाण्याच्या शोधात. दोडा मार्ग तालुक्यातल्या मांगेली गावातून मानमार्गे ते
तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरले. इथे त्यांना खाण्यासाठी पुरेसं अन्न
होतं. तिलारी धरणातलं मुबलक पाणी पिण्यासाठी होतं. सगळीकडे चंगळच चंगळ.
तिथून हे हत्ती आणखी पुढे सरकले. माणगाव खोर्यातल्या सावंतवाडी आणि कुडाळ
तालुक्याकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला.
कोकणपट्टय़ातली ही गावं, त्यांच्या भोवतीची जंगलं आपापसांत वाटून
घेताना विसातल्या अकरा हत्तींनी या परिसरालाच आपलं घर मानलं. नऊ हत्ती
कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्याकडे रवाना झाले. तीन हत्तींनी
माणगावकडे कूच केलं आणि आपापल्या परगण्यांत त्यांनी स्वतंत्रपणे राज्य सुरू
केलं. या परिसरातली शेतीवाडी, पाणी, जंगल. सार्यांवर त्यांनी ताबा
मिळवला. त्यांच्या भीतीनं माणसंही त्यांच्यापासून लांब पळाली.
ही फक्त सुरुवात होती. त्यानंतर हळूहळू या हत्तींनी आपलं साम्राज्य
वाढवताना अख्खा सिंधुदुर्ग जिल्हाच आपल्या टापूखाली, ‘पायाखाली’ आणला आणि
माणूस अन् हत्ती यांच्यातल्या संघर्षाला सुरुवात झाली.
या एक तपात काय काय घडलं?
या हत्तींनी हजारो हेक्टर जमीन, शेती, बागायती अक्षरश: पायाखाली
तुडवली. नारळ, सुपारी, भातशेती, बांबू. अनेक उभी पिकं त्यांच्या पायाखाली
शब्दश: भुईसपाट झाली. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. काही गजराजांनी तर
थेट माणसांच्या घरातच पाऊल टाकलं. रात्री घराच्या भिंतींना धडका देऊन ही
घरंही पार उद्ध्वस्त करून टाकली.
या परिसरातून काढता पाय घ्यायला हत्तींचा नकार होता आणि त्यांनी
पुन्हा जंगलात परतावं यासाठी माणसांचा आटापिटा. या संघर्षात आतापर्यंत
तब्बल नऊ जण ठार झाले, अनेक जण जखमी झाले आणि पीकपाणी-घरगोठय़ांच्या आर्थिक
नुकसानीची तर गिनतीच नाही.
नागरिकांच्या रेट्यानंतर २00४ मध्ये वनखात्यानं ‘ऑपरेशन एलिफंट बॅक टू
होम’ ही मोहीम राबवली. पण या मुजोर हत्तींना पकडण्यासाठी अथवा त्यांना
माघारी धाडण्यासाठी कोणतीच सक्षम यंत्रणा महाराष्ट्राकडे नव्हती. त्यामुळे
त्यावेळी मदत घेण्यात आली ती कर्नाटकच्या एका खासगी पथकाची. हत्तींना पकडणं
शक्यच नव्हतं. जमलं तर त्यांना फक्त माघारी पिटाळून लावणं, एवढाच पर्याय
होता. पण वेळ आणि पैसा खर्च जाता त्यापेक्षा फार काही हाती आलं नाही.
हत्ती आणि माणसांचा संघर्ष फारच उग्र होऊ लागल्यावर, नागरिकांनीही
त्याविरुद्ध रस्त्यावर उतरायला सुरुवात केल्यानंतर सरकारनं आता हत्तींना
पकडण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माण खोर्यात ठाण मांडून बसलेल्या तीन
हत्तींना अगोदर पकडण्याचा आणि त्यांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेण्यात
आला. नागरी भागात धुमाकूळ घालणार्या जंगली हत्तींना हुसकण्याऐवजी त्यांना
पकडण्याची महाराष्ट्रातली आतापर्यंतची ही पहिलीच मोहीम.
पण या जंगली हत्तींना पकडणार तरी कसं? त्यासाठी ना पुरेसं मनुष्यबळ, ना प्रशिक्षित कर्मचारी, ना पैसा. महाराष्ट्रात तर यासाठी लागणारी अक्षरश: कोणतीच यंत्रणा नाही. शेवटी
परत एकदा कर्नाटकच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. जंगली हत्तींना पकडण्यात
वाकबगार असलेले डॉ. उमाशंकर, हत्तींना पकडण्याचा अनुभव असलेले कर्नाटक वन
विभागाचे सुमारे २५ कर्मचारी आणि चार प्रशिक्षित हत्ती. जंगलातला रस्ता
वगैरे दाखवण्यासाठी त्यांच्या मदतीला महाराष्ट्रातल्या (हत्ती पकडण्याबाबत
संपूर्णत: अननुभवी असलेल्या) सुमारे दोनशे वन कर्मचार्यांचा चमू !
आम्ही सगळे जंगलात घुसलो, त्याची ही थरारक गोष्ट.. धोका तसा बराच
होता आणि अनेक प्रकारच्या आडकाठय़ाही खूप. जंगलातला रस्ता. सोबतीला
संरक्षणासाठी तसं काहीच नाही. एका विशिष्ट र्मयादेपुढे जाऊ देण्यास वन
विभागाचाही नकार. तशात हे जंगली हत्ती. चुकून त्यांच्या समोर आलो तर
‘पायाखाली’ घातल्याशिवाय ते पुढे सरकणार नाहीत याची पक्की खात्री.
शिवाय अनेक प्रश्नही डोक्यात ठाण मांडून होतेच. हत्तींना कसं पकडणार?
मागील मोहिमेप्रमाणे आताही शासनाचा, लोकांचा पैसा वायाच जाणार का? लोकांना
शांत करण्यासाठी हा केवळ एक देखावा की खरंच प्रामाणिकपणे ही मोहीम राबवली
जाणार आहे?.
आम्ही काही पत्रकार मित्र वन विभागाच्या ‘सोबतीनं’ तरीही स्वतंत्रपणे
या मोहिमेवर निघालो, तेव्हा कुठे माहीत होतं या निबिड जंगलात आपल्याला काय
काय अनुभव येणार आहेत!.
सोमवार, दि. ९ फेब्रुवारी
दुपारचे बारा
कुडाळ तालुक्यातील आंबेरी येथील चेकनाका. येथे वन विभागाचा तळ होता.
हत्तींच्या पकड मोहिमेला येथूनच सुरुवात होणार होती आणि जंगली हत्तींना
पकडल्यानंतर पहिल्यांदा याच ठिकाणी आणलं जाणार होतं.
हे जंगली हत्ती आत्ता नेमके कुठे आहेत हे अगोदरच हेरून ठेवलं होतं. या
मोहिमेचे कर्नाटकातील मुख्य अधिकारी डॉ. उमाशंकर, हत्ती पकडण्याचा अनुभव
असलेले तिथलेच सुमारे २५ कर्मचारी, जंगली हत्तींना पकडण्यात अत्यंत कळीची
भूमिका निभावणारे कर्नाटकातलेच ‘अभिमन्यू’, ‘अर्जुन’, ‘गजेंद्र’ आणि
‘हर्ष’! हे चार प्रशिक्षित हत्ती. या मोहिमेचा म्होरक्या होता ‘अभिमन्यू’!
कारण त्याला या चक्रव्यूहात शिरण्याची, तो भेदण्याची रीत माहिती होती आणि
आपल्याच सैरभैर जंगली बांधवांना ‘पकडण्याचा’ त्याचा अनुभवही खूपच दांडगा!
नानेलीच्या जंगलात मोहीम सुरू झाली. हत्तींना पकडण्यासाठीचं मुख्य पथक
पुढे जंगलात गेलेलं होतं. या तळावर काही कर्मचार्यांनी मोर्चा बांधला
होता. ‘नाकेबंदी’ केली होती. वन विभागाचे कर्मचारी दबा धरून बसले होते. निबिड अरण्यात घुसणं अशक्य असल्यानं आम्ही नानेली येथील डोंगराच्या
पायथ्याशी थांबण्याचा निर्णय घेतला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती. केवळ
चार प्रशिक्षित हत्ती आणि डॉ. उमाशंकरांसारखा एकटा तज्ज्ञ माणूस! - काय
करतील ते? अर्थात डॉ. उमाशंकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला आतापर्यंत
शंभराच्या वर रानटी हत्तींना पकडण्याचा अनुभव होता! त्यामुळे आशाही वाटत
होती. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, उत्कंठा वाढत होती, त्या जंगलात वेळ
मात्र जाता जात नव्हता.
सायंकाळचे चार.
जंगलाच्या परिसरात राहणार्या एका स्थानिक ग्रामस्थाचा अचानक फोन आला.
‘ते जंगली हत्ती आता आमच्या भागात आहेत. आत्ताच दिसले!.’ - म्हणजे
अंदाजाच्या नेमक्या विरुद्ध ठिकाणी! आमच्या सोबतच्या वन विभागाच्या राखीव
पथकानं तातडीनं तिकडे मोर्चा वळवला.
आता काय करायचं?. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आधीच आमच्यावर लक्ष
ठेवून होते. जंगलात जाण्यापासून ग्रामस्थांनाही रोखण्यात आलं होतं. मग वन
विभागाबरोबर न जाता आम्ही खुष्कीचा मार्ग निवडला आणि जंगलातून मधल्या
वाटेने वन विभागाच्या राखीव पथकाच्या आधीच हत्ती असलेल्या डोंगरी भागात
पोहचलो. उन्हं आता उतरली होती, सूर्य मावळतीकडे सरकू लागला होता.
सायंकाळचे पाच.
डॉ. उमाशंकर यांचं मुख्य पथक हत्तींच्या मागावर होतंच. आणि कळलं,
शोधमोहिमेला गेलेल्या पथकानं तिघा जंगली हत्तींपैकी एकाला डार्ट मारला!
(डार्ट म्हणजे हत्तींना पकडताना वापरण्यात येणारं इंजेक्शन.) इतक्या वेळचा आमचा थकवा आणि वाट पाहून आलेला ताण क्षणात कुठल्या कुठे गायब झाला! आम्हीही लगेच आमची आयुधं सरसावली. कॅमेरे सज्ज केले. हत्तीला डार्ट
मारल्याचं कळल्याबरोबर वन विभागाचे सुमारे तीस कर्मचारी दोन्ही हातात
पाण्याचे पाच-पाच लिटरचे कॅन घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले. हत्तीला डार्ट मारल्यानंतर त्याच्या अंगात खूप उष्णता निर्माण होते.
त्याला गुंगीही येते. या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून डार्ट मारल्याच्या
ठिकाणी, हत्तीच्या अंगावर भरपूर गार पाणी टाकावं लागतं. नाहीतर क्वचित
त्याचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे ही सगळी खबरदारी.
सायंकाळचे सहा.
सुमारे तासभर आम्ही आमच्या कॅमेर्यांसह सज्ज होतो, पण पाण्याचे कॅन
घेऊन जंगलात गेलेलं राखीव पथक रिकाम्या हातानं, पण त्याच (भरलेल्या कॅनसह)
परतताना दिसलं!काय झालं असेल? थोड्याच वेळात कळलं, हत्तीला डार्ट तर मारला, पण हत्ती उन्मत्त झाले
आणि तिथून पुन्हा दुसरीकडे उधळले! या अपरिचित जंगलात डॉ. उमाशंकरही वाट
चुकले आहेत. काळजाचा ठोका चुकला! वेळ न दवडता आम्ही पुन्हा जंगलाच्या दुसर्या भागाकडे वळलो.
रात्रीचे साडेसात.
चांगलाच काळोख पडला होता. या अंधारात हत्तींना पकडणं अशक्यच होतं. आता
ही मोहीम आजच्यापुरती थांबवली जाईल असं वाटत होतं. परत फिरावं? पण डार्ट
मारलेल्या हत्तीचं काय? उधळलेल्या उन्मत्त हत्तींचं काय? काही बरंवाईट तर
घडलं नसेल? आणि डॉ. उमाशंकरांचं काय? ते सापडले की नाहीत? - असंख्य
प्रश्नांनी डोक्यात फेर धरला होता. या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय
जंगलातून हलायचं कसं? आम्ही तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला.
रात्रीचे आठ.
कळलं, राखीव पथकाला पुन्हा जंगलात बोलावलं आहे. राखीव पथक जंगलात रवाना झालं.
बुधवार, दि. ११ फेब्रुवारी
रविवार, दि. १५ फेब्रुवारी
निबिड जंगलात, रात्रीच्या अंधारात. नेमकं काय झालं होतं ?
कसं पकडतात जंगली हत्तींना?
रात्रीचे साडेनऊ.
मोहिमेचं नेमकं काय झालं, काहीच कळत नव्हतं. मोहीम जर थांबवली असती तर
जंगलात गेलेले चार प्रशिक्षित हत्ती आणि डॉ. उमाशंकर एव्हाना परतायला हवे
होते. मात्र, त्यांचा अजून पत्ता नव्हता. दिवसभराची पळापळ, जंगलात फिरून
भूकही लागली होती. परंतु माणगावसारख्या ग्रामीण भागात रात्री साडेनऊच्या
दरम्यान जेवण कुठे मिळणार? जेवणासाठी बाहेर गेलो आणि वेळ लागला तर.. शिवाय
याच दरम्यान मोहिमेवरचे कर्मचारी परतले तर?
रात्रीचे दहा.
आम्ही पुन्हा जंगलाच्या दिशेनं निघालो. रस्त्यात कळलं, एका जंगली
हत्तीला पकडण्यात यश आलं आहे आणि पथक त्याला घेऊन आता रात्रीच आंबेरी
तळाकडे येतं आहे. आम्ही पुन्हा वाट बदलली.
रात्रीचे साडेअकरा.
ज्या मार्गानं हे पथक येणार होतं त्या रस्त्यावर आम्ही तळ ठोकला.
वातावरणात ताण होता. प्रत्येकाला थांबवलं जात होतं. प्रत्येक वाहनाची कसून
चौकशी होत होती. येईलच आता एवढय़ात पथक, साखळदंडानं बांधलेल्या त्या हत्तीला
आपण कॅमेर्यात बंदिस्त करू. आम्ही वाट पाहत बसलो होतो. आजूबाजूचा काळोख
गडद होत होत आता मिट्ट अंधार झाला होता.
रात्रीचे दोन.
सकाळी दहा वाजता जंगलात शिरलेलं पथक हत्तींसह परत येताना दिसू लागलं.
रानटी हत्तीला दोरखंडानं बांधण्यात आलं होतं. इतके थकूनही प्रसन्न मुद्रेचे
डॉ. उमाशंकर, माहूत, वन विभागाचे कर्मचारी असा जवळपास ५0 जणांचा ताफा
होता. बंदिस्त हत्तीसह डॉक्टरांना सहीसलामत पाहिल्यानंतर ताण निवळला. या
रानटी हत्तीला डार्ट मारल्यानंतर त्याला ग्लानी आली होती. तशाही परिस्थितीत
सुटका करून घेण्यासाठी तो आटापिटा करत होता. परंतु ते शक्य नव्हतं.
‘अभिमन्यू’च्या नेतृत्वाखालील प्रशिक्षित हत्तींनी त्याला चारही बाजूंनी
घेरलं होतं. या रानटी हत्तीच्या पुढे माहूत असलेला एक हत्ती. त्याच्या
डाव्या आणि उजव्या बाजूला माहूत असलेले दोन हत्ती आणि मागे आणखी एक. त्याचे
पाय साखळदंडानं बांधलेले होते. आंबेरीतील वनतळाकडे त्याला आणलं जात होतं.
आम्हाला बजावण्यात आलं, या अंधारात हत्तीचे फोटो काढू नका, त्याच्या
डोळ्यावर फ्लॅश पडता कामा नये, नाहीतर तो पुन्हा उन्मत्त होईल. दरम्यान,
आजूबाजूचे सारे दिवे विझवण्यात आले. पथदीप बंद करण्यात आले. हत्तींच्या
मार्गावरचा वीजप्रवाह खंडित करण्यात आला.
पाच हत्ती एकाचवेळी चिंचोळ्या रस्त्यावरून मध्यरात्री नेणं म्हणजे
मोठी जिकिरीची आणि तितकीच धोकादायक बाब होती. मार्गावर असलेले विजेचे खांब,
वीजवाहिन्या, मोठी झाडं आदि अडथळे पार करत दोन किलोमीटरचं अंतर
कापण्यासाठी तब्बल चार तास लागले.
मध्यरात्रीचे तीन.
सार्या लवाजम्यासह पथक आंबेरी वनतळावर पोहोचलं आणि पकडलेल्या हत्तीला
क्रॉलकडे नेण्यात आलं तेव्हा सगळेच खूप थकले होते. (क्रॉल म्हणजे जाड
घेरांचे लांब ओंडके एकमेकांवर उभारून तसेच जमिनीत ठेचून त्यापासून तयार
केलेला मजबूत असा चौकोनी तुरुंग.)
सकाळी १0 वाजता सुरू झालेली मोहीम रात्री ३ वाजता संपली आणि पहाटे
चार वाजण्याच्या सुमारास आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
१७ तासांच्या अथक प्रयत्नांची मोहीम अखेर फत्ते झाली. एकूण दहा दिवसांची ही मोहीम. आज मंगळवार; विश्रांतीचा दिवस होता. बुधवारी पुन्हा मोहीम सुरू होणार होती.
बुधवार, दि. ११ फेब्रुवारी
डॉ. उमाशंकर यांचं पथक सकाळी पुन्हा निवजे येथील जंगलात गेलं.
सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी उर्वरित दोघांपैकी आणखी एका हत्तीला
अवघ्या पाच तासांत जेरबंद केल्याचं समजलं. माणगाव खोर्यात केवळ तीनच जंगली
हत्ती होते. पण गेल्या काही वर्षांत त्यांनी सार्यांनाच सळो की पळो करून
सोडलं होतं. या परिसरात आता आणखी एकच जंगली हत्ती आहे. पण तो सुळेवाला
हत्ती ‘टस्कर’ आहे का, की अगोदर पकडलेल्या हत्तींमधलाच एखादा ‘टस्कर’ आहे
हे अजून स्पष्ट झालेलं नाही. इथल्या लोकांनी ‘टस्कर’चा खूपच धसका घेतला
आहे. अतिशय खतरनाक म्हणून त्याची कुख्याती आहे. कळपातील एक मादी मरण
पावल्यापासून हा हत्ती पिसाळला असून, त्यानं माणसांवर हल्ले सुरू केले
आहेत.
आता पुढचे दोन दिवस गुरुवार आणि शुक्रवार मोहीम बंद ठेवली जाणार आहे.
कारण जंगली हत्तींना पकडल्यानंतर त्यांना ज्या ‘क्रॉल’मध्ये ठेवलं जातं
त्याच्या उभारणीचं काम सुरू आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत हे काम पूर्ण होईल
आणि शनिवारी मोहिमेला पुन्हा सुरुवात होईल.
रविवार, दि. १५ फेब्रुवारी
या परिसरात एकट्याच उरलेल्या या जंगली हत्तीनं शनिवारी तर पथकाला
गुंगारा दिला, पण आज सायंकाळी सहाच्या सुमारास ‘अभिमन्यू’च्या नेतृत्वाखाली
त्याला पकडण्यात आलं! एक तपाचा अध्याय निदान या भागापुरता तरी संपला!
मोहीमही संपली!
सिंधुदुर्ग परिसरात गेली काही वर्षं ज्या हत्तींनी दहशत माजवली
होती तेच हत्ती आता ‘मित्र’ आणि ‘सहकार्या’च्या रूपात नागरिकांना पाहायला
मिळू शकतील. कारण, आता त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन ‘माणसाळवण्याचा’
प्रयोग सुरू झाला आहे.
निबिड जंगलात, रात्रीच्या अंधारात. नेमकं काय झालं होतं ?
डॉ. उमाशंकर यांच्या पथकानं जंगलात संध्याकाळी रानटी हत्तींना हेरलं
आणि त्यातील एकाला ‘डार्ट’ही (इंजेक्शन) मारला. मात्र त्यानंतर ते दोन्ही
हत्ती बिथरले आणि जंगलात सैरावैरा पळू लागले. त्यातच प्रशिक्षित हत्तींचा
म्होरक्या ‘अभिमन्यू’ वगळता अन्य तीनही प्रशिक्षित हत्ती जंगलात
एकामेकांपासून वेगळे झाले. याच दरम्यान डॉ. उमाशंकर यांच्याकडे असलेली
टॉर्चदेखील डिस्चार्ज झाली आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला.
ज्या हत्तीला डार्ट मारण्यात आला होता, त्यानं ‘अभिमन्यू’शी थेट
युद्धच पुकारलं. बराच वेळ त्यांची झुंज सुरू होती. रात्रीच्या वेळी जंगलात
एक ते दीड तास हे थरारनाट्य सुरू होतं. प्रसंग अतिशय बाका होता. जंगली
हत्तीशी ‘अभिमन्यू’ एकटा लढत होता आणि त्याचे तिन्ही सहकारी हत्ती वाट
चुकले होते. रात्रीचा अंधार होता. डॉक्टर उमाशंकरांच्याही मदतीला कुणी
नव्हतं. पण त्यांनी प्रसंगावधान राखलं. डार्ट मारलेल्या हत्तीची पाठ
त्यांनी सोडली नाही. आपल्या मोबाइलच्या बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी पुन्हा
सर्वांना एकत्र आणलं. पथकातील अर्जुन, गजेंद्र आणि हर्ष या तीन प्रशिक्षित
हत्तींच्या मदतीनं या रानटी हत्तीवर ताबा मिळवून त्याला जेरबंद केलं!.
कसं पकडतात जंगली हत्तींना?
रानटी हत्तींना पकडण्यासाठी प्रशिक्षित हत्तींची (कुणकी) गरज असते.
प्रशिक्षित हत्ती रानटी हत्तींना अडवून घेरतात. त्यानंतर जवळूनच हत्तीला
‘डार्ट’ (इंजेक्शन) मारलं जातं. त्यामुळे हत्तीला ग्लानी यायला लागते.
हत्ती प्रथम पळण्याचा प्रयत्न करतो व शेवटी एका ठिकाणी थांबतो. अशा वेळी
कुणकी हत्तींच्या मदतीनं त्याला जेरबंद केलं जातं. दोरखंड बांधून कुणकी
हत्ती त्याला खेचत, ढकलत इच्छित स्थळी घेऊन जातात. रानटी हत्तीला मोठय़ा
झाडाला बांधलं जातं वा ‘क्रॉल’ तयार करून त्यात डांबण्यात येतं.
हत्ती अत्यंत बुद्धिवान तेवढाच अजस्त्र प्राणी. त्याला प्रशिक्षित
करणंही तेवढंच जिकिरीचं. परंतु दोन ते चार महिन्यांत त्यांना योग्य
प्रशिक्षण देऊन तयार केलं जातं.
(लेखक लोकमतच्या सिंधुदुर्ग आवृत्तीचे प्रमुख आहेत.)
- लोकमत
दि. २१/०२/२०१५, शनिवार
No comments:
Post a Comment