
२५०० वर्षांपूर्वी माणसाला लिहिता-वाचता येत नव्हतं. अशा वेळेस स्वत:चं मनोरंजन करण्यासाठी मानवानं दगडामध्ये कोरीव काम करायला सुरुवात केली. हे काम आकर्षक दिसावं म्हणून त्यात कोळशाची बारीक पूड भरायला सुरुवात केली. अशा प्रकारे कोळशाच्या पुडीचा उपयोग रंग तयार करण्यासाठी होऊ शकतो असं लक्षात आलं. इजिप्तमधील लोकांनी कोळशाच्या पुडीत डिंक मिसळून काळा रंग तयार केला. या रंगाचा वापर कागदावर लिहिण्यासाठी केला. डिंक वापरल्यामुळं ही शाई खूपच घट्ट झाली. कागदावर शोषली जाणारी, प्रवाही शाई करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. ओक झाडाच्या फांद्यांवर गाठी असतात. या गाठींची भुकटी वापरून शाई तयार केली. या शाईला लोकांची पसंती मिळाली. हा साधारण अकराव्या शतकानंतरचा काळ असेल. त्या काळात मुद्रणाचा शोध लागला नव्हता. चौदाव्या शतकात मुद्रणाचा शोध लागला आणि मुद्रित शाई कागदावर उमटली.
मुद्रणाची शाई, लिखाणाची शाई असे शाईचे प्रकार विकसित झाले. लिखाणाची म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर लाल शाई, निळी शाई, काळी शाई असे वेगवेगळे प्रकार येतात. कारण आपल्याला फक्त शाईच्या रंगातील फरक दिसतो. त्या शाईचं अंतरंग दिसत नाही.
शाईचे अंतरंग

आयर्न-गॉल या शाईत ओक झाडाच्या खोडावरील गाठीची पूड असते. या गाठी म्हणजे गॉल. याशिवाय फेरस सल्फेट हा महत्त्वाचा रासायनिक पदार्थ वापरतात. लोखंडाला इंग्रजीत आर्यन म्हणतात. लोखंडाचे लॅटीन भाषेतील नाव फेरस. या दोन महत्त्वाच्या पदार्थामुळेच या शाईला आयर्न-गॉल शाई असं नावं दिलं आहे. गाठींमध्ये टॅनिक आम्ल असते. टॅनिक आम्लाची फेरस सल्फेटबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन फेरस टॅनेट आणि सल्फ्युरिक आम्ल तयार होतं. फेरस टॅनेट पाण्यात विरघळतं. हे कण पाण्यात विरघळतात आणि कागदावर शोषले जातात, फेरस टॅनेटचे कण हवेच्या संपर्कात आले की हवेतील ऑक्सिजनशी त्याची अभिक्रिया होते. या अभिक्रियेत फेरस टॅनेटचं फेरिक टॅनेटमध्ये रूपांतर होतं. त्यामुळं शाईचा रंग प्रमाणापेक्षा जास्त गडद होतो. ही समस्या दूर करण्यासाठी थोडय़ा प्रमाणात ऑक्सिडीकरण कमी होईल असे पदार्थ मिसळतात. या अभिक्रियेत तयार झालेल्या सल्फ्युरिक आम्लामुळं शाईमधील आम्लाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पेनची निब खराब होते. आम्लाचं प्रमाण कमी करण्यासाठी शाईत कधी कधी अंडय़ाच्या कवचाची बारीक पूड घालतात. अंडय़ाच्या कवचात कॅल्शिअम काबरेनेट हे आम्लारी किंवा अल्कधर्मी रसायन असतं, त्यामुळं शाईतील आम्लाचं प्रमाण कमी होतं.
अॅनिलीन या प्रकारची शाई प्लॅस्टिकवर छपाई करण्यासाठी वापरतात. शिवाय मिथिल अल्कोहॉल, रेझिन, लाख हेही पदार्थ वापरलेले असतात.
शाईचे प्रकार

कागदाचा पृष्ठभाग असो
किंवा प्लॅस्टिक असो, शाई वाळणं महत्त्वाचं असतं. बाष्पीभवनानं शाई वाळते
तेव्हा हवेतील ऑक्सिजनचा परिणाम होतो आणि ऑक्सिडीकरणाची क्रिया होते. शाई
वाळण्याची क्रिया लवकर होण्यासाठी या शाईत वनस्पती तेल आणि रेझिन यांच्या
मिश्रणातून तयार केलेला ओलिओरेझीन हा पदार्थ वापरतात. या प्रकारच्या शाईला
'डिकॅल्कोलेनिया शाई' असे म्हणतात.
स्टॅम्प पॅडसाठी शाई वापरताना अशी
शाई वापरणे अपेक्षित असते की जी शाई स्टॅम्प पॅडच्या पृष्ठभागावर ओलीच
राहिली पाहिजे. पण कागदावर छापली गेली की वाळली पाहिजे. या शाईत इंडय़ुलीन
ब्लॅक या प्रकारातील रंजकद्रव्य वापरलेली असतात.
संगणकाच्या प्रिंटरमध्ये दंडगोलाकर आकाराचा एक भाग असतो. या दंडगोलावर कोरडी किंवा
द्रवरूपातील शाई पसरवलेली असते. प्लॅस्टिकची अत्यंत बारीक पूड करून त्यात
रेझिन मिसळलेलं असतं. ही शाई कोरडी असते. द्रवरूपातील शाई तयार करताना
आयसोपॅराफेनिक हायड्रोकार्बनचा वापर केलेला असतो.
एखादा संदेश फक्त
विशिष्ट व्यक्तीलाच समजावा अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही अदृश्य शाई
वापरू शकता. या शाईत दूध, फळांचा रस, साखरेचं द्रावण अशा पदार्थाचा उपयोग
केलेला असतो. या पदार्थानी लिहिलेली अक्षरं वाळल्यावर दिसत नाहीत. मात्र
त्याला उष्णता दिल्यावर तपकिरी रंगाची अक्षरं दिसू लागतात. पोटॅशियम
फॅरोसायनाइड किंवा टॅनिक आम्ल या रसायनांनी लिहिलेली अक्षरं रंगहीन दिसतात.
पण फेरिक क्लोराइड, फेरिक अलॅम या रासायनिक पदार्थामुळे हीच अक्षरं दिसू
लागतात.
- कुतूहल (नवनीत, लोकसत्ता)
दि. १२ - १५ सप्टेंबर, २०१४
No comments:
Post a Comment